News Flash

‘मी’लेनिअल उवाच : विचारांचे पराठे

बऱ्याचदा आपल्या कानावर पडते की, मला अमुक अमुक गोष्टीत करिअर करायचे आहे, पण आईवडील परवानगी देत नाहीत.

(संग्रहित छायाचित्र)

जीजिविषा

जेवणाच्या ताटात असलेला नावडता पदार्थ पहिले खावा असे मला कायम वाटते म्हणून सर्वात आधी मी हे सांगितले. कारण ज्या गोष्टीला तुम्ही तुमच्या आयुष्याची महत्त्वाची वर्ष देणार आहात, त्या गोष्टीबद्दल तुम्ही पूर्णपणे विचार करायला हवा ही तुमची स्वत:प्रति नैतिक जबाबदारी आहे.

प्रिय वाचक मित्र,

मुंबईत यंदा बरीच थंडी पडली आहे. विश्वास बसणार नाही कदाचित, पण तीन दिवसांपूर्वी सकाळी उठून बघते तर माझ्या खिडकीत दव साचलेले. पुण्यात पूर आणि मुंबईमध्ये गारठा हे दोन्ही नवीनच; पण तरीही काही लोकांना ‘क्लायमेट चेंज’ ही अफवा वाटते. असो.

तुमच्यापैकी काही जणांनी ‘व्हिवा’ला ई-मेल्स  केले, ते मला मिळाले. वाचून खूप बरे वाटले. आपण जे लिहू/ म्हणू बघतो आहोत हे वाचकांना पटते आहे याची त्यापेक्षा मोठी पावती नाही. खूप जणांनी श्वेताबद्दलही विचारले. ती नियमितपणे मानसोपचारतज्ज्ञांकडे जाते आहे. हालहवाल जाणून घेतले, आता मुद्दय़ाकडे वळूयात.

बऱ्याचदा आपल्या कानावर पडते की, मला अमुक अमुक गोष्टीत करिअर करायचे आहे, पण आईवडील परवानगी देत नाहीत. मला खरं तर हे हे करायचे होते, पण घरच्यांनी नकार दिला. फारच क्वचित आपल्याला हवे ते करण्याची संधी आपल्याला मिळते. या ‘फिल्ड’मध्ये ‘स्टेबिलिटी’ नाही, हातात डिग्री मिळव, मग बघू. मी मराठी सिनेसृष्टीत काम करते आणि आमच्याकडेही आहेत तितके लोक याच गोष्टींवर मात करून आले आहेत.

वरच्या पिढीला यासाठी दोष देण्याआधी समजून घ्यायला हवे की, ही काय भीती असावी की ज्यामुळे ते नाही म्हणत असावेत. ‘करिअर’ हा शब्द डिक्शनरीमध्ये जरी पूर्वीपासून असला तरी भारतात, मध्यमवर्गीयांनी.. तो जेमतेम नव्वदच्या दशकापासून वापरात आणला असेल. या पिढीतले बहुतांश लोक जॉब्सला ‘चिकटायचे’. आपल्याला मोठे व्हायचे आहे म्हणून आपले शिक्षण आणि आर्थिक तरतूद करायला त्यांनी हे जॉब्स घेतले. एकदा माणूस जॉबला चिकटला, की त्याची सुटका एक तर मृत्यू किंवा रिटायरमेंट – अशा दोनच कारणांनी होत असे. त्यामुळे या पिढीला समजावताना आपल्याला हे विसरून चालणार नाही.

त्याचबरोबर पसा महत्त्वाचा आहे हेही विसरून चालणार नाही. कदाचित कटू सत्य म्हणतात ते हेच. डोक्यावर छप्पर असताना आणि दोन वेळचे अन्न पुढय़ात वाढले जाताना करिअरच्या बाता करणे सोप्पे आहे. ज्याची या सगळ्याविना राहण्याची तयारी असेल त्यानेच आपले ‘ऑफ बीट’ करिअर निवडावे. लोन घेणार असाल तर ती भरण्याची तयारी दाखवायला हवी. आपल्या निर्णयांच्या परिणामांना सामोरे जाण्याची तयारीसुद्धा दाखवायला हवी.

थोडे उद्धट वाटेल, पण हे माझे वैयक्तिक मत आहे. हे लिहिताना मी किमान चार वेळा खोडून ते पुन्हा लिहिले. कुणाला पटले नाही तर? हा विचार अनेक वेळा येऊन गेला; पण जेवणाच्या ताटात असलेला नावडता पदार्थ पहिले खावा असे मला कायम वाटते म्हणून सर्वात आधी मी हे सांगितले. कारण ज्या गोष्टीला तुम्ही तुमच्या आयुष्याची महत्त्वाची वर्ष देणार आहात, त्या गोष्टीबद्दल तुम्ही पूर्णपणे विचार करायला हवा ही तुमची स्वत:प्रति नैतिक जबाबदारी आहे.

आता तुम्ही म्हणाल, की जीजि, तू एवढे सगळे बोललीस; पण आईवडिलांना सांगायचे कसे हे नाही सांगितलेस. खरे सांगायचे तर यासाठी कोणताही फॉम्र्युला माझ्याकडे नाही, पण हां.. कुणालाही काहीही समजावायचे असेल तर माझी एक ‘युक्ती’ आहे, ज्याला मी म्हणते ‘मेक पराठा’ (किंवा मेक अ सॅण्डविच). या युक्तीने मला अनेक गोष्टी लोकांना समजवायला मदत केली आहे.

म्हणजे काय?

ज्यांनी आपल्या आईचे निरीक्षण केले असेल, त्यांना कदाचित समजलेही असेल. प्रत्येक लहान मुलाला कोणता ना कोणता पदार्थ किंवा शक्यतो भाजीच नावडती असते. मग आई काय करते? तीच भाजी कणकेत घालून पराठे बनवते किंवा सॅण्डविच बनवते. कारण तिला माहिती असतं की, ती गोष्ट पोटात तर जायला हवी, पचनी तर पडायला हवी. तर मग मुलाला आवडेल अशा पद्धतीने ती ही युक्ती करते. या सगळ्यात कुणी कुणी कशाचे पराठे खाल्ले आहेत हे ज्याचे त्याचे त्याला आठवेलच; पण मुद्दा हा की, एखाद्याला एखादी गोष्ट न दमदाटी करता, न भांडण करता समजवायची असेल तर ती त्यांच्या त्यांना समजेल अशा पद्धतीने आपल्याला समजावता यायला हवी.

माझ्या एका मत्रिणीने तर चक्क तिच्या प्रोफेसर वडिलांना पॉवर-पॉइंट प्रेझेन्टेशन करून दाखवले होते. हे जरा अति झाले, पण तुम्हाला माझा मुद्दा कळला असावा अशी मी अपेक्षा करते. त्यांनी नाही म्हणायची तरीही शक्यता आहेच, पण मला फारशा न आवडणाऱ्या डी.डी.एल.जे.मधला राजचा डायलॉग (जो त्याने ज्या कारणासाठी वापरलाय ते मला अजिबात पटलेले नसून) मी कायम स्वत:शी घोकते – ‘ना तो है ही, शायद हाँ हो जाए!’

आशा करते की, तुम्ही मला आपले मानून, माझे कडू शब्दसुद्धा गोड मानून घ्याल. तुमच्या पत्रांची वाट बघेन. पराठे बनवले तर ते कसे झाले होते हे मला सांगायला विसरू नका.

जाता – जाता एक टीप – जेव्हा कोणती बाजू निवडावी कळत नसेल तेव्हा माणुसकीची बाजू निवडा.

ता.क. – मला डी.डी.एल.जे.मधला तो डायलॉग का आवडत नाही हे मी तुम्हाला लवकरच सांगेन, पण तो पराठा मला अजून बनवायला जमलेला नाही. रेसिपी एकदा जमली की नक्की खाऊ घालेन.

कळावे,

जीजि.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2020 4:16 am

Web Title: parathas of thoughts millennial article abn 97
Next Stories
1 माध्यमी : दिल ये जिद्दी है..
2 बुकटेल : लपवलेल्या काचा
3 #बदलाच्या दिशेने..
Just Now!
X