काही दिवसांपूर्वी टीव्हीवरची एक जाहिरात बरीच गाजली होती. मॅरेज रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये बसलेला तरुण, ‘मी लग्नानंतर बायकोचं नाव लावणार’, असं सांगतो आणि मॅरेज रजिस्ट्रारसकट प्रेक्षकही अचंबित होतात. एका पंख्याची जाहिरात आणि टॅगलाइन.. हवा बदलेगी. आता अगदी तंतोतंत नाही तरी अशा हवाबदलाची काही उदाहरणं नक्कीच दिसताहेत. हवेची दिशा नक्कीच बदलतेय. या बदलत्या हवेचेच काही झोत टिपायचा हा प्रयत्न.

लग्न ठरलेल्या किंवा लग्नाळू मुलीच्या घरात अजूनही ‘चार पदार्थ करायला शिक’ चा नारा सुरू असतोच. मुलीला स्वयंपाक करता येतो का, हा प्रश्नही कधी थेट तर कधी आडून विचारला जातोच. पण लग्नाळू मुलांचं काय? हो.. आता मुलंही स्वयंपाक शिकायला लागली आहेत.

‘हे रोहन.. काँग्रॅट्स!! तुझं लग्न ठरल्याबद्दल. मग आता झाली का तयारी सुरू?’
‘हो यार! उद्यापासूनच कुकिंक क्लास जॉइन करतोय मी.’

स्ट्रेंज वाटला हा संवाद? वाटणारंच.. कारण अजूनही आपण इमॅजिन करू शकत नाही, की लग्न ठरल्यावर एक मुलगा स्वयंपाक शिकतोय. मुलगी लग्नाच्या वयाची झाली किंवा लग्न ठरलं की, जवळपास प्रत्येक घरात एक कॉमन दृश्य दिसतं : आई, आजी तिला थोडा ‘हा पदार्थ करायला शिक, हे करता आलं पाहिजे’ वगैरे म्हणून स्वयंपाकाचे धडे द्यायला लागतात. लग्न ठरलेला मुलगा मात्र त्याच्या मित्रमंडळींमध्ये किंवा ऑफिसच्या कामातच बिझी असतो. पण दोस्तहो.. आता जग बदललं आहे. हवा बदल रहीं है! वरचे संवाद जसेच्या तसे नाही तरी त्या आशयाचे घडण्याला पूरक वातावरणनिर्मिती झालेली आहे. मुलगा – मुलगी दोघंही चांगल्या कंपनीत कामाला आहेत. त्यातून नोकरीमुळे बरेच जण परिवारापासून दूर राहतात. लग्नानंतर घरात दोघंच. मग स्वयंपाकाचा लोड एकटय़ा मुलीवर आला तर तिची फार दमछाक होते. सकाळी लवकर उठायचं. ब्रेकफास्ट, डबा करायचा, रात्री थकून आल्यावर परत तेच. म्हणूनच आजच्या जंटलमन्सनी ठरवलंय की, ही जबाबदारी दोघांनी मिळून उचलायची.
थोडं-फार तरी कुकिंग जमायलाच हवं, या विचारांनी आजकाल बऱ्याच घरांमध्ये मुलांना मुद्दाम चार गोष्टी शिकवल्या जातात. तर काही उत्साही पुरुष मंडळी आणि मुलं चक्क स्वयंपाकाचे क्लासेसही लावतात. जग इतकं बदललं असताना मुलींना चूल आणि मूल याच फॉम्र्युल्यात अडकवायला आजची मुलंच तयार नाहीत. एखाद्या मुलीला स्वयंपाकाची आवड नाही, किंवा शिक्षणाच्या गडबडीत तिला स्वयंपाक शिकायचा वेळ नाही मिळला तर त्यात चुकीचे काय आहे?
इंजिनीयिरगचा विद्यार्थी विशाल सरवटेने तर सरळ सांगितलं की, ‘माझ्या बायकोने जन्मभर स्वयंपाक नाही केला तरी चालेल. मी करेन. स्वयंपाक करणं ही आवड आणि इच्छा असते. मला स्वयंपाकाची आवड आहे. तिला आवडत नसेल तर मी ते करेन आणि आवडत असलं तरी तिची मदत नक्की करेन.’
पुण्यात पत्रकारिता शिकणारा विद्यार्थी शरद बोद्रे सांगतो, ‘मी आत्ताच माझ्या बहिणींना स्वयंपाकात मदत करतो. बायको आल्यावर तिला या गोष्टीचा त्रास होऊच देणार नाही. मी फक्त मदतच नाही करणार तर आम्ही मिळून स्वयंपाक करू. स्वयंपाक करणं खूप इंटरेस्टिंग असतं.’
पुण्यातल्या मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी करणाऱ्या अजिंक्य गणोरकरनं तर याबाबतीत अगदी मोकळेपणानं मत मांडलं. अजिंक्य म्हणतो, ‘लग्न हे डिसिजन दोघांचं असतं, मग त्यासोबत येणारी प्रत्येक जबाबदारीदेखील दोघांचीच असते. जगात  Net Nutrality आली आहे आणि आपण  Gender Eqality साठी भांडतो आहोत. केवळ स्वयंपाकच नाही तर घरकामात पुरुषांनी मदत केलीच पाहिजे. खरं तर एकत्र काम केल्याने प्रेम वाढतं, असं मला वाटतं.’
मुंबईच्या एका कंपनीत नोकरी करणाऱ्या स्वप्निल मांडविकरलाही असंच वाटतं. ‘बायको थकून आल्यावर तिच्यासोबत स्वयंपाकघरात एकत्र काम करून तिला खूश करायला मला नक्कीच आवडेल. आमच्या गोजिरवाण्या घरात, मेजवानी रंगतदार रेसिपीची मजा आम्ही दोघे मिळून घेणार. आणि मी माझ्या होम मिनिस्टरला नक्की सुखी ठेवणार.’
पुण्यात केवळ पुरुषांसाठी रोजच्या स्वयंपाकाचे क्लासेस घेणाऱ्या मेधा गोखले यांनी त्यांच्या क्लासचे खूप मजेदार अनुभव सांगितले. कुणी प्रेग्नंट बायकोला सरप्राईझ देण्यासाठी क्लास लावला होता तर कुणी बायकोच्या जबाबदाऱ्या हलक्या करण्यासाठी स्वयंपाकघरात उतरण्याचा चंग बांधला. त्यासाठी क्लास लावला होता. मेधाताईंशी गप्पा मारताना त्यांनी सांगितले की, ‘आजचं जग धावतं आहे. तरुण मुलांचे विचारही वेगाने बदलताहेत. लग्न झाल्यानंतर मुलांना स्वयंपाक आलाच पाहिजे. जेव्हा हाताला चटके बसतात तेंव्हा बायकोच्या कष्टांची जाणीव होते. स्वत:च्या हातानं प्रेमानं केलेला स्वयंपाक बायकोला खाऊ घालता यावा याच उद्देशाने मुलांनी लग्न ठरल्यावर स्वयंपाक शिकावा.’
याच क्लासमधून स्वयंपाक शिकलेल्या अंबर कर्वेने त्याची खूप छान आठवण शेअर केली, ‘माझी बायको प्रेग्नंट होती, तेव्हा मी हा क्लास जॉइन केला. केला. आम्हाला जुळं होणार होतं, बायकोला डॉक्टरनी रेस्ट सांगितली होती. तिला सरप्राइझ द्यायला मी कुकिंग क्लास जॉइन केला. आजसुद्धा मी तिला मदत करतो. मुलांना शाळेपासूनच स्वयंपाक शिकवला पहिजे अस मला वाटतं.’
गोखले मॅडमचा क्लास जॉइन करणारा अजून एक जंटलमन जावेद अकबर इनामदार. जावेद म्हणतो, ‘लग्न ठरलं तेव्हाच मला माहिती होतं की, बायकोच्या नोकरीमुळे तिला रोजच्या स्वयंपाकात फार लक्ष देता येणार नव्हतं. एकच व्यक्ती घरातला किती लोड घेणार म्हणून मी प्राजक्ताच्या.. माझ्या बायकोच्या मदतीसाठी स्वयंपाक शिकायचं ठरवलं. आज आम्ही दोघं मिळून डबा करतो. मी भाजी चिरली तर ती फोडणीला घालते. तिनं कुकर लावला तर मी वरण करतो. एकमेकांना समजून घेऊन आम्ही स्वयंपाक एंजॉय करतो.
हे सगळे जंटलमन स्वयंपाकाच्या धडय़ांसोबत सहजीवनाचे नवे पैलू समजून घेताना दिसत आहेत. लाइफ पार्टनरबरोबर सगळ्या जबाबदाऱ्या त्यांना वाटून घ्यायच्या आहेत. आफ्टर ऑल लाइफ इज अबाऊट एंजॉइंग टूगेदरनेस आणि कुकिंग इज जस्ट अ मीन्स. काय.. पटलं ना ? हवा बदलतेय ना!
निहारिका पोळ

vv05बायको थकून आल्यावर तिच्यासोबत स्वयंपाकघरात एकत्र काम करून तिला खूश करायला मला नक्कीच आवडेल.
स्वप्निल मांडवीकर

vv06माझ्या बायकोने जन्मभर स्वयंपाक नाही केला तरी चालेल. मी करेन. स्वयंपाक करणं ही आवड आणि इच्छा असते. मला स्वयंपाकाची आवड आहे. तिला आवडत नसेल तर मी ते करेन.
विशाल सरवटे