आपल्याकडे पोषणाबद्दल अनेक गैरसमज आहेत. आयुष्यातल्या एखाद्या टप्प्यावर आपल्यापैकी अनेकजण वजनाबाबत फारच विचार करतात. उपाशी राहून किंवा मर्यादित आहार घेऊन जास्तीचं वजन नियंत्रित करण्याचा प्रयत्न आपण करतो. पण या उपायांमुळे आपल्या शरीरावर नेमका काय परिणाम होईल, याचा मात्र आपण अजिबात विचार करत नाही. अनेकदा सल्ले आणि सूचना देऊनही वजन घटवण्यासाठी डाएटिंगचाच मार्ग चोखाळला जातो. सुयोग्य आहाराबाबत कोणतीही निश्चित परिमाणं नसल्याने, आहाराबद्दल गैरसमज निर्माण होणं स्वाभाविकच आहे.

आहाराबद्दल नेहमी आढळणारे गैरसमज

लो फॅट म्हणजे कमी कॅलरीज- साफ चूक
‘लो फॅट’ ही मार्केटिंगमधली एक लोकप्रिय संज्ञा आहे. तयार अन्नपदार्थ, ज्यांच्यात फॅट्सचं प्रमाण कमी असल्याचा दावा केला जातो, त्यांची चव राखण्यासाठी त्यांच्यात जास्त साखर किंवा तत्सम रिफाइण्ड काबरेहायड्रेट घटक टाकले जातात. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे ‘फॅट फ्री’ असं लेबल एखाद्या पदार्थाला लागलं की, लोकांना जणू ते पदार्थ वाट्टेल तसे खाण्याची परवानगीच मिळते. फॅट्स टाळण्याचा सोपा मार्ग म्हणजे ज्या पदार्थामध्ये निसर्गत:च भरपूर फॅट्स आहेत अशा पदार्थाचं म्हणजे चीज, होल मिल्क, मटण, बटाटय़ाचे चिप्स, आइस्क्रीम आदींचं मर्यादित सेवन करणं. स्वयंपाकाच्या पद्धतीत बदल केल्यानेही फायदा होतो. तळण्यापेक्षा पदार्थ ग्रिल करून, भाजून किंवा उकडून खावेत. प्रक्रिया केलेल्या पदार्थापेक्षा नैसर्गिक पदार्थाना पसंती द्यावी.

फॅट फ्री पदार्थ पौष्टिक असतात- सर्वसाधारणपणे चूक
मानवी शरीराला आहारातून काही प्रमाणात फॅट्स मिळणं आवश्यक असतं. उदाहरणार्थ, थायरॉइड हार्मोन्सना फॅट्स लागतात. अपुऱ्या फॅट्सअभावी थायरॉइडचं कार्य बिघडलं तर वजनवाढ निश्चित असते. बरेच डबाबंद आणि प्रक्रिया केलेल्या ‘फॅट फ्री’ खाद्यपदार्थामध्ये भरपूर साखर असते.

लो कॅलरी सोडा/ सॉफ्टड्रिंक्स डाएटसाठी चांगली असतात- चूक
‘अ‍ॅसपार्टेम’ या कृत्रिम गोडवा देणाऱ्या घटकामध्ये कमी कॅलरीज असल्या तरी तो भूक वाढवणारा घटक म्हणूनही काम करतो. मानवी शरीरासाठी तो विषारी मानला गेला आहे आणि त्याच्या अतिवापरामुळे चेतासंस्थेवर दुष्परिणाम होऊन पार्किनसन्स हा आजार होण्याची शक्यता बळावते.

फळांचे रस विरु द्ध फळं
फळांच्या रसांचं पौष्टिक मूल्य निश्चितपणे उच्च असतं, पण त्याचबरोबर त्यात ‘फ्रुक्टोस’ ही साखरही जास्त प्रमाणात असते. ग्लासभर संत्र्याचा रस हा ४ ते ५ संत्र्यांएवढा असतो. त्यात भरपूर साखर असते. त्यामुळे रसाऐवजी अख्खं फळ खाणंच जास्त हितकारक असतं, कारण त्यामुळे शरीराला आवश्यक ते पौष्टिक घटक आणि फायबरही मिळतं.

क्रॅश डाएट किंवा उपवासामुळे वजन कमी होतं- चूक
९५ टक्क्यांहून अधिक केसेसमध्ये अशा पद्धतीने झपाटय़ाने वजन कमी करणाऱ्यांचं वजन तितक्याच झपाटय़ाने वाढतं. अशा झटपट बारीक करणाऱ्या डाएट्समुळे आपल्या शरीरावर मरगळलेपणा, उतींमध्ये जिवंतपणा नसणं, स्नायूची कार्यक्षमता कमी होणं आदी वाईट परिणाम होऊ शकतात. बॉडी फॅट कमी करणं गरजेचं असतं, जे झटपट होत नाही. स्नायूंच्या उती कॅलरीज खर्च करतात. त्यामुळे झटपट बारीक करणाऱ्या डाएट्समुळे तुमच्या शरीरातलं पाणी कमी होत असेल आणि स्नायूंच्या उतींना इजा पोहोचत असेल तर तुमची चयापचय क्रिया मंदावते आणि वजन पुन्हा वाढतं.

लो कॅलरी/ काबरेहायड्रेटस पदार्थामुळे वजन कायमस्वरूपी घटतं
कमी काबरेहायड्रेटस असलेले बरेच पदार्थ सध्या उपलब्ध आहेत. कोणत्याही पदार्थामध्ये किती कॅलरीज आहेत हे तपासून घेणं अत्यंत गरजेचं आहे. पदार्थाची चव आणि पोत चांगला होण्यासाठी त्यात जास्तीची साखर आणि स्टार्चसारखे घट्टपणा वाढवणारे पदार्थ टाकले जातात. जास्त काळासाठी काबरेहायड्रेट्सचं सेवन पूर्णत: रोखून धरल्याने मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेवर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. तसंच मळमळणं आणि थकवा येणं हे परिणामही दिसतात. प्रक्रिया केलेल्या पदार्थामध्ये कॉर्नसिरप आणि फ्लेवर्स असतात ज्यामुळे इन्सुलिनचं प्रमाण वाढतं आणि भूक लागते.

वजन जास्त असणं हे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असतं- नेहमीच खरं नसतं
शक्यतो योग्य ते वजन राखणं आणि निरोगी राहणं केव्हाही चांगलं. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा-आरोग्य हे वजनापेक्षा अधिक महत्त्वाचं असतं. जर तुम्ही आरोग्यावर लक्ष केंद्रित केलं तर तुमचं वजन योग्य राहणारच. सकारात्मक भावनांवर लक्ष केंद्रित करा आणि नियमित व्यायाम, आहाराच्या सुयोग्य सवयी, योगसाधना आणि जीवनाबाबत सकारात्मक दृष्टिकोन बाळगून रसरशीत आणि निरोगी आयुष्य जगा.