चॉकलेट न आवडणारी व्यक्ती सापडणं मुष्किलच! चॉकलेटचा चॉकलेटी चौकोन किंवा लांबुडका बार, बिस्किट किंवा केक-पेस्ट्रीमधल्या चोको चिप्स.. बऱ्याचदा ‘चॉकलेट’ म्हटल्यावर आठवणारे काही प्रसिद्ध ब्रॅण्ड्स नि सगळ्याच सोशल साइट्सवर अ‍ॅक्टिव्ह असलेले चॉकलेटप्रेमींचे ग्रुप्स. त्यावर आपापल्या चॉकलेटप्रेमाचं सांगितले गेलेले किस्से नि फेव्हरेट चॉकलेट्सचे तितक्याच प्रेमानं अपलोड केलेले फोटोज.. ही सगळी चॉकलेटी स्टोरी सांगायचं कारण असं की सध्या ट्विटरवर ‘माय चॉकलेटी मोमेंटस्’ हा ट्रेण्ड अ‍ॅक्टिव्ह आहे.
Mychocolatymoment  या अकाऊंटवर किती तरी चॉकलेटप्रेमींच्या चॉकलेटी क्षणांचे किस्से-कहाण्या वाचायला मिळताहेत. निमित्त आहे ‘सनफिस्ट डार्कफॅण्टसी’च्या ट्विटचं. आपापल्या आवडत्या चॉकलेटविषयी लिहा, या त्यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळतोय. या ‘माय चॉकलेटी मोमेंट्स’चे प्रकारही नाना आहेत. काय तर अमुक एखाद्या ब्रॅण्डचं चॉकलेट खाल्लं तर, पहिलावहिला पगार झाला म्हणून, असंच वाटलं म्हणून, मूड चेंजिंग म्हणून, केवळ चॉकलेटसाठी म्हणून, स्वप्नात चॉकलेट पाहिलं वगरे..  तर ‘कॅडबरी’, ‘अमूल’ ‘नेसले’, ‘फिएरो’ वगरे किती तरी देशी-विदेशी चॉकलेटचे ब्रॅण्ड आज अस्तित्वात आहेत नि अनेक जण त्यांच्या तरफदारीत मग्न असतात.
आपली आवडती गोष्ट आपल्या आवडत्या व्यक्तीला देऊन त्याच्यासोबत त्या मोमेंटचं सेलिब्रेशन करावंसं वाटलं तर त्यात नवल ते काय? पण हल्ली घे कुठलंही चॉकलेट नि दे कुणालाही असंही नसतं. कारण सध्या एक प्रकारचे जणू अलिखित ‘चॉकलेट एटिकेट’ही अस्तित्वात आलेत. त्यामुळं सहसा कॅडबरी सेलिब्रेशन्ससारखं चॉकलेट फेस्टिव्हल्स नि कॉर्पोरेट फंक्शन्ससाठी, सिल्क, बोर्नव्हिले, टेम्प्टेशन्स फ्रेण्ड्ससाठी किंवा खास फ्रेण्ड्ससाठी नि चॉकेलट बुकेज-बॉक्सेस नातलग किंवा ‘जीएफ’-‘बीएफ’साठी अशी चॉकलेट दिली जातात. कधी काही चॉकलेटप्रेमी ब्रॅण्डेड चॉकलेट्सना स्टॅच्यू करून सरळ मार्केटला जातात. चॉकलेट करायचं साहित्य जमवतात नि चक्क होममेड चॉकलेट करतात. वर छानसा रॅपर गुंडाळून आपलेपणानं गिफ्ट करतात.. हे सरप्राइज गिफ्ट समोरच्याला न आवडलं तरच नवल. त्याशिवाय बर्थ डे स्पेशल केकमध्ये चॉकलेट नाही, अशी सरप्राइज पार्टी विरळाच. मग कधी या चॉकलेटी मोमेंट्स मित्रांसोबत असतात, कधी फॅमिलीसोबत, कधी नवऱ्यासोबत तर कधी को-वर्कर्ससोबत. कधी प्रपोज, कधी अ‍ॅनिव्हर्सरी, कधी हनिमून, कधी परीक्षेसाठी बेस्ट लक तर कधी घवघवीत यश.. चॉकलेट नि त्याच्या फ्लेव्हरचे केक-पेस्ट्रीज, बिस्किट्स, कुकीज, कॅण्डीज.. असे किती पदार्थ सांगू की जे बिनाचॉकलेट अच्छे नहीं लगेंगे. त्यामुळं ‘कुछ खास हो जाए..’ म्हणत सेलिब्रेट केलेल्या आपल्या सगळ्याच ‘चॉकलेटी मोमेंटस्’ प्राइसलेस असतात.. ‘स्वप्नातला चॉकलेट’चा बंगला प्रत्यक्षातल्या अशा क्षणांनीच तर साकारतो.. ‘कुछ खास हैं जिंदगी में..’ असं म्हणत.