08 July 2020

News Flash

संशोधनमात्रे : पर्यावरणस्नेही शोधांच्या वर्तुळांचा प्रवास

सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये करिअर करताना पर्यावरणस्नेह आणि सामाजिक जबाबदारीचं भान राखणाऱ्या मीत पगारियाने व्यावसायिक दृष्टीनेही या प्रयोगांचा विचार केला.

सकाळच्या ठराविक वेळी तासिकांच्या आधी क्लबमध्ये नावनोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी एका आठवडय़ात एकेका वर्गातले २५ विद्यार्थी या सुविधेचा लाभ घेतील, अशी आखणी केली आहे.

राधिका कुंटे – viva@expressindia.com

सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये करिअर करताना पर्यावरणस्नेह आणि सामाजिक जबाबदारीचं भान राखणाऱ्या मीत पगारियाने व्यावसायिक दृष्टीनेही या प्रयोगांचा विचार केला. हे शोध आणि तो विचार कसा प्रत्यक्षात आला ते जाणून घेऊ या.

मीत पगारिया बी.टेक.च्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात आहे. थोडंसं मागं वळून पाहत या सदराच्या निमित्ताने त्याच्याशी संवाद साधला. मीतला जळगावच्या ‘सेंट तेरेसा कॉन्व्हेंट’मध्ये दहावीला ९१.४ टक्के गुण मिळाले होते. त्याच्या घरी बांधकाम व्यवसाय आणि अन्नधान्याचा व्यापार आहे. इंजिनीअरिंगची आवड त्याला लहानपणापासून होती. त्याचे काका इंजिनीअर आहेत. तरीही चांगले गुण मिळाल्याने कॉम्प्युटर इंजिनीअरिंगला जायला घरच्यांनी सुचवलं होतं. पण सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये रस असल्याने त्यातच करिअर करायचं असं त्याने ठरवलं. नागपूरच्या ‘शिवाजी सायन्स महाविद्यालया’त बारावी सायन्स केल्यावर त्याच्यासमोर दोन पर्याय होते. मुंबई किंवा पुण्याला जायचं. त्याने देशाच्या आर्थिक राजधानीला प्राधान्य दिलं. मुंबईच्या एनएमआयएमएस (NMIMS) महाविद्यालयात बॅचलर्स इन टेक्नॉलॉजीच्या (सिव्हिल इंजिनीअरिंग) अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला.

शालेय विज्ञान स्पर्धांमध्ये तो सहभागी झाला होता. योगायोगाने हॉस्टेलमध्ये निरनिराळे शोधक प्रकल्प करणाऱ्या सीनिअर्सशी त्याची भेट झाली. पहिल्या सत्रापासूनच आपणही काहीतरी प्रकल्प करायला हवा, असं मीतला वाटू लागलं. एनएमआयएमएस महाविद्यालयात संशोधनासाठी अर्थसाहाय्य केलं जातं, ही माहिती त्याला कळली. ती आठवण तो सांगतो की, ‘महाविद्यालयापासून जुहूचा समुद्रकिनारा जवळ आहे. रविवारी रात्री मेस बंद असल्याने तिथे आम्ही डोसा खायला जातो. हॉस्टेलला परतताना अंतर कमी असल्याने रिक्षावाले चटकन यायचे नाहीत, रिक्षाचं भाडं थोडं जास्ती व्हायचं. या वाहतुकीच्या साधनाला काहीतरी पर्याय शोधायला हवा, असं प्रकर्षांनं वाटलं. मग मी आणि माझा रूममेट व्यंकटेश अग्रवालने मिळून यावर विचार करायला सुरुवात केली. परीक्षेनंतर मिळालेल्या सुट्टीत दोघांनी गावाला भेटून यावर अधिक विचार केला आणि ‘पब्लिक बायसिकल शेअरिंग’ या स्टार्टअपचा श्रीगणेशा झाला’. तीन वर्षांंपूर्वी भारतात या पद्धतीचं अवलंबन फारसं होत नव्हतं. काही मोजक्या कंपन्या परदेशातून सेटअप आयात करायच्या. त्यामुळे आर्थिक गणित वाढायचं. भारतातले रस्ते, वाहतूक, जागेची उपलब्धी, लोकांची मानसिकता, आर्थिक—सामाजिक स्तर अशा अनेक मुद्दय़ांचा त्यांनी सहा महिने अभ्यास केला. सुरुवातीला दोघांनी मिळून त्यांच्या खिशातले जवळपास तीन—साडेतीन लाख रुपये गुंतवले. मग महाविद्यालयाचे तत्कालीन संचालक मधू जेकब यांनी या दोघांना मार्गदर्शन केलं. अंडरग्रॅज्युएट रिसर्च प्रोजेक्टसाठी अर्ज करून त्याअंतर्गत संशोधन करता येईल, अशी दिशा दाखवली. मग प्रोफेशनल टीम तयार झाली आणि Zest Smart Solutions Pvt Ltd या स्टार्टअपची नोंदणी केली गेली.

एखादी कल्पना डोक्यात येणं आणि ती प्रत्यक्षात साकारणं यात जमीन—अस्मानाचं अंतर असतं, असं आतापर्यंतचं निरीक्षण सांगतं. या प्रयोगातही तसंच घडलं. पहिलं मेकॅनिकल डिझाइन घडताना अनेक अडचणी आल्या. ते दिवसभर महाविद्यालयात अभ्यास केल्यावर संध्याकाळी घरी यायचे. जेमतेम तासाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा रात्री अकरापर्यंत या संदर्भात काम करायचे. त्यांचं वर्कशॉप होतं नाशिकला आणि सेटअप शिरपूरच्या एनएमआयएमएस महाविद्यालयातील कॅम्पसमध्ये करायचा होता. दर मंगळवारी तासिका दोन वाजता संपायच्या. त्या दिवशी प्राध्यापकांच्या परवानगीने पंचवटी पकडून नाशिक गाठायचं, मग रिक्षाने ओझरला जायचं असं दोन आठवडे केलं. पैसे संपले. मग गाडीने कसारा, मग टॅक्सीने मुंबई नाका, पुन्हा रिक्षा असा प्रवास करावा लागला होता. चार महिन्यांनी पहिलं डिझाईन तयार झालं. मीत सांगतो की, ‘महाविद्यालयातल्या ११ विद्यार्थी इंटर्नसह आम्ही शिरपूरला गेलो. पहिलं युनिट लावायला सुरुवात केल्यावर ते पडलं. महाविद्यालयाने केलेल्या अर्थसाहाय्यापैकी अर्धे पैसे डोळ्यांदेखत वाया गेले. इंटर्न उन्हाळी सुट्टीत आमच्यासोबत काम करत होते, तेही आपापल्या घरी परतले. फक्त मी, व्यंकटेश आणि श्रीनिकेत जोशी असे तिघंच उरलो. मुंबईत हम्ॉस्टेलमध्ये राहून नेटानं आम्ही एक नवी टीम उभारून कामाला सुरुवात केली. पुन्हा दुसरं डिझाइन तयार केलं. सिस्टिमही नवीन केली. मागच्या वेळच्या काही चुका टाळल्या, काही चुका नव्यानं केल्या. ५०सिस्टिम इन्स्टॉलेशन आणि अन्य कामात शिरपूरच्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी आम्हांला मदत केली. महिनाभर आम्ही तिथे राहिलो. या व्यवस्थेत काहीतरी त्रुटी आहेत, असं वाटत राहिलं. आणखी अभ्यास केला. आधी आडव्या पद्धतीची व्यवस्था उभारली होती. त्यात पुढच्या सुट्टय़ांमध्ये बदल केला आणि उभ्या पद्धतीची व्यवस्था उभारली. त्यामुळे ७० टक्के जागेची बचत होते. आणखीही काय बदल करता येतील, यावर विचार सुरू आहे’.

खरं तर ही सिस्टिम महाविद्यालयाच्या मुंबई कॅम्पसमध्ये उभारायचा त्यांचा मानस होता. पण तांत्रिक अडचणींमुळे ते शक्य नव्हतं. मग त्यांच्या महाविद्यालयाच्या शिरपूर कॅम्पसमध्ये सिस्टिम उभारायची परवानगी मिळाली. तो ३० एकरचा कॅम्पस असून त्यात ५० डॉक्स, २५ सायकली आणि ७ स्टेशन्स आहेत. सध्या ३०० विद्यार्थी या सुविधेचा लाभ घेत आहेत. गेल्या वर्षी तिथला इंर्टन सुबोध आणि अडमिनिस्ट्रेटर राजेश यांच्याकडून मीतला कळलं की, तिथे सायकलिंग क्लब स्थापन झाला आहे. सकाळच्या ठराविक वेळी तासिकांच्या आधी क्लबमध्ये नावनोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी एका आठवडय़ात एकेका वर्गातले २५ विद्यार्थी या सुविधेचा लाभ घेतील, अशी आखणी केली आहे. तिथल्या प्राध्यापकांसाठी ही सुविधा फार उपयुक्त ठरली आहे. त्यांच्यासाठी ५० सायकली देण्यात आल्या आहेत. महाविद्यालयाच्या मान्यतेमध्येही (accreditation) या प्रकल्पाचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. यानंतर दोन—तीन ठिकाणांहून या कामासाठी विचारणा झाली होती. आता व्यंकटेश अमेरिकेहून शिक्षण घेऊन भारतात आला आहे आणि मीतचा मास्टर्ससाठी तिथे जायचा बेत ठरतो आहे. त्यामुळे फक्त तंत्रज्ञान लीझवर (भाडेपट्टय़ावर) द्यायचा विचार सुरू आहे. या स्टार्टअपचे ते संस्थापक असून, ते विद्यार्थी असल्यामुळे सध्या त्यांचे अन्य टीम मेंबर्स कंपनी चालवत आहेत.

तिसऱ्या वर्षांपर्यंत विविध विषयांत मीतने काम केलं. आता मूळ विषयात काही करावं, म्हणून एल. अ‍ॅण्ड टी. कन्स्ट्रक्शनच्या AKRP या औरंगाबादमधल्या साईटवर रस्तेउभारणीच्या कामासाठी समर इंर्टनशिप केली. तिथेच मीतला ग्रीन पेव्हर ब्लॉकची कल्पना सुचली होती. महाविद्यालयात परत आल्यावर उसाच्या चिपाडापासून ब्लॉक करता येईल, याची चाचपणी केली, पण ती अयशस्वी ठरली. प्लॅस्टिक आणि वाळूचा विचार  मनात सुरू होता. मग शेवटच्या वर्षांत एक ग्रुप प्रोजेक्ट म्हणून मीतसह तीनजणांनी मिळून RePaver रि—पेव्हर ब्लॉक संदर्भात अभ्यास केला. तो सांगतो की, ‘यात कॉँक्रीट नाही. प्रदूषणाच्या अंगाने विचार केल्यास कॉन्क्रिट हे प्लॅस्टिकहूनही घातक आहे. प्लॅस्टिकचा पुर्नवापर करता येऊ शकतो. या रि—पेव्हर ब्लॉकची क्षमता १५ एमपी असून सध्याच्या वाहतूक नियमानुसार त्यावरून छोटी वाहने चालवता येऊ शकतात. पुढे मास्टर्ससाठी याच विषयात अधिक संशोधन करायचा माझा विचार आहे’. हा ब्लॉक दिसायला कॉँक्रीटसारखा दिसला तरीही त्यात सिमेंट अजिबात नाही. त्यात रिसायकल प्लॅस्टिक आणि वाळूचा वापर केला आहे. त्याच्या प्रक्रियेमध्ये उरणाऱ्या प्लॅस्टिकपासून बायोडिझेल निर्माण होतं. त्याचा व्यावसायिक वापर करण्याच्या विचारापेक्षा त्याचा आणखी सखोल अभ्यास करतो आहोत. यासाठी लागणाऱ्या रिसायकल प्लॅस्टिकसाठी त्यांनी ‘प्लास्ट एक्स्पो’ या प्लॅस्टिक एक्स्पोमध्ये दोन दिवस खेपा मारल्या. तिथल्या ‘हर्षिल प्लास्टिक’मधून त्यांना प्रयोगासाठीचं रिसायकल प्लॅस्टिक मिळालं. त्यातलं उपयुक्त ठरणारं प्लॅस्टिक त्यांनी वेचून काढलं. अडेटिव्हचं फ्री सॅम्पल मिळवलं. महाविद्यालयाने त्यांना काही प्रमाणात अर्थसाहाय्य केलं. ब्लॉक तयार करताना नाना कसरती आणि क्लृत्या कराव्या लागल्या. कोणत्याही औद्योगिक साधनांच्या साहाय्याने नव्हे तर इंडक्शनच्या साहाय्याने हा ब्लॉक तयार झाला. ‘इनोव्हेशन इज द वेस्टर्न नेम फॉर इंडियन जुगाड’,असं Zest साठी त्यांना मोलाचं मार्गदर्शन करणाऱ्या मंजू जेकब यांचं मत मीतला या संदर्भात आजही आठवतं आहे.

दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री कार्यालयात दोन महिने इंटर्न म्हणून पॉलिटिकल अ‍ॅनालिसिस, स्ट्रॅटेजी, कॅम्पेन प्लॅनिंग आणि पब्लिक पॉलिसी या संदर्भात काम करायची संधी त्याला मिळाली. त्यानंतर ‘फ्लुईडस्केप्स कन्सल्टन्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये समर इंटर्न म्हणून मिडिया अ‍ॅनालिसिस, डिजिटल मार्केटिंग आणि पॉलिटिकल मिडिया मॅनेजमेंटमध्ये काम करता आलं. त्याखेरीज श्रेया अग्रवाल आणि अभिनव जोशी यांच्यासह मीतने लोकसभा आणि विधानसभा २०१९ मधल्या निवडणुकांसाठी काम केलं.  त्याअंतर्गत उत्तर महाराष्ट्रातील सात जिल्ह्यतील उमेदवार आणि मुंबईतील चुरशीच्या विभागातील उमेदवाराचं प्रचारतंत्र, वचननामा वगैरे गोष्टींसाठी टीमवर्क केलं. त्याला स्वत:ला राजकारणात रस आहे. तो सांगतो की, ‘एका कामात लोकांवर संशोधन करता तर दुसऱ्या कामात लोकांसाठी संशोधन करायचं असतं.. बाकी भोवतालची परिस्थिती, साधनं, स्पर्धा कुणाशी, समस्येवरचा पर्याय शोधणं इत्यादी अनेक मुद्दे आहेत. प्रयोगशाळेतील संशोधनापेक्षा बाहेर जाऊन लोकांशी संवाद साधणं, त्यांची मत—मतांतरं जाणून घेणं ही वेगळी गोष्ट आहे. अनेक प्रकारच्या, स्वभावांच्या, स्तरांवरच्या माणसांशी सांगड घालताना माणसं पारखायला शिकता आलं. दोन्हीकडं एक प्रकारे ट्रायल अँड एरर पद्धत वापरली जाते. या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यासाठी प्रत्यक्ष काम करताना आपसूकच व्यक्तिमत्व विकासासाठी उपयुक्त ठरणाऱ्या काही गोष्टी अनुभवायला मिळाल्या’.

अभ्यासाखेरीज मीत शालेय पातळीवरची बास्केटबॉलची स्पर्धा राज्यस्तरापर्यंत खेळला होता. राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेत खेळायला गेला असता दुखापत झाल्याने त्याला परत यावं लागलं होतं. पुढे बास्केटबम्ॉल खेळायला कधीच वेळ मिळाला नाही. पण कधीतरी वेळ मिळालाच तर तो स्क्वॉश खेळतो आणि चित्रपट बघायला आवर्जून जातो. त्याच्या घरच्यांना सुरुवातीला अभ्यासाव्यतिरिक्त चालणाऱ्या त्याच्या अविरत धडपडीबद्दल थोडं आश्चर्य वाटलं होतं, किंचितशी भीती वाटली होती. विशेषत: मुंबईत राहून मुलगा बिघडला की काय, अशी पुसटशी शंकाही त्यांच्या मनात तरळून गेली होती. हळूहळू सायकलचा प्रकल्प आकार घ्यायला लागल्यावर त्यांना सगळी कल्पना आली. मग ते थोडे निश्चिंत झाले. विशेषत: त्याच्या वडिलांनी त्याला सर्वतोपरी पाठिंबा दिला. सगळ्यांनी त्याच्यावर दाखवलेला विश्वास आता त्याला सार्थ करून दाखवायचा आहे. त्याच्या मते, आपल्या संशोधनात अपयश येऊ शकतं याची मानसिक तयारी संशोधकांनी ठेवायला हवा. अपयश आलं तरी त्याने खचून न जाता पुढची वाटचाल आत्मविश्वासाने आणि आधी झालेल्या चुका सुधारून करायला हवी. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर पहिल्या वर्षांत ही कल्पना सुचली होती आणि आता तो शेवटच्या वर्षांला आहे. जणू एका शोधाचं एक वर्तुळ पूर्ण झालं आहे. त्याच्या मनातलं स्वप्न प्रत्यक्षात चांगल्या रितीनं उतरलं. मीतच्या पर्यावरणस्नेही शोधांचा वर्तुळांचा प्रवास अधिकाधिक यशस्वी होण्यासाठी त्याला अनेक शुभेच्छा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2020 1:06 am

Web Title: meet pagaria civil engineer sanshodhan matre dd70
Next Stories
1 माध्यमी : संकलनाचं तंत्र
2 ‘मी’लेनिअल उवाच : पॅन्डेमिक म्हणजे काय रे भाऊ ?
3 बुकटेल : पुराणातली वांगी
Just Now!
X