News Flash

वस्त्रान्वेषी : अस्सा शेला सुरेख बाई!

पैठणी शेल्याचे कदरदान मुस्लीम रसिकही होते, मुस्लीम मोहतरमांना विशेष प्रसंगांसाठी पाचवार लांबीचे व ४८’’ रुंदीचे दुपट्टे पैठणमध्ये खास बनवले जात.

पैठणी शेल्याचे कदरदान मुस्लीम रसिकही होते, मुस्लीम मोहतरमांना विशेष प्रसंगांसाठी पाचवार लांबीचे व ४८’’ रुंदीचे दुपट्टे पैठणमध्ये खास बनवले जात.

विनय नारकर viva@expressindia.com

तुळशी ग माई, हिरवा तुझा पाला

शेल्याला रंग दिला, भाईरायांनी

मागच्या लेखामध्ये शेला आणि शालजोडीबद्दल आपण जाणून घेतलं. शेल्याचे आणखी काही प्रकार व आधुनिक काळात शेल्याचा विकास कसा झाला हे या लेखात जाणून घेऊ. पैठणी शेल्याचे कदरदान मुस्लीम रसिकही होते, मुस्लीम मोहतरमांना विशेष प्रसंगांसाठी पाचवार लांबीचे व ४८’’ रुंदीचे दुपट्टे पैठणमध्ये खास बनवले जात. त्यांच्या नेहमीच्या वापरासाठी दोन वार लांबीचे व ३०’’ रुंदीचे छोटे दुपट्टे बनवले जात. जनसामान्यांतील मुस्लीम स्त्रिया एक साधी पांढरी चादर अंगभर घेत, त्यास ‘शेलकट’ म्हणत असत. तशाच प्रकारे काही हिंदू स्त्रियाही अंगभर शेला ओढून घेत असत, त्यास ‘बुंथी’ म्हटले जात असे. एके ठिकाणी, ‘कनकांबराची घेऊन बुंथी। बैसली सती कौसल्या।’ असा उल्लेख आहे. नामदेवांच्या एका रचनेतही हा शब्द आला आहे,

रात्र काळी, घागर काळी,

जमुनाजळें ही काळीं वो माय॥

बुंथ काळी , बिलवर काळी,

गळां मोती एकावळी काळि वो माय॥

या शेल्यांना दुपेटा, दुपट्टा, दुशाला, चौशाला अशी नावेही होती. थोडय़ाफार फरकाने हे प्रकार होत असत. हे विणल्या जाणाऱ्या पेठा व त्यानुसार यांचा आकार वेगवेगळा असायचा. महाराष्ट्रातील अभिजनांची खास पसंती मात्र पैठण किंवा येवल्याचे जरीकाठ आणि पदराचे शेलेच होत. या शिवाय इतर पेठांतूनही शेले बनत. यानुसार आणि विणकामानुसार याचेही काही प्रकार होत. सगळ्यांनाच पैठणीचा शेला परवडणे शक्य नसायचे. इतर पेठांमधील शेल्यांचीही स्वत:ची खासियत असायची. खसखशी, म्हणजे अगदी बारीक चौकडा असे काठ असणारा शेलाही लोकप्रिय होता. अष्टगोली शेलाही स्वत:चा आब राखून होता. याच्याही काठापदरावर वेलबुट्टी काढलेली असायची. हा शेला चौपदरी असायचा. ‘कोणासी पागोटें परकाळा। कोणी मागती अष्टगोली शेला।’, असा उल्लेख सापडतो.

जरीचा मोठा पदर असलेल्या शेल्याला ‘लफ्फेदार शेला’ असे म्हटले जात असे. डाळिंबाच्या दाण्यासारखे बुट्टे असणारा ‘अनारदाणी शेला’. ‘ताडपत्री शेला’ या नावाचाही शेला असायचा. हा रेशमी असून, यामध्ये प्रामुख्याने लाल किंवा इतर रंगांचा, पांढऱ्या रंगांसोबत चौकडा केलेला असतो. याची लांबी कमी पण रुंदी जास्त असायची. हा शेलासुद्धा पैठणीप्रमाणे स्त्री व पुरुष दोघेही वापरत. याशिवाय शहागडी शेलाही प्रचलित होता. बऱ्याच आधीच्या काळी, चार पट्टय़ा जोडून शेला तयार केला जात असे, असाही उल्लेख सापडतो. महाराष्ट्रात विणल्या जाणाऱ्या शेल्यांशिवाय, बनारसमध्ये विणले जाणारे शेलेही महाराष्ट्रात बरेच प्रचलित होते.

लांबीला कमी असणाऱ्या, म्हणजेच आखूड शेल्यांना ‘साखरशेले’ म्हटले जात असे. ‘आजि तुम्ही बसा। साखर शेले नेसा।’ अशी एका गाण्यात ओळ आहे. शेल्यांना ‘वैरण’ असेही म्हटले जात असे. ‘उत्तम वैरणें विराजत’, व ‘वैरण्यगांठी वधुवरा’ अशा ओळी ‘सीतास्वयंवर’मध्ये आल्या आहेत. शेला घेण्यासाठी स्त्रियांचा खास हट्ट असायचा. शेल्याबाबत स्त्रीवर्गाचं मन किती हळवं होतं ते एका ओवीतून जाणवतं..

भरतार नव्हे माझा सये पूरवीचा राजा

मावलीवाणी छंद पुरवीला माझा

भरतार नव्हं माझा मखमली शेला

त्येच्या सावलीमंदी माजा फुलला पानमळा

या ओवीमध्ये ओवीकर्तीने आपल्या नवऱ्याला ‘मखमली शेल्या’ची उपमा दिली आहे! आणखी काही ओव्यांमध्ये, ‘करगती’ शेल्याचा उल्लेख आला आहे,  पण याच्याबद्दल काही माहिती मिळाली नाही.

‘तीन वनं वोलांडिलं घेतला करगती शेला’ किंवा ‘तिकडनं आली धाकली बहीण, घेतला करगती शेला’, असा उल्लेख सापडतो. खंबायतची रेशमी वस्त्रे प्रसिद्ध होती. याबद्दल काही लोकसाहित्यातही उल्लेख येतात.

आहेर की आला शेला शालू खंबायीत

चल सखी मंडपात उषाताई

शेल्याचा समावेश मानाच्या वस्त्रांत केला गेला. अभिजन असोत किंवा जन असोत, मंगलप्रसंगी आहेर देताना शेला किंवा उपरण्याचा समावेश अवश्य केला जायचा. दरबारात दिल्या जाणाऱ्या सन्मानाच्या साडेतीन वस्त्रातही शेल्याचा समावेश असे. समाजातही एखाद्याचा सन्मान करण्यासाठी त्यास ‘शेला पागोटे’ भेट देण्याचा रिवाज होता. ‘शेला पागोटे’ हा तर सन्मान करणे, या अर्थी एक वाक्प्रचार बनून गेला.

पूर्वी गावांमध्ये निरनिराळी वतने असायची. त्या रीतीनुसार गावच्या पाटलाला ‘शेलापाटी’ मिळणे हा त्याचा हक्क असायचा. तसेच गावातील एखाद्या लग्नाच्या किंवा पुनर्विवाहाच्या वेळेस ज्याला ग्रामीण भाषेत ‘म्होतूर लावणे’ असे म्हणतात, या वेळेस पाटलाला ‘शेला वाटी’ देणे हा पाटलाचा हक्क किंवा मान असे. लग्नसमारंभांमध्ये पूर्वी ‘वरमूठ’ नावाची प्रथा होती. यात नवरदेवाच्या मेहुणीद्वारे नवरा-नवरीच्या शेल्याला मारलेली गाठ काढली जात असे. या वेळेस नवरदेव त्याच्या मेहुणीस काही रक्कम देत असे, त्यास वरमूठ म्हणत. पूर्वी मृताच्या नातेवाईकांना राजदरबाराकडून किंवा नातलगांकडून दुखवटय़ाची वस्त्रे दिली जात, त्यास ‘शेला घालणे’, असे म्हणत असत.

‘सरकारचे तेल शेल्यावर घेणे’, अशी म्हणही मराठी भाषेत रूढ होती. त्याचा अर्थ राजाने वा अधिकारी व्यक्तींनी दिलेल्या भेटी किंवा मान सन्मान, त्याचे काहीही दुष्परिणाम असतील तरी मुकाटय़ाने स्वीकार करणे, असा होतो. तसेच पुढील काही उदाहरणांवरून हे ही लक्षात येईल की, आपल्या भाषेत किती नेमके शब्द आहेत. जीर्ण झालेल्या शेल्याला ‘झांजर’ असे म्हटले जात असे. निकृष्ट दर्जाच्या, जाडय़ा भरडय़ा शेल्याला, शेलगट, शेलखंड, रकटें अशी शेलकी विशषणे लावली जायची.

उत्तर पेशवाईनंतर ब्रिटिश अंमल सुरू झाला. त्यानंतर इंग्रजी प्रभावाने मराठी लोकांच्या पेहरावामध्ये वस्त्रसंकर होत गेला. सुरुवातीला अर्थातच अभिजनांच्या पेहरावात बदल झाले. शेल्याची जागा उपरण्याने घेतली. उपरणे सुती असले तरी त्याचे महत्त्व अबाधित राहिले. पूर्वी शेला हा खांद्यावरून घेऊन, मागच्या बाजूने डाव्या हातास गुंडाळून घेतला जात असे. या काळात जसे उपरणे जास्त प्रचलित होत गेले तसे ते नेसण्याच्या निरनिराळ्या तऱ्हाही विकसित होत गेल्या. त्यातला एक प्रकार म्हणजे, उपरणं मानेवरून पुढे घेऊन दोन्ही बाजूंनी खाली सोडणे. दुसऱ्या एका पद्धतीत, मानेभोवती उपरण्याचा वेढा घेत असत व त्याचे एक टोक छातीवरून व दुसरे टोक पाठीवरून लोंबते ठेवले जात असे. ही पद्धत नामदार गोखल्यांनी प्रसिद्ध केली, असे म्हटले जाते. पुढे रँग्लर परांजपे व काँग्रेसच्या मवाळ पंथीयांनी हीच पद्धत अंगीकारली. तिसरी पद्धत म्हणजे, उपरणं उजव्या खांद्याखालून घेऊन ते डाव्या खांद्यावरून मागे सोडणे, याला टिळक पद्धत म्हटले जात असे. याशिवायही आणखी एक पद्धत होती, यामध्ये उपरणं पाठीवर टाकले जात असे. त्यानंतर त्याच्या दोन्ही बाजू, दोन्ही काखांखालून पुढे घेतल्या जात असत. मग त्या दोन्ही बाजू खांद्यावरून मागे टाकल्या जात असत. अर्थात कोणत्याही पद्धतीत उपरण्याचा उपयोग व्यक्तिमत्त्वास उठाव देणे किंवा रुबाबदार दिसणे हाच होता.

त्या काळातील पुण्यातील नामवंतांची ओळख आपल्या मनावर कशी ठसली याविषयीचं एक अगदी छोटं पुस्तक सरोजिनी बाबर यांनी लिहिलं आहे. ग्रामीण भागात व सांगली कोल्हापूरकडे राहून महाविद्यालयीन जीवनात जेव्हा सरोजिनी बाबर पुण्यास वास्तव्यास आल्या तेव्हा इथल्या नामवंतांची ओळख मनावर ठसली ती त्यांच्या, झुरमुळ्यांची रेशमी पगडी आणि अंगावरचं जरीकाठांचं उठून दिसणारं उपरणं यांमुळे. बाकीच्या शहरांपेक्षा इथल्या लोकांचा पेहराव वेगळा होता, असं त्यांनी नोंदवलं आहे. त्या वेळच्या पुण्यातल्या नामवंत विद्वांनांची, म्हणजे दत्तो वामन पोतदार, आबासाहेब मुजुमदार, तात्यासाहेब केळकर, रँग्लर परांजपे, दिनकर केळकर, या सर्वाची ओळख त्यांच्या मनात प्रथमदर्शनी ठसली ती त्यांच्या रेशमी पगडी व जरीकांठी उपरणं यामुळे. या दोन्ही गोष्टी या महानुभावांच्या व्यक्तिमत्त्वाचे किती महत्त्वाचे भाग होत्या हे सरोजिनीबाईंनी रोचकपणे सांगितले आहे. या छोटय़ाशा पुस्तकाचे नाव आहे, ‘ठेवणीतली पगडी न् जरीकाठी उपरणं!’

आपल्याकडे, झोकदार राहणाऱ्यांना ‘शेले साबळीचा’ म्हणजे शेला व शेमला असलेला अक्कडबाज किंवा ऐटबाज असा शब्दप्रयोग रूढ झाला. काही लोक उगाच असा बडेजाव करण्याच्या नादात स्वत:ची हानी करून घेतात, त्यावरही एक म्हण आहे, ‘शेला पांघरला आणि हिवाने मेला’.

शेला काय किंवा उपरणे काय, ही सगळी होती अभिजनांची चैन. बहुजनांचे अशाप्रकारे पांघरायचे वस्त्र कोणते होते, ते पुढच्या भागात जाणून घेऊ.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2021 12:20 am

Web Title: paithani shela dupatta maharashtrian design paithani shela zws 70
Next Stories
1 नवं दशक नव्या दिशा : दोन ओंडक्यांची होते..
2 ‘फेन्ड्स’ फॉरेव्हर!
3 जुन्या पद्धती नवा ट्रेण्ड
Just Now!
X