तेजश्री गायकवाड

पारंपरिक कौशल्य आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घातली तर प्राचीन परंपरा टिकवणं, नव्याने रुजवणं आणि जगभरात त्याच दिमाखात पोहोचवणं शक्य होतं हे गेल्या काही वर्षांत सातत्याने हातमाग व्यवसायासाठी के ल्या गेलेल्या ठोस प्रयत्नांतून दिसून आलं आहे. २०१५ पासून दरवर्षी आपल्याकडे ७ ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय हातमाग दिन’ म्हणून साजरा होऊ लागला. केवळ साजरा करण्यापुरता हा दिवस मर्यादित न राहता आज हातमागाचे कपडे हे ब्रॅण्डेड म्हणून परदेशातही पोहोचविण्यात यानिमित्ताने हातभार लागला आहे.

हातमाग व्यवसाय हा देशातील सर्वात जुन्या उद्योगांपैकी एक. देशभरातील कोटय़वधी लोकसंख्या विशेषत: ग्रामीण भागातील लोक या व्यवसायाशी जोडले गेलेले आहेत. हातमाग कला आणि  त्यातून विणल्या गेलेल्या सुंदर वस्त्रांचे धागे शोधत गेलो तर आपल्याला इतिहासाशी त्यांची देखणी नाळ जोडलेली दिसते. ‘धागा धागा अखंड विणू या’ म्हणत केलेली अप्रतिम कारागिरी, उत्तम कपडे, रंग यांचा मिलाफ असलेल्या साडय़ा आणि इतर वस्त्रं किती मौल्यवान आहेत, याची जाणीव आता कु ठे आपल्याला नव्याने होऊ लागली आहे. काळाच्या ओघात नामशेष होतो की काय अशा स्थितीत पोहोचलेल्या या व्यवसायाला अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मार्के टिंगच्या मदतीने पुन्हा एकदा लौकिक प्राप्त झाला आहे. हातमागाचे कपडे विणण्यास लागणारा वेळ, कष्ट, त्याच्यावरची कलाकु सर यामुळे हे कपडे मुळातच महाग असल्याने त्याकडे ग्राहकांची पावलं सहजी वळत नव्हती, पण गेल्या पाच वर्षांत हातमागाविषयी झालेला प्रचार-प्रसार ग्राहकांना पुन्हा एकदा हातमागाच्या कपडय़ांकडे घेऊन आला आहे.

हातमागाच्या कपडय़ांक डे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी भारतीय फॅ शन डिझायनर्स आणि लॅक्मे फॅशन वीकसारखे मोठे फॅ शन महोत्सव यांचे प्रयत्न मोठय़ा प्रमाणावर कारणीभूत ठरले आहेत. लॅक्मे फॅशन वीकचा दुसरा दिवस हा दरवर्षी हातमाग दिवस म्हणून साजरा के ला जातो. या दिवशी देशभरातील कारागिरांना त्यांची कला या फॅशन वीकच्या जागतिक मंचावर दाखवण्याची संधी मिळते. अनेकदा या शो दरम्यान हातमागाचे कपडे कसे तयार होतात, त्यामागचे कष्ट आणि कारागिरांची अनमोल कला यांची माहिती व्हिडीओच्या माध्यमातून जाणीवपूर्वक पोहोचवली जाते. गौरांग शहा, सब्यासाची मुखर्जी, अब्राहम आणि ठाकोर , अनीता डोंगरे, मधु जैन, नीरु कुमार, संजय गर्ग, रितू कुमार, मोहम्मद मझहर हे भारतीय फॅशन डिझायनर त्यांच्या लेबल आणि ब्रॅण्डअंतर्गत हातमागाच्या कपडय़ांचा प्रसार करत आहेत. खेडोपाडय़ातील कारागिरांकडून आजच्या पिढीला आवडतील अशा पद्धतीचे इंडियन-वेस्टर्न फ्युजन डिझाइन असलेले कपडे तयार करून घेत त्यांना ग्लोबल बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे काम या डिझायनर्सनी के ले. त्यामुळे नव्या पिढीपर्यंत हातमागाच्या कपडय़ांचे सौंदर्य पोहोचले आहे.

हातमागाची एक साडी जरी विकत घेतली तरी अंदाजे १५ कारागिरांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतो. हातमागाचे कपडे दीर्घकाळ टिकतात. आणि आता फॅ शन विश्वात होऊ घातलेल्या रिसायकल, फ्युजन कपडे अशा पद्धतीने या हातमागाच्या कपडय़ांचा पुन:पुन्हा सुंदर पद्धतीने वापर के ला जाऊ शकतो. हातमागावर विणलेल्या कपडय़ांचे महत्त्व आता कु ठे लोकांच्या लक्षात येऊ लागले असल्याने आता अधिकची पदरमोड करून हातमागाचे अस्सल, सुंदर कपडे घेण्याकडे लोकांचा कल हळूहळू वाढतो आहे. देशभरात होणारी प्रदर्शने, भरवल्या जाणाऱ्या बाजारपेठा यामुळे हे कपडे सहज लोकांना उपलब्ध होऊ लागले आहेत. अगदी लॉकडाऊनच्या काळातही व्हच्र्युअल प्रदर्शनांच्या माध्यमातून ही क ला पोहोचवली गेली आणि कारागिरांचा रोजगारही कायम राहिला. मिनिस्टरी ऑफ टेक्स्टाइलनेही वेगवेगळे प्रकल्प राबवून हातमाग व्यवसायाला उभारी देण्याचे सातत्याने के लेले प्रयत्नही फळाला आले आहेत. सरकारी प्रकल्पांमुळे  डिझायनर्स, कपडे विकणारे, बुटिक चालवणारे यांना  कारागिराशी थेट  संपर्क करता येणंही शक्य झालं आहे.

हातमाग दिनानिमित्त होणारे कार्यक्रम

यंदाही लॉकडाऊन असला तरी ‘राष्ट्रीय हातमाग दिन’ नेहमीच्या उत्साहाने आणि भव्यतेने साजरा के ला जाणार आहे. अर्थात प्रत्यक्ष संपर्क कठीण असल्याने डिजिटल स्वरूपातच तो बव्हंशी साजरा के ला जाणार आहे. ‘व्होकल फॉर लोकल’चा नारा लक्षात घेत हातमाग आणि टेक्स्टाइल इंडस्ट्रीची समीकरणं आता कशी बदलली जातील यावर भर देत अनेक चर्चासत्रं आयोजित केली गेली आहेत. टेक्स्टाइल स्पेशल इंटरेस्ट ग्रुप आणि हेतुशमा हॅण्डलूम यांनी आजच्या काळातील हातमाग परिस्थितीबद्दल लोकांना सांगण्यासाठी असंच एक डिजिटल चर्चासत्र आयोजित केलं आहे. याबद्दल श्वेता हरिया सांगते, अनेक वर्षांपासून आम्ही हातमागाचे कापड विकत आहोत. मध्यंतरी पॉवरलूमवर तयार होणाऱ्या  कमी किमतीच्या कापड उत्पादनामुळे लोकांचा हातमागाकडे कल फार कमी होता. परंतु गेल्या २-३ वर्षांत यात बदल जाणवतो आहे. वेगवेगळ्या स्तरांवर होत असलेल्या प्रचारामुळे लोकांना आपल्या देशी कलाकुसरीचे विविध प्रकारही माहिती झाले आहेत. एरव्ही ही माहिती के वळ टेक्स्टाइल व्यवसायातील लोकांपुरतीच मर्यादित असते, मात्र आता चोखंदळ ग्राहकांपर्यंत हातमाग कपडय़ांविषयी माहिती पोहोचत असल्याने ग्राहकांचा ओघ वाढत असल्याचे तिने सांगितले.

‘डॉ. बी.एम.एन. कॉलेज ऑफ होम सायन्स’च्या ‘टेक्स्टाइल सायन्स आणि अ‍ॅपरल डिझाइन’च्या डिपार्टमेंटने ‘रिव्हायवल ऑफ इंडियन ट्रॅडिशनल हॅण्डलूम टेक्स्टाइल’ या विषयावर वेबिनार आयोजित केलं आहे. नष्ट होत चाललेल्या कोलकाताच्या हातमागावर कसं काम केलं गेलं याबद्दल लोकांना या वेबिनारमधून जाणून घेता येणार आहे. डॉ.  हेमलता जैन यांनी ‘पुनर्जीवना’ या संस्थेंतर्गत काम करत हरवत चाललेली ढं३३ीिं अल्लूँ४ ही वीण पुन्हा पुनरुज्जीवित केली आहे. हे करत असताना त्यांनी तिथल्या गावातील विणकरांनाही पुन्हा एकदा काम मिळवून दिलं. त्यांचा हा प्रवास, तिथले विणकर, लोप पावत असलेल्या हातमाग व्यवसायाला आपण कसं वाचवलं पाहिजे याविषयी सगळ्यांना माहिती व्हावी म्हणून आम्ही हे वेबिनार करत आहोत, अशी माहिती प्रोफेसर वीणा वर्मा यांनी दिली. वेबिनारबरोबरच अनेकांनी हातमागाविषयी प्रश्नमंजूषा, साडी ड्रेपिंग स्पर्धा, गेम्सही आयोजित केले आहेत.

एकंदरीत डिजिटल माध्यमातून  लोकल हातमागाविषयी व्होकल होत साजरा के ला जाणारा ‘राष्ट्रीय हातमाग दिवस’ हातमाग व्यवसायाला जागतिक पटलावर विस्तारण्याासाठी मोलाची भूमिका बजावतो आहे.

viva@expressindia.com