30 November 2020

News Flash

खावे त्यांच्या देशा : चलो मंगोलिया! (मंगोलिया १)

शेफ देवव्रत आपल्याला जगाच्या सफरीवर घेऊन चाललेत. ही खाद्यसंस्कृतीची सफर असेल. प्रत्येक देशाची ओळख त्यांच्या ‘खाने’सुमारीतून आपल्याला होईल.

| February 14, 2014 01:03 am

शेफ देवव्रत आपल्याला जगाच्या सफरीवर घेऊन चाललेत. ही खाद्यसंस्कृतीची सफर असेल. प्रत्येक देशाची ओळख त्यांच्या ‘खाने’सुमारीतून आपल्याला होईल. या सफरीत आता काही दिवस मंगोलियात विसावा घेऊ या.
मंगोलिया म्हटलं की, आपल्या डोळय़ासमोर येतो ‘चंगेझ खान’, त्याच्या असंख्य सन्याबरोबर, मंगोलियाच्या उंच सखल पठारावरून धुळीने माखलेल्या रस्त्यावरून त्याची आगेकूच. वेगवेगळय़ा भटक्या जमातींचं मंगोलियामध्ये पूर्वीपासून वास्तव्य! हय़ा सगळय़ा टोळय़ांना एकत्र करून चंगेझ खानने ‘मंगोलिया’ निर्माण तर केलाच, शिवाय युरोप आणि आशियामध्ये स्वत:चा दरारा निर्माण केला. स्वराज्यस्थापनेसाठी महापराक्रम करणारे शिवाजी महाराज काय, किंवा सबेरियापासून ते युरोपपर्यंत आपली राजवट प्रस्थापित करणारा चंगेझ खान काय, आपल्यासारख्याच हाडामासाची ही माणसं, पण अशा कोणत्या रसायनांनी, ‘लार्जर दॅन लाइफ’ बनली, याचं मला नेहमी कुतूहल आणि अप्रुप वाटतं.
मंगोलिया म्हणजे चीन आणि रशिया, या दोन देशांनी घेरलेला प्रदेश. त्यामुळे इथल्या खाद्यसंस्कृतीवर या दोघांचा प्रभाव बघायला मिळतो. विषम आणि अचानक बदलणारं हवामान, याला आवश्यक असे बदल मंगोलियन माणसांनी आपल्या जेवणात केले आहेत. वर्षांचे बहुतेक महिने थंड हवामान असल्यामुळे शरीराला उष्णता देणारे मटण, पोर्क, दुधाचे पदार्थ आणि विशिष्ट प्रकारचा चहा (सुतो साई) याचा जास्ती वापर केला जातो. पहिल्यापासून भटकी जीवनपद्धती असल्यामुळे जास्त मसाले, साहित्याचा वापर इथं केलेला दिसत नाही. जेवण तर चुलीवर बनवलं जातंच. पण, शिवाय गरम दगडांवर मांस शिजवण्याचीही पद्धत इथे दिसते.
मंगोलियन ‘स्टिम्ड डम्पिलग्ज्’ तिथे खूपच लोकप्रिय आहेत. शिवाय मटण, पोर्क आणि उंटाचे मांस खारवून, उन्हात वाळवून, साठवून ठेवण्याची तिकडे पद्धत आहे.
www.devwratjategaonkar.com

चिकन आणि नुडल्स सूप
साहित्य : चिकन – १ कप, ऑलिव्ह ऑईल – २ टेबल स्पून, मेथीचे दाणे – अर्धा टी स्पून, ठेचलेले लसूण – ६ टेबलस्पून, ठेचलेले आल – १ टी स्पून, सुंठ – १ चिमुट, चिकन स्टॉक – पाऊण कप, जीरा पूड – १ टेबल स्पून, हळद – १ टीस्पून, राइस नूडल्स – अर्धपॅकेट (सुपर मार्केट मध्ये मिळतात. हे अ‍ॅव्हेलेबल नसेल तर नेहमीचे नूडल्स वापरू शकता), बारीक लांब कापलेला पातीचा कांदा -अर्धा कप, कांदा लांब कापलेला – १ नग, टोमॅटो – १ नग, तीळाचे तेल – १ टेबलस्पून, मीठ – चवीनुसार
कृती : एका बाऊलमध्ये राइस् नुडल्स गरम पाण्यात भिजत ठेवा. पॅनमध्ये ऑलिव्ह ऑइल गरम करून त्यात मेथीचे दाणे परतून घ्या. त्यात आल लसूण टाकून परतून घ्या. जिरा पूड, हळद, कांदा, टोमॅटो टाका आणि चिकनचे तुकडे टाकून शिजवा. नंतर चिकन स्टॉक टाकून उकळी आणा. वरून तिळाचे तेल टाका. एका बाऊलमध्ये भिजलेले नुडल्स टाकून त्यात तयार झालेले सूप टाका आणि पातीचा कांदा टाकून सव्‍‌र्ह करा.

मंगोलियन टोफू
साहित्य : टोफू लांब कापलेले – १ कप, कॉर्नफ्लॉवर – ३ टी स्पून, तेल – तळण्यासाठी.
सॉससाठी साहित्य : बारीक चिरलेले लसूण – १ टी स्पून, बारीक चिरलेलं आलं – १ टी स्पून, राइस वाइन – अर्धा कप, लाइट सोया सॉस – ४ टेबल स्पून, मध – १ टी स्पून, होइसीन सॉस – २ टेबल स्पून, लाल तिखट – १ टी स्पून, शेंगदाण्याचे तेल, कांदा स्लाइस – २ नग छोटे, हिरवी सिमला मिरची – १, पातीचा कांदा – ३ टी स्पून, सजावटीसाठी – बारीक चिरलेली कोथिंबीर, काजू – २ टी स्पून
कृती : एका बाऊलमध्ये टोफू, कॉर्नफ्लॉअर टाकून मिक्स करा आणि ते तळून घ्या. एका पॅनमध्ये तेल गरम करून आलं, लसूण, परतून घ्या आणि सॉससाठी लागणारं इतर साहित्य त्यात टाकून परतून घ्या. मग टोफू टाकून सॉसला दोन मिनिटं शिजवून घ्या. पातीचा कांदा आणि काजूने सजावट करून मंगोलियन टोफू सव्‍‌र्ह करा.

आजची सजावट : काकडीचा फॅन (Cucumber Fan)

हॉटेलमध्ये असतं तसं सॅलड कावर्ि्हग आपल्यालाही करता आलं तर.. असं नेहमी वाटतं. ते वाटतं तितकं अवघड मुळीच नाहीय. हा कोपरा खास त्यासाठीच..

साहित्य : मध्यम आकाराची काकडी.

कृती : १. चित्रात दाखवल्याप्रमाणे काकडीला एका बाजूने तिरपा कट दय़ा. काकडीच्या छोटय़ा भागाचे दोन्ही कॉर्नर कट देऊन काढून घ्या. (चित्रात दाखवल्याप्रमाणे) २. आता काकडीच्या तुकडय़ावर व्ही शेप कट दय़ा.

३. काकडीचा मागच्या भागापर्यंत पातळ कट दय़ा. (पूर्ण स्लाइस कापायची नाही.) ४. आता काकडीचा हा फॅन हाताने दाब देऊन पसरवून सजावट करा.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2014 1:03 am

Web Title: mongolian food recipes
Next Stories
1 क्लिक
2 @ व्हिवा पोस्ट
3 दिल से
Just Now!
X