सेवा परीक्षांच्या अभ्यासासह प्रशासन आणि सैन्यदलातील विविध संधी, अनुभवांची चर्चाही यावेळी झाली. या यशस्वी वाटचालीत दोघींनाही लाभलेल्या माहेर -सासरच्यांचा भरभक्कम पाठिंब्याचा आवर्जून नि प्रांजळपणं उल्लेख केला गेला. दोघींनीही काम करताना महिला म्हणून कधीही डावलंलं गेलं नाही, हेही अधोरेखित केलं. दोन्ही सेवांच्या दरम्यान शिस्तपालन, आदरभाव, संवादीपणा, तौलनिक विचार नि वेळेचं महत्त्व प्रशिक्षणार्थीच्या मनात बिंबवलं जातं. त्यांना शारीरिक नि मानसिकदृष्टया एवढं तय्यार केलं जातं की त्यांनी अधिकार पदी आल्यावर काळ, काम नि वेगाचं गणित पटापट सोडवणं अपेक्षित असतं, हे यावेळी उपस्थितांना कळलं. आणि कामाच्या पॅशनसोबतच पेशन्सचीही गरज असणं आवश्यक असतं, असा कानमंत्रच जणू या कार्यक्रमादरम्यान या करिअरचा विचार करणाऱ्यांना मिळाला.

अश्विनी भिडे आणि सोनल द्रविड या दोघींनाही स्पर्धा परीक्षा आणि इंटरव्ह्य़ूची तयारी कशी करावी यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. सुरुवातीपासून ध्येय निश्चित करा आणि रस घेऊन अभ्यास करा, असे या दोघींनी सांगितले. शॉर्ट सव्‍‌र्हिस कमिशनच्या (एसएसबी) पाच दिवसाच्या इंटरव्ह्य़ूचे अनुभव सोनल यांनी सांगितले. संरक्षण दल किंवा प्रशासकीय सेवांमध्ये मुलींना समान संधी आहे. त्याचा पुरेपूर वापर करावा, असं आवाहन या दोघींनी केलं. या वेगळ्या वाटेवरच्या करिअरमध्ये आव्हाने अनेक असली, तरी त्याचा सकारात्मक दृष्टीने सामना करण्याचा कानमंत्र त्यांनी दिला.

vnnn02‘झी २४ तास’वर रविवारी प्रक्षेपण
व्हिवा लाउंजच्या या पंचवीसाव्या कार्यक्रमाला भारतीय नौदलाचा पाठिंबा मिळाला.या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रथमच सैन्यदलातील अधिकारी व्हिवा लाउंजच्या व्यासपीठावर आली. भारतीय नौदलाच्या वतीने कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक छोटा माहितीपटही दाखवण्यात आला. केसरी प्रस्तुत लोकसत्ता व्हिवा लाउंज हा कार्यक्रम दिशा डायरेक्टच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. झी २४ तास या कार्यक्रमाचा टेलिव्हिजन पार्टनर होता. या कार्यक्रमाचा संपादित अंश झी २४ तास या वाहिनीवर रविवारी (दिनांक ९ ऑगस्ट) संध्याकाळी ६.३० वाजता प्रक्षेपित केला जाईल. तसेच यूटय़ूबवर लोकसत्ता लाईव्ह चॅनेलवर या कार्यक्रमाची क्षणचित्र पाहता येतील.