मी इंजिनीयरिंगच्या थर्ड इयरला आहे. माझी हाइट पाच फूट आठ इंच आहे आणि वजन पन्नास किलो. मी खूप सडपातळ आहे, माझे गालपण आतमध्ये गेलेत. माझ्या पॅरेंट्ना पण वाटतं मी जाड व्हावं. मी जिम जॉइन करायच्या विचारात आहे. माझ्या मैत्रिणी म्हणतात की जिम लावल्यावर कूल लुक जातो, चेहरा रागीट होतो, सो तू नको जॉइन करूस. मला कूल, फिट आणि स्लिम राहायचंय. मी ‘प्यूअर व्हेजिटेरियन’ आहे. म्हणून शाहीद कपूरचा आदर्श ठेवलाय. अ‍ॅज अ बिगिनर, मी जिम जॉइन करताना काय केलं पाहिजे? आहारात कोणत्या गोष्टी अ‍ॅड केल्या पाहिजेत? सप्लीमेंट्सची गरज आहे का? नॉर्मल जिम आणि कार्डिओमध्ये काय फरक आहे? जिम सोडल्यावर पोट सुटतं असं ऐकलंय, ते खरं आहे का? तसं असेल तर मी कोणती काळजी घ्यावी?
– आकाश
हॅलो आकाश, खूप विचारी दिसतोस तू. कुठलीही गोष्ट करण्याआधी व्यवस्थित प्लॅन करणारे असतात, तसं दिसतंय तुझं. आततायीपणे, घाईघाईत काही करण्यापेक्षा नक्कीच चांगली सवय आहे ही. सडपातळपणा प्रमाणाबाहेर आहे का हे पहाण्यासाठी फक्त वजन बघण्यापेक्षा उंची-वजनाचा BMI  नावाचा रेशो वापरला जातो. तुझा BMI 16.5kg/m2  येतोय जो अ‍ॅक्सेप्टेबल पातळीच्या खाली आहे, म्हणजे तुला वजन वाढवण्याची जी गरज वाटतेय ती जेन्युइन आहे.
लेट अस गो स्टेप बाय स्टेप. आधी वजन कमी का आहे हे पाहायला हवं. अनुवंशिकता, काही आजार, स्ट्रेस आणि अपुरा आहार ही याची काही कारणं असतात. तू यातल्या कुठल्या कॅटेगरीत बसतोस?
वजन वाढवण्यासाठी तुला आहार आणि व्यायाम हा दोन आघाडय़ांवर प्रयत्न करायचेत हे तू सांगितलंच आहेस. आहाराचा विचार करताना कॅलरीज आणि प्रोटिन्स या दोन घटकांचा प्रामुख्यानं विचार करायला हवा. तुला साधारण कमीत कमी अडीच हजार कॅलरीजची बेसिक आवश्यकता आहे. तुझ्या वर्कआऊटच्या  इन्टेन्सिटीप्रमाणे यात बदल होईल. या कॅलरीज एम्प्टी-कॅलरीजच्या फॉर्ममध्ये नकोत. (म्हणजे ज्यात फक्त कॅलरीज आहेत, बाकी कोणतंही न्यूट्रीशन नाही, उदा. केक्स, चॉकलेट्स इ.) यानं फक्त बॉडी फॅट वाढतं, बॉडी मास नाही. शाकाहारी आहारात प्रोटिन्स प्रामुख्यानं दूध, मिल्क प्रॉडक्ट्स आणि डाळी, कडधान्यं यामधून मिळतात. प्रॉपर, भरपूर नाश्ता इज अ मस्ट. लंच, डिनर आणि संध्याकाळी काही हेल्दी स्नॅक्स न मिस करता घ्यायला हवं.
वर्कआउट करताना तीन प्रकारांवर लक्ष केंद्रित करायला लागतं- एक म्हणजे एरोबिक व्यायाम, ज्यामुळे हार्ट व फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते आणि कॅलरीज व फॅट बर्न होतात. तू विचारलं आहेस तो कार्डीओ व्यायाम म्हणजे हाच. फास्ट चालणे, पोहणे, डान्स आणि जिममधले ट्रेडमिल, सायकलिंग हे या प्रकारात मोडतात. दुसरा प्रकार म्हणजे मसल स्ट्रेंग्थ वाढवण्यासाठी केलेला व्यायाम. यात पुश अप्स, बार्स, मशिन्स आणि वेट लिफ्टिंग असतात. आणि तिसरा आणि शेवटचा म्हणजे ट्रेकिंग, दोरीच्या उडय़ा, कराटे, रनिंग इ.मुळे होणारे बोन स्ट्रेग्थ वाढवणारे व्यायाम. गंमत म्हणजे, फुटबॉल, बास्केटबॉल, टेनिस या मैदानी खेळामुळे या तीनही प्रकारचा व्यायाम  होतो.
एखाद्याला जर तात्पुरतं पीळदार शरीर हवं असेल, (एखाद्या भूमिकेसाठी, गर्लफ्रेंडवर इंप टाकण्यासाठी वगैरे) तर जिममधे केलेलं इंटेन्स वर्कआऊट, प्रोटीन सप्लीमेंट्स, स्ट्रिक्ट डाएट यांचा उपयोग! पण मला नाही वाटत आयुष्यभर कोणी प्रोटीन पावडर वगैरे गोष्टी फॉलो करू शकेल. लाँग टर्म फायदा हवा असेल तर आहारात, व्यायामात मॉडरेशन हवं. या गोष्टी तात्पुरती फॅड्स न राहाता टिकल्या पाहिजेत. त्यामुळे कूल, फिट आणि स्लिम राहाण्याचा तुझा अ‍ॅप्रोच मला योग्य वाटतो. योग्य आहार आणि व्यायाम हा आयुष्याचा भाग बनायला हवा.
जिम सोडल्यावर काय होईल याची तुझी भीती रास्त आहे. अचानक खूप व्यायाम आणि मग एकदम सगळं बंद, मग पुन्हा व्यायामाची सणक अशामुळे वजन रीबाउंड होणं, पोट सुटणं हे होऊ शकतं. कुठला ना कुठला व्यायाम नेहमी करत राहाणं हेच याला उत्तर आहे. आठवडय़ातले तीन दिवस मॉडरेट, अंडर-सुपरव्हिजन जिममधे व्यायाम आणि तीन दिवस एखादा तास तुला आवडणारा मैदानी खेळ किंवा ट्रेकिंग असा पर्याय मला तुला सुचवावासा वाटतो.
Take a step at a time toward your goal
The journey of a thousand miles begins with one step -Lao-Tse

विचारा तर खरं..
तरुणपणात निसर्गनियमाप्रमाणे प्रेमात पडायला होतंच. अर्थात ओघानं प्रेमभंगही आलाच. नवीन नाती, नवीन अभ्यासक्रम, नवीन जॉब आणि त्यांमधल्या गुंतागुंती. शरीराविषयी शंका, निर्णयांविषयी शंका असं खूप काही मनात सुरू असतं. खरं तर शंका खूप जेन्युईन असते पण ऐकणारा काय म्हणेल, हसेल की काय असं वाटतं. कुणाला विचारावं हेही कळत नाही. तुम्हाला वाटतंय असं काही? मग हा कॉलम आहे खास तुमच्यासाठी, तुम्हाला पडत असलेल्या प्रश्नांना वाट देण्यासाठी. इथे तुम्हाला वाटणाऱ्या शंकेला कुणी नाकं मुरडणार नाहीये की फालतू म्हणून त्या निकालात काढणार नाहीये. बिनधास्तपणे त्या शेअर करा. viva@expressindia.com या आयडीवर. सब्जेक्टलाईनमध्ये ओपन अप असं लिहायला विसरू नका.