News Flash

मातीशी मैत्री

सध्या बाजारातील महागाई आणि लोकांचा बदलता कल यामुळे प्रत्येक जण पीओपीच्या मूर्तीकडे वळतो आहे.

: निलेश अडसूळ

सध्या बाजारातील महागाई आणि लोकांचा बदलता कल यामुळे प्रत्येक जण पीओपीच्या मूर्तीकडे वळतो आहे. पण अशातूनही स्वत:चे वेगळेपण सिद्ध करणारे मातीकाम करणारे अवली कलाकार आपल्या कलेने समाजमाध्यमांवर प्रसिद्धी मिळवत आहेत. त्यातही तरुण कलाकार मातीतून विविध गणेशरूपे साकारण्यात आघाडीवर आहेत. पर्यावरणाशी सौहार्द साधत गणेशाची सुबक, सुंदर रूपे साकारण्याची ओढ तरुणांनाही लागली असून अनेक विद्यार्थी स्वत: मूर्तिकारांकडे ही कला शिकण्याची इच्छा व्यक्त करताना दिसतात.

आषाढ मास सुरू झाला की, शाळेच्या रस्त्यावर एक मंडप उभा राहायचा. त्या बंद मंडपाची ताडपत्री सरकवून डोकावण्याची मजाच काही वेगळी असायची. कारण आम्हा शाळकऱ्यांना कायम आकर्षण असायचे ते मातीच्या गोळ्यातून घडणाऱ्या त्या गोड गणेशमूर्तीचे. कामाला सुरुवात होताच महिन्याभरात सगळा कारखाना गणपतीमय होऊन जायचा. आणि आम्ही तासन्तास त्या मंडपाबाहेर उभे राहायचो. हे सगळे आठवायचे कारण म्हणजे सध्या बाजारातील महागाई आणि लोकांचा बदलता कल यामुळे प्रत्येक जण पीओपीच्या मूर्तीकडे वळतो आहे. पण अशातूनही स्वत:चे वेगळेपण सिद्ध करणारे मातीकाम करणारे अवली कलाकार आपल्या कलेने समाजमाध्यमांवर प्रसिद्धी मिळवत आहेत. त्यातही तरुण कलाकार मातीतून विविध गणेशरूपे साकारण्यात आघाडीवर आहेत. पर्यावरणाशी सौहार्द साधत गणेशाची सुबक, सुंदर रूपे साकारण्याची ओढ तरुणांनाही लागली असून अनेक विद्यार्थी स्वत: मूर्तिकारांकडे ही कला शिकण्याची इच्छा व्यक्त करताना दिसतात.

गणेशाची नाना रूपे, नाना बैठकी, बालगणेश, चित्रकृती आणि संकल्पनेवर आधारित किंवा काही विशेष मूर्ती साकारण्यासाठी शाडूच्या मातीचाच वापर करावा लागतो. तसे हे काम फार किचकट स्वरूपाचे आणि वेळखाऊ  असल्याने मूर्तिकारांनी आकारलेले मूर्तीचे दर ग्राहकांना महागडे वाटतात. परंतु माती आणून, ती भिजवून, मळून, त्याला आकार देऊन सुबक आणि सुंदर मूर्ती घडवणे सोपे नव्हे. गेल्या काही वर्षांत समाजमाध्यमांतून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घरी आणण्याचा संदेश दिला जातो. परिणामी लोकही आता शाडूच्या मूर्तीकडे वळले आहेत. यात वैशिष्टय़ आहे ते मूर्तिकार विशाल शिंदे यांच्या मूर्तीचे. मूर्तीतील जिवंतपणा आणि दैनंदिन प्रसंगांशी घातलेली सांगड पाहताना डोळे दिपून जातात. त्यांनी साकारलेला बालगणेश कधी आईला मोदक भरवत असतो, कधी उंदरांची शेपटी ओढत असतो तर कधी नंदीच्या पाठीवर बसून खेळत असतो. आपल्या मूर्तिकलेविषयी आणि व्यवसायाविषयी बोलताना ही कला आपल्याला वडिलांकडून मिळाली, पण यावर संस्कार मात्र जे जे स्कूल ऑफ आर्टच्या पाच वर्षांत घडले, असं सांगतात. चाळ संस्कृतीतल्या मध्यमवर्गीय जीवनात मूर्तिकार म्हणून त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाल्याने मूर्ती घडवताना कायम लहान मुले आजूबाजूला खेळत असायची. आणि ते पाहताना गणपती असा खेळू लागला तर .. ही संकल्पना डोक्यात आली आणि कामाला लागलो. कालानुरूप त्यात बदल होत गेले. आज मूर्तीमध्ये असलेला जिवंतपणा, मानवी हावभाव, दागिन्यांची ठेवण, वस्त्रे नेसवण्याची पद्धत या गोष्टी जेजेमध्ये आत्मसात केल्या, असे त्यांनी सांगितले. आज त्यांच्या मूर्ती प्रसिद्ध आहेत, मात्र त्यावर समाधान मानण्यापेक्षा जोवर माझे समाधान होईल, अशी मूर्ती साकारत नाही तोवर ती पूर्ण झाली असे मी मानत नाही. म्हणूनच ग्राहकांच्या चेहऱ्यावरही समाधान दिसतं. सध्या कामाचा व्याप इतका वाढला आहे की काही ठरावीक मूर्तीनंतर मला ऑर्डर थांबवावी लागते, असं ते सांगतात. आपण एकमेकांशी शब्दाने बोलत असलो तरी डोळ्यांनीही संवाद सुरू असतो. तेच गणित मूर्ती घडवताना लक्षात घेतले की डोळ्यांच्या रेखीव आखणीतून मूर्ती अधिक बोलकी होते, असं सांगणाऱ्या विशाल यांच्या कारखान्यात बरीच मुलं मूर्तिकाम शिकण्यासाठी येतात.

हा व्यवसाय असला तरी हे आमचे कुटुंब आहे. मूर्ती घडवताना आजही मला वडिलांची भक्कम साथ मिळते. ते स्वत: माझ्यासोबत काम करतात, हे सांगतानाच या व्यवसायातील आर्थिक बाजूही ते समजावून सांगतात. ‘शाडूच्या मूर्ती महाग असल्या तरी लोक पैसे देतात, पण त्यासाठी आपणही त्यांना सुंदर गणेशमूर्ती घडवून द्यायला हवी. हा माझा बारमाही व्यवसाय आहे. भाद्रपदातील गणपती जाताच काही दिवसांत आमची माघी गणेशोत्सवाची तयारी सुरू होते. वर्षांला साधारण ४०० मूर्ती आम्ही घडवतो. त्यात १ फुटापासून ते ३ फुटांपर्यंतच्या मूर्ती असतात. मूर्ती कशी, किती उठून दिसते त्यावर त्याची किंमत ठरते. साधारण ८ हजारांपासून ते पन्नास हजार रुपये किमतीच्या मूर्ती आमच्याकडे बनवल्या जातात’, असे त्यांनी सांगितले.

धारावीतील मूर्तिकार महेश कदम सांगतात, शाळेत जाण्याच्या मार्गावर एक गणेश कार्यशाळा लागायची. माझे मन तिथेच जास्त रमायचे. तिथे मूर्ती बघायच्या आणि घरी जाऊन मूर्ती बनवण्याचा प्रयत्न करायचा असे सुरू होते. एक दिवस तिथले मूर्तिकार देवजी शिंदे यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला आणि माझ्या कामाला चालना मिळाली. सुरुवातीला नातेवाईकांचे गणपती घडवायचो. त्यानंतर माहीमचे मूर्तिकार केतन विंदे यांच्या कारखान्यात वर्षभर शिक्षण घेतले आणि २००८ साली वयाच्या १५ व्या वर्षी स्वत:ची कार्यशाळा सुरू केली. मूर्तिकामासोबतच मी रुईया महाविद्यलयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. या क्षेत्रात शिकण्यासारखे बरेच काही आहे. मूर्तिकाराने डोळसपणे सगळीकडे पाहायला हवे, त्यातूनच नवनवीन संकल्पना आणि काय  वेगळे करता येईल याची प्रेरणा मिळत जाते. या क्षेत्रात काम करताना हटकर, तांडेल गुरुजी, केतन विंदे, विशाल शिंदे असे अनेक मूर्तिकार गुरुस्थानी आहेत. याच व्यवसायावर माझी उपजीविका समर्थपणे सुरू आहे. अर्थात त्यात मला आईवडिलांची भक्कम साथ आहे, असं ते म्हणतात.

ट्री गणेशाचे अभिनव पाऊल

रहेजा महाविद्यालयातून पदवी मिळवलेला दत्तात्रय कोतुर याने मुंबईमध्ये ट्री गणेशाचा अभिनव उपक्रम राबवला आणि बघता बघता त्याच्या गणेशमूर्तीची संख्या दोन हजारांहून अधिकच्या घरात गेली. दत्ता सांगतो, शाळेपासूनच मातीकामाची आवड असल्याने घरचा गणपती घरीच बनवण्याचे प्रयत्न केले. पुढे मूर्तिकार विशाल शिंदेंच्या कार्यशाळेत शिकत राहिलो. मूर्ती व्यवसायाला सुरुवात करून काही वर्ष लोटल्यानंतर काहीतरी वेगळे करण्याचे मनात होते. लाल मातीपासून गणेशमूर्ती साकारावी या उद्देशाने माझे प्रयोग सुरू झाले. प्रयोग यशस्वी झाला, परंतु लाल मातीसोबत जर आपण एक बीज लावले तर खऱ्या अर्थाने आपल्याला पर्यावरणपूरक काहीतरी करता येईल. या कल्पनेतून ‘ट्री गणेशा’ जन्माला आला. आमच्या मूर्तीत ना भारी रंगकाम, ना वेगवेगळे अवतार. केवळ मातीच्या लाल मूर्ती आणि त्यावर रेखलेले डोळे, असे असतानाही या मूर्ती लोकांना भावल्या, असं तो सांगतो.

अभियांत्रिकी शिक्षण घेतलेला भूषण कानडे सध्या कागदी गणेशमूर्ती घडवून पर्यावरण रक्षणाला हातभार लावतो आहे. वडिलांकडून मूर्तिकलेचे धडे गिरवलेल्या भूषणने काही वर्षांपूर्वी एका शिबिरातून कागदी लगद्यापासून गणेशमूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. वृत्तपत्रांचा कागद, झाडाचा डिंक, खडूची भुकटी आदी घटकांचा वापर करून या मूर्ती साकारल्या जातात. विशेष म्हणजे या व्यवसायाची सुरुवात आम्हाला उन्हाळ्यात करावी लागते, असे भूषण सांगतो. कागद हा आद्र्रता शोषून घेणारा पदार्थ असल्याने या मूर्ती पावसाळा सुरु होण्याच्या आधीच सुकवून ठेवाव्या लागतात. एप्रिल – मे  महिन्याच्या कडक उन्हाळ्यात ही सुकवण्याची प्रक्रिया सुरू असते. सुरुवातीला लोकांनी याला फारसा प्रतिसाद दिला नाही, कारण पीओपीच्या तुलनेने महाग असलेल्या या मूर्ती थोडय़ा कमी आकर्षक दिसायच्या. परंतु, भूषणने त्यावर मात क रून आकर्षक मूर्ती घडवल्या आहेत. आता याबाबतीत लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली असून दरवर्षी ग्राहकांच्या संख्येत वाढ होत असल्याचे तो सांगतो. आमच्याकडे ९ इंचांपासून ते ३ फुटांपर्यंत घरगुती मूर्ती उपलब्ध आहेत. अडीच हजारांपासून ते दहा हजारांपर्यंत या मूर्तीची किंमत असून साधारण तीनशेच्या आसपास गणेशमूर्ती यंदाच्या गणेशोत्सवासाठी घडवल्या असल्याची माहिती त्याने दिली. मूर्तिकामातून निव्वळ नफा कमावण्यापेक्षा पर्यावरणपूरक गणेशमूर्ती ग्राहकांपर्यंत कमी दरात कशा पोहोचवता येतील, यावर इतरांप्रमाणेच भूषणही भर देतो. त्यामुळे ठरलेल्या किमतीपेक्षाही कमी किमतीत या मूर्ती विकत असल्याचे त्याने सांगितले.

कला, कौशल्य आणि मातीशी मैत्री करत सुरू केलेला हा गणेशमूर्ती घडवण्याचा व्यवसाय तरुण मूर्तिकारांना ओळख आणि नफा मिळवून देण्यासाठी नक्कीच महत्त्वाचा ठरतो आहे.viva@expressindia.com

शाडूच्या मूर्ती घडवताना खूप काळजी घ्यावी लागते. त्या नाजूक असल्याने त्यांना सहज इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे मूर्तिकारांनी घडवलेली मूर्ती ग्राहकांच्या घरी जाईपर्यंत ताण असतो. मूर्ती सुबक बनवण्याबरोबरच ती सुखरूप पोहोचणेही मूर्तिकारांसाठी महत्त्वाचे असते. तरुण मुलांनी आवड असल्यास या कलेकडे व्यवसाय म्हणून नक्कीच पाहता येईल. परंतु कलेसोबत कौशल्य आणि मेहनत करण्याची तयारीही असायला हवी. महेश कदम

मूर्तीचे विसर्जन घरातल्या कुंडीत करून त्यातून एक झाड जन्माला घालण्याची कल्पना लोकांना आवडली. समाजमाध्यमातून त्याला तुफान प्रतिसाद मिळाला. आपल्याकडे मूर्ती घडवण्याचे क्षेत्र मोठे आहे. तरुणांनी त्यात नक्कीच यायला हवे, पण तुमच्याकडे काहीतरी हटके आणि लोकांना आकर्षित करेल, असे असेल तरच या व्यवसायात यावे. फक्त व्यवसाय करताना आपण निसर्गाचे देणे लागतो ही भावना प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवी.’’दत्तात्रय कोतुर

उत्सवांचे पावित्र्य राखायलाच हवे. त्यासाठी मूर्तीमधील सात्त्विक भाव मी कायम जपत आलो आहे. पीओपीच्या मूर्ती कमी वेळात घडवून नफा मिळवणे सहज शक्य आहे, परंतु या कलेच्या माध्यमातून निसर्गालाही जपणे हे आमचे कर्तव्य आहे.’’ विशाल शिंदे (मूर्तिकार)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2019 1:14 am

Web Title: market expensive pop ganesh utsav environment akp 94
Next Stories
1 अनन्यसाधारण महत्त्व असलेलं ‘हरितालिके’चं व्रत का करतात?
2 मोदक-लाडूंसह गणेशोत्सवात घरच्याघरी करता येतील अशा पाककृती
3 गणेशोत्सवादरम्यान प्रसादातून घातपात? सार्वजनिक मंडळांना सतर्क राहण्याचा आदेश
Just Now!
X