नेल आर्टची हल्ली मुलींमध्ये खूपच क्रेझ आहे. नेल आर्ट नजाकतीनं करण्याचं काम आहे. त्यासाठी विशेष कसब असावं लागतं. नेल आर्ट पार्लरमध्ये याविषयी ट्रेनिंग घेतलेल्या प्रोफेशनल असतात. त्यामुळे पार्लरमध्ये केलेल्या आर्टवर्कला एक सफाई दिसते, पण घरच्या घरीसुद्धा नेल आर्ट डिझाइन्स करता येतील. यासाठी काही टिप्स..

नखांवरचं आधीचं नेलपॉलिश रिमूव्हरनं काढून टाका.
नखं आधी स्वच्छ धुऊन घ्या. त्याला शेप दिलेला नसेल तर ती सारखी करून घ्या.
कोमट पाण्यात ग्लिसरीनचे दोन थेंब टाकून त्यात जरा वेळ हात बुडवून ठेवा.
स्वच्छ कोरडा करून पुन्हा एकदा नखं सारखी करून घ्या. नखं खूप छोटी कापू नका. कारण त्यामुळे डिझाइन करायला फार थोडा वाव मिळेल.
पहिल्यांदाच नेल आर्ट करणार असाल तर सोप्पं आणि कमी नक्षीकाम असणारं नेल आर्ट डिझाइन निवडा.
सर्वप्रथम बेस कोट लावून घ्या.
बेस कोट नेहमी ट्रान्स्परंट किंवा हलक्या रंगाचा असतो. कुठल्याही रंगासाठी चांगला बेस तयार व्हावा यासाठी तो लावतात.
बेसकोटमुळे नेलपॉलिश लवकर निघून जात नाही आणि रंगाचे पोपडे पडत नाहीत.
बेसकोट पूर्ण वाळल्यानंतर डिझाइनडे वळा.
बेसकोटनंतर एक बॅकग्राऊंड कलर निवडा. तो डिझाइनचा बेस असेल.
हा रंग पूर्ण वाळल्यानंतरच सेकंड कोट द्या.
कोट वाळेपर्यंत थांबलं नाही, तर डिझाइनची रया जाऊ शकते.
त्यावर डिझाइन करण्यासाठी डार्क रंगाचं नेलपेंट वापरा.
बारीक ब्रश किंवा टूथपिक अथवा पिनसुद्धा डिझाइनसाठी वापरू शकता.
पोल्का डॉट्सची सोपी डिझाइन्स सुरुवातीला करून बघता येतील.
टूथपिक किंवा ब्रशनं हलक्या हातानं टॅप करत डॉट्स काढा.
दोन रंग वापरून कलर शेडिंग करता येईल.
त्यावर ग्लिटर पेंट वापरून चमकदार बनवता येईल.
सुटी ग्लिटर किंवा चमचमसुद्धा वरून वापरता येईल. नेलपेंट वाळल्यानंतर त्यावर नेल ग्लू लावा आणि वरून ही चमचम भुरभुरा.
सगळं डिझाइन पूर्ण झालं की टॉप कोट द्या.
नेल आर्ट डिझाइन चांगलं टिकावं आणि लवकर खराब होऊ नये, यासाठी टॉप कोट देणं गरजेचं आहे.