News Flash

लर्न अ‍ॅण्ड अर्न : ज्ञानाचा ‘विवेक’

आकाशवाणीची सिग्नेचर टय़ून वाजते. ‘वंदे मातरम’चे सूर आळवले जातात. मग उद्घोषणा होते की ‘नमस्कार.. हे आकाशवाणीचं औरंगाबाद केंद्र आहे.. आजच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम सुरू होत

| May 24, 2013 01:07 am

लर्न अ‍ॅण्ड अर्न : ज्ञानाचा ‘विवेक’

आकाशवाणीची सिग्नेचर टय़ून वाजते. ‘वंदे मातरम’चे सूर आळवले जातात. मग उद्घोषणा होते की ‘नमस्कार.. हे आकाशवाणीचं औरंगाबाद केंद्र आहे.. आजच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम सुरू होत आहेत..’ हे प्रासंगिक निवेदन ‘तो’ करतो. त्याची शैक्षणिक कारकीर्द बरीच मोठी आहे. त्याच्या यशाला पुरस्कारांची किनार आहे नि सामाजिक कार्याची जोड आहे. त्याचा भरगच्च बायोडेटा वाचणारा दमतो. पण ‘तो’ म्हणतो- मी पुढं शिकतच राहणार.. हा आहे ज्ञानाची कास धरणारा विवेक राठोड.
यवतमाळ जिल्ह्यात, दिग्रस तालुक्यात, आरंभी गावात विवेकचं घर आहे. घरची शेतकरी कुटुंबाची पाश्र्वभूमी. त्याला बी.बी.ए. व्हायचं होतं, पण तेव्हाच्या डी.एड.च्या क्रेझमुळं त्यानं डी.एड. करावं असं त्याच्या वडिलांना वाटलं. त्यांच्या इच्छेला मान देऊन त्यानं डी.एड.ला अ‍ॅडमिशन घेतली. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळात डी.एड. केलं असून त्यात तो जिल्ह्यातून पहिला आलाय. त्यानंतर नागपूरच्या चाटे कोचिंग क्लासेसमध्ये वर्षभर शिकवलं. बी.ए. (हिंदी) केलं. झेडपीच्या शाळेत त्याची निवड झाली. पण त्यात तो रमला नाही. मग त्यानं औरंगाबादला एम.ए. मास कम्युनिकेशन अँण्ड जर्नालिझमला अ‍ॅडमिशन घेतले.
कॉलेजमध्ये असताना स्थानिक वृत्तपत्रातून त्याचे लेख प्रसिद्ध होत असत. विवेक सांगतो की, ‘गावातल्या एका घराला आग लागली असताना त्या रात्री मी अग्निशमन दल, पोलीस, पत्रकारांच्या सतत संपर्कात होतो. त्या अनुभवानंतर पत्रकारितेत जाता येईल असं वाटलं. त्या सुमारास शिर्डीला गेलो असता पेपरमधली हाíनमन कॉलेजची एम.ए. जर्नालिझमची जाहिरात पाहिली. प्रवेश परीक्षा देऊन तिथं अ‍ॅडमिशन घेतली. मी फर्स्ट सेमिस्टरमध्ये विद्यापीठातून पहिला आलो, तेव्हा ‘लोकमत’तर्फे पत्रकारिता क्षेत्रातील ८ जणांना मिळणारी स्कॉलरशिप मलाही मिळाली होती. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एम.ए. वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद अभ्यासक्रमात सर्वप्रथम आलो. विद्यापाठातर्फे स्व. माधवराव दोडके गुणवत्ता पुरस्कार आणि शामराव हस्तक पारितोषिक मिळालं.’
सध्या त्याचा एम.फिल.चा अभ्यास सुरू आहे. ‘सामाजिक घटनांमध्ये माध्यमांचा वाढता हस्तक्षेप’ यावर तो रिसर्च करणारेय. मीडिया हे सामाजिक दृष्टिकोन बदलणारं माध्यम आहे, पण मीडियाचाच सामाजिक दृष्टिकोन का बदलतोय, याविषयीचा अभ्यास करून नाण्याच्या दोन्ही बाजू समोर आणायच्यात. तीन सेमिस्टरपकी दोन सेमिस्टरमध्ये थेरॉटिकल आणि एक सेमिस्टर प्रॅक्टिकल असतं. मग प्रेझेंटेशन नि सबमिशन असतं. त्यानं औरंगाबाद विद्यापीठाची सीईटी परीक्षा दिली असून ती उत्तीर्ण झालाय. आता त्याला पीएच.डी. करता येईल. तो म्हणतो की, ‘डी.एड.च्या अनुभवानंतर मी शिक्षकी पेशाकडं परतेनसं वाटलंही नव्हतं. पण इथं आल्यावर हळूहळू शिक्षणाची व्याप्ती कळली. नेटसेट परीक्षा दिली. आता असं वाटतंय की, महाविद्यालयातील मुलांना शिकवता येईल. हा एक पर्याय ठरू शकेल.’
पत्रकारितेचं शिक्षण आणि लिखाणावर तो भरभरून बोलतो. तो सांगतो की, ‘एम.ए. करतानाच मी उपसंपादक म्हणून ‘दैनिक भास्कर’मध्ये जॉइन झालो होतो. तेव्हा मी िपट्र मीडियाला नवखाच होतो. त्या मुलाखतीच्या प्रश्नोत्तरांच्या फैरीत, मी क्रीडाक्षेत्र कव्हर करू शकेन, मराठवाडय़ात क्रिकेट सर्वाधिक खेळलं जातं, असं सांगत तिथल्या काही उदयोन्मुख खेळाडूंची नावं सांगितली. त्यांची माहिती देता येईल, असं सांगून पुढं त्यासाठी लिहिता झालो. याच काळात ‘झी चोवीस तास’मध्ये दीड महिन्याची एन्ट्रन्सशिप मिळाली होती. त्यासाठी परीक्षा घेतली गेली होती. त्यादरम्यान आठवडाभर रिझल्टच्या प्रतीक्षेत मरिन ड्राइव्हवर भटकंती केली होती. आमदार निवासात राहावं लागलं होतं. माझं पहिलं शूट गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यासोबत झालं होतं. तत्कालीन राजकीय घडामोडीसंबंधी त्यांना प्रश्न विचारण्याबद्दल ऑफिसमधून सांगण्यात आलं होतं. माझ्या प्रश्नांना उत्तर न देता त्यांनी त्या विषयावर बोलायचं टाळलं. त्यानंतर मनोरंजन क्षेत्रातील काम देण्यात आलं होतं. अँकर विशाल पाटील यांनी मला खूप गोष्टी शिकवल्या. आता ते माझे चांगले मित्र झाल्येत.’
‘हाíनमन कॉलेज ऑफ जर्नालिझम’च्या उमा मेहरोत्रा या प्राचार्य आहेत. ‘वृत्तपत्रीय लेखनशैली’ यावर विवेकनं एक लघुप्रबंध सादर केला होता. त्यासाठी मॅडमनी सुचवलेल्या संदर्भ पुस्तकांचा त्यानं एवढा सखोल अभ्यास केला की त्या म्हणाल्या की, ‘तुला पीएचडीचा नव्हे तर एम.ए. जर्नालिझमचा प्रबंध सादर करायचाय. इतक्या डिटेल्समध्ये कशाला जातोस?’ विवेक सांगतो की, ‘सेकंड सेमिस्टरला असताना मार्चअखेरीस फी भरायची होती. मी ती भरू शकलो नव्हतो. त्यामुळं मी मॅडमना म्हणालो की, ‘मला सूट देण्यात यावी, मी पंधरा दिवसांत फी भरतो.’ त्या म्हणाल्या की, ‘तुला सूट दिली तर सर्वाना सूट द्यावी लागेल.’ मी केबिनबाहेर आलो. तेवढय़ात त्यांनी मला आत बोलावलं. पर्समधून पसे देत म्हणाल्या, ‘हे तू भरून टाक. मला नंतर परत दे. कारण तुला सूट दिली तर बाकीच्यांनाही द्यावी लागेल नि तू फी भरलीस तर सगळे भरतील.’ तो माझ्या आयुष्यातला एक खूप मोठा क्षण होता..’
सध्या विवेक आकाशवाणीवर प्रासंगिक निवेदक म्हणून काम करतोय. तो सांगतो की, ‘सुरुवातीला त्याचे उच्चार सदोष होते. ‘न’ आणि ‘ण’मधला फरक कळत नव्हता. आकाशवाणीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली भाषा सुधारते. चौरसपणा वाढतो. आता मी माझ्या चुका शोधण्यापेक्षा इतरांच्या बोलण्यातल्याच चुका शोधतो. कसं बोलावं याचं जणू लॉजिकच मनात तयार झालंय.’ सकाळच्या प्रसारणात विवेकची डय़ुटी असते. एक डय़ुटी ऑफिसर (डिओ) निवेदकांवर लक्ष ठेवतो. विवेक अगदीच नवखा असताना एक गोंधळ झाला होता. प्रोमो किंवा जाहिराती ठरावीक काळात वापरायच्या असतात, हे त्याला माहीतच नव्हतं. संहितेवर अमुक वाजता स्टुडिओबाहेर असं लिहिलेलं ग्राह्य मानून तो आरामात होता. डिओंनी त्याला त्यासंदर्भात विचारलं. विवेक सांगतो की, ‘मी म्हटलं मला माहीतच नव्हतं.’ त्यांनी मला स्टुडिओत नेलं. ते म्हणाले की, ‘ऑनएअर फिलर जायलाच हवा.’ मला काही सुचतच नव्हतं. पण हताश न होता मी फिलर शोधून तो वाजवला. त्या काळातलं एक मिनिट अगदी ब्लँक गेलं होतं. आता मात्र अगदी छान चाललंय. इथं काम करताना वेळेचं महत्त्व नि माहात्म्य कळतंय.’
औरंगाबादच्या ‘रोटरॅक्ट क्लब’च्या ‘यूथ फेस्टिव्हल’मध्ये सहभागी झाल्यावर त्याला त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती मिळाली. आपल्या बिझी शेडय़ुलमधून समाजासाठी वेळ काढावासा वाटला. सामाजिक काम करतानाच स्वचाही विकास होत गेला. तो सांगतो की, ‘दिवाळीत आपण फटाके उडवायचे नाहीत आणि इतरांना त्यात सामील करून घ्यायचं ठरवलं. निराला बाजार भागात जाऊन रांगोळ्या काढल्या. तिथं प्रत्येकानं एक दिवा लावावा, असं लोकांना आव्हान केलं. प्रतिक्रियेसाठीच्या रजिस्टरमध्ये आता आम्ही घरी जाऊन फटाके वाजवणार नाही, असं काहींनी लिहिलं होतं. प्रदूषण कमी करणारा हा उपक्रम आता दरवर्षी करतोय. नववर्षांचं सेलिब्रेशन करताना आम्ही गेली दोन वर्षे औरंगाबाद शहरात कपडे गोळा करण्याची मोहीम राबवतोय. ३१ डिसेंबरच्या आधी पंधरा दिवस ५०० हून अधिक कुटुंबांना पुरणारे हे कपडे शहरातल्या गरिबांना ३१ डिसेंबरला दिवसभर हे कपडे वाटले. रात्री अनाथालयात जाऊन लहान मुलांसोबत नवीन वर्षांचं स्वागत केलं. १ जानेवारीला पुन्हा कपडेवाटप केलं. ‘सायकल फॉर लाइफ’ हा उपक्रमही राबवला. या पर्यावरणस्नेही नि फिटनेससाठी उपयुक्त उपक्रम सतत राबवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.’ तो रोटरॅक्ट क्लबमध्ये पीआरओ आहे. सामाजिक कामांमुळं मिळणारं मानसिक समाधान तो महत्त्वाचं मानतो.
या सगळ्या धडपडीत त्याला घरच्यांचा आणि मित्रांचा खूप सपोर्ट आहे. विवेकनं एम.ए. जर्नालिझमला अ‍ॅडमिशन घेतली तेव्हा पहिलं वर्ष त्याच्या वडिलांना तो नेमकं काय करतोय ते कळलंच नाही. तो सांगतो की, ‘तालुक्याला वणवण करणारा नि पसे खाऊन बातमी छापणारा पत्रकारच वडिलांना माहीत होता. त्यामुळं मी हे शिक्षण घेतोय, याचं त्यांना वाईट वाटायचं. पण माझ्या यशाबद्दलच्या बातम्यांनी हा गरसमज दूर केला. एम.ए.त मी मिळवलेल्या यशामुळं वडिलांना अत्यानंदानं हार्टअ‍ॅटॅक आला होता. आता मी सेटल झाल्याचं त्यांना समाधान वाटतंय. त्या वेळी माझी मंत्रालयात पीआरओ म्हणून निवड झाली होती. पण काही कारणानं ते काम अडून राहिलंय. मला वाचनाची प्रचंड आवड असून आत्मवृत्त नि कादंबऱ्या वाचण्यात अधिक रस आहे. सध्या माझ्या विषयाशी निगडित अनेक पुस्तकं वाचतोय. निवेदनाचा विचार तर सतत माझ्या डोक्यात असतो. बॉलीवूडशी संबंधित लेखनही करतोय. कॅरम नि क्रिकेट खेळणं आवडत असलं तरी वेळेअभावी ते मागं पडलंय. पत्रकारितेत आल्यावर मला माणूस जोडणं नि ते संबंध तुटू न देणं ही गोष्ट कळली. वाढलेल्या जनसंपर्कामुळं मी माझ्या शिक्षकांशी संपर्क साधू शकलोय. लवकरच त्यांना एकत्र आणून त्यांच्यासाठी काहीतरी करायचं माझं स्वप्न आहे..’
नागपूरला असताना विवेकला नोकरीमुळं ‘मॉरिस कॉलेज’मध्ये बी.ए. कंटिन्यू करता आलं नव्हतं. म्हणून मुळातच सायकॉलॉजीची आवड होती. पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करायचं तर माणसांची मानसिकता ओळखता यायला हवी. म्हणून ‘यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठा’त त्यानं बी.ए.ला अ‍ॅडमिशन घेतलेय. त्याची परीक्षा आता जवळ आलेय. अलीकडेच त्याला ‘स्व. जवाहरलालजी दर्डा एक्सलन्सी अ‍ॅवॉर्ड २०१३’ जाहीर झालंय. आपल्या शिक्षणात खंड पडू द्यायचा नाही, असा त्याचा निश्चय आहे. त्यासाठी त्याला ऑल द बेस्ट!

लर्न अ‍ॅण्ड अर्न या नव्या कॉलममधून तुम्हाला तुमच्या अशा काही मित्रांना आणि मैत्रिणींना भेटायला मिळणारेय जे शिकताना स्वतची आवड जपत आहेत. अर्थात ही आवड म्हणजे केवळ छंद जोपासण्याइतपत मर्यादीत नाही तर ही आवड आर्थिकदृष्टय़ा सक्षम होण्याची आहे. तरूणांमध्ये अलीकडे लर्निग प्लस अर्निग हे चित्र दिसून येत आहे. पूर्वी केवळ समर जॉब करणारे चेहरे आता कॉलेजच्या लेक्चर्ससह इतर जॉबसाठीही वेळ देत आहेत. अशाच तरूणांची आणि त्यांच्या कामाची महती आपण जाणून घेऊया. यासंदर्भात आपणास मेल करावयाचे असल्यास viva.loksatta@gmail.com या संकेतस्थळावर माहिती पाठवावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2013 1:07 am

Web Title: meet vivek rathod in viva learn and earn
Next Stories
1 बुक शेल्फ : सहा अभिमानास्पद पदके
2 मिकीज् फिटनेस फंडा : दुग्धस्रवणाची मार्गदर्शक तत्त्वं
3 ओन्ली स्टार्टर्स
Just Now!
X