क्षण एक पुरे! : वेदवती चिपळूणकर

चारचौघांसारखं शिक्षण-लग्न आदी गोष्टी पूर्ण झाल्या म्हणून सगळं आयुष्य त्याच पद्धतीने काढावं, असं काही नाही. उलट एका दृष्टीने स्थैर्य असताना आपली महत्त्वाकांक्षा ओळखून तिला खतपाणी घालून ती पूर्ण करणं ही गोष्ट एका स्वप्नाहून कमी नाही. असं स्वप्न पाहणारे आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी धडपडणारे चेहरे तसे कमीच असतात. बेकिंगच्या क्षेत्रात इन्स्टिटय़ूट उभी करणारी रिया कामत ही या चेहऱ्यांपैकी एक..

शिक्षण अगदी चारचौघांसारखं सामान्य पद्धतीचंच झालं. लग्नही लवकर झालं आणि ती मुंबई सोडून थेट मिडल ईस्ट देशांमध्ये शिफ्ट झाली. आधी सौदी, मग कुवेत आणि फायनली दुबईमध्ये स्थिर होऊन तिथं पूर्णवेळ नोकरी करताना तिच्या लक्षात आलं की, यात आपलं मन काही रमत नाही. लहानपणापासून बेकिंग, केक मेकिंग अशा गोष्टींची आवड असल्याने तिने तिथं मोकळ्या वेळात त्याचं शिक्षण घ्यायला आणि आपली आवड जोपासायला सुरुवात केली. दुबईमधल्या ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर कलीनरी आर्ट्स’मधून तिने प्रोफेशनल डिप्लोमा पूर्ण केला. भारतात मुंबई, दिल्ली आणि लॅवॉन बेकिंग अकॅडमी, बंगलोर इथंही केक बेकिंग आणि डेकोरेटिंगचं शिक्षण तिने घेतलं. भारतात कायमसाठी परतल्यानंतर या सगळ्या शिक्षणाचा प्रत्यक्षात उपयोग करायचा निर्णय घेऊन तिने मुंबईत क्लासेस सुरू केले. २०११ मध्ये सुरू झालेल्या तिच्या क्लासेसचं रूपांतर आता इन्स्टिटय़ूटमध्ये झालं आहे आणि रिया कामतला आता ‘बेकगुरू’ म्हणून ओळखलं जाऊ  लागलं आहे. ‘टेस्टी सिक्रेट्स’ हे तिचे क्लासेस हळूहळू स्वत:ची ब्रँड व्हॅल्यू निर्माण करत आहेत.

बेकिंगची आवड लहानपणापासून असल्याने त्यातलं शिक्षण वेळोवेळी रियाने घेतलं होतं. त्याचं प्रत्यक्ष कामात रूपांतर मात्र ती मुंबईत परत आल्यानंतर झालं. बेकिंगच्या नुसत्या ऑर्डर्स न घेता इतरांना शिकवण्याच्या तिच्या आवडीबद्दल ती सांगते, ‘केकच्या ऑर्डर्स घेणारे खूप असतात आणि तेव्हाही होते. पण मुंबईच्या परिसरात फक्त केक्स शिकवणारे असे प्रोफेशनल्स जवळजवळ नव्हतेच. मला घरगुती पद्धतीने शिकवायचं नव्हतं, मला अगदी व्यवस्थित सगळ्या उपकरणांसहित शिकवायचं होतं. उद्देश हाच होता की, ज्यांना आवड आहे, पॅशन आहे त्या प्रत्येक मुलीला, स्त्रीला शिकता आलं पाहिजे. मग शिकवायचं तर इतकं व्यवस्थित शिकवायचं की उद्या ती व्यक्ती स्वत:च्या जिवावर ऑर्डर्स घेऊ  शकली पाहिजे. अर्धवट शिकवून त्यांना धड येतही नाही आणि थोडंसं काही तरी येतंय अशा अवस्थेत मला त्यांना ठेवायचं नव्हतं. यात काहीसा सक्षमीकरण हा हेतूदेखील होताच. महत्त्वाचं म्हणजे ज्या केटरिंग इन्स्टिटय़ूट किंवा हॉटेल मॅनेजमेंट शिकवणाऱ्या संस्था आहेत तिथं बेकिंग म्हणजे ब्रेड आणि पावापासून सर्व शिकवलं जातं. मात्र कोणतीही गृहिणी किंवा मुलगी घरातल्या घरात पाव आणि ब्रेड नक्कीच करत बसणार नाही. त्यामुळे खरं तर फोकस हा कपकेक्स, चॉकलेट्स, केक्स, बिस्किट्स यावर असायला हवा जेणेकरून प्रत्येकच व्यक्तीला त्याचा उपयोग होईल. या विचारानेच मी ठरवलं की आपणच शिकवायला सुरुवात करायची. मला हव्या त्या गोष्टींना महत्त्व देऊन व्यवस्थितपणे समोरच्यापर्यंत पोहोचवता येण्यासाठी हेच उत्तम माध्यम होतं. त्यामुळे ऑर्डर्सच्या मागे न लागता मी शिकवायला सुरुवात केली.’

कोणताही उद्योग शून्यातून सुरू करण्यासाठी दोन प्रकारचं भांडवल लागतं; एक म्हणजे त्या क्षेत्रातलं सखोल ज्ञान आणि दुसरं म्हणजे आर्थिक भांडवल. रियाकडे तिच्या क्षेत्रातलं ज्ञान पुरेपूर होतं आणि आर्थिक भांडवल गुंतवताना आधी आपल्या कल्पनेची प्रत्यक्षातली उपयोगिता पडताळून पाहणं गरजेचं असतं, असा रियाचा विचार होता. त्यामुळे तिने सुरुवातीला घरातूनच क्लासेस घ्यायला सुरुवात केली. क्लासेसला मिळणारा वाढता प्रतिसाद बघून जेव्हा वेगळी जागा घेण्याचा विचार केला तेव्हा मात्र तिला अडचणी जाणवल्या. रिया म्हणते, ‘बेकिंग क्लासेससाठी जागा म्हणजे सगळी इक्विपमेंट राहतील अशी मोठी जागा पाहिजे, त्यांना लागेल इतकी इलेक्ट्रिसिटी पाहिजे. भांडी, उपकरणं यांच्या स्वच्छतेसाठी मुबलक प्रमाणात पाण्याचा पुरवठा पाहिजे. एका वेळी पंधरा जण एकत्र काम करू शकतील अशी सोय करून घेता आली पाहिजे. एकंदरीतच परिसर स्वच्छ असला पाहिजे. स्टेशनच्या जवळचं लोकेशन असलं पाहिजे, जेणेकरून क्लासला येणाऱ्या कोणालाही प्रवासाचा फार त्रास होता कामा नये. अशी आखूडशिंगी बहुदुधी या कॅटेगरीत येणारी जागा मिळणं इतकं अवघड जात होतं की एकदा माघार घ्यायचा विचारही मनात येऊन गेला. आपण घरी करतोय तेच ठीक आहे असंही एकदा वाटून गेलं. इतक्या अडचणी येऊनही जागेच्या बाबतीत तर मला तडजोड करायचीच नव्हती कारण कोणत्याच पद्धतीची गैरसोय परवडणार नव्हती’, असं रियाने सांगितलं. मात्र एकदा सहज म्हणून बघायला गेलेली जागा आवडली आणि नुकतेच आम्ही तिथं शिफ्ट झालो आहोत. सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज तिथं पुरवल्याचं समाधान माझ्याकडे आणि माझ्या स्टुडंट्सकडेही आहे, असं ती समाधानाने सांगते.

रियाच्या ‘टेस्टी सिक्रेट्स’मध्ये शिकलेल्या अनेकींनी स्वत:ची केक शॉप्स सुरू केली आहेत तर अनेकींनी घरी चॉकलेट्स, कपकेक्स, केक्स अशा ऑर्डर्स घ्यायला सुरुवात केली आहे. ऑनलाइन व्हिडीओज बघून अनेक जण बेकिंगचा प्रयत्न करतच असतात. मात्र त्यात परफेक्शन आणण्यासाठी आणि बारीकसारीक खाचाखोचा समजून घेण्यासाठी रीतसर शिक्षण आणि ट्रेनिंगची गरज आहे, असं रियाचं मत आहे. रिया म्हणते, ‘बंगलोरला जशी लॅवॉन आहे तशी कोणतीच संस्था इथं तरी मला आढळली नाही. मी स्वत: तिथं शिकले आहे. त्यामुळे तेवढय़ा मोठय़ा प्रमाणावर फॅसिलिटीज असताना शिकण्याची गरज आणि त्यात येणारी एन्जॉयमेंट या दोन्ही गोष्टी मला चांगल्याच ठाऊक आहेत. अशा पद्धतीची सुसज्ज इन्स्टिटय़ूट उभी करण्याची माझी इच्छा आहे. सध्या मी एका वेळी माझ्यासोबत पंधरापेक्षा जास्त स्टुडंट्स घेत नाही. कारण मला प्रत्येकाकडे नीट लक्ष द्यायचं असतं. शिकवणं ही अशी गोष्ट आहे जिथं प्रत्येकाला कळलं, जमलं तरच आपल्या शिकवण्याला यश आलं म्हणता येतं. त्यामुळे एका वेळी खूप जास्त स्टुडंट्स घेण्यात अर्थही नाही. म्हणूनच इन्स्टिटय़ूट मोठी करण्यासाठी अजून ट्रेनर्सही तयार होण्याची गरज आहे. बेकिंगची नवनवीन इक्विपमेंट्स ठेवता येतील, शिकवता येतील आणि वापरता येतील अशी जागा असणं गरजेचं आहे’, असं ती सांगते.

आपली आवड जोपासतानाच शिक्षण आणि सक्षमीकरणाच्या क्षेत्रातही काही करू पाहणाऱ्या रिया कामतच्या ‘टेस्टी सिक्रेट्स’ने आतापर्यंत दोन हजारांहून अधिक स्त्रियांना बेकिंगमध्ये तयार केलं आहे. तिच्या महत्त्वाकांक्षी स्वप्नामुळे भविष्यात संपूर्णत: बेकिंगवर लक्ष केंद्रित करणारी एखादी इन्स्टिटय़ूट आपल्या जवळपास बघायला मिळाली तर नवल नाही!

‘आपण केलेल्या विचारापासून मागे फिरावं असं मला कधीच वाटलं नाही. मात्र जेव्हा जागा मिळत नव्हती तेव्हा खरंच खूप निराश झाले होते. घरच्यांचा कायमच असणारा सपोर्ट ही गोष्ट अशा काळात इतकी महत्त्वाची ठरते की, त्यातूनच तुम्हाला नव्याने काम करायला उत्साह येतो. मला एखादी गोष्ट करायची इच्छा आहे म्हटल्यावर कोणीच मला कधीच अडवलं नाही. त्यातून मला कायमच स्फूर्ती मिळत राहिली.’ – रिया कामत  viva@expressindia.com