|| तेजश्री गायकवाड

फॅ शनडिझायनर, वेशभूषाकार, फॅशनइंडस्ट्रीमध्ये सातत्याने आपला ठसा उमटवणारा आणि नॅशनल-इंटरनॅशनल स्तरावर अनेक अ‍ॅवॉर्ड जिंकणारा मराठमोळा डिझायनर म्हणजे नचिकेत बर्वे. प्रत्येक नवीन गोष्ट एक्स्प्लोर करणारा नचिकेत अनेकांना ‘लॅक्मे’च्या ‘जेन नेक्स्ट डिझायनर’मधूनच पुढे आला आहे हे माहिती आहे, परंतु त्याआधीही त्याने आपल्या आवडत्या क्षेत्रात नावलौकिक मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.

फॅशन डिझायनर म्हणून झालेल्या त्याच्या आजवरच्या प्रवासाबद्दल सांगताना तो म्हणतो, ‘मी लहान असल्यापासूनच मला या फिल्डचं आकर्षण होतं. मला टेक्स्टाईल, फॅ शन फोटोग्राफी अशा गोष्टींमध्ये रस होता. माझ्या घरातील अनेकजण मेडिकल फिल्डमधील आहेत. २० वर्षांपूर्वी फॅ शनइंडस्ट्रीमध्ये एवढा करिअरला वाव नव्हता. परंतु तरीही माझ्या कुटुंबाने मला सपोर्ट केला. मी आधी माझं बी. कॉम. पूर्ण केलं आणि त्यानंतर मी फॅ शन डिझायनिंगचेशास्त्रशुद्ध पद्धतीने शिक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. कारण शिक्षण खूप महत्त्वाचं आहे हे माझं ठाम मत आहे. कोणत्याही क्षेत्रात आपलं करिअर करण्यासाठी आधी पूर्ण शिक्षण घेणं गरजेचं असतं असं मला वाटतं.’

नचिकेतचा ‘जेन नेक्स्ट डिझायनर’ ते आतापर्यंतचा प्रवास तसा सगळ्यांसमोर आहे, अनेकांना तो माहिती आहे. परंतु ‘जेन नेक्स्ट’ आधीचा नचिकेत कसा घडला त्याबद्दल तो म्हणतो, ‘माझा जेन नेक्स्टच्या आधीचा प्रवास अनेकांना माहिती नाही. मी शिक्षण घेत असतानाच मला खूप मोठी संधी मिळाली होती. मी एकमेव विद्यार्थी होतो ज्याला पॅरिसमधील नामांकित शाळेत शिकण्यासाठी स्कॉलरशिप मिळाली होती. त्यानंतर मी एका मोठय़ा कंपनीमध्ये इंटर्नशीप केली. भारतात परत आल्यावर मी अनेक मोठमोठय़ा डिझायनर्सबरोबर अनेक डिप्लोमा प्रोजेक्ट केले. त्यानंतरही मी अनेक कामं केली आणि इतक्या वेगवेगळ्या अनुभवांतून गेल्यानंतरच मी ‘जेन नेक्स्ट डिझायनर’ म्हणून लॉन्च होण्यासाठी तयार झालो.’ नवोदित फॅ शन डिझायनर्ससाठी असलेला‘लॅक्मे’चा हा ‘जेन नेक्स्ट डिझायनर’ खूप महत्त्वाचा मंच आहे. आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तितकीच कठोर मेहनत घ्यावी लागते, असे त्याने सांगितले. याचसंदर्भातला त्याचा किस्साही तो सांगतो. ‘मी माझं जेन नेक्स्टचं कलेक्शन बनवण्यासाठी पुन्हा मुंबईत आलो होतो. माझं शिक्षण मुंबईबाहेर झाल्यामुळे मी कितीतरी र्वष मुंबईत नव्हतो. त्यामुळे माझा मुंबईशी असलेला संबंध, इथल्या सवयी सगळंच तुटलं होतं. अशा परिस्थितीत माझं कलेक्शन बनवण्यासाठी मी तीन महिने स्लम भागातील मास्टर्सबरोबर काम केलं. माझा दररोज  सकाळी दहा ते रात्री दहा असा दिनक्रम त्या मास्टर्सबरोबर ठरलेला असायचा. ‘जेन नेक्स्ट’साठी एवढी मेहनत करूनही माझे फक्त दहा आऊटफिट्स तयार झाले होते. पण या मेहनतीचं फळ इतकं मोठं होतं की त्या प्रवासानंतर मी मागे वळून बघितलं नाही’, असं नचिकेत अभिमानाने सांगतो.

नचिकेतला काही वर्षांपूर्वीच आंतरराष्ट्रीय फॅशन विश्वातील ‘यंग फॅ शनआंत्रप्रीनर’ हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. फॅ शन हे क्षेत्रच असं आहे जिथे नुसतंच कलेवर भर असून चालत नाही. फॅ शनही फक्त कला नाहीये तर तो एक व्यवसायही आहे, याचं भान ठेवायला हवं, असं नचिकेत म्हणतो. फॅ शन बिझनेस यशस्वी करायचा असेल तर कला आणि व्यवहार यांचा बॅलन्स साधता आलाच पाहिजे, असं तो म्हणतो. या फिल्डमध्ये अनेक र्वष काम करण्यासाठी क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा हा बॅलन्स खूप महत्त्वाचा ठरतो. तुमच्या कल्पनांनुसार तयार झालेल्या कपडय़ांना व्यावसायिकदृष्टय़ा किंमत मिळालीच पाहिजे. या सगळ्या गोष्टींचे भान मी माझे कलेक्शन करताना सतत ठेवत आलो आहे. त्यामुळेच मला हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार मिळाला आणि जो मला खूप आनंद देणारा आहे, असं त्याने स्पष्ट केलं. नचिकेतला ‘आणि डॉ.काशिनाथ घाणेकर’, ‘कटय़ार काळजात घुसली’ यासारख्या मराठी सिनेमांच्या वेशभूषा निर्मितीसाठीही पुरस्कार मिळाले आहेत. आता तो अजय देवगणच्या आगामी चित्रपटासाठीही वेशभूषाकार म्हणून काम करतो आहे. नचिकेतने काही वर्षांपूर्वी एका जाहिरातीसाठीही वेशभूषा केली होती. दिवाळी दरम्यान ‘तनिष्क’ ज्वेलरीच्या जाहिरातीसाठी अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन यांच्यासाठी वेशभूषा करायची संधी मला मिळाली. ही संधी खरंच खूप मोठी आणि मनाला समाधान देणारी होती, असं नचिकेत सांगतो.

नचिकेत हा ऑलराऊं डर फॅ शन डिझायनर आहे. त्याच्या कलेक्शनमागच्या इन्स्पिरेशनमध्येही खूप विविधता असते. त्याच्या कलेक्शनमध्ये आपल्याला भारतीय कल्चर दिसणार नाही असं होऊच शकत नाही. अत्याधुनिक डिझाइन्स आणि क्रिएटिव्ह सरफेस ऑर्नमेन्टेशन ही त्याची खासियत आहे. याच्या जोरावर नचिकेतने भारतात  मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकत्ता, बंगलोर, अहमदाबाद, हैदराबादमध्ये तर इंटरनॅशनली तीन ठिकाणी स्टोअर्स सुरू केले आहेत. फॅ ब्रिक आणि क्लोदिंगमधून गोष्टी सांगायला आपल्याला खूप आवडतं असं सांगणारा नचिकेत या इंडस्ट्रीमध्ये नव्याने पाय रोवू बघणाऱ्यांनाही इंटर्नशीपच्या माध्यमातून खूप मदत करतो. नुकतेच त्याने वैविध्यपूर्ण मेन्सवेअर क लेक्शनही आणले आहे. ‘या इंडस्ट्रीमध्ये खूप स्पर्धा आहे. मिळेल ती संधी घ्या, पण त्या संधीसाठी खूप मेहनतही घ्यायला विसरू नका’, असा सल्ला तो तरुण फॅशनडिझायनर्सना न विसरता देतो.

viva@expressindia.com