|| गायत्री हसबनीस

आजच्या डिजिटल, वेबसीरिज आणि व्हीएफएक्सच्या जमान्यात हातांनी तयार केलेला सेट, हातांनी विणलेले कपडे, दिवसेंदिवस विविध पद्धतीने सर्वेक्षण आणि अभ्यास करून चित्रपटात वापरले जाणारे दागिने, चपला, वस्तू ज्या चित्रपटांसाठी खास बनवल्या जातात. त्यामागे वेशभूषाकार आणि कला दिग्दर्शक कसे मेहनत घेतात याचा प्रत्यय ‘आर्ट अ‍ॅण्ड कॉस्च्यूम शो’मधून अनुभवता आला. हे प्रदर्शन प्रथमच मुंबईत पार पडले. यानिमित्ताने फॅ शन डिझाइनिंगबरोबरच कॉस्च्यूम डिझाइनिंग प्रकरणही तितकेच रोमांचक आहे हे लक्षात आले..

चित्रपटातून केल्या जाणाऱ्या वेशभूषेचा परिणाम आपल्यावर होत असतोच. चित्रपटांमध्ये पीरियड फिल्म्स किंवा वेगळ्या जॉनरमधून अनुभवायला मिळणारी वेशभूषा जास्त परिणामकारक ठरते. मणिकर्णिकासारख्या चित्रपटानंतर तत्कालीन दागिने, साडय़ा यांना मागणी वाढते हा आजवरचा अनुभव आहे. अर्थात, अशा प्रकारे चित्रपटांमधून कॉस्च्यूम डिझाइनिंग करताना त्यामागे डिझायनर्सचा अभ्यास खूप महत्त्वाचा असतो. चित्रपटांमधून पारंपरिक कपडे दाखवताना ते नेत्रसुखद दिसायला हवेत, यापेक्षाही त्यातले वेगळेपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हा ध्यास कॉस्च्यूम डिझायनरचा असला पाहिजे. अगदी जुनी छायाचित्रे पाहतानाही विशिष्ट प्रकारे बसलेले स्त्री-पुरुष, त्यांची वस्त्रं परिधान करण्याची रचना, अलंकार, केशरचना या गोष्टी वेगळ्या आहेत हे पाहणाऱ्याच्या सहज लक्षात येतं. त्यामुळे लोकांपर्यंत हा वेगळेपणा पोहोचेल या हेतूनेच कॉस्च्यूम डिझाइनिंगकडे लक्ष द्यावं लागतं, असं मतं नामांकित वेशभूषाकार पिया बेनेगल यांनी मांडलं. पिया बेनेगल यांनी आत्तापर्यंत लोकप्रिय चित्रपटांसाठी कॉस्च्युम्स डिझायनर म्हणून काम पाहिले आहे. ‘झुबेदा’, ‘संविधान’, ‘बोस – द फर्गोटन हिरो’, ‘अलिगढम्’ असे मोठे पीरियड चित्रपट त्यांनी केले आहेत.

‘चित्रपटासाठी जर ऐतिहासिक पात्र असेल तर त्या पात्राभोवतीचा समाज, लिंग, जात, शेजारील लोकांचा सहवास यांचा अभ्यास करावा लागतो. एकच साडी कर्नाटक, नाशिक, पुणे या भागात वेगवेगळ्या पद्धतीने परिधान केली जाते. त्यामुळे तरुण कॉस्च्यूम डिझायनर्सनी इतिहास अभ्यासायला हवा. त्याचबरोबर भारतीय फॅब्रिकचा वापर करायला हवा,’ असं त्या म्हणतात. ‘चित्रपटात कोणतीही वेशभूषा तयार करताना अभिनेता वा अभिनेत्रीच्या शरीररचनेचाच विचार केला जातो. तिथे संबंधित कलाकार त्या ऐतिहासिक पात्रासारखा हुबेहूब दिसला पाहिजे, असा विचारच नसतो. त्याऐवजी त्या काळात ते कपडे कसे घालत होते आणि आज ते कसे दिसले असते हा भागच जास्त महत्त्वाचा आहे, असं मतं राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कॉस्च्यूम डिझायनर लवलीन बेन्स यांनी मांडले. त्यांनी ‘मंगल पांडे’, ‘रंग दे बसंती’, ‘मौसम’, ‘कामसूत्रा’ अशा नावाजलेल्या चित्रपटांसाठी वेशभूषा साकारली आहे. ‘कॉस्च्यूम डिझायनरला संबंधित पात्रांचे कॉस्च्यूम डिझाइन्स करता ऐतिहासिक, सामाजिक संदर्भ शोधून त्यांचा अभ्यास करावा लागतो. ‘मंगल पांडे’ या चित्रपटात आम्ही ईस्ट इंडिया कंपनीच्या सैनिकांची वेशभूषा दाखवली. त्या काळची वेशभूषा आताच्या पिढीला सहजपणे पाहता येणार नाही, पण म्हणूनच डिझायनरची जबाबदारी अधिक वाढते. तो युद्धाचा काळ असल्याने कपडय़ांवर बंदुकांच्या गोळ्यांमुळे झालेल्या खुणाही दिसल्या पाहिजेत, क पडय़ांचे रंगही तसे दिसले पाहिजेत, ही काळजी घ्यावी लागते. त्या वेळी मी लंडनच्या म्युझियममध्ये गेले. त्यासाठी आधी लष्कर इतिहासकारांची परवानगी घेतली. तिथे ईस्ट इंडिया कंपनीच्या आर्मीच्या वेशभूषांची चित्रे, जिवंत नमुने आणि तसे कपडे होते, ज्यातून मला एक वेगळा दृष्टिकोन मिळला, असं त्यांनी सांगितलं.

‘लष्करी अधिकाऱ्यांची वेशभूषा व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी आर्मी, पोलीस, एअर फोर्स इत्यादींच्या संपर्कात सतत राहावे लागते. राजकारणी मंडळींची वेशभूषाही अभ्यासावी लागते. शेवटी कपडय़ांच्या बाबतीत संशोधन अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतं. भारतात तुम्हाला कुठल्याही ऐतिहासिक पात्रांचे लेखी पुरावे मिळतील, पण प्रत्यक्ष नमुने पाहायला मिळणं फार अवघड आहे. एखाद्या ऐतिहासिक वेशभूषेचे महत्त्व, ते कसे परिधान केले जायचे, त्यांचा कालावधी या सगळ्याची पुरेपूर माहिती कादंबरी, पुस्तकं, वर्तमानपत्रातून मिळतेच. पण जोवर तुम्हाला त्याचे चित्रमय पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत वेशभूषा आकाराला येऊ  शकत नाही’, असं पिया बेनेगल यांनी सांगितलं.

‘कॉस्च्यूम डिझायनर्सना आपला शोध स्वत:च घ्यावा लागतो. आम्हाला अशा वेळेस कन्सल्टंट खूप मदत करतात. मीरा नायर यांच्या ‘कामसूत्र’ या चित्रपटात तीन मुघल काळ होते तेव्हा त्या तिन्ही काळातील महिला आणि पुरुष यांच्या वेशभूषेतील पुरावे तर हवेच होते. आम्हाला १६०० च्या काळातील खूप जुनी चित्रे मिळाली पण त्यापूर्वीचे १५०० च्या काळातील पुरावे मिळणं तर खूपच अवघड होतं. तेव्हा ‘भांडारकर इन्स्टिटय़ूट ऑफ ओरिएन्टल स्टडीज, पुणे’ येथील एका अभ्यासकाने मला मदत केली. त्याने संस्कृत भाषेतील काही लिखित स्वरूपातील पुस्तकं मला आणून दिली. ती मी इंग्रजीत अनुवादित केली आणि त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार व माझ्या आकलनाने आम्ही तीस वेगवेगळी डिझाइन्स तयार केली,’ असे लवलिन यांनी सांगितले. फॅ शन डिझाइनिंगपेक्षा कॉस्च्यूम डिझाइनिंगचं काम हे पूर्णत: वेगळं आणि जिकिरीचं असतं हेही त्या सांगतात. कॉस्च्यूम डिझाइनिंगमध्ये व्यक्तिरेखा, तो काळ, तेव्हाचे रंग, फॅब्रिक शोधून डिझाइनिंग करणं, त्यासाठी तसे कारागीर शोधणं इथपासून ते सेटवर या गोष्टी व्यवस्थित पोहोचवण्यापर्यंत अनेक गोष्टी सांभाळून कराव्या लागतात, असं त्या म्हणतात.

फॅशन आणि कॉस्च्यूम डिझाइनिंगमधील फरक..

फॅशन ही सतत बदलत असते. जे आज आहे ते उद्या नसतं. जी फॅशन चित्रपटात येते ती फॅशन म्हणून आपण आज नाही पाहू शकत. एखाद्या फॅशन डिझायनरने पूर्वीच्या काळातील टचनुसार आपली क्रिएटिव्हिटी त्याच्या कलेक्शनमध्ये आणली तर ती गोष्टच वेगळी आहे, कारण ती फॅशन म्हणून जरी ओळखली गेली तरी त्याचे महत्त्व आजचे नसून ते पूर्वीचेच आहे. हेच पुढच्या काळात नसणार, अशा शब्दांत पिया बेनेगल फॅक्शन आणि कॉस्च्यूम डिझाइनिंगमधील फरक समजावून सांगतात.आज तरुण मुलींना जुन्या कपडय़ांचे आणि दागिन्यांचे खूप अप्रूप आहे अर्थात पूर्वीच्या पद्धतीनुसार वरील कुठल्याही गोष्टी तशाच्या तशा वापरल्या जात नाहीत. आपण आपल्या पद्धतीने त्या खुलवतो आणि तसं परिधान करतो. जुन्या काळातील पारंपरिक पेहराव ते आत्ता जुनी पारंपरिक वस्त्रं परिधान करण्याच्या पद्धतीत फरक आहे. त्यामुळे फॅशन डिझायनर पद्धतीचा विचार करीत नाही तो कपडय़ाच्या रूपाचा विचार करतो तर कॉस्च्यूम डिझायनरला पूर्णत: पहिल्यांदा कपडय़ाची पद्धत काय होती, याचा विचार करावा लागतो आणि मग तो त्या पद्धतीने दिसावा, यासाठी प्रयत्न केले जातात.

सामान्यत: मुलींना जुन्या पारंपरिक दागिन्यांचे, साडय़ांचे आणि वस्त्रांचे वेड आले ते सिनेमा, नाटक आणि मालिकांमधून. पीरिअड फिल्म्समधून मांडलेल्या काही विशेष आणि महत्त्वपूर्ण ऐतिहासिक कथा सामान्यांना भावल्या होत्या त्यामुळे त्या पद्धतीचे कपडे पडद्यावर आणण्याचा प्रयत्न कॉस्च्यूम डिझायनर्सनी केला. चित्रपटांमधून त्याची ओळख प्रेक्षकांना झाली, किंबहुना ती फॅशन म्हणून सामान्य नागरिकांच्याही पसंतीस पडली. पण तेव्हा तशी फॅशन करण्यामागे तेव्हाची विचारसरणी, राहणीमान याची काही कारणं होती. आज त्याचं अनुकरण करताना जीवनशैली पूर्ण बदललेली आहे, याचं भान फॅशन डिझायनर्सना ठेवावं लागतं. पूर्वी आदिवासी स्त्रिया या अर्धनग्न असायच्या. आज त्या अंग झाकून असतात. त्यामुळे ती फॅशन नव्हती तर ती परिस्थिती होती जी आता बदलली आहे. तसंच आपलं अस्तित्व, राहणीमान आणि एकूणच परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे जुन्या काळातील नव्याने आलेली फॅशन ही आज ठरावीक काळापुरतीच मर्यादित राहते हे लक्षात घेऊनच फॅशन डिझायनर्स काम करतात. त्यांना दोन्ही काळातील फॅशन, परिस्थितीचे भान ठेवून डिझाइनिंग करावे लागते. तो त्या काळातील फॅशन आजच्या काळातील फॅशनसोबत मिक्स करून एक नवीन आऊटफिट तयार करतो आणि मग तो पूर्ण लुक ट्रेण्डमध्ये येतो, असे बेनेगल यांनी स्पष्ट केले. याउलट, कॉस्च्यूम डिझायनरला जे होतं, जे आहे आणि जे राहिलं आहे ते तसंच्या तसं परत आणावं लागतं आणि त्यातील वीस टक्के गोष्टी या ट्रेण्डमध्ये येतात. मात्र कॉस्च्यूम डिझाइनिंगचं क्षेत्रही फॅ शन डिझाइनिंगप्रमाणेच उत्कंठावर्धक असून इथे काम करण्यासाठी भरपूर वाव असल्याचेही त्यांनी सांगितले.