तेजश्री गायकवाड viva@expressindia.com

करोनाचा कहर सगळीकडे पसरलेला आहे. या धामधूमीत सौंदर्यस्पर्धाचा विचारही मनाला शिवणे अशक्य. गेलं वर्षभर ६९ वी ‘मिस युनिव्हर्स’ अर्थात विश्वसुंदरीचा मान मिळवून देणारी ही स्पर्धा पुढे पुढे ढकलण्यात आली होती. अखेर या आठवडय़ात फ्लोरिडामध्ये या सौंदर्यस्पर्धेचा अंतिम सोहळा पार पडला. यंदा ‘मिस युनिव्हर्स’चा किताब मेक्सिकोच्या २६ वर्षीय तरुणी अँड्रिया मेझा हिने मिळवला आहे. तर भारताची २२ वर्षीय अ‍ॅडलाईन कॅस्टेलिनोने या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर आपला झेंडा रोवला आहे. यंदाच्या या स्पर्धेवरही करोनाचा परिणाम निश्चितपणे जाणवला.

गेल्या वर्षीपासून करोनाने जगभर थैमान घातल्याने अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या, तर काही पुढच्या वर्षीपर्यंत लांबणीवर टाकण्यात आल्या. २०२० या वर्षीची ‘मिस युनिव्हर्स’ ही स्पर्धा यंदा फ्लोरिडामध्ये पार पडली, यात ७४ स्पर्धकांनी भाग घेतला होता. करोनाची साथ असल्याने सगळे नियम पाळून कमी लोकांमध्ये आणि साध्या पद्धतीने ही स्पर्धा हॉलीवूडमधील ‘रॉक हॉटेल अ‍ॅण्ड कॅसिनो’ येथे घेण्यात आली. या स्पर्धेची अंतिम फे री ही नेहमी विजेता ठरवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असते, त्यात स्पर्धकांच्या बुद्धिमत्तेचा खरा कस लागतो. या अंतिम फे रीत करोनाच्या अनुषंगानेही प्रश्न विचारण्यात आले होते. अगदी अँड्रिया मेझाला शेवटच्या प्रश्नोत्तरांच्या फेरीमध्ये ‘तू जर तुझ्या देशाची प्रमुख असतीस, तर करोनाची साथ कशी हाताळली असतील?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ही परिस्थिती हाताळण्यासाठी कुठलीही एक आदर्श पद्धत नाही, मात्र असे असले तरी गोष्टी टोकाला जाण्यापूर्वीच मी टाळेबंदी लागू केली असती. या आजारात जीवितहानी मोठय़ा प्रमाणावर होते आहे आणि ते परवडणारे नाही. आपण लोकांची काळजी घेतली पाहिजे. मी देशाची प्रमुख असते तर सुरुवातीपासूनच लोकांची काळजी घेतली असती, असे उत्तर तिने दिले. तर चौथ्या क्रमांकावर आलेल्या मिस इंडिया कॅस्टेलिनोला, अर्थव्यवस्थेवर ताण असतानाही ‘कोविड-१९’मुळे देशांनी टाळेबंदी कायम ठेवावी की आपल्या सीमा इतर देशांसाठी उघडून संसर्गाचा धोका पत्करावा? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर मी भारतातून आले आहे. सध्या भारतातील परिस्थितीचा जो अनुभव आम्ही घेतो आहोत, त्यातून आपल्या प्रियजनांच्या आरोग्यापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही हे मला विशेषत्वाने जाणवले आहे. देशाची अर्थव्यवस्था आणि तेथील नागरिकांचे आरोग्य यामध्ये समतोल निर्माण करण्याची गरज आहे. यासाठी सरकारने लोकांच्या बरोबरीने काम के ले पाहिजे, तरच हा समतोल साधता येईल. अर्थव्यवस्थेसाठी उपयुक्त ठरेल अशी निर्मिती करणे गरजेचे आहे, असे मत तिने व्यक्त के ले.

‘मिस युनिव्हर्स’ ही स्पर्धा विविध फेऱ्यांमध्ये पार पडते. प्राथमिक फेरी आणि लाइव्ह शो असं सुरुवातीच्या फे ऱ्यांचं विभाजन असतं. प्राथमिक फेरीमध्ये स्पर्धक इंट्रोडक्शन, नॅशनल ड्रेस, स्विमसूट किंवा अ‍ॅथलेटिक वेअर आणि सर्वात शेवटी इव्हिनिंग गाऊन अशा विविध फे ऱ्यांमधून एकेक कसोटी पार पाडत पुढे जातात. इंट्रोडक्शन आणि नॅशनल ड्रेस या फेरीनंतर  लाइव्ह शो अर्थात सेमी शोमध्ये प्राथमिक फेरीमधून निवड झालेल्या स्पर्धकांची यादी जाहीर केली जाते. यात यंदा २१ स्पर्धकांची निवड झाली होती. त्यांच्यात पुन्हा स्विमसूटची फेरी रंगली आणि त्यातून टॉप १० स्पर्धक निवडले गेले. पुन्हा या १० स्पर्धकांमध्ये इव्हिनिंग गाऊनची फेरी झाली, ज्यातून टॉप ५ ची निवड करण्यात आली. यामध्ये भारत, मेक्सिको, ब्राझील, पेरू आणि डॉमनिक रिपब्लिक या देशांच्या स्पर्धकांनी बाजी मारली. या टॉप ५ स्पर्धकांमध्ये महत्त्वाची प्रश्नोत्तरांची फेरी होते. त्यानंतर उत्स्फूर्त भाषणाचीही छोटी फेरी होते. या फे रीत स्पर्धकांना मिळालेल्या चिठ्ठीत असलेल्या विषयावर त्यांना बोलून परीक्षकांना इम्प्रेस करण्याची संधी मिळते. यंदा ‘मिस युनिव्हर्स’ हा किताब पटकावलेल्या अँड्रिया मेझाला ‘बदलते सौंदर्याचे निकष’ हा विषय देण्यात आला होता. ‘आपण अशा समाजात राहतो जो अधिकाधिक प्रगत आहे. आपण जसजसे समाज म्हणून प्रगत झालो, तसे आपण प्रचलीत विचारांवर भर देत आहोत. आजकाल सौंदर्य म्हणजे निव्वळ दिसणे असे मानले जाते. माझ्यासाठी सौंदर्य म्हणजे आपली जिद्द व मानसिकतेचे प्रतिबिंब आहे. आपल्या वर्तनातून ते दिसत असते,’ असे मत तिने आपल्या छोटेखानी भाषणातून व्यक्त के ले. या फेरीनंतर टॉप ५ स्पर्धकांना मेगा स्टार कलाकारांबरोबर छानसे सादरीकरण करण्याची संधी मिळाली. शेवटच्या आणि बाकीच्या फेऱ्यांमधून मिळवलेल्या गुणांची बेरीज करून स्पर्धेचा निकाल लावला जातो. या संपूर्ण स्पर्धेमध्ये स्पर्धकांना वेळोवेळी ट्रेनिंग दिले जाते. भारताच्या दृष्टीने अ‍ॅडलाईन केस्टेलिनोने चौथ्या क्रमांकावर आपले स्थान राखून ठेवले हे महत्त्वाचे आहे.

सौंदर्य स्पर्धा या के वळ स्पर्धक किती सुंदर दिसतात एवढय़ापुरत्याच मर्यादित नसतात, त्यात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची कसून परीक्षा घेतली जाते. त्यांचे विचार, बुद्धिमत्ता यालाही तेवढेच महत्त्व दिले जाते. करोनाने जगभर जे आर्थिक-सामाजिक संकट उभे राहिले आहे, त्याचाही सामना भविष्यात लोकांना करावा लागणार आहे. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत ही परिस्थिती हाताळण्याची क्षमता स्पर्धकांकडे आहे का? याचीही पडताळणी करण्यात आली. करोनाच्या प्रभावापासून यंदाची सौंदर्यस्पर्धाही दूर राहू शकली नाही हेही तितकेच खरे!