नयन परळीकर, ट्रोनहाइम, नॉर्वे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेले दीड वर्ष मी नॉर्वेमधल्या ट्रोनहाइम शहरात राहते आहे. माझा नवरा परितोषच्या पीएचडीच्या निमित्ताने आम्ही इथे आलो आहोत. भारतात मी एमबीबीएस केलं असून इथे ‘मास्टर्स इन क्लिनिकल हेल्थ रिसर्च’ करते आहे. डॉक्टर म्हणून करिअर करण्यासाठी आवश्यक असणारे अभ्यासक्रम शिकत असून, परीक्षा देते आहे. नॉर्वेमध्ये आरोग्य क्षेत्रात करिअरला चांगली संधी आहे. रिसर्च आणि प्रॅक्टिस या दोन्ही गोष्टी एकत्र होतात. परवाना मिळवण्यासाठी बऱ्याच गोष्टी आत्मसात असणं आवश्यक असतं. इंग्रजीपेक्षा स्थानिक भाषेला कायमच प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे मीही नॉर्वेजियन भाषा शिकते आहे. नॉर्वेजियन भाषेच्या मेडिकलशी संबंधित दोन परीक्षा द्याव्या लागतात. त्यानंतर परवाना मिळतो. डॉक्टर्स रिसर्चही करतात. मास्टर्स व्हायच्या आधीच मला रिसर्चला प्रवेश मिळाला आहे. इथली शिक्षणपद्धती पूर्णपणे वेगळी आहे. ग्रूपवर्कवर अधिक लक्ष केंद्रित केलं जातं. एकमेकांशी सखोल चर्चा केली जाते. स्वत:च्या कल्पनाशक्तीचा वापर करणं अपेक्षित असतं. बाळबोध पद्धतीने शिकवण्यापेक्षा स्वयंशिक्षणावर भर दिला जातो. मेथड शिकवली गेली तरी प्रॅक्टिकल स्वत:च करावं लागतं. अगदी भाषेसारख्या विषयाचं उदाहरण घेतलं तर व्याकरण, वाक्यरचना वगैरे शिकता येईल, पण केवळ वर्गात बसून भाषा शिकता येत नाही. त्यासाठी अधिकाधिक लोकांशी संवाद साधावा लागतो. मी खूप व्हॉलेंटरी अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये काम केलं आहे. इथल्या निर्वासितांसोबत काम केलं. त्यांना इंग्रजी येत नसल्याने आमच्या संवादाची भाषा नॉर्वेजियन असते.

‘लँग्वेज कॅफे’ ही संकल्पना इथे खूप प्रचलित आहे. फेसबुकवर ग्रूप्स तयार होऊ न, भाषा शिकायची असेल त्या लोकांनी या कॅफेमध्ये येणं अपेक्षित असतं. एक कॅफे ठरवला जातो आणि आठवडय़ातून एक-दोन वेळा एकत्र भेटून केवळ नॉर्वेजियन भाषेतच गप्पा मारल्या जातात. मीही अशा गप्पांमध्ये सहभागी होते. या कॅफेमध्ये म्हणा किंवा अन्य काही वेळा भाषेच्या बाबतीत काही गमतीशीर आणि प्रोत्साहनपर प्रसंग माझ्या वाटय़ाला आले. इथले लोक नव्याने भाषा शिकणाऱ्याला मनापासून पाठिंबा देतात. अनवधानाने झालेल्या चुकीचा कधी बाऊ  करत केवळ टीका केली जात नाही. मला आठवतंय की मी नॉर्वेजियन शिकायला लागून दोन-तीन महिनेच झाले होते. मी आणि परितोष फर्निचर विकत घ्यायला गेलो होतो. इथले काही वृद्ध पालक आपल्या मुलांकडे कायमचं राहायला जाताना आपलं फर्निचर विद्यार्थ्यांना देतात. आम्ही अशाच एका आजींकडे गेलो होतो. त्यांना इंग्लिश येतच नव्हतं. त्यामुळे पहिली काही मिनिटं आमचा संवादच होईना. शेवटी मी माझ्या तेव्हा जुजबी येणाऱ्या नॉर्वेजियन भाषेत बोलू लागले आणि ते त्यांना कळलंही. त्यानंतर मारलेल्या गप्पांमध्ये त्यांनी माझ्या भाषाकौशल्याला दाद आणि प्रोत्साहन दिलं. सध्या मी ज्या हेल्थ अँण्ड वेलफेअर सेंटरमध्ये काम करते तिथेही फक्त नॉर्वेजियनच बोलावं लागतं. बरेचसे पेशंट वृद्धच असतात आणि ते चांगल्या मूडमध्ये असतात तेव्हा त्यांच्याकडून भाषा शिकण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. अवघ्या वर्षभरातच एवढं कसं काय मी शिकले, याचं कौतुक वाटतं त्यांना..

नॉर्वेमध्ये चांगल्या रीतीने वर्कबॅलन्स साधला जातो. इथे पदांची उतरंड अजिबात नाही. सगळ्यांना समान दर्जा दिला जातो. स्वच्छता करणाऱ्या हेल्पर्सची संख्या अल्प असून सगळे मिळून काम करतात. ‘बॉसगिरी’ करण्याची संस्कृती नाहीच इथे. स्टेटसचा बाऊ  केला जात नाही. आहे त्या परिस्थितीत लोक खूश असतात. ट्रोनहाइम हे नॉर्वेमधलं तिसरं मोठं शहर आहे. युनिव्हर्सिटी टाउन असल्याने विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. लोकसंख्या संमिश्र असून लोक खूप सुसंवादी आहेत. स्त्रियांना महत्त्व दिलं जातं आणि बऱ्याच ठिकाणी स्त्रियांचं वर्चस्व आहे. ‘इंडियन असोसिएशन’ आणि ‘इंडियन स्टुण्डट फोरम’ असून स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनासह आपले सगळे सणवार मोठय़ा उत्साहात साजरे केले जातात. त्यात अनेकदा नॉर्वेजियन लोकांसह अन्य देशांतील विद्यार्थीही सहभागी होतात. शहराजवळ निसर्गसंपदा असल्याने जंगल, तलाव, डोंगर अशा ठिकाणी जाता यावं अशीच शहराची रचना केलेली आहे. त्यामुळे आपसूक हायकिंग, सायकलिंग, स्विमिंग, स्किइंग, फिशिंग, स्पोर्ट्स केलं जातं. ऋतुमानानुसार निसर्गाचे बदलते रंगढंग निरखत राहण्याजोगे आहेत. मला मुळात हायकिंगची आवड होतीच, इथे ती पूर्ण करता आल्याने मी हायकिंग, सायकलिंग, स्विमिंग, स्किइंग करते.

इथे स्वयंप्रेरित वृत्तीने राहणं आवश्यक आहे. स्वावलंबी वृत्ती अंगी बाणवावी लागते. निर्वासितांबरोबर काम करताना त्यांच्या आयुष्यातला संघर्ष, त्यांच्या कहाण्या ऐकायला मिळाल्या. त्यांच्यापुढे आपलं आयुष्य किती बरं आहे आणि आपल्याला किती काय काय चांगल्या गोष्टी करता येऊ  शकतील, याची जाणीव झाली. गेली १५वर्ष भारतात मी शास्त्रीय संगीत शिकले आहे. त्यामुळे निर्वासितांसाठी होणाऱ्या गेट टुगेदरमध्ये परफॉर्म करता करता काही नॉर्वेजियन मित्रमंडळींशी माझी ओळख झाली आणि आम्ही ‘जुगलबंदी’ नावाचा बँड सुरू केला आहे. आम्ही काही फ्यूजन्सही केली आहेत. त्यांची नॉर्वेजियन गाणी मी सध्या ऐकतेय, ती शिकणं अजून सुरू केलेलं नाही. नॉर्वेजियन भाषा शिकण्यामुळे संगीत क्षेत्रात काम करताना खूप फरक पडला आहे. इथल्या लोकांना एकूणच संगीत, भारतीय संगीतात बराच रस आहे. भारतीय पदार्थ त्यांना खूपच आवडतात. त्यामुळे अनेकांना आम्ही भारतीय पदार्थ खिलवतो. इथल्या रेस्तराँमुळे त्यांना उत्तर भारतीय पदार्थाची अधिक ओळख झाली आहे. तिथे ब्रेड अधिकांशी खाल्ला जातो तरी आपली रोटी-दाल वगैरे पदार्थ जास्ती आवडतात. मी केलेले काशीफळाचे धपाटे (लाल भोपळ्याचे धपाटे), मसालेभात माझ्या मैत्रिणीला खूपच आवडला होता.

मुलांना लहानपणापासून निसर्गाशी मैत्री करायला आणि त्यात रममाण व्हायला शिकवलं जातं. त्यामुळे मुलांना डोंगरदऱ्यांमध्ये फिरायची गोडी आपसूक लागते. इथल्या गैलढोपिजेन या उंचच उंच पर्वतावर निर्वासितांच्या ग्रूपबरोबर मी गेले होते, तेव्हा छोटी छोटी मुलं, तरुण मुलं तिथेही आली होती. इथल्या लोकांना जागतिक इतिहासात, घडामोडींमध्ये खूप रस असतो. समाजमाध्यमांचा वापर होतो, पण त्याचं अ‍ॅडिक्शन जाणवत नाही. लोक अनेकदा स्वत:ची लाकडी घरं किंवा जास्तीची रूम सुट्टीत मुलांना सोबत घेऊ न स्वत:च बांधतात. ट्री हाउसेस बांधणं, सायकल किंवा कार रिपेअरिंग, टायरच्या खुच्र्या करणं हे सगळं स्वत:च केलं जातं. काही अपवाद वगळता बहुतांशी लोक सुदृढ आणि कणखर आहेत. आयुष्यमान दीर्घ आहे. अनेकांचा चालण्यावरच भर असतो. शिवाय स्किइंग, व्यायाम वगैरे केल्यामुळे त्यांचा स्टॅमिनाही खूप असतो.

इथली बससेवा खूप चांगली आहे. सायकलिंगसाठी वेगळे ट्रॅक्स असून हे ट्रॅक्स स्नोफ्रेण्डली असून त्यांची नियमित देखभाल होते. केवळ थंडी वाढली तर थोडेसे र्निबध येतात, पण आपलं मनोबल चांगलं असेल तर ऐन थंडीतही वावरता येतं. इथे फॅशनऐवजी साधेपणा आणि उपयुक्ततेला प्राधान्य दिलं जातं. फॅशन हे त्यांचं प्राधान्य नाहीच. रंग-रूप, डिझाइनपेक्षा उलट हवामान, सुरक्षा आदी मुद्दय़ांचा विचार करून तयार केलेल्या कपडय़ांना आणि त्यांच्या गुणवत्तेला प्राधान्य दिलं जातं. जवळपास पन्नासएक वर्षांपूर्वी इथे एकत्र कुटुंबव्यवस्था अस्तित्वात होती. आता व्यक्तिस्वातंत्र्य वाढलं आहे. स्वावलंबन वाढलं आहे. मूल १८ वर्षांचं झाल्यानंतर प्रत्येकाला मतस्वातंत्र्य आहे आणि त्यानुसार वागता येतं. कुटुंब, नातलग, समाज आदींची दडपणं तरुणाईवर नसतात. या गोष्टींचं वैषम्य कुणाला वाटत नाही. स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मुलांना घरच्यांची ओढ नसते, असं नाही. पण ते केवळ त्यातच अडकून राहात नाहीत. इथल्या युनिव्हर्सिटीतील शिक्षण मोफत असतं, फक्त परीक्षेचं शुल्क भरावं लागतं. बहुतांश विद्यार्थी अर्धवेळ नोकरी करतात किंवा पूर्णवेळ नोकरी केली तर अर्धवेळ शिक्षण घेतात.

अलीकडेच युनिव्हर्सिटीमधला माझा मास्टर्सचा कोर्स सुरू झाला आहे. त्या वेळी आम्हाला संबोधित करताना डीननी सांगितलं की, ‘कुठेही काहीही गोष्ट चुकीची वाटली तर लगेचच सांगा, व्यक्त व्हा’. ‘आंतराष्ट्रीय महिला दिना’च्या सुमारास इथे सीरियन निर्वासितांच्या एका संघटनेतर्फे ‘आमच्या देशात महिलांना समानतेची वागणूक मिळत नाही, ती मिळायला हवी’, अशी मागणी करत सीरियामधल्या माहिलांचा प्रश्न मांडला होता. समाजाला त्रासदायी ठरू शकतील, अशा काही गोष्टी आढळल्या तर थेट मोठय़ा पदावरचे अधिकारी किंवा संबंधितांना मेसेज करता येऊ  शकतो. एकंदर आपली मतं मांडता येतात आणि त्यांचा विचारही होतो.

शब्दांकन : राधिका कुंटे

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nayan parliikar article about norway
First published on: 07-09-2018 at 03:32 IST