‘तरुण पिढी मराठी साहित्यापासून दूर गेली आहे, मराठीचं काही खरं नाही’ अशी ओरड नेहमीच केली जाते. आजच्या मराठी भाषा दिनी थोडी वेगळी बाजू मांडायचा हा प्रयत्न..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सागर कळसाईत याची ‘कॉलेज गेट’ नावाची मराठी कादंबरी दोन वर्षांपूर्वी प्रकाशित झाली असून महाविद्यालयीन तरुणाईकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सागरने पुण्याच्या मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून अभियांत्रिकीची पदवी घेतली असून सध्या पुढच्या कादंबरीच्या लेखनाबरोबर तो एका कॉर्पोरेट कंपनीत नोकरी करत आहे. एका नवोदित तरुण मराठी लेखकाची पहिली कादंबरी प्रकाशिक होताना त्याला कुठल्या पातळीवर काय काय संघर्ष करावा लागतो (आणि आजच्या काळातल्या या शहरी संघर्षांचं बदललेलं स्वरूप कसं असतं) यावर प्रकाश टाकणारं एक मनोगत.  

‘कॉलेज’ एक असं ठिकाण जिथे सर्वात जास्त प्रेमकहाण्या पाहायला, ऐकायला,अनुभवायला मिळतात. इथे प्रत्येक तरुणाला एक प्रश्न नक्कीच पडतो की, तिच्याशी माझी फक्त मत्री आहे की हे प्रेम आहे? माझ्याही कॉलेज जीवनात मला हा प्रश्न सतावत होता. पण या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं आणि एक वेगळंच नातं समोर आलं. मत्री आणि प्रेम या दोन्ही नाण्याच्या विरुद्ध बाजूंना जोडून ठेवणारं एक निखळ नात अनुभवायला मिळालं. मत्री की प्रेम या गुंत्यात अडकलेल्या माझ्यासारख्याच अनेक तरुणांना यातून मुक्त करण्यासाठी आणि कॉलेज जीवन संपल्यानंतर सर्व मित्रांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी हाती पेन घेतलं. मोडक्या मोडक्या शब्दांमध्ये लिखाणास सुरुवात केली आणि तब्बल ११ महिने १ दिवस उलटल्यावर एक कादंबरी लिहून पूर्ण झाली. या लिखाणात बराच संघर्षही करावा लागला. तो पुस्तक प्रकाशनाच्या वेळीही चालूच राहिला. जवळ जवळ १७ प्रकाशकांनी दिलेला नकार पचवल्यानंतर ‘कॉलेज गेट’ कादंबरी प्रकाशित झाली.

कादंबरी केवळ जन्माला घालून चालत नाही. त्याचं पालन पोषणही करावं लागतं. माझी कादंबरी मराठी तरुणाईपर्यंत पोचवण्यासाठी आम्ही मित्रांनी महाविद्यालयांजवळच्या रस्त्यावर उभे राहून प्रसिद्धी केली. साहित्य संमेलनातून वाचक जोडले. त्यामुळे अवघ्या सहा महिन्यातच कादंबरीच्या तीन आवृत्त्या प्रकाशित झाल्या.

अर्थात, फक्त जन्म देऊन चालत नाही, त्याचं पालन-पोषणही करावं लागतं. कादंबरी जन्माला येऊन २ महिने उलटले तरी फक्त ७०-७५ प्रतीच विकल्या गेल्या होत्या. मग पुन्हा आम्ही सर्व मित्रांनी मिळून कादंबरी प्रत्येक तरुणापर्यंत आणि मराठी वाचकापर्यंत पोहचविण्याचा ठाम निश्चय केला. पुण्याच्या फग्र्युसन कॉलेज रस्त्यावर आम्ही एके सायंकाळी पुस्तकाचा स्टॉल उभा केला. स्टॉल म्हणजे खरं तर हातात पुस्तक घेऊन आम्ही रस्त्यावर उभे होतो. येणाऱ्या-जाणाऱ्या गर्दीला अगदी तळमळीने कादंबरीविषयी सांगत होतो. सायंकाळी ६.३० ते रात्री ११ पर्यंत आम्ही तिथे उभे होतो, विक्री करत होतो. पहिल्या दिवसापेक्षा पुढचे २-३ दिवस लोकांकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळू लागला. ३ दिवसांमध्येच शंभराहून अधिक प्रती विकल्या गेल्या. मग आम्ही फक्त एफसी रस्त्यावरच नव्हे तर पुण्यातील बऱ्याच महाविद्यालयांत जाऊन तरुणांपर्यंत कादंबरी पोहचविली. मग पुण्याच्या बाहेरही आणि साहित्य संमेलनातही आमची घोडदौड चालूच राहिली. कादंबरीच्या माध्यमातून फक्त वाचकच नव्हे तर नवीन मित्रही बनू लागले, जोडले जाऊ लागले. संपूर्ण महाराष्ट्रभरातून अभिप्राय येऊ लागले. अगदी परदेशातून मराठी वाचकांचे काही अभिप्राय मिळाले. मित्रांच्या साथीने आणि चपराक प्रकाशनाचे संपादक घनश्याम पाटील सरांमुळे अवघ्या ६-७ महिन्यांमध्येच कादंबरीच्या तीन आवृत्या प्रकाशित झाल्या. जोडल्या गेलेल्या प्रत्येक वाचकानेही आपापल्या पद्धतीने कादंबरी पुढे पोहचविली. मीडियानेही चांगली दखल घेतली.
कादंबरीवर मराठी वाचकांनी एवढं भरभरून प्रेम केलं की, त्यावर एक मराठी चित्रपटही बनविण्याचा योग आला. लवकरच चित्रपटाच्या दृष्टीने काम सुरू होईल. त्याचबरोबर माझी दुसरी कादंबरी-‘लायब्ररी फ्रेंड’ हीसुद्धा प्रकाशनाच्या मार्गावर आहे.
‘कॉलेज गेट’च्या यशाचे खरे हक्कदार म्हणजे मला या प्रवासात मिळालेली माणसं आहेत. ज्ञात-अज्ञात वाचक, माझे मित्र, चपराक परिवार आहेत. या सर्वाबरोबरच माझ्या कुटुंबाने माझ्यावर जो विश्वास दाखविला त्याचं हे फळ आहे.        
सागर कळसाईत -viva.loksatta@gmail.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi novel college gate get good response from college youth
First published on: 27-02-2015 at 02:00 IST