News Flash

नवं दशक नव्या दिशा : शरकाराची कैफियत – २

कामात एकाग्रता आणावी म्हणून लहान मुलांना दिलेला हा दृष्टांत आजच्या ध्वनिप्रदूषणामध्ये कुचकामी ठरला आहे.

सौरभ करंदीकर

आवाज आणि आपले कान यांच्यामध्ये प्रतिबंधक दरी निर्माण करणं आवश्यक आहे. त्यासाठी अनेक जण कान झाकणारे हेडफोन वापरू  लागले आहेत. परंतु हे ‘पॅसिव्ह नॉईज कॅन्सलेशन’ झालं (निष्क्रिय ध्वनी प्रतिबंध). म्हणजे हे गांधीजींच्या माकडांप्रमाणे कानावर हात घेऊन ‘बुरा मत सुनो’ म्हणण्यासारखं झालं.

मागील लेखात आपल्या घरावरून जाणाऱ्या मिरवणुकीच्या आवाजाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून आपले काम करणाऱ्या शरकाराची (बाण बनवणाऱ्या कारागिराची) गोष्ट आपण वाचली. कामात एकाग्रता आणावी म्हणून लहान मुलांना दिलेला हा दृष्टांत आजच्या ध्वनिप्रदूषणामध्ये कुचकामी ठरला आहे. शहरांमध्ये इतकंच नव्हे तर गावागावांत लाऊडस्पीकरमुळे, यंत्रांच्या आणि वाहनांच्या आवाजामुळे आपल्या एकाग्रतेवरच नाही तर आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. हा लेख प्रकाशित झाल्यानंतर त्यावर अनेकांनी प्रॉब्लेम काय आहे ते सांगितलंस, परंतु उपायांबद्दल फारसं लिहिलं नाहीस.. असा शेरा मारला. वरकरणी निरुपद्रवी वाटणाऱ्या ध्वनीची पातळी ८५ डेसिबलपेक्षा उंचावली तर मानवी शरीरावर त्याचे काय परिणाम होऊ शकतात, आपल्याला कोणत्या ‘लाइफस्टाइल व्याधी’ जडू शकतात हे सांगणं महत्त्वाचं होतं. आपल्या उत्सवप्रिय आणि ओघानेच ‘ध्वनिप्रिय’ समाजाला ही माहिती देता देता शब्दसंख्या संपली आणि उपाययोजनांबद्दल पुरेसं लिहिता आलं नाही, म्हणून हा जोड-लेखाचा प्रपंच.

करोनाकाळात अनेक जण आपल्या घरात कोंडले गेले आहेत. वर्क फ्रॉम होम आता अनेकांच्या अंगवळणी पडलं आहे. याचा अर्थ आपल्याला अचानक आजूबाजूचे आवाज ऐकूच येत नाहीत, असं काही होत नाही. घरातील मिक्सरपासून हेअर ड्रायपर्यंत आणि थाळ्या वाजवण्यापासून जोरजोराने भांडण्यापर्यंत प्रत्येक आवाज आपले कान गोळा करत असतात. आणि आपला मेंदू त्यावर सतत प्रक्रिया करत असतो.

ऐच्छिक अनुभूती म्हणजेच सिलेक्टिव्ह पर्सेप्शन ही मानवी मनाची एक कसरत आहे. आपल्याला कुणी सांगितलं की सभोवारच्या लाल रंगाच्या गोष्टी शोधून काढा, तर आपली नजर त्या बरोबर हुडकून काढते. लालऐवजी हिरवा असं म्हटलं तर आपल्याला भोवतालच्या हिरव्या गोष्टी चटकन दिसू लागतात, परंतु बाकीच्या गोष्टी दिसत नाहीत असं नाही. आपल्या मेंदूने अवघ्या काही सेकंदात ठरलेले रंग सोडून इतर माहिती गोळा केली, त्यावर प्रक्रिया केली आणि त्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं असं म्हणावं लागेल. आवाजाचं देखील तसंच आहे.

बाजूच्या टीव्हीचा आवाज कितीही मोठा असला तरी आपापली कामं करणारे अशाच ऐच्छिक अनुभूतीचा अवलंब करतात. आजूबाजूला कितीही गोंधळ चालू असला तरी फोनवर संवाद साधणं ही कला अनेकांना अवगत असते. परंतु अशा परिस्थितीत आपल्या मेंदूवर प्रत्येक आवाजाचा आघात होतच असतो. प्रत्येक ध्वनिसंदेशाचं आकलन, त्याची वर्गवारी, आपल्या आठवणीतल्या आवाजांशी त्याची केलेली तुलना (लक्ष असो अथवा नसो, दूरवर लागलेलं गाणं कुठल्या चित्रपटातलं आहे याचं आकलन होतंच असतं की..) आणि सरतेशेवटी त्या माहितीकडे दुर्लक्ष करणं, ही सारी कामं आपला मेंदू करतच असतो. ध्वनिप्रदूषण आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर घाला घालतच असतं. आवाज आणि आपले कान यांच्यामध्ये प्रतिबंधक दरी निर्माण करणं आवश्यक आहे. त्यासाठी अनेक जण कान झाकणारे हेडफोन वापरू लागले आहेत. परंतु हे ‘पॅसिव्ह नॉईज कॅन्सलेशन’ झालं (निष्क्रिय ध्वनी प्रतिबंध). म्हणजे हे गांधीजींच्या माकडांप्रमाणे कानावर हात घेऊन ‘बुरा मत सुनो’ म्हणण्यासारखं झालं. त्यामुळे आपल्या मेंदूपर्यंत पोहोचणाऱ्या आवाजाची पातळी नक्कीच कमी होते, पण हे पुरेसं नसतं.

१९३६ साली अमेरिकन संशोधक पॉल लुईग याने ‘अ‍ॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन’ (सक्रिय ध्वनी प्रतिबंध) या तंत्रज्ञानाचं पहिलं पेटंट मिळवलं. ध्वनीच्या मार्गामध्ये त्याच क्षमतेचा ध्वनी उलटय़ा दिशेने जाईल अशी व्यवस्था केली, तर ध्वनिलहरी एकमेकांना कॅन्सल म्हणजेच (काही प्रमाणात) नाहीशा करतात हे त्याने दाखवून दिलं. १९५० साली लॉरेन्स फोगल याने हेलिकॉप्टर आणि विमानाच्या कॉकपिटमधले आवाज कमी करण्यासाठी याच तंत्राचा अवलंब केला. १९८० च्या दशकानंतर हे तंत्रज्ञान सामान्यांना परवडू लागलं. तरीही अ‍ॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन असलेले हेडफोन साध्या हेडफोनच्या तुलनेने आजही महागच आहेत. ‘वर्क फ्रॉम होमदरम्यान डोक्याचा भुगा होण्यापेक्षा थोडासा खर्च झालेला परवडला’, असं अनेकांचं म्हणणं आहे.

ध्वनी शोषून घेणारे स्पंज आणि लाकडासारखे पदार्थ घराच्या अंतर्भागात विशिष्ट ठिकाणी वापरणं, भिंतींना कापडी किंवा तत्सम पदार्थाचं आवरण देणं, इत्यादी कल्पना इंटिरियर डिझाइन क्षेत्रात काम करणारे आपल्या ग्राहकांना सुचवत असतात. साऊंड स्टुडिओमधल्या भिंतींवरून ध्वनी परावर्तित होऊ नये म्हणून काँक्रीट, व्हिनाईल इत्यादी पदार्थाचे थर वापरले जातात. खिडक्यांना विशिष्ट प्रकारच्या काचा आणि सिलिकॉन वापरून साऊंड प्रूफ केलं जातं. आज अशी व्यवस्था घराघरांत करण्याची वेळ आली आहे.

२०१३ साली अमेरिकेतील मिनेसोटा शहरात ऑरफिल्ड लॅब्समध्ये जगातील सर्वात शांत खोली तयार करण्यात आली. या खोलीची रचना अशी केली गेली होती की त्यात ‘वजा नऊ डेसिबल’ इतकी शांतता असेल. या खोलीत कुणीही ४५ मिनिटांपेक्षा अधिक बसू शकत नसत. स्वत:च्या हृदयाची धडधड, श्वासोच्छ्वास, रक्ताचं सळसळणं इतकंच नाही तर हाडांचं हलणं आणि अन्नपचन इत्यादींचे आवाज त्या खोलीत स्पष्ट ऐकू येत असत. नासा आपल्या अंतराळवीरांना पृथ्वीबाहेरील भयाण शांततेची सवय व्हावी म्हणून ऑरफिल्ड लॅब्समध्ये पाठवत असत. मायक्रोसॉफ्टने २०१७ मध्ये त्याहून अधिक ध्वनिरहित (वजा वीस डेसिबल) खोलीची उभारणी केली. त्यांच्या ध्वनी-उत्पादनांवरील संशोधनासाठी या खोलीचा वापर केला जातो.

इतक्या शांत खोल्यांची गरज सर्वसामान्यांना नाही, परंतु ३० डेसिबलपर्यंत शांतता आपल्याला लाभावी म्हणून प्रयत्न करणं आवश्यक आहे. वैयक्तिक पातळीवरच्या उपाययोजना ज्यांना शक्य आहे ते करतील, पण आपल्या आसमंताचं ‘नॉईज कॅन्सलेशन’ होण्यासाठी मात्र सामाजिक इच्छाशक्तीचीच गरज आहे.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2021 12:59 am

Web Title: passive noise cancellation article about headphones zws 70
Next Stories
1 वस्त्रान्वेषी :  धोतराचा इतिहास
2 ‘परीक्षा’ ही जुलमी गडे…
3 संशोधनमात्रे : अभ्यासोनि प्रगटावे
Just Now!
X