सध्या तबाटा या नव्या बॉडी वेट वर्कआऊटची जोरदार चर्चा आहे. मन, शरीर आणि स्वास्थ्य यांच्या संतुलनासाठी रोज थोडा तरी शारिरीक व्यायाम करणं आवश्यक आहे. तबाटा हा कमीत कमी वेळात जास्तीत जास्त फायदा देणारा व्यायाम म्हणून लोकप्रिय होत आहे. जपानमधल्या डॉ. इझुमी तबाटा यांनी अ‍ॅथलेट्ससाठी ही व्यायामाची पद्धत शोधून काढली. आताच्या फास्ट जमान्यात कमीत कमी वेळ स्वतसाठी असणाऱ्या पिढीला तबाटा ट्रेण्डी वाटतोय तो यासाठीच.
आता हा व्यायाम कसा करावा, किती करावा हे प्रत्येकाच्या शारिरीक क्षमतेनुसार आणि गरजेनुसार ठरतं. पुरुष आणि महिलांच्या शरीरामध्ये, त्यांच्या फिटनेसच्या पातळीमध्येदेखील फरक असल्याने ते वेगवेगळे व्यायाम प्रकार निवडतात.
viva27महिलांसाठीच्या इंटव्‍‌र्हल ट्रेिनग अंतर्भूत असणारा व्यायाम खूपच चांगला. कारण त्यामुळेच या चयापचयाचा वेग वाढण्यास मदत होते. तबाटा या नव्या बॉडी वेट वर्कआऊटची म्हणूनच तरुणींमध्ये चर्चा आहे. हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग या प्रकारचा हा व्यायाम. जलद गतीने आणि शरीर अधिक कार्यक्षम करण्याचा हा उत्तम पर्याय आहे. या वर्कआऊट दरम्यान तसंच नंतरही तुमच्या शरीराची कार्यक्षमता वाढते आणि अतिरिक्त कॅलरीज जळतात.
 तबाटा फिटनेस रुटीनमध्ये कुठलाही व्यायाम जलद गतीने शरीराची पूर्ण क्षमता वापरत करणे अपेक्षित आहे. वीस सेकंद व्यायामानंतर दहा सेकंदाचा ब्रेक आणि पुन्हा वीस सेकंद व्यायाम अशा सहा ते आठ सायकल्स पूर्ण करायच्या असतात. एकूण वीस मिनिटांचे तबाटा ट्रेनिंग पुरेसे असते. पुश-अप्स, पुल-अप्स स्कॉट्स, सिट-अप्स, स्प्रिंट्स असं काहीही तबाटा रुटीनमध्ये करता येतं. फक्त ते जलद गतीने २०- २०  सेकंदांच्या सेटमध्ये करणं आवश्यक आहे. मध्ये १०-१० सेकंदांची विश्रांती घेत सहा ते आठ सेट्स पूर्ण करायचे की, एक तबाटा सायकल पूर्ण होते. अशा सहा  सायकल्स केल्या तरी बराच व्यायाम होईल. तबाटा रुटीनमध्ये एकच एक्झरसाइज करण्याऐवजी पूर्ण शरीराला व्यायाम देणारे तीन- चार व्यायाम प्रकार एकामागे एक करू शकता. अशा पद्धतीने केवळ वीस मिनिटांमध्ये पुरेसा व्यायाम होऊ शकतो. वर्क-लाइफ बॅलन्स साधताना क्विक फिक्स व्यायाम प्रकार म्हणूनच तबटा लोकप्रिय होत आहेत. तरुणींमध्ये फिटनेसची ही लेटेस्ट क्रेझ त्यासाठी आहे.