13 December 2019

News Flash

फुलवा खामकर

फुलवाचे नृत्य टीव्हीवर अनेक नृत्यांवर आधारित रिअ‍ॅलिटी शोजमधून प्रेक्षकांनी पाहिलेले आहे.

फुलवा खामकर

|| प्रियांका वाघुले

फुलवा खामकर प्रसिद्ध नृत्यांगना आणि त्याचबरोबर मराठी चित्रपट-नाटक विश्वातील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका म्हणून अगदी आबालवृद्धांच्या परिचयाची आणि आवडती आहे. फुलवाचे नृत्य टीव्हीवर अनेक नृत्यांवर आधारित रिअ‍ॅलिटी शोजमधून प्रेक्षकांनी पाहिलेले आहे. तिचा चित्तवेधक पदन्यास बघून आपल्याला ही अशी नृत्यकला अवगत असती तर असा विचार मनात डोकावल्याशिवाय राहत नाही. शास्त्रीय नृत्य, लावणी ते आधुनिक नृत्यप्रकारांमध्येही निष्णात असणाऱ्या फुलवाचा फिटनेसही वाखाणण्याजोगा आहे.

नृत्यकला अवगत असणं हेच फिट राहण्यासाठी देवाने मला दिलेलं वरदान आहे, असं अनेकांचं म्हणणं आहे. अर्थात, त्यात काही प्रमाणात तथ्यही आहेच, मात्र तुमच्याकडे नुसती कला असून चालत नाही, त्याचा उपयोग स्वत:साठी करून घेता येणं गरजेचं आहे, असं फुलवा म्हणते. आपल्याला येत असलेल्या गोष्टीचा आपण सदुपयोग करून घेतला तर त्याला खरा अर्थ प्राप्त होतो, असे सांगणारी फुलवा एकाअर्थी शालेय जीवनापासूनच फिटनेसशी जोडली गेली आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. शालेय जीवनात जिम्नॅस्ट असलेली फुलवा पुढे नृत्याकडे ओढली गेल्याचे सांगते.

आज नर्तक, नृत्यदिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध असलेली फुलवा फिट राहण्यासाठीदेखील नृत्यालाच महत्त्व देत असल्याचे सांगते.  सादरीकरण करताना किंवा कलाकारांना-विद्यार्थ्यांना नृत्य शिकवताना माझेही नृत्य सुरू असतेच. तरीही मी स्वत:साठी रोज वेळ देते, असे ती सांगते.

कथ्थक विशारद असलेली फुलवा कन्टेम्पररी आणि लोकनृत्य हे दोन नृत्यप्रकारदेखील आवर्जून करते. नृत्य हे स्वत:च अनेक फायद्यांनी परिपूर्ण आहे. त्यातही हे कन्टेम्पररी आणि लोकनृत्य या दोन नृत्य प्रकारांत शरीराच्या हालचाली पुरेपूर होत असतात. त्याचा फायदा शरीर सुदृढ राहण्यासाठी अधिक होत असल्याचे तिने सांगितले.

कन्टेम्पररी, लोकनृत्य हे नृत्यप्रकार शरीराची लवचीकता राखण्यासाठी, वजन नियंत्रित ठेवण्यासाठी फायद्याचे असून त्याचबरोबर हृदय आणि फुप्फुसांना सुस्थितीत ठेवण्यासाठीही त्यांचा उत्तम प्रकारे उपयोग होतो, असे तिने सांगितले.  फुलवा स्वत:च नृत्य शिकवत असल्याने दिवसभरात तिचा व्यायाम होतो. मात्र इतर फिटनेसचे प्रकार न करता स्वत:च्या फिटनेससाठी दिवसातला काही वेळ नृत्यासाठी देत असल्याचे ती आवर्जून सांगते. आणि जेव्हा काही कारणास्तव नृत्य करणे शक्य नसेल तेव्हा शरीरासाठी व्यायाम म्हणून कमीतकमी १२ ते १५ सूर्यनमस्कार घालत असल्याचेही तिने सांगितले. नृत्य हाच खरा तिच्या फिटनेसचा मंत्र आहे, आणि फिटनेससाठी म्हणून झुम्बापासून सालसासारखे अनेक नृत्यप्रकार प्रचलित असले तरी ती स्वत: कन्टेम्पररी आणि लोकनृत्यावरच भर देते.

viva@expressindia.com

First Published on August 9, 2019 12:06 am

Web Title: phulwa khamkar mpg 94
Just Now!
X