News Flash

नवशब्दकर्ते

एका प्राध्यापिकेचा आणि तिच्या विद्यार्थिनीचा संवाद आहे.

प्राध्यापिका : तुझ्या प्रबंधिकेविषयी चर्चा करायची आहे ना आपल्याला?

विद्यार्थिनी : हो बाई.

प्राध्यापिका : मी तुझ्या सांगातीवर संदेश पाठवला होता, छायाप्रती घेऊन आलीस का तू?

विद्यार्थिनी : छायाप्रती नाही आणल्या, पण माझ्याकडचा मजकूर संगणकावर आहे, तो मी तुम्हाला संवाहीमध्ये नकलून देते.

हा एका प्राध्यापिकेचा आणि तिच्या विद्यार्थिनीचा संवाद आहे. आता सामान्यांना कळावं म्हणून आजच्या भाषेत सांगते. त्या विद्यार्थिनीच्या ‘डिजर्टेशन’बद्दल त्यांना चर्चा करायची आहे, त्यासाठी फोटोकॉपीज् आणल्या का, असं प्राध्यापिका तिला विचारतात, तसा मेसेज त्यांनी तिच्या मोबाइलवर केला होता, असं त्या सांगतात, त्यावर ती म्हणते, की फोटोकॉपीज् नाही आणल्या, पण माझ्याकडचा कॉम्प्युटरवरचा मॅटर मी तुम्हाला पेनड्राइव्हमधे कॉपी करून देते. हा संवाद काल्पनिक नसून वास्तव आहे. मुंबईतल्या एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये मराठी विभागात असा संवाद नेहमी ऐकू येतो. माटुंग्यातल्या रुपारेल महाविद्यालयाच्या मराठी साहित्याच्या तरुण प्राध्यापिका अनघा मांडवकर आणि त्यांची विद्यार्थिनी अनघा मोडक यांच्यात झालेला हा संवाद. विद्यार्थिनी अनघाने सांगितलेला. ही तर फक्त एक झलक होती, पण अनघाबाई रोजच्या बोलण्यात येणारे इंग्रजी शब्द टाळून सहजपणे मराठी शब्द वापरतात. (हो.. त्यांचे विद्यार्थी त्यांना ‘बाई’च म्हणतात, मॅम नाही.)  पेनच्या ‘रिफिल’ला अनघाबाई भरणी म्हणतात, पेनला लेखणी. फाइलला धारिका म्हणतात; पण मराठीच्या प्राध्यापिका म्हणून त्या केवळ अस्खलित मराठीच बोलतात असं नाही, तर तितक्याच अस्खलित हिंदी आणि इंग्रजीही बोलतात, एक भाषा दुसऱ्या भाषेत न मिसळता. तितक्याच समर्थपणे संस्कृत रचना करतात. त्यांचं मराठीतलं बोलणं ऐकून अनोळखी लोकही सहजपणे त्यांना दाद देतात; पण अनेकदा मराठीशी संबंधित व्यक्ती मात्र असा आग्रह धरत नाहीत याचं वाईट वाटतं, असं त्या म्हणतात.

‘‘माझ्यासारखी अस्खलित मराठी बोलणाऱ्या व्यक्ती दुर्मीळ आहेत, म्हणून मी वेगळी ठरते, पण असे अनेक जण असते आणि त्यांच्यातली मी एक उत्कृष्ट असते, तर मला जास्त आवडलं असतं,’’ असं त्यांना वाटतं.

त्यांच्या मराठी साहित्याच्या विद्यार्थ्यांना त्या नेहमी सांगतात, की मराठी भाषा ही तुम्ही तुमची व्यवसाय भाषा म्हणून निवडत असाल तर ती तुम्हाला अस्खलित बोलता यायला हवी. तुमची व्यवसाय भाषा आणखी संपन्न व्हावी यासाठी तुम्हीच प्रयत्न करायला हवेत. ‘‘पूर्वी माझा आग्रह असायचा की, इतरांनाही माझ्यासारखं बोलता यायला हवं. आता आग्रह नाही, पण आशा नक्कीच आहेत,’’ असं त्या सांगतात. पुढे त्या असंही म्हणतात की, मातृभाषेशिवाय एखादी प्रादेशिक किंवा परदेशी भाषा अवश्य आत्मसात करा, पण एका भाषेतून बोलताना अस्खलितपणे त्याच भाषेतून बोला. भाषांची सरमिसळ करू नका.

‘‘कोणतीही भाषा ही त्या त्या भाषेच्या भाषकांच्या व्यवहारावर आधारलेली असते. एखादा शब्द एखाद्या भाषिक व्यवहारात पुन:पुन्हा वापरला जातो, तेव्हाच तो त्या भाषेत रुळतो,’’ राज्य मराठी विकास संस्थेत कनिष्ठ संशोधक म्हणून काम करणारा सुशांत देवळेकर सांगतो. तो असंही म्हणतो की, ‘‘मला आपल्या भाषेत नवे शब्द तयार करायला आवडतात. एखाद्या इंग्रजी शब्दासाठी मराठीत प्रतिशब्द शोधायचा, तो नसेल तर तयार करायचा. ‘डिफॉल्ट’ला मी ‘क्रियापूर्व’ असं म्हणतो, रणगाडा हा शब्द आपण जसा सहजपणे वापरतो, तसं मी ट्रॅक्टरला ‘नांगरगाडा’ म्हणतो. असे शब्द तयार करायला आवडतं, म्हणून मी अस्खलित किंवा इंग्रजी शब्द न वापरता मराठी बोलू शकतो. याचा अर्थ मला इंग्रजीचा तिटकारा आहे असं नाही. मला तसं बोलायला आवडतं, म्हणून मी बोलतो. इतरांनीही तसंच बोलावं असं माझं म्हणणं कधीच नसतं.’’

२७ फेब्रुवारीला साजऱ्या होणाऱ्या मराठी राजभाषा दिनविषयी तो म्हणतो, ‘‘असा एक दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करण्यापेक्षा महाजालावर मराठीचा वापर, वावर कसा वाढेल यासाठी सातत्याने प्रयत्न करायला हवेत. संगणकावर आपल्या भाषेचा वापर वाढण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. विकिपीडियावर अनेक बाबतींतली माहिती मराठीत उपलब्ध नाही. ती कशी उपलब्ध होईल, त्याच्या भाषांतरासाठी प्रयत्न व्हायला हवेत. आय.आय.टी. मुंबईत याविषयीचं संशोधन आणि काम सुरू असतं. तिथे आपण संपर्क करू शकतो. तंत्रज्ञानाचा वापर करून भाषेच्या प्रगतीसाठी हातभार लावू शकतो.’’

ज्ञानभाषेचा आदर राखत मातृभाषेचा सन्मान करणारा, ज्ञानभाषेतलं ज्ञान मातृभाषेत आणणाऱ्यांपैकी एक असलेला सुशांत देवळेकर आणि कुसुमाग्रजांनी म्हटल्याप्रमाणे, ‘परभाषेतही व्हा पारंगत, ज्ञानसाधना करा तरी’ असं सांगणाऱ्या प्रा.अनघा मांडवकर या दोघांनीही मातृभाषा आणि ज्ञानभाषेचा समतोल साधला आहे. आज २६ फेब्रुवारी. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांचा ५० वा आत्मसमर्पण दिन. मध्येच याचा काय संदर्भ? असा प्रश्न पडेल. महापौर, दिग्दर्शक, प्रतिवेदक (रिपोर्टर), असे अनेक शब्द स्वा. सावरकरांनी मराठी भाषेला दिले आणि शब्दसंपत्तीत मोलाची भर घातली. तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर जे नवे शब्द आले, त्यांनाही मराठी पर्याय शोधून आणि वापरून हे दोघेही त्यात भरच घालत आहेत.

अनघाबाईंना त्यांचे सगळे विद्यार्थी बाईच म्हणतात. तसं त्याच म्हणायला सांगतात. त्या वापरत असलेले मराठी शब्द कानावर पडून, त्यांच्या प्रभावामुळे आम्हीही काही काळ ते शब्द वापरतो. एरवी इंग्रजी शब्द वापरत असू तरी बाईंशी बोलताना साहजिकपणे त्या वापरत असलेले शब्द आम्ही वापरतो. बाई बोलताना त्या खूप सहज, उत्स्फूर्त बोलतात, त्यामुळे त्यांचे बोलणं कधीच नाटकी वाटत नाही.’’
new-word-1

अनघा मोडक (विद्यार्थिनी)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2016 1:12 am

Web Title: new word marathi
टॅग : Marathi
Next Stories
1 गाइज अ‍ॅण्ड अदरवाइज : ‘वन साइडेड’ विटनेसेस
2 खाबूगिरी : चाय पे चर्चा
3 खाऊच्या शोधकथा : नान आणि कुल्चा
Just Now!
X