09 August 2020

News Flash

फ्रीडम अ‍ॅट इट्स बेस्ट..

शांत मनाने विचार करायला रात्रीची वेळ पूरक ठरते.

आजची तरुणाई रात्रीच जगते असं म्हणतात. उद्याचे इंजिनीअर्स त्यांच्या असाइनमेंट्स रात्रीच पूर्ण करतात, उद्याचे डॉक्टर्स जर्नल्स रात्रीच भरतात, एका रात्रीत प्रोजेक्ट्स पूर्ण होतात, सकाळच्या पेपरचा अभ्यास होतो, एखादी नवीन कविता सुचते, एखादं पेंटिंग आकार घेतं, एखादी नाटकाची संहिता जन्म घेते, राहिलेल्या मूव्हीज पाहिल्या जातात, गप्पांचा फड रंगवला जातो.. रात्री तरुणाई जास्त कम्फर्टेबल फील करते. शांत मनाने विचार करायला रात्रीची वेळ पूरक ठरते. नाइट आउट मारताना कंटाळा आला म्हणून बाहेर भटकायला जाताना ‘नाइट सायकलिंग’च्या कल्पनेने आकार घेतला. मित्र-मैत्रिणींच्या एखाद्या ग्रुपने आपापल्या सायकली बाहेर काढून मनसोक्त आणि बिनधास्त भटकायचं एवढाच खरं तर यामागचा उद्देश! रात्रीच्या शांत रस्त्यांवरून फिरताना आपोआप मनाला शांत वाटतं. मधेमधे चालणारे लोक नाहीत, गाडय़ांच्या हॉर्नचे भोंगे नाहीत, एकमेकांशी बडबड नाही, फक्त नि:शब्द शांततेत आपण आणि आपली सायकल!
19
ज्या मुंबईच्या गर्दीचा, प्रदूषणाचा आपल्याला दिवसभरात वीट आलेला असतो, त्याच मुंबईच्या आपण रात्री अक्षरश: प्रेमात पडतो. ज्याने रात्री मुंबई बघितली तो पुन्हा कधीही दिवसाच्या मुंबईच्या धावपळीबद्दल कणानेही तक्रार करणार नाही इतकं हे शहर रात्री मोहक असतं. सायकलिंगची हौस असलेल्यांसाठी ही जणू सुवर्णसंधी असते. नाईट सायकलिंगमध्ये मुलांबरोबर मुलीही तितक्याच उत्साहाने सहभागी होतात.
नियमित सायकलिंग करणारा आशीष आगाशे म्हणतो, ‘पेडर रोड, मरिन ड्राइव्ह, कुलाबा, मलबार हिल ही आमची नेहमीची आवडती ठिकाणं आहेत. कधी कधी ठाण्याहून निघायचं आणि बोरिवली, उत्तन करीत लाँचमध्ये सायकली चढवून पगोडा बघून पहाटे ठाण्यात परतायचं. साधारण १५० कि.मी.ची ही फेरी होते. साधारणत: दुसऱ्या दिवशी सुट्टी असेल असं बघूनच बाहेर पडायचं, त्यातही २५ जानेवारीची किंवा १४ ऑगस्टची रात्र ही फिरायला सगळ्यात बेस्ट. कारण एक तर मुंबईच्या मुख्य भागांमध्ये रोषणाई केलेली पाहायला मिळते आणि दुसरं म्हणजे त्या दिवशी ड्राय डे असल्याने नाइट राइडला मद्यपींचा अडथळा येत नाही. दिवसाच्या गोंगाटापासून दूर आणि प्रदूषणमुक्त हवेत फिरता यावं यासाठी नाइट राइड महत्त्वाची ठरते. वृत्तपत्रांच्या कार्यालयांमध्ये, शिवाजी पार्क रस्ता, एशियाटिक लायब्ररी अशा काही ठिकाणी रात्रभर चहावाले, नाश्तावाले असतात, तिथे थांबून स्वत:मध्ये पुन्हा उत्साह भरून पुढची सफर करायला आपण तयार होतो.’
अलीकडे तर नाइट सायकलिंगची टूम इतकी वाढली आहे की अनेकांनी त्याचा जणू व्यवसायच सुरू केला आहे. ८०० ते १००० रुपये घेऊन एका रात्रीची सायकल फेरी काढली जाते. त्यानिमित्ताने लोकांचा नाइट सायकलिंगकडे ओढा वाढला हे जरी खरं असलं, तरी आपल्या शहरात, आपल्या रस्त्यांवर, आपली सायकल घेऊन फिरण्यासाठी खरं तर काहीच खर्च येत नाही. आपण स्वत:मध्ये स्वत:हून शिस्त पाळली, वाहतुकीचे नियम पाळले, सुरक्षिततेसाठी काही काळजी घेतली आणि इतरांना त्रास होणार नाही असं वागणं ठेवलं तर पोलीसही आपल्याला अडवणार नाहीत. कोणत्याही संस्थेला अथवा कोणा व्यक्तीला पैसे देऊन ती संस्था किंवा व्यक्ती पोलिसांची परवानगी घेण्याव्यतिरिक्त काहीदेखील करीत नाही आणि आपल्याला सेफगार्ड करण्यासाठी आपण स्वत: पोलिसांशी नक्कीच बोलू शकतो. जी गोष्ट आपण स्वत:हून करू शकतो त्यासाठी फक्त थोडी हिंमत एकवटून शांतपणे बोलायला शिकलं पाहिजे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2016 1:02 am

Web Title: night cycling in mumbai
टॅग Viva,Viva News
Next Stories
1 छगन भुजबळांचा पाय आणखी खोलात; सीए सुनील नाईक होणार माफीचा साक्षीदार
2 किनन-रुबेन हत्येप्रकरणी चारही आरोपींना जन्मठेप
3 ‘आयआरसीटीसी’चे संकेतस्थळ हॅक झाल्याचे वृत्त रेल्वे प्रशासनाने फेटाळले
Just Now!
X