20 January 2021

News Flash

पाणीपुरी एटीएम

भैयाचा हात न लागता मशीनच्या माध्यमातून पुरी आणि पाणी आपल्या प्लेटमध्ये उतरतात.

|| मितेश रतीश जोशी

पदार्थ कसा खावा याचे नियम धुडकावून लावणारा, रस्त्यावर हातात प्लेट घेऊन उभं राहून नाजूकपणे खाण्याचा नम्रपणा शिकवणारा पदार्थ म्हणजे पाणीपुरी. समोर वेगवेगळ्या भांड्यांत ठेवलेल्या पाण्यात हात घालून पुरी बुडवून ती प्लेटमध्ये देणारा पाणीपुरीवाला भैया ही प्रतिमाच पुसायचा चंग बांधलेल्या औरंगाबादच्या प्रतीक व समीर पितळे या भावांनी पाणीपुरी एटीएम मशीन तयार केले आहे.

काही पदार्थ घरीच खावे या वर्गातले, तर काही पदार्थ नेहमी बाहेरच खावेत या वर्गातले असतात. पाणीपुरी या दुसऱ्या वर्गात मोडते. म्हणजे घरी आईने कितीही स्वच्छ आणि चटपटीत पाणीपुरी केली तरी रस्त्यावरच्या भैयाकडची पाणीपुरीच आपल्याला जास्त आठवत राहते. म्हणूनच टाळेबंदीच्या कठीण काळातच नाही तर आताही करोनाच्या काळात आरोग्याच्या काळजीपोटी खवय्यांना पाणीपुरीवर काट मारावी लागते आहे. यावर उपाय म्हणून टाळेबंदीच्या रिकाम्या वेळेचा फायदा घेऊन औरंगाबादच्या दोन इंजिनीअर भावांनी पाणीपुरी एटीएम मशीनची निर्मिती केली. भैयाचा हात न लागता मशीनच्या माध्यमातून पुरी आणि पाणी आपल्या प्लेटमध्ये उतरतात.

समीर आणि प्रतीक हे दोघेही लहानपणापासून उद्योगीच. समीरचे आजोबा एसटी वर्कशॉपमध्ये काम करायचे. त्यामुळे दोन्ही बंधूंना वेगवेगळे जुगाड करण्यासाठी लागणारे टूल्स घरीच मिळायचे. एकदा दोघांनी मिळून लाकडापासून नंबर लॉकचे गल्ले तयार केले होते. अशा या खेळीमेळीच्या वातावरणात पाणीपुरी मशीन तयार करावी हा विचार या दोन्ही बंधूंच्या मनात यायला एक घटना निमित्त ठरली. गेल्या वर्षी पाणीपुरी खाल्ल्यानंतर पोटदुखी होऊन समीर आजारी पडला. सोनोग्राफी केली तर डॉक्टरांनी बाहेरचं खाऊन त्रास झाल्याचं सांगितलं. ‘अस्वच्छता व पाणीपुरी’ हा विषय नेहमीच चर्चेचा ठरलेला आहे. पाणीपुरी देण्याघेण्यातला मानवी हस्तक्षेप कमी करून कॉलेजमध्ये घेत असलेल्या शिक्षणाचा वापर करून मशीन तयार करण्याचा दोन्ही भावांनी निर्णय घेतला.

हे मशीन तयार करायला दोघांनी तब्बल दीड वर्ष मेहनत घेतली. अगदी सुरुवातीला या यंत्रासाठी लागणाऱ्या पंपाचा सर्वत्र शोध केला. जे पंप मिळाले ते प्लास्टिकचे व चायनीज होते. मनासारखे पंप न मिळाल्याने समीर व प्रतीकने साधे पंप बसवण्याचा निर्णय घेतला. याला लागणारा सर्किट बोर्ड डिझाइन केला आणि दीड वर्षात मशीनची निर्मिती केली. पण या पहिल्या मशीनने निराशा के ली. आईवडिलांनी दिलेले खूप पैसे वाया गेले, पण अनुभवाचं गाठोडं पक्कं केलं. याच दरम्यान देशात टाळेबंदी झाली. टाळेबंदीच्या रिकाम्या वेळेचा फायदा घेऊन नवीन मशीन तयार करण्याचा त्यांनी संकल्प केला. निराशेला कारणीभूत ठरलेले, मशीनला लागणारे पंप या वेळी दोन्ही भावांनी स्वत: घरी तयार केले. नवीन मशीन तयार करण्यासाठी साठ हजार रुपये खर्च आला. घरच्यांचे टक्के टोणपे ऐकत नवी मशीन महिन्याभरात तयार झाली, कारण गेल्या दीड वर्षाच्या अपयशाचे अनुभव पाठीशी होते. त्यामुळे या वेळी चूक होण्याचा प्रश्नच उपस्थित झाला नाही. सप्टेंबर २०२०ला समीर व प्रतीकच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि या मशीनला नाव मिळाले ‘पाणीपुरी एटीएम’.

‘पाणीपुरी एटीएम’ नेमके चालते कसे?, हा प्रश्न विचारला असता समीर म्हणाला, आम्ही दोन प्रकारच्या मशीन तयार करतो. सिंपल सिरीज व स्मार्ट सिरीज. या मशीनच्या माध्यमातून एका वेळी तीन जण पाणीपुरीचा आस्वाद घेऊ शकतात. मशीनला लागणारे नोजल आम्ही ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार वाढवतो. पण प्रत्येक मशीनला साधारणपणे तीन नोजल असतात. एका नोजलमधून तिखट, एकातून गोड तर एकातून मध्यम चवीचे पाणी येते. दिवसभरात विक्री झालेल्या प्लेटची नोंदणी मशीनमध्ये होते. हे मशीन बॅटरीवर चालते. एकदा चार्ज केल्यावर ३००

प्लेट पाणीपुरीची विक्री मशीनच्या माध्यमातून करणे शक्य आहे. यासाठी ०.२ युनिट इतकीच वीज लागते. म्हणजे ३०० प्लेट पाणीपुरीसाठी फक्त २ रुपये खर्च येतो. इतकंच नाही तर पार्सलसाठीसुद्धा स्वतंत्र सुविधा मशीनमध्ये देण्यात आली आहे. आम्ही आतापर्यंत तीन मशीन तयार केल्या आहेत. तिन्ही मशीन उत्तम काम करत आहेत.

खाबूविश्वात सेन्सरयुक्त टचलेस मशीन ही सध्या काळाची गरज आहे. पाणीपुरी आवडणाऱ्यांसाठी ही गरज महाराष्ट्राच्या या बंधूंनी मेहनत करून भरून काढली आहे. दोघांनाही पुढील वाटचालीसाठी व्हिवा परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !!

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2020 12:00 am

Web Title: panipuri atm machine akp 94
Next Stories
1 खणखणीत फॅशन!
2 सदा सर्वदा स्टार्टअप : तुलनात्मक अभ्यास करताना
3 भटकंतीचे नवे आयाम
Just Now!
X