|| वेदवती चिपळूणकर

यंदाच्या ‘लॅक्मे फॅशन वीक’च्या मेन्स वेअरमध्ये खासकरून जॅकेट्सचा ट्रेण्ड दिसून आला, मात्र त्यातही नेहमीपेक्षा वेगळेपणा होता. नेहमीच्या लाँग जॅकेट्सना बाजूला सारून शॉर्ट जॅकेट्स किंवा अगदी क्रॉप जॅकेट्ससुद्धा मेन्स वेअरमध्ये डिझाइन केली गेली.

केवळ मेन्स वेअरच नव्हे तर या वेळी रॅम्पवर मेन्स अ‍ॅक्सेसरीजसुद्धा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाल्या. समर कलेक्शन्स असल्यामुळे गॉगल्सचा वापर अनेक डिझाइन्समध्ये केला गेला होता. ‘स्पोर्टी क्रॉस बॅग्ज’ हा ट्रेण्ड जवळजवळ सगळ्याच डिझाइनर्सच्या कलेक्शन्समध्ये दिसून आला. काही ‘ऑफ – द – ट्रॅक’ डिझाइन्समध्ये मेल मॉडेल्सना वेगवेगळे हेड गिअर्ससुद्धा अ‍ॅक्सेसरी म्हणून देण्यात आले होते. मेन्स कलेक्शनमधल्या मेकअप आणि अ‍ॅक्सेसरीजनी या वेळच्या शोमध्ये लक्ष वेधून घेतलं हे नक्की!

फॅशन म्हटलं की वुमन सेंट्रिक माहौलच डोळ्यासमोर येतो. फॅशन शोमध्ये किंवा एखाद्या डिझाइनरच्या कलेक्शनमध्ये भरपूर मेन्स वेअर आउटफिट्स असणं हे थोडंसं आदर्शवादीच होतं. मात्र यंदाच्या फिजिकली पार पडलेल्या ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये वेगळंच चित्र पाहायला मिळालं. ‘लॅक्मे फॅशन वीक २०२१’ मध्ये मेन्स वेअरला बरोबरीने महत्त्व दिलेलं दिसून आलं. बहुतेक सगळ्याच डिझाइनर्सच्या कलेक्शनमध्ये या वेळी मेन्स वेअरचा समावेश होता.

फॅशनचे एक एक टॅबू मोडत फॅशन इंडस्ट्री प्रगती करते आहे याचं द्योतक म्हणजे या वेळच्या ‘लॅक्मे फॅशन वीक’मधलं मेन्स कलेक्शन म्हणावं लागेल. रंग, शेड्स, प्रिंट्स, पॅटन्र्स अशा कोणत्याही एलिमेंटची मर्यादा न ठेवता मेन्स कलेक्शनमध्ये आउटफिट्स डिझाइन केली गेली. जॅकेट्स, पॅन्ट्स, शूज सगळ्या डिझाइन्समध्ये रंगाची कोणतीही मर्यादा न ठेवता सर्व आउटफिट्समध्ये पेस्टल शेड्स वापरल्या गेल्या. नाजूक एम्ब्रॉयडरी, फ्लोरल पॅटर्न, सिक्वेन्स वर्क अशा सगळ्या प्रकारच्या डिटेल्सचा वापर मेन्स वेअरमध्ये मुक्तहस्ताने केला गेलेला दिसून आला. यंदाच्या ‘लॅक्मे फॅशन वीक’च्या मेन्स वेअरमध्ये खासकरून जॅकेट्सचा ट्रेण्ड दिसून आला, मात्र त्यातही नेहमीपेक्षा वेगळेपणा होता. नेहमीच्या लाँग जॅकेट्सना बाजूला सारून शॉर्ट जॅकेट्स किंवा अगदी क्रॉप जॅकेट्ससुद्धा मेन्स वेअरमध्ये डिझाइन केली गेली. सरसकट लेदर जॅकेट्स किंवा लेअर्ड जॅकेट्स म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर जाड जॅकेट्स न वापरता कॉटनची, सिल्कची, बुट्टे वर्क असलेली, बादला वर्क असलेली, थ्रेड एम्ब्रॉयडरी असलेली नाजूक आणि लाइटवेट जॅकेट्सही मेन्स वेअरमध्ये सादर केली गेली.

प्रत्येक डिझाइनरने काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न या वर्षी नक्कीच केला आहे. डिझाइनर नितीन बाल चौहानच्या डिझाइन्समध्ये ग्रे आणि व्हाइट्सचा जास्त वापर केलेला होता. तर डिझाइनर पवन सचदेवने संपूर्ण कलेक्शन मेन्स वेअरचं सादर केलं. ‘आयएनआयएफडी’च्या ‘जेन नेक्स्ट’मध्ये डिझाइनर राहुल दासगुप्तानेदेखील संपूर्ण कलेक्शनमध्ये मेन्स आउटफिट्सचे डिझाइन केले होते आणि त्यात सामान्यत: न दिसून येणाऱ्या शिबोरी वर्क, कॉटन आणि ऑर्गन्झा फॅब्रिकचा वापर केला होता. डिझाइनर गौरव खनिजोच्या ‘खनिजो’ कलेक्शनमध्ये क्रॉप आणि वुलन जॅकेट्स बघायला मिळाली. या शोचे मुख्य आकर्षण असलेल्या प्रसिद्ध फॅ शन डिझाइनर मनीष मल्होत्राच्या मेन्स वेअर डिझाइन्समध्ये हेवी जरदोसी वर्क आणि फेस्टिव्ह कलेक्शन असूनही गडद काळ्या रंगाचा मोठ्या प्रमाणावर वापर के लेला पाहायला मिळाला.

केवळ रॅम्पवर शोभणारी आणि काहीशी हटके मेन्स वेअर डिझाइन्सही या वेळच्या ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये पाहायला मिळाली. मल्टिकलर आणि अ‍ॅबस्ट्रॅक्ट पॅटर्नचे जॅकेट्स आणि त्यासोबत आर्मी कलरची पॅन्ट अशी कॉम्बिनेशन्स ‘सक्र्युलर डिझाइन चॅलेंज’मध्ये प्रियंका मुनीयप्पाने सादर केली. तर त्याच चॅलेंजमध्ये विनर ठरलेल्या सत्यजित वेतोसकर या डिझाइनरने त्याच्या ‘बँडिट’ या कलेक्शनमध्ये रेनकोट मटेरियलची आणि ब्राइट येलो, ऑरेंज अशा कॉम्बिनेशनची आउटफिट्स सादर केली. शंतनू-निखिल या नेहमीच्या मेन्स वेअरसाठी नावाजलेल्या डिझाइनर जोडीने ग्रे-ब्लॅक शेडमधली धोती, थ्री-फोर्थ पँटस, नी-लेन्ग्थ जॅकेट्स अशी डिझाइन्स प्रेझेंट केली. ‘पर्ल अकॅडेमी’च्या शोमध्ये सादर झालेल्या कलेक्शन्समध्येही पेस्टल शेड्स, फर जॅकेट्स, फ्लोरल पॅटन्र्स यांची चलती पाहायला मिळाली. खास ओपनिंग शोसाठी डिझाइनर अनामिका खन्नाने सर्व मेन्स वेअर डिझाइन्समध्ये एम्ब्रॉयडरी असलेल्या पांढऱ्या शॉर्ट आणि लॉन्ग जॅकेट्सचा वापर केला होता.

‘लॅक्मे फॅशन वीक’च्या रॅम्पवर यंदाच्या सीझनमध्ये मेन्स वेअरला तोटा नव्हता. दरवर्षी मेन्स वेअर डिझाइन्सच्या संख्येत होत असलेली वाढ बघून फॅशन ‘इन्क्लुजिव्ह’ आणि ‘युनिसेक्स’ होते आहे, असं म्हणायला हरकत नाही.

viva@expressindia.com