|| आसिफ बागवान

ऑनलाइन शॉपिंग हा ग्राहकांच्या पसंतीचा पर्याय बनला आहे. बाजारात मिळणारी वस्तू बाजारभावापेक्षा कमी दरात आणि तीही घरबसल्या मिळत असल्याने अनेकजण अगदी फर्निचर किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूही संकेतस्थळावरून खरेदी करण्यावर भर देतात. ग्राहकांना चोख सेवा पुरवणारी काही ई-कॉमर्स संकेतस्थळे आहेत. मात्र, अशी संकेतस्थळे आता ग्राहकांना गंडा घालण्याची ठिकाणे बनली आहेत.

इंटरनेटच्या प्रभावी वापराने भारतीय बाजारपेठेचा चेहरा बदलला. यात ई-कॉमर्स संकेतस्थळांचा वाटा फार मोठा आहे. ग्राहकाला बसल्याजागी जगभरातील कोणत्याही ब्रॅण्डचे कोणतेही उत्पादन खरेदी करण्याची आणि ते घरपोच करण्याची सुविधा पुरवणारी ही संकेतस्थळे ग्राहकांच्या क्रयशक्तीला चालना देत आहेत. भारतात या उद्योगाचा वाढलेला पसारा पाहायचा झाला तर, २०१७ मध्ये ई-कॉमर्स उद्योगाची उलाढाल ३९ अब्ज डॉलरच्या आसपास होती. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांत ती इतकी वाढली आहे की, २०२०मध्ये या क्षेत्रातील उत्पन्नाचा आकडा १२० अब्ज डॉलरच्या घरात जाण्याची शक्यता आहे. आणि हा बहर इतक्या सहजासहजी ओसरणारा नाही. कारण २०३४ पर्यंत भारत अमेरिकेला मागे टाकून जगातील दुसऱ्या क्रमांकाची ई-कॉमर्स बाजारपेठ ठरेल, असा अंदाज आहे.

ई-कॉमर्स उद्योगाची ही भरारी चोखंदळ भारतीय ग्राहकांच्या ऑनलाइन खरेदीवरील विश्वासाचे प्रतीक आहे. दहा एक वर्षांपूर्वी एखाद्या ग्राहकाला ऑनलाइन खरेदीबाबत विचारणा केली असती तर, त्याने खळखळ केली असती. ‘ऑनलाइन वस्तूचा काय भरवसा?’, ‘इतक्या स्वस्तात देत आहेत म्हणजे काहीतरी घोटाळा आहे’, ‘आपल्याला नाही पटत असं खरेदी करणं’, अशी वेगवेगळी कारणं या ग्राहकाने दिली असती. परंतु, आज ऑनलाइन खरेदीला भारतीय ग्राहकांची पहिली पसंती मिळते आहे. पैशांत त्याचे प्रमाण मोजायचे झाले तर २०१७मध्ये ऑनलाइन खरेदीचे दरडोई प्रमाण २२७ डॉलर इतके होते. त्यात गेल्या दोन वर्षांत आणखी वाढ झाली आहे. स्वस्त दरांत मिळणाऱ्या वस्तू, बाजारात उपलब्ध नसलेल्या नामांकित कंपन्यांची उत्पादने, घरपोच सुविधा आणि ऑनलाइन पेमेंटच्या सुविधा या कारणांमुळे भारतीय ग्राहक ऑनलाइन खरेदीकडे वळू लागला आहे. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या संकेतस्थळांवर तर खरेदीसाठी उडय़ा पडत असतातच, पण ‘ऑनलाइन’बद्दलचा भारतीयांचा विश्वास इतका गाढ झाला आहे की, एरवी चर्चेत नसलेल्या किंवा फारशी माहिती नसलेल्या संकेतस्थळांवरूनही ग्राहक बेधडक खरेदी करतात.. इथेच मोठा घोटाळा होऊ लागला आहे.

भारतीय ग्राहकांची ऑनलाइन खरेदीची हौस इतकी वाढली आहे की, एखादी वस्तू स्वस्त दिसली की संकेतस्थळ कोणतेही असो, ग्राहक लगेच पैसे मोजायला तयारच असतो. यातूनच अनेक ग्राहक गंडवले जात आहेत. काही दिवसांपूर्वीच एका तरुणाने नामांकित कंपनीचा नवा स्मार्टफोन स्वस्तात मिळत असल्याचे पाहून तो ऑर्डर केला आणि प्रत्यक्षात त्याला मिळाले काय तर, एक बेल्ट आणि साबणाची वडी! स्मार्टफोन स्वस्तात मिळतोय म्हणून त्याने ऑनलाइन पैसेही जमा केले. पण हाती आलेल्या वस्तू पाहून जेव्हा त्याने ते पैसे परत मिळवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्या पदरी निराशाच आली. अशा स्वरूपाच्या बातम्या अनेकदा आपल्या वाचनात येतात. पण तरीही खरेदी करण्यापूर्वी याबाबतची खातरजमा करण्याची तसदी फारच कमी ग्राहक घेतात.

केवळ नवखी वाटणारी किंवा फारशी प्रचलित ई कॉमर्स संकेतस्थळेच अशाप्रकारच्या फसवणुकीची ठिकाणे नाहीत. फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन यासारख्या प्रसिद्ध संकेतस्थळांवरून खरेदी केलेल्या ग्राहकांनाही बऱ्याचदा फसवणुकीला तोंड द्यावे लागते. संकेतस्थळावर दाखवलेली वस्तू आणि प्रत्यक्ष पाठवलेली वस्तू यांत तफावत असणे, त्यात दोष असणे, जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे तिचा दर्जा नसणे या गोष्टी तर आहेतच. पण ग्राहकाने पैसे पाठवूनही त्याला वस्तू न पाठवणे किंवा बनावट वस्तू पाठवणे यासारख्य़ा घटनाही मोठमोठय़ा संकेतस्थळांवर घडतात. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या कंपन्या सातत्याने आपल्या विक्रेता धोरणांत सुधारणा करून ग्राहकांची अशा प्रकारची फसवणूक टाळण्याचा प्रयत्न करतात. परंतु, प्रत्येक वेळी भामटे यातून पळवाट शोधून ग्राहकांना गंडा घालण्याचा मार्ग शोधतातच.

याहीपेक्षा गंभीर फसवणुकीचा प्रकार अलिकडेच एका घटनेतून उजेडात आला. वडाळ्यातील एका महिलेने एका अप्रचलित संकेतस्थळावरून दीड हजार रुपयांची साडी मागवली. मात्र, ती साडी खराब निघाली. महिलेने संकेतस्थळाच्या ई-मेलवरून संपर्क साधून परताव्याची मागणी केली. परंतु, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे गूगलवरून तिने संकेतस्थळाशी संबंधित दूरध्वनी क्रमांक शोधण्याचा प्रयत्न केला. अशात तिला सापडलेल्या एका ग्राहक सेवा केंद्राशी तिने संपर्क साधला. त्या केंद्रातील व्यक्तीने तिला गुगल पेचे अ‍ॅप डाऊनलोड करण्याची सूचना केली. त्यासाठी आपण पाठवलेल्या लिंकवर क्लिक करण्याची सूचनाही केली. संबंधित महिलेने आलेल्या एसएमएसमधील लिंकवर क्लिक करताच काही क्षणांत तिच्या ई-वॉलेट आणि बँक खात्यावरून एक लाख रुपये लंपास झाले!

हा घोटाळा पोलिसांनाही चक्रावणारा आहे. गेल्या काही वर्षांत ई-वॉलेटचा वापर वाढला आहे. पेटीएम, गूगल पे, मोबिक्विक यांसारख्या अ‍ॅपवरून खरेदी-विक्री किंवा डिजिटल पेमेंट करण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा ग्राहक या अ‍ॅपना आपल्या बँकखात्याशी जोडतात आणि त्याद्वारे थेट आर्थिक व्यवहार करतात. सायबर भामटय़ांनी नेमकी हीच बाब ओळखून फसवणुकीची नवी शक्कल लढवली आहे. यामध्ये ग्राहकाला फोन करून किंवा त्याने स्वत:हून संपर्क केल्यानंतर त्याला एखाद्या अ‍ॅपची ‘रिक्वेस्ट’ पाठवून ती मान्य करण्याची सूचना केली जाते. त्याद्वारे ग्राहकाचा क्यूआर कोड किंवा रेफरन्स क्रमांक मिळवला जातो. त्यानंतर ग्राहकाला एक लिंक पाठवून त्यावर क्लिक करण्याची सूचना केली जाते. ग्राहकाने सूचनेबरहुकूम लिंक क्लिक करताच त्याच्या बँक किंवा ई-वॉलेट खात्यावरील पैसे लंपास केले जातात.

गेल्या काही महिन्यांत असे अनेक प्रकार समोर आले आहेत. विशेषत: ऑनलाइन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांत या घटना प्रामुख्याने घडल्या आहेत. ग्राहकांचा ऑनलाइन यंत्रणेवरील अतिविश्वासच याला कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पोलीस किंवा सुरक्षा यंत्रणा आणि ई-कॉमर्स सेवा पुरवणाऱ्या कंपन्या अशा प्रकारच्या ठकांना रोखण्यासाठी उपाययोजना करतच असतात. परंतु, अशी फसवणूक रोखण्याची मुख्य जबाबदारी तुम्हा-आम्हा ग्राहकांवरच आहे. ‘ओएलएक्स’ किंवा ‘क्वीकर’ यासारख्या ‘सेकण्डहॅण्ड’ वस्तूंच्या खरेदीविक्रीच्या संकेतस्थळांवरही अशी फसवणूक सर्रास होते. तेथे तर एक वेगळाच पॅटर्न दिसू लागला आहे.

लष्करी पोषाखातील व्यक्तीचा प्रोफाइल फोटो असलेला एखादी व्यक्ती आपल्याला अमुक वस्तू विकायची आहे, अशी जाहिरात करतो. लष्करातला किंवा सैन्य दलात काम करणाऱ्या व्यक्तीचा फोटो पाहून ग्राहकाचा त्यावर पटकन विश्वास बसतो. मग ती व्यक्ती आपल्या वस्तूशी संबंधित बनावट कागदपत्रे किंवा छायाचित्रे ग्राहकाला पाठवतो आणि ऑनलाइन पेमेंट करण्याच्या सूचना करतो. ग्राहकही लगेचच पैसे पाठवतात. समोरच्या व्यक्तीकडून वस्तू कुरिअर केल्याची पावती पाठवली जाते. पण नंतर लक्षात येते की ही पावती बनावट आहे. ग्राहकाची फसवणूक झालेली असते. बरं हा प्रकार केवळ खरेदीदारांच्याच फसवणुकीचा नाही तर, अशाच प्रकारे विक्रेत्यांचीही फसवणूक केली जाते.

ऑनलाइन फसवणुकीचे नाना प्रकार सध्या घडत आहेत. प्रत्येक वेळी सर्वसामान्य ग्राहक त्यात फसवला जात असतो. परंतु, या फसवणुकीला तो स्वत:च जबाबदार असतो. संकेतस्थळांवरून खरेदी करताना त्याची नीट तपासणी न करणे, विक्रेता डिलरची माहिती न घेताच त्याच्याशी व्यवहार करणे, ऑनलाइन पैसे पाठवण्याची घाई आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्ताईचा सोस या गोष्टींमुळे ग्राहक सहज भामटय़ांच्या जाळ्यात सापडतात. एकीकडे ई-कॉमर्सचे देशातील प्रमाण वाढत असताना अशी ऑनलाइन ‘गंडा’स्थळेही फोफावत चालली आहेत, ती याच कारणांमुळे.

viva@expressindia.com