25 September 2020

News Flash

मयुरी देशमुख       

फिट-नट

|| प्रियांका वाघुले

मुळात बारीक शरीरयष्टी असताना फिटनेसची काय आवश्यकता? असा प्रश्न सातत्याने मयुरी देशमुखच्या बाबतीत अनेकांना पडतो. फक्त मयुरीच नाही तर अशा मुळात बारीक, नाजूक शरीरयष्टी असणाऱ्यांना त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. असा समज अनेकांचा असतो, पण हा समजच मुळात चुकीचा आहे, असे मयुरी सांगते.

मयुरी फिटनेसला अतिशय महत्त्व देत असल्याचं सांगते. आणि फिटनेस म्हणजे बारीक होणे, वजन कमी करणे नव्हे, हेही ती पुन:पुन्हा बजावून सांगते. व्यायाम हा मुळात आपल्या वजनावर ताबा ठेवण्यासाठीचा उत्तम मार्ग असला तरी शरीरासोबत मनाचा, बुद्धीचा समतोलही तितकाच महत्त्वाचा असतो. त्यामुळे व्यायाम, आहार या सगळ्या गोष्टींकडे पाहताना फिटनेस म्हणजे काय?, हे समजून घेणे अनेकांसाठी गरजेचे असल्याचे मयुरी म्हणते.

मयुरी आपल्या श्वासावर, मनावर, सहनशक्तीवर, क्षमतेवर ताबा मिळवण्यासाठी फिटनेसला महत्त्व देत असल्याचं सांगते. अनेकदा दिवसभर मालिकेच्या सेटवर असताना आपल्या दृश्याची तयारी पूर्ण होईपर्यंत बराच वेळ जातो. पण अशा परिस्थितीत देखील आपली मानसिक स्थिती तितकीच प्रसन्न राखण्यासाठी या गोष्टी अतिशय उपयुक्त ठरतात. आणि आपल्याला जो टेक द्यायचा आहे तो आपण अगदी प्रसन्न मनस्थितीत देऊ शकतो. एक अभिनेता-अभिनेत्री म्हणून तुमच्यावर चित्रित होणारा प्रसंग त्याच ऊर्जेने आणि प्रभावीपणे सादर होणे गरजेचे असते. आणि त्यासाठी स्वत:वरचा आत्मविश्वास, सादरीकरणासाठी लागणारी क्षमता वाढवण्यासाठी फिटनेस नानाविध अर्थाने उपयोगी ठरतो, असं ती सांगते.

मयुरीही फिटनेससाठी जिमपेक्षा विविध व्यायाम प्रकारांवर भर देते. व्यायामातही फंक्शनल ट्रेनिंग, धावणे, योग अशा विविध गोष्टींची सांगड घालून दररोज तो पूर्ण करणे यावर आपला कटाक्ष असल्याचं ती सांगते. गेली अनेक वर्ष ती योगासने करते आहे. त्यात ताडासन, उंटासन, शिशुपालासन, सूर्यनमस्कार यांसारखे योगप्रकार रोजच्या रोज करत असल्याचं तिने सांगितलं. योगासने आपल्या शरीराला लवचीक बनवण्यासाठीचा उत्तम मार्ग असतो. योगासनांचे कित्येक फायदे असल्याने फिटनेससाठी याहून उत्तम मार्ग तो काय असावा, असे ती आनंदाने सांगते. रोजच्या व्यायामाबरोबरच आपल्या आहारात काही गोष्टी प्रामुख्याने येणे खूप उपयुक्त ठरते. त्यामुळे त्यांचा आहारात समावेश करून घ्यायला हवा, असं तिने सांगितलं. रोजच्या दिनक्रमात तूप, गूळ, लिंबू हे आपल्या आहारातून शरीरात गेलेच पाहिजेत, याकडे लक्ष ठेवा आणि आपल्या व्यायामात खंड पडू देऊ नका!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2019 12:05 am

Web Title: mayuri deshmukh
Next Stories
1 अवधी शाही खाद्यसंस्कृती
2 ८ तास, २०३ महिला..
3 रेड कार्पेटवरील ‘स्टॅण्ड आऊट’ फॅशन
Just Now!
X