पाऊस या शब्दाभोवती अनेक आठवणींचं मोहोळ असतं. आठवणी म्हणण्यापेक्षा पावसाळ्यात करण्याच्या गोष्टींची जंत्रीच असते ती.  पाऊस म्हटल्यावर आठवतो तो पहिल्या पावसातल्या मातीचा सुगंध. मग आठवतात ती गरमागरम कांदा भाजी, वाफाळता चहा आणि मान्सून पिकनिक. हल्ली त्यात एक गोष्ट अॅड झालीय.. ती म्हणजे पावसातल्या त्या रोमँटिक आठवणीतली बाईक राईड.
धो- धो पाऊस कोसळतोय, आसपास हिरवंगार दिसतंय, रस्त्यावर पाण्याचे ओहोळ वाहताहेत आणि वाऱ्याच्या साथीत आपण बाईकवरून भन्नाट पळतोय.. धमाल!! म्हणूनच सध्या अनेक तरुण ‘बाईक राईड’चे बेत आखण्यात गुंग आहेत. यात कोकण, लोणावळा, खंडाळा, सापुतारा, माळशेज घाट, रायगड अशा विविध ठिकाणी बाईक राईडचे आयोजन केले जात आहे. त्यातही कोकण, लोणावळा हे तरुणाईचे हिट बाईकिंग स्पॉट ठरताहेत. सध्या या बाईक राईडच्या पोस्ट अनेकांच्या फेसबुक वॉलवर दिसत आहेत. अनेक ग्रूप फेसबुकवरूनच या बाईक राईडचे आयोजन करताना दिसतात. या राईड एक दिवसपासून ते चार दिवसांपर्यंत आहेत. याचं प्लॅनिंग, अगदी ट्रॅव्हल पॅकेजेससह सोशल नेटवर्कवरून दिलं जात आहे. कोकणापासून ते अगदी लेह-लडाखला बाईकवर जाण्याचे प्लॅन्स फेसबुकवरच शिजताहेत.
या ग्रूप्समध्ये काही प्रोफेशनल टूर अरेंजर आहेत, तर काही हौशी तरुणाईचे ग्रूप. या कट्टय़ांवर सध्या पावसात फिरायला कुठे जायचं, याचीच चर्चा आहे. फक्त मुलंच नाही, तर मुलीसुद्धा या राईडमध्ये सहभागी होत आहेत. महाराष्ट्रातल्या बाईक राईड या राईड केवळ राज्यातील तरुणांनाच नाही तर केरळ, तामिळनाडू, गुजरात अशा बाहेरच्या तरुणांनाही आकर्षित करत आहेत.
तुमच्या फेसबुकवर मान्सून राईड असं सर्च केलंत तरी तुम्हाला अनेक इव्हेंटची माहिती मिळेल. यात हॅपी मान्सून, राईड द वेस्टर्न घाट इन मान्सून, राईड द मान्सून इन महाराष्ट्र, मान्सून राईडर्स, मान्सून बाईकर्स वे अशी अनेक इव्हेंटसची पेज सापडतील. यातून तुम्ही माहिती मिळवू शकता. या पेजवर राईडला येताना का करावे आणि कसा असेल प्रवास, किती दिवस लागतील आदी सर्व माहिती सविस्तर दिली आहे.
काळजी घ्या.
या गुपमध्ये जॉइन होताना प्रत्येकाने आपली काळजी घेणं आवश्यक आहे. ग्रूपची माहिती किती खरी-खोटी आहे ते तपासून बघायला हवं. बाईक राईडरने फेसबुकवरच्या माहितीची शहानिशा केल्याशिवाय कुणाबरोबर जाऊ नये. कारण आपली सुरक्षा ही आपणच घेऊ शकतो नाही का?
घाटातले बाजीगर
कोसळणाऱ्या पावसात धुंद होऊन बाईक चालविण्यासारखं पॅशन नाही. या कोसळणाऱ्या सरीबरोबर घाटातून कोसळणारा धबधबा पाहण्यात काही वेगळी मज्जा असते. घाटातून बाईक चालवताना पडणाऱ्या सरी झेलत आणि तो ऊन सावलीचा खेळ बघत जाणं हा भन्नाट अनुभव. हा घाट जो जिद्दीने पार करतो. तोच खरा बाजीगर. रत्नागिरी, पावस, राजापूर, देवगड, कुडाळ, सावंतवाडी, मालवण, माळशेज घाट, लोणावळा, अलिबाग, महाबळेश्वर, माथेरान ही ठिकाणं बाईक राईडसाठी फेमस आहेत.

तीन दिवसांची महाराष्ट्र राईड
मी गेल्या अनेक वर्षांपासून बाईक राईडमध्ये सहभागी होत आहे. आम्ही भारताच्या विविध भागांत प्रवास केला आहे. परंतु महाराष्ट्रातील पावसाळा काही वेगळा असतो. म्हणून आम्ही आमच्या राईडला ‘राईड द मान्सून इन महाराष्ट्र’ असे नाव दिले आहे. पावसात बाईक चालवण्याची मज्जा काही वेगळी असते.
– कल्पेश आचार्य, सुरत

आंबोली घाटात जास्त मज्जा
मी पहिल्यांदा बाईक राईड करणार आहे. त्यामुळे मनात भीती आणि उत्सुकता आहे. आंबोली घाटातून जाताना निसर्गसौंदर्याचा आनंद मिळणार आहे.
– समृद्धी पिंपळे, पुणे</strong>

बाईक राईडचा मोह आवरत नाही
मी गेल्या सात-आठ वर्षांपासून बाईक राईडमध्ये सहभागी होत आहे. प्रत्येक बाईक राईडचा अनुभव वेगळा असतो. यंदा आम्ही पश्चिम घाटातून बाईक राईडचा आनंद घेणार आहोत.
– साकेत पिंपळे, पुणे