अभिनेत्री होण्याचं स्वप्न बाळगून मुंबईच्या दिशेला रवाना होणारे असंख्य चेहरे असतात. त्यातीलच एक चेहरा होता उषा जाधव हिचा. केबीसीच्या जाहिरातीमधून ‘बधाई हो बेटी हुई हैं’ असं म्हणत हा चेहरा प्रत्येक घरात पोहोचला. उषाला ‘धग’ या चित्रपटासाठी सवरेत्कृष्ट अभिनेत्री म्हणून राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. उषाच्या याच यशाची गाथा व्हिवा लाऊंजच्या माध्यमातून उलगडली. सोनाली कुलकर्णीने साधलेल्या संवादातून उषाने तिचा या क्षेत्रातील प्रवास आणि तिचा स्ट्रगल सर्वाना उलगडून सांगितला..

पुरस्कार आणि वय
इतक्या तरुण वयात हा राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. छोटय़ा उषाला असं कधी वाटलं होतं का? गेल्या काही दिवसांत या प्रश्नाला मला खूपदा सामोरं जावं लागलंय. पण नक्कीच नाही.. मला असं कधीच वाटलं नाही वयाच्या या टप्प्यावर मला नॅशनल अ‍ॅवॉर्ड मिळेल. अभिनय करायचं हे मात्र लहानपणापासूनचं स्वप्न होतं. डान्सची आवड आहे. थिएटर करायचं तेव्हा मी ठरवलेलं होतं की मला अभिनेत्री व्हायचं आहे. त्यामुळे आज मला नक्कीच अभिमान वाटतो की मी या क्षेत्रात काम करत्येय आणि माझ्या कामाची पोचपावतीही मला मिळालेली आहे.

मुंबई आणि मी
मुंबईत आले, जॉब शोधला. सहा महिने जॉब केला. मुंबई काय आहे हे समजण्यासाठीच मला जवळपास सहा महिने लागले होते. लोकलची माहिती आणि ओव्हरऑल मुंबई समजण्यासाठी काही काळ लागला. माझं ऑफिस होतं महालक्ष्मीला. मी राहायला होते मीरा रोडला. विरार ट्रेनने मला आयुष्यात खूप काही शिकवलं. लोकलमध्ये चढण्यापासून स्ट्रगलला सुरुवात झाली होती. दिवसाची सुरुवातच स्ट्रगल करतच व्हायची. चढणं आणि उतरणं याची नंतर सवय झाली.

अभिनयातील संधी
मी शनिवार-रविवार कामाच्या शोधात फिरत होते. मधुर भंडारकर कास्टिंग करत होते. मी गेले आणि मला ‘ट्रॅफिक सिग्नल’ चित्रपटामध्ये ब्रेक मिळाला. त्यानंतर मी जॉब सोडला. पुढे म्हणावी तशी ऑफर मिळाली नाही. त्यामुळे ऑफरच्या शोधात होते. मला करायचं नव्हतं छोटं काम. मी हट्टी आणि जिद्दी आहे. छोटे रोल्स सोडले म्हणून जाहिरातीकडे वळले. स्वत:च्या मिळकतीसाठी. जाहिरातीमध्ये मी लीड रोलमध्ये काम केलं. पीचवर राहणं माझ्यासाठी मस्ट होतं.

कोल्हापूर माझी जन्मभूमी..
दहावीपर्यंत शिक्षण कोल्हापुरात झालं. १२ वी झाल्यानंतर इंजिनीअरिंग करण्याचं ठरवलं. खास बाबांच्या आग्रहास्तव. एक वर्षे इंजिनीअरिंग केलं. पण त्यानंतर मी इंजिनीअरिंग सोडलं. घरी कुणालाच सांगितलं नव्हतं मला अभिनयाची आवड आहे वगैरे.. मी ट्रॅफिक सिग्नल साइन केली तेव्हा आई-बाबांना कळलं. तेव्हा मी मुंबईत जॉब करत होते. आई-बाबांना सांगितलं नाही, कारण मला तेव्हा त्यांची प्रतिक्रिया या गोष्टीवर काय असेल याचीच भीती होती.
मी पुण्यात असताना जॉब करत होते, कारण घरच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळण्याची जबाबदारी कुठेतरी माझ्यावर आली होती. आम्हा भावंडांपैकी मी अभ्यासात हुशार असल्याने बाबांचं स्वप्न होतं मी इंजिनीअर किंवा डॉक्टर व्हावं. आम्ही पाच बहिणी व एक भाऊ त्यामुळे बाबांचं स्वप्न होतं. पण माझ्या मनात काहीतरी वेगळंच चाललेलं होतं. म्हणूनच मी इंजिनीअरिंग केवळ एकच वर्ष केलं. त्यानंतर मी जॉब करू लागले. बाबा खूप नाराज झालेले होते. त्यानंतर मी डिप्लोमा केला. पुण्याला आले, जॉबची सुरुवात केली. एअर टिकीटिंग क्षेत्रात होते. दहा वर्षांपूर्वी ३ हजार पगारावर काम करण्याची सुरुवात केली होती. बाबा तेव्हाच रिटायर झाले होते. म्हणून मी नोकरी करण्यास सुरुवात केली. मी पुण्यात जॉब करताना काहीतरी वेगळं करायला मिळेल, अशी अपेक्षा होती. पण तसं मात्र काहीच घडलं नाही. सकाळी आठला सुरू झालेला दिवस रात्री नऊ वाजता संपायचा. पुण्यात तीन र्वष मी काम केलं, त्यानंतर मी मुंबईला येण्याचा निर्णय घेतला. असं एकूण माझ्या घरचं वातावरण असलं तरी माझ्या कलेचं श्रेय बाबांना देईन. बाबा संगीत शिक्षक आहेत. कलेचा वारसा माझ्या बाबांकडून मला मिळालं.

‘धग आणि मी’
‘धग’ मसणवटेत काम करणाऱ्या एका कुटुंबाची स्टोरी आहे. तिचा नवरा मसणवटेत काम करतोय. पूर्वापार कुटुंब करत आलेलं काम तिचा नवरा करतोय. तो ते काम करतोय, त्याच्या बायकोला यशोदेला ते नको आहे. पण नवरा करतोय म्हटल्यावर तिला ते सहन करायचंय. अशी एकूणच तिची भावना आहे. तिला असं वाटत असतं की मुलांनी मात्र हे काम करू नये. या सिनेमाची भाषा कुठल्या भागातील अशी नाही पण भाषेतील एक लहेजा आहे. चाळीसगाव भागात शूट झालेली आहे. यशोदेच्या रोलला खूप शेड्स आहेत.

सीन समजावून घेताना-
मी तयारी करते म्हणजे माझ्या दिग्दर्शकाबरोबर बघून समजून घेते. त्याला नेमकं काय हवं आहे. मला काय वाटतं यापेक्षा दिग्दर्शकाला काय हवं आहे हे आधी समजून घेते. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. शेवटी दिग्दर्शक हा चित्रपटातील सर्वात महत्त्वाचा दुवा आहे.

कलाकार म्हणून अभ्यास..
मी अभिनयाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेलं नाही. पण मला नक्कीच आवडेल ते करायला. मी लोकांचं निरीक्षण करते. माझं ग्रास्पिंग चांगलं आहे. वर्ल्ड सिनेमापासून ते रिजनल भाषेतील सर्व सिनेमा पाहते. त्यातूनच मी शिकते. आजूबाजूच्या लोकांचं निरीक्षण करणं हा माझा आवडता छंद आहे. हाच माझा अभ्यास आहे.

असा होता माझा स्ट्रगल
मराठी दोन-चार सिनेमे केले. ‘स्ट्रायकर’ हिंदीमध्ये केली होती. दीप्ती नवल यांची फिल्म केली होती. काम हवं म्हणून मी ती कामं करत होते. त्यानंतर मात्र सात र्वष मला केवळ स्ट्रगल करावी लागली. टेलिव्हिजन करावं असं वाटलं होतं, पण त्या वेळी मला मात्र टेलिव्हिजन करायला मिळालं नाही. तेव्हा मला रंगामुळे रिजेक्शन मिळालं होतं. पण मी त्याही क्षणी मी पॉझिटिव्ह होती.
बाईमाणूस हा चित्रपट पाहून मला ‘धग’ हा चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. शिवाजीने मला फोन केला आणि त्यांनी मला रोल समजावून सांगितला. मी फार काही विचार न करता सरळ होकार कळवून दिला. सिनेमातील माझी भूमिका खूप अवघड होती.

जाहिरात आणि ऑडिशन्स
जाहिरात क्षेत्रात यायचं असेल तर ऑडिशन्स देण्याची तयारी हवी. सतत ऑडिशन्स देणं हेच या क्षेत्राचं मूलभूत सूत्र आहे. त्या सूत्राप्रमाणे मी बऱ्याच ऑडिशन्स दिल्यात. दहा ऑडिशनमधून किमान एखादी जाहिरात मिळते. तेव्हा एकात कुठेतरी तुम्ही शॉर्टलिस्ट होता.

स्वत:वर प्रेम करायला हवं..
आपल्याला पुढे जाण्यासाठी किंवा उमेद मिळवण्यासाठी स्वत:वर प्रेम करणं खूप आवश्यक आहे.

दिसणं आणि मी
टेलिव्हिजनसाठी ट्राय केल्यावर नोकराचा रोल करा असं व्हायचं. पण आता मात्र असं होत नाही. मी ज्या वेळी टेलिव्हिजन सुरू केलं तेव्हा असे अनुभव मला नक्कीच आले होते. केबीसीच्या जाहिरातीनंतर मला लीड रोल ऑफर झाले होते. आपण उत्तम काम कुठे करू, जिथे पैसा मिळू शकतो. म्हणूनच मग मी जाहिरात क्षेत्रात गेले. आता यंग दिग्दर्शक आले आहेत ते रंग किंवा या अशा गोष्टींना महत्त्व देत नाहीत.

कोल्हापूरची माती आणि मी..
कोल्हापुरात आजही मराठी चित्रपटाची शूटिंग होते. त्यामुळे चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी भरीव कामगिरी करायला नक्कीच आवडेल.

नकार पचवायला शिका..  
उमेद टिकवण्यासाठी मी खूप कष्ट केलेत. मी जॉब सोडला आणि मुंबईत आले. साडेतीन र्वष मी उत्तम पैसे कमावत होते. मी मानसिक तयारी केली होती, मला मुंबईत आल्यावर. मला इथे खूप प्रयत्न करावे लागतील. तरीही मी कुठेही डगमगणार नाही. हे मनाशी पक्कं करूनच मी इथे आले होते. नक्कीच दहा ठिकाणांहून नकार आल्यावर अकराव्या ठिकाणी जाणं खूप कठीण वाटायचं. पण डिप्रेशनमध्ये गेल्यावर रडून मोकळी व्हायचे. ढग काळे झाल्यावर, पाऊस पडून गेल्यावर सर्व स्वच्छ होतं. तसंच माझंही होतं. आता नवीन दिवस सुरू झालेला आहे. आजचा दिवस आपण उत्तम जगू या, हा माझा जगण्याचा मंत्र आहे. आर्थिक टेन्शन नक्कीच होतं, यात काहीच दुमत नाही. मीरा रोड ते चर्चगेटचा पास रिन्यू करण्यासाठीही पैसे नव्हते, अशी वेळही आली होती. पण माझा स्वत:चा असलेला विश्वास आणि माझी जिद्द या दोन गोष्टींनी मला टिकवून ठेवलेलं होतं. कुटुंबाने नक्कीच सपोर्ट केला. रडून, स्वत:ला सांभाळून मी टिकलेय. प्रयत्नाला नशिबाची साथ आहे, यात काहीच दुमत नाही.

वैयक्तिक आयुष्य खूप महत्त्वाचं आहे
आपल्या क्षेत्रात खूप अस्थिरता आहे. त्यामुळे काहीही असू शकतं. वैयक्तिक व कामातील अस्थिरता ही पचवणं फारच कठीण आहे. पण यातूनही अनेक मार्ग आहेत. त्याला आत्महत्या हा पर्याय नाही. काहीही असो, आयुष्य हे एकदाच मिळतं. कितीही निराशा आली तरी त्यातून बाहेर पडणं हे महत्त्वाचं आहे. एकदा मिळालेलं आयुष्य छान जगावं हार न मानता.

मुंबईतील ऑडिशन्स आणि मी..
पुण्यात असताना मी एक फोटोशूट केलं होतं. त्याने फोटोग्राफरने मला काही कॉर्डिनेटर्सचे नंबर दिले होते. माझं ऑफिस महालक्ष्मीला होतं. तिथे समोर फेमस स्टुडिओ होता. तिथे मी बरेच वेळा ऑडिशनला जायचे.

‘धग’ चित्रपटाच्या यशाचं रहस्य
संहिता ही खूपच उत्तम होती. गोष्टी घडत गेल्या. चित्रपट करताना आम्ही राष्ट्रीय पुरस्कार मिळवू, असं कधीही वाटलं नव्हतं. या यशाचं श्रेय दिग्दर्शक आणि पूर्ण टीमला देईन. मला हा चित्रपट मिळणं हेच खूप महत्त्वाचं होतं.

पुढची वाटचाल
मी आता एक हिंदी चित्रपट करत्येय के. के. मेनन यांच्यासोबत बघूया. आता पुढच्या ऑफर्स कशा येताहेत. मला अभिमान आहे की, मला मराठी फिल्मसाठी पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे सर्व भाषिक चित्रपट नक्कीच करेन.

सहकलाकारांचं टेन्शन येत नाही
मी पहिला चित्रपट उपेंद्र लिमयेबरोबर केला होता. त्यामुळे टेन्शन आलेलं नव्हतं. त्यामुळे काम करताना मला अजिबात टेन्शन आलं नाही. मी माझं काम करते, समोर कुठलाही अभिनेता असला तरी.. उपेंद्रजी मला पहिल्यापासून सांगत होते. उत्तम काम कर, हा रोल तुला खूप काही देऊन जाईल. त्यामुळे त्यांच्यापेक्षा खूप चांगलं काम करायचंय, असं डोक्यात वगैरे काही नव्हतं.
माझी केबीसीची जाहिरात ही अमिताभ बच्चन यांच्यासोबत होती. माझी त्यांच्यासोबत काहीच ओळख नव्हती. असं काही नाही की काम करताना रॅपो असायला हवा. मी व्यक्तिरेखेचा अभ्यास करते आणि मी कामाचं दडपण घेत नाही. मी शांत राहून माझं काम करते. सहकलाकार कोण आहे यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. पण आपण आपलं काम उत्तम करणं महत्त्वाचं आहे.

माझे ड्रीम रोल..
‘जैत रे जैत’ व ‘उंबरठा’ यातील रोल माझे ड्रीम रोल आहेत.

कष्ट करा, यश मिळेल
नवीन मुलांना मी सांगेन की, या क्षेत्रातील ग्लॅमर दिसतं त्यामुळे सर्व जण येतात. पण इथे कष्टही खूप आहेत. तुमचा फोकस क्लीअर ठेवा. तुम्हाला काय करायचंय हे आधी ठरवा. तुम्ही कशात निपुण आहात हे ठरवा.

पुरस्कारानंतर उषा जाधवसाठी काय बदललं..
पुरस्कारानंतर माझ्यासाठी जग खूपच बदललं आहे. आत्तापर्यंत ज्यांनी नाकारलं होतं त्या सर्वाचे अभिनंदनाचे फोन आलेत. इतकंच नाही तर खूप काही बदल घडलाय.

मार्गदर्शन मी काय करणार?
तुम्ही प्रयत्न करत राहा. आत्मविश्वास ढळू देऊ नका. मी इतकंच सांगू शकते.

शांत राहून काम करा..
माझा स्वभाव जगा, जगू द्या असा आहे. त्यामुळे मी माझं काम शांतपणे करते. त्यामुळे हा पुरस्कार मिळाल्यावरही माझ्या जगण्याच्या कुठल्याही कक्षा बदलल्या नाहीत.

नाटकात भूमिका नक्की करेन..
नाटकात अभिनयाची उजळणी होते. त्यामुळे मी नक्कीच या क्षेत्रात काम करेन. मला नाटकात काम करायला आवडेल यात वादच नाही. नाटय़क्षेत्रात मी काम केलेलं नाही. शाळेत असताना मात्र नक्कीच केलेलं आहे. त्यामुळे मला नव्या क्षेत्रात काम करायला आवडेल.

कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांच्या प्रतिक्रिया

उषाने कोल्हापूर ते मुंबई केलेला प्रवास ऐकायचा होता. त्यांनी इतके नकार पचवून तितक्याच जोशात बाउन्स बॅक केले. हॅट्स ऑफ टू हर, कामात सातत्य व मेहनत यादेखील महत्त्वाच्या गोष्टी आहेत.
– लतिका नायकवाडी

कार्यक्रम खूपच छान होता. उषाची एक गोष्ट आवडली ती म्हणजे त्यांनी इतके नकार पचवूनदेखील पेशन्स ठेवला. जिद्द व चिकाटी सोडली नाही. सतत प्रयत्नशील राहिल्या त्यामुळेच त्यांना लहान वयात राष्ट्रीय पुरस्कार मिळू शकला.
– ईशा वेडनेकर  

कार्यक्रमात एका मुलाने प्रश्न विचारला की मी आई-वडिलांना कसे कन्व्हिन्स करू, त्यावर उषा मॅडम म्हणाल्या की एक गोष्ट लक्षात ठेवा आपले आई-वडील नेहमीच आपल्याला सपोर्ट करत असतात. हे वाक्य खूप आवडले. त्यांची इच्छाशक्ती व आत्मविश्वासामुळेच त्या इथवर पोहोचू शकल्या आहेत.
– अनघा पाटील

जिद्द, चिकाटी व प्रयत्न या तीन गोष्टी आपणदेखील लक्षात ठेवल्या पाहिजेत. या तीन गोष्टींमुळेच उषा जाधव या यशशिखरावर पोहोचल्या आहेत. गेली कित्येक वर्षे त्यांना रंगावरून नकार पचवावा लागला होता. पण त्यांच्या मतावर त्या ठाम होत्या व जिद्दीने त्यांची ही इच्छा त्यांनी पूर्ण केली. ही गोष्ट महत्त्वाची वाटली.
– सागर जाधव

उषाताईंनी सांगितले की त्या घराची जवाबदारी पेलून म्हणजेच नोकरी करून सुट्टीच्या दिवशी ऑडिशनला जायच्या. ही गोष्ट वाखाणण्याजोगी आहे, कारण आजकाल या क्षेत्रातील फार कमी लोक आहेत की जे सुरुवातीला नोकरी करुन आíथकदृष्टय़ा स्वत:च्या पायावर उभे आहेत व त्या जोरावर त्यांनी इंडस्ट्रीत आपला जम बसवला आहे.
सायली परब