24 September 2020

News Flash

‘नायगारा’ आहे साक्षीला

जगाच्या पाटीवर

|| अमित पाटील

नायगारा कॉलेज, ओंटारिओ, कॅनडा

‘नायगारा’ ऐकायला, वाचायला किती छान वाटत होतं इतके दिवस! आता तर मी त्याच्याजवळच आहे. अधूनमधून त्याची गाज कानांवर पडणं, त्याला प्रत्यक्ष न्याहाळण्याचं भाग्य मला लाभतं आहे. कारण मी कॅनडातील ‘नायगारा कॉलेज’मध्ये शिकतो आहे. हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी हा आमच्या घरातला अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. माझे बाबा एका फाइव्हस्टार हॉटेलमध्ये शेफ आहेत. या सगळ्या कारणांमुळे मीही या क्षेत्रात यायचा निर्णय घेतला. रुईया महाविद्यालयातून अकरावी-बारावी केलं. बारावीच्या सुट्टीत जेईईची परीक्षा दिली. मला आयएचएम मुंबईमध्ये (इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, मुंबई) हॉटेल अ‍ॅण्ड हॉस्पिटॅलिटी अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला. तिथले शिक्षण आणि प्राध्यापक खूप चांगले होते. तो अभ्यासक्रम सुरू असताना पलेडिअम हॉटेलमध्ये (आताचं सेंट रिजिस) इंटर्नशिप केली. बरेच कॅम्पस इंटरव्ह्य़ू दिल्यावर माझ्यापुढे टीम मॅनेजमेंट ट्रेनिंगचे तीन पर्याय होते. ‘आयएचजी’ अर्थात इंटरकाँटिनेंटल, ‘आयटीसी’ आणि ‘ओबेरॉय’. मग ओबेरॉयमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी मी दिल्लीला गेलो. त्या वर्षभराच्या प्रशिक्षणात हाऊस कीपिंग, फ्रण्ट ऑफिस वगैरे गोष्टी शिकायच्या होत्या. दरम्यान मी सिमल्याच्या ओबेरॉय हॉटेलमध्ये गेलो. तिथल्या कडाक्याच्या थंडीचा त्रास झाल्याने ते प्रशिक्षण नाइलाजाने अर्धवट सोडावं लागलं. फारच वाईट वाटलं तेव्हा..

मुंबईला परतल्यावर काही ठिकाणी काम केल्यानंतर ‘फोर सीझन्स’ हॉटेलमध्ये नोकरी लागली. तिथे फ्रण्ट रिसेप्शनिस्ट आणि अपसेल ट्रेनर म्हणून काम केलं. ‘फोर सीझन्स’ हा कॅनेडियन ब्रॅण्ड आहे. तिथली मूल्यं आणि आतिथ्यशीलता मला फारच भावली. आपल्याकडच्या हॉटेलमधील वातावरणापेक्षा खूप वेगळं होतं सगळं. आपल्याकडे बहुतांशी दृष्टिकोन असतो, ‘अतिथी देवो भव’चा आणि इथे यजमान-पाहुणे एकमेकांकडे ‘माणूस’ म्हणूनच पाहात होते. सतत ‘सर, सर’ असं संबोधणं नसतं. मला ते आवडलं. आपल्याकडच्या हॉटेलमध्ये एक प्रकारे ग्राहकाचं वर्चस्व आणि यजमानाची आदरातिथ्याची भूमिका असते. पण कॅनेडियन पद्धतीत कोणीच मालक – नोकर नाही. हे निरीक्षण केल्यावर विचारांती मी परदेशी जाऊन शिक्षण घ्यायचं ठरवलं. पहिला पर्याय चाचपडला न्यूझीलंडचा. तो बाद झाल्यावर कॅनडावर शिक्कामोर्तब झालं.

कॅनडामध्ये ‘थॉमसन रिव्हर्स युनिव्हर्सिटी’ आणि ‘नायगारा कॉलेज’ या दोन ठिकाणी अर्ज केले होते. पण तिथल्या जागा भरल्या होत्या. मग ‘नायगारा कॉलेज’मध्ये हॉस्पिटॅलिटी अ‍ॅण्ड टुरिझमच्या पदविकेच्या वर्षभराच्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला. त्यानंतर व्हिसा, तिकीट आदी गोष्टी सुरळीतपणे झाल्या. योगायोगाने मला थेट विमान मिळालं होतं. ते आता बंद झालं आहे. खरंतर एवढा लांबचा प्रवास सलग करणं, म्हणजे सोपी गोष्ट नाही. पण एकुणात मजा आली. मुंबईतील तीन मित्रांसोबत इथे आलो. आता आम्ही एका अपार्टमेंटमध्ये एकत्र राहतो. मात्र आमचे अभ्यासक्रम वेगवेगळे आहेत. भल्या सकाळी टोरांटोला पोहोचल्यावर सगळे सोपस्कार पूर्ण होईपर्यंत दहा वाजले. माझी मावशी इथे राहते. त्यांच्या घरच्या गाडीने तासाभरात नायगाराला पोहोचलो. रूमवर बॅग ठेवून थेट नायगारा फॉल्सला जाऊन थडकलो. तो अगदी अविस्मरणीय अनुभव होता.. तोच कशाला, त्यानंतर दरवेळी ‘नायगारा’ला गेलो, त्या त्या वेळी दिसणारा, भासणारा, अनुभवास येणारा ‘नायगारा’ शब्दांत मांडण्याच्या पलीकडचा आहे. ‘नायगारा ऑन द लेक ओंटारिओ’ला आमचं कॉलेज असून आम्ही राहतो नायगारा फॉल्सला. कॉलेजने आम्हाला बसपास मोफत दिला आहे.

सुरुवातीच्या काळात स्थिरावायला मावशीच्या घरच्यांची मदत झाली. शिवाय कॅनडाच्या सरकारने विद्यार्थ्यांसाठी काही चांगल्या सोयीसुविधा पुरवलेल्या असल्याने त्याचाही लाभ घेता येतो. त्यापैकी सुरुवातीला भारतातून ठरावीक रक्कम कॅनडातील बँकेत जमा करावी लागते. त्यानंतर इथल्या बँकिंग सुविधेमुळे विद्यार्थ्यांच्या खात्यात दर महिन्याला ठरावीक रक्कम जमा होते आणि तिचा वापर करता येऊ  शकतो. केवळ शिक्षण घेतलं आणि अर्धवेळ काम केलं नाही, तरी या पैशांच्या सुविधेमुळे वर्षभर निभावता येतं. सगळ्यांना सोशल इन्शुअरन्स नंबर काढावा लागतो. विद्यार्थ्यांना नोकरीच्या ठिकाणी हा नंबर द्यावा लागतो. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट पगार जमा होतो. इथे नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत, कारण हा भाग पर्यटकांनी कायम गजबजलेला असतो. विद्यार्थ्यांना ठरावीक वेळच काम करता येतं त्यावर काम केलं गेल्यास तशी सूचना दिली जाते. सुट्टीच्या काळात यात वेळेची मुभा दिली जाते.

थंडी कडाक्याची असली तरी एकूण हवामान चांगलं आणि प्रदूषित नसल्याने सुदैवानं मी अजून आजारी पडलेलो नाही. केवळ हवाच नव्हे तर कोणतंही प्रदूषण कमी आहे. पहिली बर्फवृष्टी पाहून लई भारी वाटलं होतं. मी घरी स्वयंपाक करतो. त्यासाठी महिन्याचं सामान वॉलमार्टमधून भरून ठेवतो. अर्धवेळ काम हे अनेकदा वीकएण्डलाच असतं आणि तीन दिवस कॉलेज असतं. इथे आलो तेव्हा थंडीचा मोसम होता. त्यामुळे तेव्हा अर्धवेळ काम मिळणं कठीण होतं. कारण पर्यटकांची संख्या रोडावते. त्यातल्या त्यात अमेरिकेतील पर्यटक सातत्याने येतात. पर्यटकांचं म्हणणं नीट ऐकून त्याप्रमाणे त्यांना सेवा द्यावी लागते. त्यासाठी भाषेवर प्रभुत्व असावं लागतं. मी कएछळरची परीक्षा दिली होती. १ ते ९ या श्रेणीत १ हे कमी तर ९ हे सर्वाधिक गुण अशी श्रेणी असते. मला ८.५ गुण मिळाले होते.

महाविद्यालयातील वातावरण खूपच वेगळं आहे. सुरुवातीच्या लेक्चर्सना मी शिस्तीत सॅकमध्ये वह्या-पुस्तकं, पेन-पेन्सिल घेऊन गेलो होतो. नंतर कळलं की त्याचा काही उपयोग नाही. परीक्षेसह सगळ्या गोष्टी ऑनलाइन असतात. काहीजणांना ते चांगलं वाटतं आणि काहींना नाही, कारण काहीजणांची मानसिकता पेन-पेपरचीच असते. ती पारंपरिक किंवा चुकीची आहे असं नाही. मला मात्र ऑनलाइन आवडतं. आमची स्टेशनरी म्हणजे फक्त लॅपटॉप आहे फक्त. परीक्षेला खूपच महत्त्व दिलं जातं, असं अजिबात नाही. उलट वर्गातील चर्चा आणि अ‍ॅक्टिव्हिटीजमधला विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा ठरतो. दर आठवडय़ाला असाइन्मेंट दिली जाते. सगळ्या गोष्टी ब्लॅकबोर्डवर सबमिट केल्या जातात. प्राध्यापकही त्यावरून संवाद साधतात, सूचना देतात. इथे पूर्णवेळ प्राध्यापक कमी आहेत. त्याखेरीज या क्षेत्रातली तज्ज्ञ मंडळी वेळोवेळी शिकवायला येतात. एका अर्थी त्यामुळे विद्यार्थ्यांनाही त्या त्या क्षेत्राची कल्पना येते. नुकतीच माझी पहिली सेमिस्टर संपली आहे.

प्राध्यापक ठरावीक चौकटीतल्याच गोष्टी शिकवत नाहीत. ते सल्लागार आणि मार्गदर्शकाची भूमिका निभावतात. काही विद्यार्थी वर्गात लक्ष देत नाहीत, सतत फोनवर असतात, मात्र प्राध्यापक त्यांना काही बोलत नाहीत. कारण प्रत्येक विद्यार्थ्यांला आपली जबाबदारी कळायला हवी, असं गृहीत धरलं जातं. सुरुवातीला काहीजणांच्या या फोनवर बिझी राहण्याचा किंवा लेक्चरच्या वेळी खाण्यापिण्याचा मला धक्का बसला होता. आश्चर्य वाटलं होतं. आता क्वचितप्रसंगी मीही खातो. इंडक्शनऐवजी ओपन हाऊस असतं. लेक्चर्सऐवजी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची ओळख होते. त्यानंतर कॅम्पसमध्ये फिरायला-भटकायला परवानगी मिळते. प्रत्येक विभागाने थोडय़ाशा कल्पकतेने आपापल्या विभागाची ओळख करून द्यायची असते. त्यातल्या काही अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये नवीन विद्यार्थ्यांनाही सामील होता येतं. विद्यर्थ्यांना एकमेकांची ओळख करून देणारं कॉलेजचं एक अ‍ॅप्लिकेशन होतं. त्यामुळे अलिशा, ट्रोय, जेडन आणि मी असा आमचा ग्रूप तयार झाला. आम्हाला बऱ्याच ग्रूप असाइन्मेंट कराव्या लागतात. त्यात कधी आमचाच ग्रूप असतो तर कधी वेगळे ग्रूप होतात. असाइन्मेंटसाठीचे संदर्भ मान्यताप्राप्त पुस्तकं, जर्नल्स वगैरेंतून घ्यायला लागतात आणि त्याची संदर्भयादीही द्यावी लागते. त्या असाइन्मेंट एपीए अर्थात ‘अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन’ने ठरवलेल्या पद्धतीनेच लिहाव्या लागतात. केवळ कॉपी-पेस्ट केल्यास ताकीद मिळते आणि त्यात सातत्य राहिलं तर कडक कारवाई केली जाते. एका असाइन्मेंटमध्ये टुरिझम अ‍ॅण्ड नायगारा फॉल्स या विषयावर यूटय़ूब व्हिडीओ तयार करायचा होता. मी ‘द ग्रेट कॅनेडियन मिडवे’ या गेमिंग सेंटरमध्ये कस्टमर सव्‍‌र्हिस रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करतो. तिथे आमच्या ग्रूपने हा व्हिडीओ तयार केला. हा व्हिडीओ बेस्ट ठरला होता. त्याबद्दल प्राध्यापकांनी आम्हाला कौतुकाने एका रेस्तराँमध्ये नेलं होतं. अशा काही छोटय़ा, पण टप्प्यांमुळे आपण योग्य दिशेने चाललो आहोत, याची खात्री वाटते.

कॅम्पसवर पूर्णवेळ सुसज्ज जिम आहे. जिममध्ये दर सोमवारी बास्केटबॉल खेळतो. मंगळवार आणि बुधवारी बॅटमिंटन खेळतो. शिवाय ‘वेललॅण्ड फ्लॅटवॉटर सेंटर’मध्ये वेगवेगळे वॉटर स्पोर्ट्स खेळतो. इथे हॉकी म्हणजे आइस हॉकी खेळलं जातं. हॉकी शिकायचं असल्यानं मी स्केटिंग क्लासला जातो. आपण ज्याला रग्बी म्हणतो, त्याला इथे फुटबॉल म्हणतात. खेळण्यासाठी म्हणून वेळात वेळ काढून जातो. कॉलेजच्या फील्ड ट्रिपमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या छोटय़ा-मोठय़ा किंवा व्हिंटेज हॉटेलना भेट देऊन तिथली माहिती दिली जाते. कॅम्पसवर सतत काही ना काही इव्हेंट्स होतात. त्यात खेळ, खाणं-पिणं, समुपदेशन असं बरंच वैविध्य असतं. जवळपास सगळेच विद्यार्थी या इव्हेंट्समध्ये सहभागी होतात, कारण त्यात कल्पकतेनं काही ना काही गिफ्ट व्हाउचर, कुपन वगैरे बक्षीस ठेवलेलं असतं.

घरच्यांची आठवण आल्यावर व्हिडीओ कॉल करतो. अंतर खूप असल्याने आणि तिकिट महाग असल्याने इतक्यात भारतात येणं होणार नाही. इथले भारतीय लोक होळीसारखे सणवार साजरे करतात. त्याविषयी विद्यार्थ्यांना ईमेल केला जातो. आमच्या कॅनेडियन मैत्रिणीला होळीविषयी उत्सुकता असल्याने तिला होळी दाखवण्यासाठी आम्ही गेलो होतो. हा अभ्यासक्रम संपल्यावर पुढे ‘इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट’ हा कोर्स करण्याचा विचार आहे. त्यानंतर इथल्या कामाचा अनुभव घ्यायचा आहे. बघा, हे सगळं सांगतो आहे, तेव्हाही नायगारा समोर दिसतो आहेच. त्याच्या साक्षीने सुरू झालेला हा आतिथ्यशीलतेचा प्रवास अधिकाधिक सुकर होईल, यात शंका नाही.

कानमंत्र

  • IELTS मध्ये चांगले गुण मिळवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे केवळ प्रवेश आणि इमिग्रेशन मिळणं सोपं होतं असं नाही तर वर्गातील शिकवण्याचं आकलन होणं सुकर होतं.
  • अर्धवेळ काम करायला लवकरात लवकर सुरू करा. त्यामुळे हातखर्चाला पैसे मिळतील आणि महत्त्वाचं म्हणजे तिथल्या कामाचा अनुभव गाठीशी बांधता येईल.

 

शब्दांकन : राधिका कुंटे

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2019 1:26 am

Web Title: niagara college canada
Next Stories
1 मोफत ‘वायफाय’ची किंमत!
2 रुपाली भोसले
3 अवघड मार्ग स्वीकारा – चंद्रकांत सोनावणे
Just Now!
X