मी सध्या सेकंड इअरला आहे. मी जाड आहे. वजन जवळपास ७५ किलो आहे. मला कधीकधी जाणवतं की, इतर लोक माझ्याकडे विचित्र नजरेनं पाहतात. माझ्याकडे पाहून कॉमेंट्स करतात. कोणत्याही फॅमिली फंक्शनला गेले की, नातेवाईक वजन कमी करण्याचा सल्ला देण्याच्या नावाखाली टोमणे मारतात. मला तेव्हा खूप वाईट वाटतं. काही दिवसांपूर्वी कहरच झाला. मी रस्त्यानं जात असताना एका कम्प्लीट स्ट्रेंजर बाईनं मला अडवलं आणि बारीक होण्यासाठी लिंबूपाणी वगैरे घे, असं सांगितलं. तेव्हा रडूच आलं मला. आता मी कुठे बाहेर जायचंच टाळते. माझा कॉन्फिडन्स कमी होतोय असं मला वाटतं. तसं मी जंक फूड टाळते आणि कोल्ड्रिंक्सना तर हातसुद्धा लावत नाही. माझा आहारही साधा असतो. पण हो.. कॉलेज, क्लास सबमिशन्स, अभ्यास हे सगळं सांभाळून मला वीकमध्ये जेमतेम तीन-चार दिवसच व्यायाम करता येतो आणि तेसुद्धा फक्त एक तास. मी काय करू? माझ्या वजनावरून मला कोणी बोलतं तेव्हा त्या सिच्युएशनशी कशी डील करू? It sucks to be a fat person but it sucks even more to be a fat girl !
 – ईशानी

हॅलो ईशानी,
‘व्हिवा’साठी लिहायला लागल्यावर माझ्या लक्षात आलं की, तुम्ही यंग मुलं आपल्याला काय वाटतंय आणि काय हवंय हे खूप छान शब्दात नेमकेपणानं मांडता.
तुझं वजन जास्त आहे याची तुला जाणीव आहे, तू त्यासाठी काही प्रयत्नही करतेयस. पण सगळ्यात जास्त त्रास तुला लोकांच्या बोलण्याचा होतोय. राग येतो, गिल्टी वाटतं. फ्रस्ट्रेशन येतं. लोकांना फुकटचे सल्ले द्यायची हौस असते. आपण त्या व्यक्तीला खूप मदत करतो आहोत असा त्यांचा समज असतो. पण या प्रोसेसमध्ये आपण त्यांना दुखावतोय याची मात्र जाणीवच त्यांना नसते. शिवाय त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून, आवाजाच्या टोनवरून आपल्या लक्षात येतं त्यांची काळजी जेन्युईन आहे की वरवरची आहे ते. अशा वरवरच्या खोटय़ा कळकळीचा काही उपयोग होण्याऐवजी रागच येतो. कारण त्यातून दुसऱ्याची उणीदुणी काढण्याचा त्यांचा स्वभाव दिसतो. लोकांना वाटतं की, वजन जास्त आहे म्हणजे मुलगी खादाड असणार, एवढा कसा कंट्रोल नाही स्वत:वर? एखाद्याचं वजन वाढलं ही त्या व्यक्तीची चूकच आहे, असा त्यांचा गैरसमज असतो. प्रत्यक्षात वजन वाढण्याची किती तरी कारणं आपल्या आवाक्याबाहेरची असतात.
आणि नेहमीच कोणी तरी नावं ठेवतंय असं होत राहिलं तर हळूहळू ते खरं वाटायला लागतं. तुझं वजन कमी करायचं हा एक इश्यू झाला, पण त्यातून उद्भवणाऱ्या या टोमण्यांना तोंड कसं द्यायचं हा तुझा मेन प्रॉब्लेम आहे. वजन जास्त असल्यानं काही वैद्यकीय दुष्परिणाम असताततच, त्यात तुला या मानसिक टॉर्चरचा अ‍ॅडिशनल भार नकोय.
तुझं वजन जास्त असणं हा तुझ्या पर्सनॅलिटीचा एक भाग आहे, त्यामुळे तू व्यक्ती म्हणून बिलकुल दुय्यम ठरत नाहीस. या अनाहूत सल्ल्यांकडे पॉझिटिव्ह दृष्टीनं पाहून चॅलेंज घे, त्यांचा इन्स्पिरेशन म्हणून उपयोग कर. तुला कंफर्टेबल वाटतील, सूट होतील असे कपडे घाल. तुझ्या वजन जास्त असलेल्या मैत्रिणी याला कसं तोंड देतात हे त्यांच्याशी डिस्कस करू शकतेस. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या साऱ्या बोलण्यामुळे वजन कमी करण्याचे कोणतेही ड्रास्टिक, अघोरी उपाय करायला जाऊ नकोस. पूर्वीच्या अनुभवांवरून आधीच सोशल सिच्युएशनचा बागुलबुवा बाळगू नकोस. बाहेर जाण्याचं टाळणं हा काही यावरचा उपाय होऊ शकत नाही. उलट अशानं तुला गोष्टींना फेस करण्याऐवजी त्या टाळायची सवय लागेल आणि हळूहळू इतर सिच्युएशन्समध्येही तू तसंच वागायला लागशील. ‘अशी मी असताना मला लाईफ पार्टनर कसा मिळणार’ ही धास्तीही वाटत असणार तुला कधीकधी. पण वजन जास्त असणाऱ्या लोकांचं एकूण सगळीकडेच प्रमाण वाढतंय. म्हणजे हा इश्यू अनेकांना फेस करावा लागतोय. शिवाय केवळ तुझ्या बाह्य़रूपाकडे पाहून कुणी तुझ्याशी लग्न करणार असेल तर ते नकोच आहे. मिशेल ओबामांचे हे विचार अगदी चपखल वाटतात तुझ्यासाठी –
Being a healthy woman isn’t about getting on a scale or measuring your waistline. We need to start focusing on what matters – on how we feel and how we feel about ourselves – Michelle Obama

विचारा तर खरं..
तरुणपणात निसर्गनियमाप्रमाणे प्रेमात पडायला होतंच. अर्थात ओघानं प्रेमभंगही आलाच. नवीन नाती, नवीन अभ्यासक्रम, नवीन जॉब आणि त्यांमधल्या गुंतागुंती. शरीराविषयी शंका, निर्णयांविषयी शंका असं खूप काही मनात सुरू असतं. खरं तर शंका खूप जेन्युईन असते पण ऐकणारा काय म्हणेल, हसेल की काय असं वाटतं. कुणाला विचारावं हेही कळत नाही. तुम्हाला वाटतंय असं काही? मग हा कॉलम आहे खास तुमच्यासाठी, तुम्हाला पडत असलेल्या प्रश्नांना वाट देण्यासाठी. इथे तुम्हाला वाटणाऱ्या शंकेला कुणी नाकं मुरडणार नाहीये की फालतू म्हणून त्या निकालात काढणार नाहीये. बिनधास्तपणे त्या शेअर करा. viva@expressindia.com
या आयडीवर. सब्जेक्टलाईनमध्ये ओपन अप असं लिहायला विसरू नका.