फॅशनच्या जगतात सध्या कुठल्या मेकअप ट्रेण्डची चर्चा जास्त होत असेल तर ती मिनिमल अर्थात शिअर फेस्ड लूकची. अ‍ॅमी अ‍ॅडम्स, सॅण्ड्रा बुलक, रिस विदरस्पून अशा अनेक हॉलीवूड तारकांनी हा लूक वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून रेड कार्पेटवर फेमस करून टाकलाय. ‘ओरिफ्लेम’च्या ब्युटी आणि मेकअपतज्ज्ञ आकृती कोचर यांनी दिलेल्या ‘न्यूड लूक’साठीच्या टिप्स..
मिनिमल लूकमागची मुख्य संकल्पना अशी की, एखाद्याच्या चेहऱ्यातलं सर्वोत्तम वैशिष्टय़ अधोरेखित करून उर्वरित लूक प्राथमिक ठेवणं किंवा साधा ठेवणं. हा लूक बिनचूक साधण्यासाठी शिअर बेस घेऊन डोळ्यांना हलका मेकअप करून ओठांसाठी पेस्टल शेड्सचा वापर करावा. गालांच्या उंचवटय़ांना रंगांनी हलका उठाव द्यावा. मीडियम कव्हरेजसाठी पातळ लिक्विड बेस्ड फाऊंडेशनचाही वापर करता येईल. मात्र या फाऊंडेशनचा अत्यंत माफक वापर करावा. जेणे करून शक्य तितका नसíगक लूक ठेवता येईल. नंतर हा बेस पक्का करण्यासाठी त्यावर थोडी कॉम्पॅक्ट पावडर लावावी आणि फाऊंडेशन सेट होऊ द्यावं. गाल निस्तेज दिसू नयेत यासाठी त्यावर सॉफ्ट, पेस्टल रंगाचा ब्लश लावता येईल.
पुढचा टप्पा म्हणजे आयशॅडो. एकाच रंगाची आयशॅडो लावून एखादा चेहरा चांगलाच उजळवता येऊ शकतो. मात्र त्यासाठी हलक्या टोनची आयशॅडो वापरावी जेणे करून ती अधिक नसíगक वाटेल. थोडय़ा प्रमाणात आयलायनरचा वापर करण्यासही हरकत नाही. ते फायद्याचंच ठरेल, कारण त्यामुळे चेहऱ्यावर कॉण्ट्रास्ट निर्माण होऊन चेहरा अधिक गोरा दिसेल. त्यामुळे डोळ्यांना आयलायनरची हलकी रेघ लावावी. डोळ्यांना अधिक उठाव येण्यासाठी हलका मस्कारा आणि भुवयांना चांगला आकार द्यावा. ओठांना हलका गुलाबी, कोरल रंग द्यावा आणि ओठांच्या केवळ मध्यभागी ग्लॉस लावावा.
उन्हाळ्याच्या दिवसात संध्याकाळच्या एखाद्या कार्यक्रमाला जाणार असाल तर आणखी एका प्रकारे आपण न्यूड लूक साधू शकतो. त्यासाठी गालांना सॉफ्ट ब्रॉन्झ्ड कलर द्यावा आणि ओठांना लाल, ऑरेंज, बेरी आदी बोल्ड रंग द्यावा. डोळ्यांना हलकं आयलायनर लावावं.
दिवसभर तुम्हाला कुठल्या कार्यक्रमात मिरवायचं असेल व सॉफ्ट आणि मिनिमल लूक ठेवायचा असेल, तर वर उल्लेख केल्याप्रमाणे बेस बनवावा. त्वचा उजळ असेल तर गालांना कोरल रंग द्यावा. मध्यम ते टॅन्ड रंगाची त्वचा असल्यास गडद गुलाबी रंगाचा वापर करावा, जेणे करून चेहरा उजळेल. हा मिनिमल लूक असल्याने रंगीत आयलायनर किंवा उजळ रंगाच्या लिपस्टिकचा वापर (दिवसा) करू नये.
एकावेळी चेहऱ्यावरचं एकच फीचर अधोरेखित करावं. बऱ्याच भारतीयांच्या चेहऱ्यामधलं उठावदार फीचर म्हणजे त्यांचे डोळे असतात. त्यामुळे डोळ्यांना अधोरेखित करायचं असल्यास फक्त मस्कारा आणि आयलायनरच्या वापराने हा लूक साधता येईल. अचूक न्यूड लूक साधण्याचं गुपीत म्हणजे एकावेळी एकाहून जास्त फीचर्सना उठाव न देणं.
न्यूड लूकमध्ये ओठांना अधोरेखित करायचं असेल तर ब्लशसाठी ठळक रंगांचा वापर करू नये. तुमच्या हाडांची ठेवण उत्तम असेल तर ब्लशसोबत सॉफ्ट ब्रॉन्झरचा वापर करावा, ज्यामुळे गालाच्या हाडांना निश्चित आकार मिळून ती अधोरेखित होतील.
काही महत्त्वाच्या टिप्स
* मिनिमलिस्ट लूकमध्ये स्मोकी आईजचा प्रयोग करू नये. नेहमी न्यूड लिप कलर आणि भरपूर लिप ग्लॉस वापरावं. दिवसाप्रमाणे रात्रीसाठी, औपचारिक मीटिंग्जसाठी किंवा संडे बॅ्रन्चसाठीही हा मेकअप उत्तम ठरेल.
*  न्यूड लूकवर काम करत असताना जाडसर पण निश्चित आकार दिलेल्या भुवयांवरही प्रयोग करता येईल. पांढरी आय पेन्सिल आणि थोडा मस्कारा यांचा वापर करावा. पांढऱ्या आय पेन्सिलच्या वापरामुळे डोळे मोठे आणि अधिक जिवंत दिसतील. गालाच्या उंचवटय़ांना हलका रंग द्यावा आणि मध्यम गुलाबी/कोरल/न्यूड रंगाची लिपस्टिक लावावी. दिवसासाठी वापरला जाणारा हा अत्यंत लोकप्रिय लूक आहे.
* दिवसासाठीचा मेकअप असो वा रात्रीसाठीचा ओठांना लिपस्टिक लावण्यापूर्वी त्यांना आऊटलाइन करणं अत्यंत आवश्यक आहे. ओठांना अधोरेखित करणार असाल तर डोळे किंवा चेहऱ्यावर विशेष लक्ष देण्याची गरज नसते.
* दिवसा ‘सन-किस्ड’ लूकसाठी पापण्या, गाल, हनुवटीला हलकं मॅट ब्रॉन्झर लावावं. याला उठाव येण्यासाठी ब्रॉन्झ, न्यूड शेडची लिपस्टिक लावावी.
* मिनिमल मेकअपला सहाय्यभूत ठरणारी केशभूषा म्हणजे नुकतंच झोपून उठल्यावर केस जसे विस्कटलेले असतात, तसा मेसी लूक. उलटे फिरवलेले केस किंवा मोकळे सोडलेले केसही या लूकवर चालतील.
* एखाद्या फॉर्मल फंक्शनसाठी असा लूक करायचा असेल संध्याकाळी, लंचला किंवा डीनरला केसांसाठी टॉप नॉट किंवा पोनिटेल चांगला दिसेल.
* मिनिमल मेकअप लूकसाठी सरळ किंवा कुरळे केस मोकळे सोडले तरी हरकत नाही. सॉफ्ट स्किन आणि गालांना उठाव येण्यासाठी वेण्या किंवा फिशटेलही चालेल.