‘भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत..’ लहानपणीच पाठय़पुस्तकाच्या पहिल्या पानावर छापलेली नि असंख्य मनामनांत कायमची कोरली गेलेली ही प्रतिज्ञा. मन:पूर्वक केलेलं झेंडावंदन नि गायलेली देशप्रेमाची गाणी.. पुढं कॉलेजमधल्या एनसीसी-एनएसएसमध्ये जॉईन होऊन १५ ऑगस्टची परेड नि समाजोपयोगी कार्यक्रम इत्यादी अ‍ॅक्टिव्हिटीज. बहुतांशी तरुणाईच्या ‘स्वातंत्र्यदिना’ची सक्रिय गोष्ट इथंच पूर्णविराम घेते. कारण पुढं कुणालाच वेळ नसतो हे सगळं अटेंड करायला. सतत धावायचं असतं, आपापल्या करिअरच्या मागं.. मग निव्वळ एक उपचार म्हणून व्हच्र्युअल जगात कमेंट पोस्ट केल्या जातात, फार फार तर व्हॉट्सअ‍ॅपचा ‘डीपी’ तिरंगी होतो नि ‘आणखी एक सुट्टी’ मिळल्याचं सेलिब्रेशन साजरं होतं..
‘स्वातंत्र्यदिना’चा हा एवढाच मर्यादित अर्थ आज घडीला अपेक्षित आहे का? ‘स्वातंत्र्य’ म्हणजे नेमकं काय? ते मनाचं, विचारांचं, देशाचं असतं की अजून काही? विचार नि निर्णयस्वातंत्र्याची धुसर होणारी सीमारेषा माहित्येय का? तुम्हाला ती सतत ओलांडायची की तिचा आदर करायचाय? या नि अशा अनेक प्रश्नांचा विचार करण्याचं स्वातंत्र्य तुमच्यापाशी आहे का? थोडय़ा मोठय़ा स्तरावर विचार केला तर स्वातंत्र्य मिळवण्यासाठी असंख्यांनी बलिदान दिलंय. नाना प्रकारचा त्याग केलाय. आपल्याकडून कुणीही तेवढी अपेक्षा करत नाहीये. केवळ व्हच्र्युअली कमेंट करण्यापेक्षा विचारांतून नि प्रत्यक्ष कृतीतून काही चांगल्या गोष्टी करायला हव्यात. काही जणांनी ऑलरेडी सुरूवात केली आहे. मग देरी किसी बात की? ‘भारतमाता की जय’.. ‘स्वातंत्र्य’ नि ‘स्वातंत्र्य दिना’बद्दलची आपली मतं काही जणांनी ‘व्हिवा’शी शेअर केली आहेत.  
 
तेजल सप्रे
‘स्वातंत्र्य’ म्हणजे स्वत:च्या विकासासाठी अवलंबलेले तंत्र होय. त्यामुळं प्रत्येक व्यक्ती आपल्या गरजांनुसार या मूल्यांशी किंवा हक्कांशी स्वत:ला रिलेट करत जाते. आजच्या तरुण पिढीला मिळणारं ‘स्वातंत्र्य’ ही फारच महत्त्वाची बाब ठरतेय. आतापर्यंत प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर प्रत्येक निर्णयात मला दिला गेलेला मोकळेपणा हे स्वातंत्र्य ठरलंय. प्रत्येक वेळी प्रत्येक निर्णयावर चर्चा करताना त्या चच्रेत माझं मत मांडायला दिलेली मोकळीक नि त्यानुसार होणारा विचार हे माझ्यासाठी स्वातंत्र्यासमानच आहे. या चच्रेच्या शेवटी माझ्या मतानुसार निर्णय घेताना ‘जे काही करशील ते नीट कर’ असा मला केलेला उपदेशही महत्त्वाचा आहे. आपल्या निर्णयात दिल्या गेलेल्या स्पेसमुळं त्या निर्णायाची अंमलबजावणी होणं, ही आपली जबाबदारी ठरते. त्यामुळं मी ‘स्वातंत्र्य’ ही मला दिली गेलेली स्पेस तर समजतेच, पण त्याचसोबत ती माझी जबाबदारीही समजते.

चिन्मय छत्रे
‘स्वातंत्र्य’ या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वत:चे निर्णय किंवा स्वत:च्या इच्छा, गरजा पूर्ण करण्यासाठी कोणाचेही बंधन किंवा दबाव नसणं. आज आपला देश स्वतंत्र आहे, म्हणून देशातील कोणतीही व्यक्ती आपले विचार मोकळेपणानं मांडू शकतेय. त्या व्यक्तीवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तो आवाज उठवू शकतोय. उदाहरणार्थ, कॉलेजला जाताना मी अगदी मला हव्या त्या स्ट्रीमला अॅडमिशन घ्यायची तर घेऊ शकतोय. मग निर्णयात ना शासनाचा दबाव आहे ना कुटुंबातील सदस्यांचा. हा निर्णय केवळ आपला स्वत:चा असतो आणि तो आपल्याला घ्यायला मिळत नसेल तर याबाबतीत आपल्याला स्वातंत्र्य नाही, असं म्हणता येईल.

प्रियांका लोकरे
‘स्वातंत्र्य’ म्हणजे मोकळेपणानं जगण्याचा अधिकार आहे. ‘स्वातंत्र्य’ म्हणजे समानतेनं जगण्याचा हक्क. स्वातंत्र्याचा दिवस अर्थात १५ ऑगस्ट मी माझ्या कॉलेजमध्ये साजरा करते. त्या दिवशी आमच्या कॉलेजमध्ये वेगवेगळे कार्यक्रम होतात. आमच्या एनसीसी युनिटची प्रभातफेरी काढली जाते. म्हटलं तर, तशी थोडीशी मजामस्तीही असते या कार्यक्रमात. पण सगळं प्रॉपर डिसिप्लिन मेंटेंन करून करायचं असतं. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मी गरजूंना मदत करते. हा अख्खा दिवसभर युनिफॉर्ममध्ये असल्यामुळं नेहमीपेक्षा आपण काही तरी वेगळं नि चांगलं काम करत आहोत, ही भावना मनात निर्माण होते. कायमच खूप अभिमान वाटतो आपल्या देशाचा.. आपसूक पुन्हा एक कडक सॅल्यूट केला जातो त्या तिरंग्याला!

श्रीपाद नेने
‘स्वातंत्र्य’ म्हणजे माझ्या जगण्याचं, विचारांचं आणि देशाचं स्वातंत्र्य. अभ्यासामुळं मला ‘एनएसएस’मध्ये जाता आलं नाही. पण ‘एसएसएस’मध्ये नसलो तरी १५ ऑगस्टच्या निमित्तानं आपल्या देशाच्या स्वातंत्र्याकरिता बलिदान दिलेल्या महान व्यक्तींच्या स्मृतींना मी मन:पूर्वक आदरांजली समíपत करतो. आज त्यांच्यामुळं मी स्वत:ला स्वतंत्र देशातला स्वतंत्र नागरिक म्हणू शकतोय नि तसा जगू शकतोय. झेंडय़ाला मानवंदना देताना मी देवाकडं नेहमीच प्रार्थना करतो की, ‘माझा देश असाच स्वतंत्र राहू दे. स्वतंत्र देशातील माझ्या साऱ्या बांधवांना सुखशांती व समृद्धी मिळू दे.’

प्रियांका साळगावकर
आपल्याला जे करावंसं वाटतं ते करण्याची पूर्ण मुभा असणं म्हणजे ‘स्वातंत्र्य’. माझ्या घरच्यांनी नेहमीच मला निर्णयस्वातंत्र्य दिलं. मला सायकॉलॉजीत करिअर करायचंय. त्यासाठी आर्ट्स स्ट्रीममध्ये जायचं ठरवलं. दहावीत एवढे चांगले टक्के मिळूनसुद्धा आर्ट्स घेतेय, म्हणून अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. पण माझ्या पालकांनी माझ्या निर्णयात मला साथ दिली. त्यांनी कधीही मुलगी म्हणून मला माझ्यावर कोणतीच बंधनं लादली नाहीत. मला जे करावंसं वाटतं, त्यात ते नेहमी माझ्या पाठीशी उभे असतात. मी एनएसएस जॉईन केलंय. कॉलेजमध्ये दर वर्षी १५ ऑगस्टनिमित्त कार्यक्रम आयोजला जातो. झेंडावंदनानंतर आम्ही झोकदार परेड करतो. या कार्यक्रमादरम्यान लहणारा तिरंगा पाहून मन अभिमानानं भरून येतं.. कायमच!

अक्षय पाटील
‘स्वातंत्र्य’ म्हणजे जे आपल्या विचारांना पटेल ते करता येणं. अनेक जण १५ ऑगस्ट म्हणजे सुट्टी एवढाच मर्यादित विचार करतात. दुसरीकडं आम्ही ‘एनसीसी’वाले सकाळी लेक्चर्स नि दिवसभर परेडची प्रॅक्टिस करतो. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी आम्ही फक्त परेडच करत नाही, तर पर्यावरणाचा विचार करून वृक्षारोपणही करतो. सगळ्यांनी आमच्याएवढी मेहनत करावी, असं माझं असं अजिबात म्हणणं नाही. पण थोडासा बदल अपेक्षित आहे. ज्याला जे शक्य आहे, ते त्यानं करावं. अभ्यासाखेरीजचा वेळ उगाचच फुकट घालवण्यापेक्षा काही चांगल्या गोष्टी मी करतोय नि पुढंही त्या करायच्या आहेत. एनसीसीच्या माध्यमातून खारीचा वाटा उचलताना समाधान मिळतंय. अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळताहेत. या सगळ्या गोष्टींसाठी घरच्यांनी मला स्पेस दिली आहे नि ही फार मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी.