|| तेजश्री गायकवाड

‘मिस इंडिया’ या सौंदर्य स्पर्धेबरोबर काही महिन्यांपूर्वी ‘मिस्टर इंडिया’ ही सुद्धा स्पर्धा झाली. या स्पर्धामध्ये जिंकलेले स्पर्धक आपल्या देशाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करतात. या स्पर्धाइतक्याच महत्त्वाच्या आणि मानाच्या समजल्या जाणाऱ्या स्पर्धा जिंकून यंदा भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणारे दोन तरुण मराठमोळे चेहरे आहेत. पौर्णिमा बुद्धिवंत हिने नुकतीच ‘मिस इंडिया एक्स्विसिट  इंटरनॅशनल २०१९’  ही स्पर्धा जिंकली आहे. तर सिद्धेश पवार हा तरुण भारताला फिलिपिन येथे होणाऱ्या ‘मिस्टर टुरिझम ग्लोब’ या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. या दोघांशीही ‘व्हिवा’ टीमने संवाद साधला..

२०१६ आणि २०१७ हे दोन्ही वर्षे भारतीय कधीही विसरू शकत नाहीत. या दोन्ही वर्षी मानाच्या सौंदर्य स्पर्धामध्ये भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजी मारली. २०१४ साली रोहित खंडेलवाल याने ‘मिस्टर वर्ल्ड’ पटकावला, तर पुढे २०१७ साली मानुषी छिल्लरने ‘मिस वर्ल्ड’चा मान आपल्या देशाला मिळवून दिला. मानुषीने मिळवलेल्या यशानंतर पुन्हा एकदा सौंदर्य स्पर्धाचे आव्हान पेलण्याची प्रेरणा अनेकांना मिळाली. अशा सौंदर्य स्पर्धा म्हणजे सर्वसामान्य माणसांनी भाग घेण्याची गोष्ट नाही असाच काहीसा समज आपल्याकडे रूढ आहे. परंतु हाच समज पौर्णिमा आणि सिद्धेश दोघांनीही मोडीत काढला आहे.

पौर्णिमा बुद्धिवंत हिच्या घरची परिस्थिती अगदी बेताची असतानाही तिने जिद्दीने आज हे यश मिळवलं आहे. तिच्या प्रवासाबद्दल ती म्हणते, ‘माझ्या एका मित्राने इन्स्टाग्रामवर फ्री  फोटोशूटबद्दल पोस्ट केली होती. आणि मी बिचकतच आपण ट्राय करू म्हणत ते फोटोशूट केलं. माझ्या त्या फोटोजना लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला, अनेकांनी मॉडेलिंग कर असेही सल्ले दिले. तेव्हापासून माझ्यात बदल झाला. माझ्यात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला.’ पौर्णिमाने नंतर एका सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला. भीतभीतच मी ऑडिशन फेरी जिंकले, पण पुढे स्पर्धा जिंकू शकले नाही, असे सांगतानाच त्या स्पर्धेने आपल्याला खूप आत्मविश्वास दिल्याचे पौर्णिमा म्हणते. पौर्णिमाने पहिल्या फोटोशूटनंतर २०१८ मध्ये जॉब करायला सुरुवात केली. आठवडाभर काम आणि आठवडय़ाच्या शेवटी फोटोशूटचे प्रोजेक्ट असे करत करत तिने आपले प्रयत्न सुरू ठेवले. २०१८ साली तिने ‘मिस्टर आणि मिस महाराष्ट्र’मध्ये भाग घेतला आणि अगदी फिनालेपर्यंत बाजी मारली. ‘मी फिनालेपर्यंत पोहोचले तेव्हा मला खूप आनंद झाला. पुढे मी अशा स्पर्धामध्ये सातत्याने भाग घेऊ  लागले. त्याच वेळी मला ‘मिस इंडिया एक्स्विसिट’ या स्पर्धेबद्दल समजलं, असं तिने सांगितलं. या स्पर्धेत विजेती ठरलेली पौर्णिमा आता याच स्पर्धेसाठी पुढच्या महिन्यात भारताचे अमेरिकेत प्रतिनिधित्व करणार आहे. आयुष्य कधीच सोपं नसतं, पण स्वप्न बघायची असतात आणि ती पूर्णही करायची असतात, असं मत असलेली पौर्णिमा समाजासाठीही खूप मोलाचं काम करते आहे.

‘२०१७ साली मी आर्किटेक्चरची पदवी घेतली. पदवीच्या शेवटच्या वर्षांत असताना मी ‘टीच फॉर इंडिया’ या संस्थेअंतर्गत मुलांना नि:शुल्क वेगवेगळे विषय शिकवू लागले. नंतर मी ‘कर्व संकलन’ नावाने वेगवेगळ्या शाळेत जाऊन चित्रकलेचेही धडे दिले. पुढे या कामामुळे मला टी.जी.पी.सी.च्या ‘मिस इंडिया’ (सीजन ६) स्पर्धेत ‘मिस गोल्डन हार्ट’ हे टायटल जिंकता आले’, असे सांगणाऱ्या पौर्णिमाला नुकताच ‘हॅप्पी क्लब मुंबई’कडून ‘यंग अचिवर अ‍ॅवॉर्ड’ही मिळाला आहे. पौर्णिमा आता ‘मिस इंडिया एक्स्विसिट : क्वीन फॉर कॉझ २०१९’साठी तयारी करते आहे.

पौर्णिमासारखीच काहीशी कहाणी २२ वर्षांच्या सिद्धेश पवारची आहे. गेल्या तीन वर्षांत त्याने ‘मिस्टर रायगड बेस्ट फोटोजेनिक २०१७’, ‘मिस्टर खोपोली २०१७’ (पहिला रनरअप), ‘मिस्टर इंडिया २०१७/१८’ (सेमी फायनॅलिस्ट), ‘मिस्टर युनिव्हर्सिटी २०१८’ आणि ‘मिस्टर नॉर्थ इंडिया २०१८/१९’ (विनर) अशा अनेक स्पर्धामध्ये भाग घेत यश मिळवलं आहे. ‘अनेक स्पर्धामधून भाग घेत मी शेवटी ‘मिस्टर नॉर्थ इंडिया २०१८/१९’चा किताब जिंकला. मी या स्पर्धेसाठी ऑनलाइन ऑडिशन दिली होती. आणि पुढे स्किल टेस्ट, टॅलेंट राऊंड, पर्सनल इंटरव्ह्य़ू आणि शेवटी प्रश्नोत्तराचा राऊंड जिंकत मी हे टायटल मिळवलं’, असं सिद्धेश सांगतो. सिद्धेशने केबीन क्रूचं शिक्षण घेतलं आहे. त्याने सिंगापूर एअरलाइनबरोबर इंटर्नशिपही केली आहे. आताची पिढी सतत सोशल मीडियाचा वापर करत असते. या सोशल मीडियाचाही त्याच्या यशामध्ये सहभाग आहे. त्याला पहिल्या सौंदर्य स्पर्धेची माहितीसुद्धा फेसबुकवरूनच मिळाली. ‘मला पहिल्यांदा सौंदर्य स्पर्धेत यश मिळालं तेव्हा मी २० वर्षांचा होतो. पहिल्या यशानंतर मी मागे वळून बघितलं नाही. फोटोशूट, वेगवेगळ्या सौंदर्य स्पर्धा, वेगवेगळ्या ब्रॅण्डसाठी काम करत करत माझा हा प्रवास अजूनही सुरू आहे’, असं सिद्धेश सांगतो. मला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचं नाव मोठं करायचं आहे. माझी प्रत्येक तयारी, काम त्याच दृष्टीने मी करतो आहे, असेही त्याने सांगितले.

वर्षांनुर्वष सुरू असलेल्या या सौंदर्य स्पर्धा गेल्या काही वर्षांपासून अगदी सर्वसामान्य माणसापर्यंत सहज पोहोचू लागल्या आहेत. आणि यामुळेच आपल्या देशातल्या अनेक तरुणांना या सौंदर्य स्पर्धाची कवाडं खुली झाली असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांना त्यांची गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळते आहे.