मला इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन मिळाली आहे. तिथे मला हॉस्टेलवर राहायला लागणार आहे. मला हवी ती ब्रँच मिळाली आहे आणि माझ्या मोठय़ा भावाकडून हॉस्टेलच्या गमतीजमती ऐकल्यात. त्यामुळे मी फार एक्सायटेड आहे, पण फॉर्म भरत असताना एक अँटी-रॅगिंगच्या फॉर्मवर सही करायला लागली, ते वाचून मला खूप भीती वाटली. या कॉलेजेसमधलं रॅगिंग खूप भयानक असतं म्हणे. ‘थ्री इडियट्स’मधले ते प्रसंग पाहून मी खूप हसलो होतो, पण आता सारखा त्या मुलांच्या जागी मी दिसतो. मग मला घामच फुटतो. असलं काही तरी घाणेरडं मला करायला लागणार का? काही काही मुलं तर पळून येतात घरी. त्यातून कुणाला काही सांगताही येत नाही. मला माझं करिअर चांगलं करायचंय. रॅगिंगमुळे नुकसान नाही करून घ्यायचंय. मी काय करू?-     – राहुल
हाय राहुल!
एकदाची इंजिनीअरिंगची अ‍ॅडमिशन झाल्यावर हुश्श झालं असेल तुला. इतक्या दिवसांचे कष्ट सार्थकी लागले, पण याच घटनेमुळे काही सीनिअर मुलं वेगळ्या कारणानं खूश झाली असतील, आता जरा मज्जा करून घेऊ म्हणून. नवीन अ‍ॅडमिशन्स झाल्या, की रॅगिंगची चर्चा सुरू होते. सासू-सुनेच्या नात्यासारखं आहे हे. सासूनं छळ केला होता म्हणून सुनेनंही तिच्या नवीन सुनेचा छळ करावा तसं ज्युनिअर मुलं सीनिअर झाली, की नवीन मुलांना रॅग करायला लागतात. अनेक मुलांची समजूत असते की, रॅगिंग आवश्यकच आहे, त्यानं पर्सनॅलिटी डेव्हलप होते, सीनिअर्सची ओळख होते वगैरे. या कुठल्याही मिषानं रॅगिंग करणं चुकीचंच आहे, कारण रॅगिंगचे भयानक साइड इफेक्ट्स आहेत- डिप्रेशन, मानसिक आजार, फोबिया आणि आत्महत्या इ.सारखे. शिवाय पर्सनॅलिटी डेव्हलप करण्याचे आणि सीनिअर्सची ओळख करून घेण्याचे इतर अनेक अधिक सुरक्षित मार्ग आहेत. मुलं आणि पालक, दोघांच्या केंद्रस्थानी करिअर असते. त्यामुळे काही वेळा या छळवादाकडे दुर्लक्ष करणं पसंत केलं जातं, पण याचे फार गंभीर परिणाम भोगायला लागतात.
तू असंही लिहिलं आहेस की, हे कुणाला सांगता येत नाही. हा गैरसमज डोक्यातून काढून टाक आधी. कुणाला सांगितलं नाही तर त्यावर उपाय कसा करणार? आपल्या मानसिक स्वास्थ्याची, करिअरची आणि प्रसंगी जिवाचीसुद्धा किंमत देण्याची वेळ का येऊ द्यायची स्वत:वर?
यूजीसी आणि भारत सरकारनं मिळून ‘अ‍ॅन्टिरॅगिंग डॉट इन’ (antiragging.in) नावाची वेबसाइट चालू केलीय. त्याचा मोफत हेल्पलाइन नंबर आहे- १८००-१८०-५५२२. शिवाय helpline@antiragging.in  या मेल आय-डीवर तक्रारीची मेल टाकली, तर चोवीस तासांच्या आत दखल घेतली जाते; पण तरीही अजून यापर्यंत पोहोचणाऱ्या मुलांचं प्रमाण नगण्य आहे. तुम्हाला फार भीती वाटत असेल, तर तुम्ही निनावी तक्रारही करू शकता; पण नाव लिहिलं तर अ‍ॅक्शन घेणं जास्त सोपं जातं. रॅगिंग करणं हा कायद्यानं गुन्हा आहे आता. दोषी ठरलेल्यांना टर्म कॅन्सल होण्यापासून ते रस्टिकेट करण्यापर्यंत शिक्षा मिळू शकते. अधिक गंभीर गुन्ह्य़ाला जास्त शिक्षा होते. एकंदरीत रॅगिंगमुळे, ते करणारा आणि त्याचा बळी ठरलेला, दोघेही आयुष्यातून उठू शकतात.
तू काय करू शकशील? रॅगिंगच्या कल्पनेनं विनाकारण घाबरून जाता कामा नये, पण त्याविषयी पूर्ण अवेअर आणि सावध असणं महत्त्वाचं आहे. तुझ्या ओळखीच्या सीनिअर मुलांशी आधीच संपर्क करून ठेव म्हणजे त्यांची तुला मदत होईल. खूप मुलं त्या सायकॉलॉजिकल टॉर्चरनं खचतात. त्यासाठी स्वत:ला कणखर करायला हवं. कॉलेजमधल्या अ‍ॅन्टिरॅगिंग सेलशी किंवा वर दिलेल्या हेल्पलाइनशी संपर्क करणे ही पुढची स्टेप. आईवडिलांना काय वाटेल म्हणून त्यांच्यापासून लपवून ठेवू नकोस. शक्यतो ग्रुपमधे राहा. कुणा सीनिअरनं काही विचारलं तर प्लेझन्टली त्याचं सरळ उत्तर दे. इतर कुणाचं रॅगिंग होत असेल तर त्याला मदत कर. अशा परिस्थितीत तू सापडलास तर सेक्शुअल अ‍ॅक्ट्स किंवा अघोरी गोष्टी करायला ठामपणे नकार दे. त्याऐवजी दुसरा काही तरी हार्मलेस ऑप्शन देऊन बघ. हेल्पलाइन, पोलीस स्टेशन यांचे फोन नंबर्स जवळ ठेव.
आणि निदान तू रॅगिंग करणार नाहीस असं ठरव. सीनिअर मुलं काही आकाशातून पडलेली नसतात. तीही कधी तरी ज्युनिअर होती. तुम्ही मुलं जेव्हा सीनिअर व्हाल तेव्हा कसं वागायचं नाही हे या घटनांमधून शिकू शकलात तरच ही साखळी कुठे तरी तुटेल.
I learned that courage is not the absence of fear, but the triumph over it. The brave man is not he who does not feel afraid, but he who conquers that fear.     
    – Nelson Mandela.

ओपन अप
तरुणपणात निसर्गनियमाप्रमाणे प्रेमात पडायला होतंच. अर्थात ओघानं प्रेमभंगही आलाच. नवीन नाती, नवीन अभ्यासक्रम, नवीन जॉब आणि त्यांमधल्या गुंतागुंती. शरीराविषयी शंका, निर्णयांविषयी शंका असं खूप काही मनात सुरू असतं. खरं तर शंका खूप जेन्युईन असते पण ऐकणारा काय म्हणेल, हसेल की काय असं वाटतं. कुणाला विचारावं हेही कळत नाही. तुम्हाला वाटतंय असं काही? मग हा कॉलम आहे खास तुमच्यासाठी, तुम्हाला पडत असलेल्या प्रश्नांना वाट देण्यासाठी. इथे तुम्हाला वाटणाऱ्या शंकेला कुणी नाकं मुरडणार नाहीये की फालतू म्हणून त्या निकालात काढणार नाहीये. बिनधास्तपणे त्या शेअर करा. viva@expressindia.com या आयडीवर. सब्जेक्टलाईनमध्ये ओपन अप असं लिहायला विसरू नका.