सौरभ करंदीकर

१९६० आणि १९७०च्या दशकांत लेझरवर अधिक संशोधन झालं आणि या तंत्रज्ञानाचा वापर तूर्तास शस्त्रास्त्रांमध्ये फारसा होणार नाही हे सिद्ध झालं. विज्ञानकथा लेखकांनी आणि दिग्दर्शकांनी आपला मोर्चा मग पल्स रायफल आणि फेझर्स वगैरे काल्पनिक शस्त्रांकडे वळवला. परंतु माझ्यासारख्या कॉमिक्सवेडय़ा वाचकांच्या मनात ‘लेझर’बद्दल आकर्षण निर्माण झालं ते कायमचं.

लहानपणी इंद्रजाल कॉमिक्सच्या पानांमध्ये ‘फ्लॅश गॉर्डन’ नावाच्या विश्वयोद्धयाच्या रोमांचक कथा वाचायला मिळत. प्रत्यक्ष कथा समजल्या नाहीत तरी चित्रविचित्र आकाराची अवकाशयानं, रंगीबेरंगी पोशाख आणि मुख्य म्हणजे फ्लॅशच्या हातातली लेझर गन आकर्षक वाटायची. नुसत्या प्रकाशकिरणांच्या साहाय्याने शत्रूचा नायनाट करणारा फ्लॅश एखाद्या देवासारखा किंवा केवळ शापाने समोरच्याला भस्म करणाऱ्या पौराणिक ऋषीमुनींसारखा वाटायचा. ‘आपल्यालासुद्धा अशीच एखादी लेझर गन मिळाली तर काय बहार येईल?’, असं वाटायचं.

तो काळ इंटरनेटपूर्व असल्यामुळे ‘लेझर म्हणजे काय?’, ‘त्याची खरंच अशी गन असते का?’, इत्यादी प्रश्नांची उत्तरं मिळायला काही वर्ष लोटली. लहान मुलांची, परंतु उद्बोधक माहिती देणारी ‘किशोर’, तसंच मराठी विज्ञान परिषदेचं ‘कुतूहल’ इत्यादी मासिकं हाती पडावी लागली. ‘लाईट अँप्लिफिकेशन बाय सिम्युलेटेड एमिशन ऑफ रेडिएशन’, (छअरएफ) म्हणजेच ‘लेझर’ हे समजलं. म्हणजे नेमकं काय होतं? जेव्हा काही विशिष्ट काच, स्फटिक किंवा वायुरूप पदार्थाचा आणि विजेचा संपर्क घडतो तेव्हा त्या पदार्थाच्या अणूंमधील इलेक्ट्रॉन्स ‘प्रभावित’ होतात, त्यांची अणूच्या केंद्राभोवतीची कक्षा बदलते आणि त्याचा परिणाम म्हणून एक तीव्र प्रकाशझोत त्या पदार्थाबाहेर पडतो. हा प्रकाशझोत आपल्या बॅटरीतून बाहेर पडणाऱ्या प्रकाशाप्रमाणे काही अंतराने फिका पडत नाही. तो मैलोन्मैल प्रखरच राहतो. काही लेझर किरणं चक्क चंद्रापर्यंत जाऊन परावर्तित होतात, परंतु त्यांची प्रखरता कायम राहते.

लेझरचा शोध अमेरिकन इंजिनीअर थिओडोर माईमन याने १९६० साली लावला, पण विज्ञानकथा नेहमीच विज्ञानापुढे एक पाऊल असते, ते याबाबतीतदेखील खरं ठरलं. प्रसिद्ध विज्ञानकथा लेखक एच. जी. वेल्स यांच्या १८९८ मधल्या ‘वॉर ऑफ द वर्ल्ड्स’ या कादंबरीत विध्वंसक ‘हीट-रे’चा उल्लेख आहे. ज्यूल्स व्हर्न यांच्या ‘फग्र्युलेटर’, तसंच जॉर्ज ग्रिफिथ यांच्या १९११ साली लिहिलेल्या ‘लॉर्ड ऑफ लेबर’ या कथांमध्येदेखील या ना त्या प्रकारच्या ‘रे’चा उल्लेख आढळतो. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला झालेल्या एक्स-रेविषयक संशोधनाचा या विज्ञानकथांवर पगडा होता.

आर्थर सी. क्लार्क यांच्या १९५५ साली प्रसिद्ध झालेल्या ‘अर्थलाईट’ नावाच्या कादंबरीत ‘पार्टिकल बीम’ नावाच्या शस्त्राचा उल्लेख आहे. लेझरच्या शोधानंतर मात्र ‘फ्लॅश गॉर्डन’पासून ‘स्टार ट्रेक’ आणि ‘स्टार वॉर्स’पर्यंत साऱ्याच विज्ञानकथांवर आधारित चित्रपटांमध्ये आणि चित्रकथांमध्ये लेझर गन्स दिसू लागल्या. लेझर गन्स चित्रविचित्र आवाज करत, मोठे स्फोट घडवून आणत आणि प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे राहात. वास्तविक प्रकाशकिरण कुठलाही गोंगाट करत नाहीत, प्रकाशाचा आणि आवाजाचा तसा फारसा संबंध नसतो, या वैज्ञानिक सत्याकडे या चित्रपटांनी कायम दुर्लक्ष केलेलं आहे. अवकाशाच्या पोकळीत, जिथे ध्वनी वाहून नेण्यास माध्यमच नाही, तिथेही चित्रपटातील लेझरचा कानठळ्या बसवणारा आवाज येतो, यावरून मनोरंजन आणि विज्ञान यांचं नेहमीच ‘जमत’ नाही हे लक्षात येतं.

१९६० आणि १९७०च्या दशकांत लेझरवर अधिक संशोधन झालं आणि या तंत्रज्ञानाचा वापर तूर्तास शस्त्रास्त्रांमध्ये फारसा होणार नाही हे सिद्ध झालं. विज्ञानकथा लेखकांनी आणि दिग्दर्शकांनी आपला मोर्चा मग पल्स रायफल आणि फेझर्स वगैरे काल्पनिक शस्त्रांकडे वळवला. परंतु माझ्यासारख्या कॉमिक्सवेडय़ा वाचकांच्या मनात ‘लेझर’बद्दल आकर्षण निर्माण झालं ते कायमचं. १९८०च्या दशकांत अमेरिकेने आणि रशियाने ‘स्वसंरक्षण’ हे कारण पुढे करत उपग्रहांवर आण्विक अस्त्रं बसवण्याच्या अनेक कल्पना पुढे आणल्या. या कार्यक्रमांना ‘स्टार वॉर्स’ असं नावही दिलं गेलं, परंतु एखादं बटन दाबलं आणि क्षणार्धात उपग्रहांवरून एखादा अग्निबाण नाही तर एखादा प्रखर लेझर किरणांचा लोळ आलाय आणि जमिनीवरच्या एखाद्या शहराची धूळधाण करून गेलाय, हे आतापर्यंत तरी फक्त ‘जेम्स बॉण्ड’च्या चित्रपटांमधूनच दिसलंय. अमेरिकन सैन्याने लेझर तंत्रज्ञानाचा वापर शस्त्रास्त्रांमध्ये कसा करता येईल याचं संशोधन १९६० पासून आजपर्यंत चालूच ठेवलं आहे. २००५ सालापर्यंत त्यांनी ‘टॅक्टिकल हाय एनर्जी लेझर’ (ळऌएछ)च्या साहाय्याने शत्रूपक्षाकडून येणारे अग्निबाण आणि तोफगोळे कसे निकामी करायचे याचे अनेक प्रयोग केले. मात्र अवजड यंत्रणा, खर्च आणि त्यामानाने विनाश करण्याची पुरेशी कुवत नसल्याचं  कारण देत ळऌएछ रद्द करण्यात आलं. कमी शक्तीच्या लेझर्सचा उपयोग निशाणा साधायला मात्र सर्रास केला जातो. शत्रूला क्षणभर आंधळं करण्यासाठी आजही कमी शक्तीच्या लेझर रायफलचा उपयोग केला जातो. २०२० सालाच्या सुरुवातीला अमेरिकन आरमाराने १ किलोमीटर अंतरावर असलेल्या मोटारबोटीला किंवा टोरपिडोला उद्ध्वस्त करू शकेल अशा ३० किलोवॅट क्षमतेच्या, ‘हेलिओस’ नावाच्या लेझरची चाचणी घेतली आहे.

लेझर्सचा उपयोग नुसता विध्वंस घडवण्यासाठीच नाही तर अनेक विधायक कामांसाठीदेखील केला जातो. लेझर किरणांच्या उत्सर्गाच्या क्षमतेवर, जी वॅटमध्ये मोजली जाते, त्यांचा उपयोग ठरतो. १०० ते ३००० वॅट्सचे लेझर्स कारखान्यात धातूच्या वस्तूंना भोकं पाडण्यासाठी वापरले जातात, तर ३० ते १०० वॅट्सचे लेझर शस्त्रक्रियांमध्ये वापरले जातात. ५ ते ४०० मिलीवॅट्सचे लेझर सीडी आणि डीव्हीडी बर्न करण्यासाठी वापरतात, तर मीटिंगदरम्यान एखाद्या आलेखाकडे सर्वाचे लक्ष केंद्रित व्हावं म्हणून १ ते ५ मिलीवॅट्सचे ‘पॉइंटर’ लेझर वापरले जातात.

कुठल्याही तंत्रज्ञानाचा उपयोग चांगल्या अथवा वाईट कामासाठी करून घेण्याची धोकादायक क्षमता मनुष्याकडे आहे यावर थोडासा ‘प्रकाश’ टाकावा, म्हणून हा लेखप्रपंच.