|| तेजश्री गायकवाड

या आठवडय़ाच्या सुरुवातीलाच तुम्ही #metgala #metgala2019 #metball अशा हॅशटॅगसोबत अनेक इंटरनॅशनल तसंच काही बॉलीवूड कलाकारांची छायाचित्रं, त्यांच्या पोस्ट सोशल मीडियावर झळकलेल्या बघितल्या असतीलच. आंतरराष्ट्रीय फॅ शनकडे जगभरातील सगळ्यांच्याच नजरा नेहमी लागलेल्या असतात. आणि त्यात जर आपले भारतीय कलाकार उपस्थित राहात असतील आणि त्यांनी केलेली फॅ शन चर्चेत असेल तर..

दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘मेट गाला’ हा इव्हेंट मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात पार पडला. ‘मेट गाला’ हा इव्हेंट म्हणजे न्यू यॉर्क शहरातील ‘मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट’ येथील ‘द कॉस्च्युम इन्स्टिटय़ूट गाला’ यांच्या फॅ शन फंड रेझिंगसाठी आयोजित करण्यात येणारा कॅलेंडरमधला मोठा इव्हेंट असतो. याची सुरुवात १९४८ साली न्यू यॉर्कमधील देणगीदारांना प्रोत्साहित करण्यासाठी झाली. दरवर्षी फॅ शन, सिनेमा, संगीत अशा सगळ्याच कलाजगतातील सेलेब्रिटी एकत्र येऊन या कार्यक्रमात भाग घेतात आणि ‘द कॉस्च्युम इन्स्टिटय़ूट गाला’च्या नवीन प्रदर्शनाच्या ग्रॅण्ड ओपनिंगचा भाग होतात. या सोहळ्याचा महत्त्वाचा भाग असतो तो कार्पेट आणि त्यासाठीची थीम. यंदाची थीम छायाचित्रकार सुसान सोंटाग यांचे कॅम्पवरील १९६४ निबंध, नोट्स यावरून प्रभावित होऊन ठेवण्यात आली होती. कॅम्प – फॅ शन नोट्स अशी या वेळची या इव्हेंटची थीम होती. त्यामुळे या वर्षी इथे सहभागी झालेल्यांचे आऊटफिट्सही ‘विडंबन, विनोद, नाटकीपणा आणि अतिशयोक्ती’ यावर आधारित होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही थीमसारखाच कार्पेटचाही रंगही पिंक होता.

या थीमला साजेसा असा पोशाख अनेक सेलेब्रिटींनी केला होता. या वर्षी अमेरिकन गायिका  लेडी गागा आणि तिने रेड कार्पेटवर बदललेले चार लुक हा चर्चेचा विषय ठरला. पिंक कार्पेटवर डार्क पिंक कलरचाच मोठा गाऊन घालून लेडी गागाने प्रवेश केला. आणि काही मिनिटांतच तिने तो काढून त्याखाली घातलेला काळ्या रंगाचा गाऊन सगळयांना दाखवला. पण तेवढय़ावरच न थांबता तिने तोही गाऊन काढत तिचा स्लिमफिट पिंक रंगाचा आऊटफिट दाखवला. मेट गालाची थीमच नाटकीपणावर आधारित होती. त्यामुळे एरवीही अशाच उचापत्या करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लेडी गागाने नाटकीपणाची तिची हौस पुरेपूर भागवून घेतली. सगळ्यात शेवटी लेडी गागाने तिसरा आऊटफिट काढत तिचा फायनल मेट गाला लुक सगळ्यांना दाखवला. तिच्या फायनल आऊटफिटमध्ये तिच्या ड्रेसबरोबरच तिने घातलेले अगदीच उंच टाचांचे फुटवेअरही तितकेच हटके होते.

सेरेना विल्यम्स या अमेरिकन टेनिसपटूने तर चक्क गाऊनखाली मॅचिंग रंगाचे नाईकीचे शूज घातले होते. जिथे नेहमीच छान गाऊनखाली उंचच उंच टाचा असणारे फुटवेअर घातले जातात तिथे सेरेनाने शूज घालत वेगळं उदाहरण सेट केलं असं म्हणायला हरकत नाही. एज्रा मिलर आणि जेरेड लिटो या कलाकारांनी फेस मास्क घेऊन कार्पेटवर हजेरी लावली. एज्रा मिलर हिने हातात फेस मास्क पकडला होता आणि चेहऱ्यावर अनेक डोळे रंगवले होते. जेरेडने स्वत:च्याच चेहऱ्याचा मास्क घालून सगळ्यांना आकर्षित केलं. मायकल उरी हा कलाकार कार्पेटवर जेंडर फ्लुइड फॅ शन स्टाइलमध्ये अवतरला. जेंडर फ्लुइड फॅ शन म्हणजे तिन्ही जेंडर वापरू शकतील अशी फॅ शन. मायकलने एका बाजूला टू – पीस आणि त्यावर बो टाय घातला होता तर दुसऱ्या बाजूला छान पिंक रंगाचा गाऊन घातला होता. पण त्याने ज्या बाजूला मेन्स आऊटफिट घातला होता त्या पायात वुमेन्स फुटवेअर तर दुसऱ्या वुमेन्स आऊटफिटखाली मेन्स फुटवेअर घातले होते. त्याने ज्वेलरीही मेन्स आऊटफिटवरच घातली होती. अशा प्रकारे इंटरनॅशनल स्तरावर सब की फॅ शन एक हेच दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. गायक हॅरी एडवर्ड स्टाइल आणि अ‍ॅलेसॅन्ड्रो मिशेल या इटालियन फॅ शन डिझायनरनेही जेंडर फ्लुइड फॅ शन स्टाइलमध्येच कार्पेटवर हजेरी लावली. हॅरीने काळ्या रंगाचा लेस टॉप घातला होता आणि खाली हायवेस्ट पॅन्ट घातली होती. या आऊटफिटबरोबर त्याने घातलेले कानातले, अंगठय़ा आणि हिल्स फोकल पॉइंट बनले होते. अ‍ॅलेसॅन्ड्रोचाही आऊटफिटही असाच काहीसा होता. त्याने पिंक रंगाचा रफल्स असलेला टॉप आणि खाली पॅन्ट घातली होती, या आऊटफिटला चारचाँद लावले ते त्याने घातलेल्या हेडगेअरमुळे. त्याने डोक्यावर सुंदर बोहोमियन फ्लोलर डिझाइनचा हेडगेअर घातला होता. केटी पेरी ही अमेरिकन गायिका अनेकांची आवडती गायिका आहे. केटीने मेट गालाला झुंबर बनून तर नंतर बर्गर बनून हजेरी लावली. मोसचिनोने डिझाइन केलेल्या या ड्रेसवर अनेक खडे लावलेले होते तर डोक्यावर आणि ड्रेसच्या बाजूने झुंबर बनवून त्यात मेणबत्त्या लावल्या होत्या. टीव्ही इंडस्ट्रीतील फेमस कार्दाशियन कुटुंबही एकत्रितरीत्या कार्पेटवर आलं होतं.

आंतरराष्ट्रीय स्तरावर फॅ शनविश्वात आत्तापर्यंत यशस्वी ठरलेली अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या राय बच्चनचंच नाव घेतलं जातं. सध्या तिच्याबरोबरीने दीपिका पदुकोण, सोनम कपूर, प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ आणि अगदी कंगना राणावतही वेगवेगळ्या परदेशी सोहळ्यांमधून रेड कार्पेटवर टेचात वावरताना दिसू लागल्या आहेत. विशेषत: प्रियांका चोप्रा अभिनेत्री म्हणून हॉलीवूडमध्ये स्थिरावली असताना आणि दीपिकाचीही त्याच वाटेवरून पावले पडली असल्याने या दोघींच्या आंतरराष्ट्रीय फॅ शनवर सगळ्यांचीच नजर असते. ‘मेट गाला’ आणि त्यात या दोघींनी परिधान केलेल्या ड्रेसवरून रंगलेली चर्चा ही याच उत्सुकतेचा भाग आहे. प्रियांकाने पती निक जोनासबरोबर पिंक कार्पेटवर आपल्या फॅ शनचा जलवा दाखवला. फेअरीटेल पद्धतीच्या सिल्वर रंगाच्या गाऊनवरती तिने हेवी मेकअपसोबत हाय फॅ शन दाखवून दिली. तिने ज्वेलरी आणि फुटवेअरमध्येही सिल्वर रंगच वापरला होता. रास्पबेरी आयश्ॉडो आणि लिपस्टिकमुळे तिचा लुक परिपूर्ण झाला. नेटकऱ्यांनी मात्र तिच्या लुकला चांगलंच ट्रोल केलं असलं तरी तिचा लुक अनेक फॅ शन एक्स्पर्ट्सच्या पसंतीस उतरला. संपूर्ण लुकमध्ये टिकली लावत भारतीय टच द्यायला मात्र देसी गर्ल विसरली नाही. दीपिका पदुकोणनेही फेअरीटेल ड्रेसलाच पसंती दिली होती. ती पिंक रंगाच्या मोठय़ा गाऊ नमध्ये बार्बी डॉल बनून आली होती. मेटॅलिक फिनिश असलेल्या गाऊ नवर तिने कानातले, ब्रेसलेट आणि हेअरबॅण्ड अशा मिनिमल ज्वेलरीवर आपला लुक पूर्ण केला होता. दीपिकाचा गाऊन आणि ओवरऑल लूक लाइट असला तरी तिने डार्क मेकअप चेहऱ्यावर ठेवत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

मेट गालाच्या कार्पेटवर कधी कलाकार गरोदर असताना आवर्जून फॅ शनेबलउपस्थिती लावतात तर कधी मोठेच्या मोठे गाऊन आणि हटके आऊटफिट्स घालून अवतरतात. मग अशा पिंक कार्पेटवर प्रयोग करणाऱ्यांची चर्चा नेहमीच होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मेट गालाची चर्चा चांगलीच रंगली. तिथे हजेरी लावलेल्या प्रत्येक सेलेब्रिटी आणि त्यांनी घातलेल्या ड्रेसने सोशल मिडियावरच्या पोस्ट्स हाऊसफुल्ल झाल्या होत्या. अनेकांच्या आऊटफिट्सला थम्सअप देत तर काहींच्या आऊटफिट्सला चांगलंच ट्रोल करत हा जगातला मोठा फॅ शन सोहळा रंगला. दरवर्षी रंगणाऱ्या या पिंक कार्पेटवरची फॅ शन कधीच प्रत्यक्षात उतरत नाही, किंबहुना ती त्यासाठी नसतेच. मात्र दरवर्षी वेगवेगळ्या थीमचे आव्हान स्वीकारत काही तरी हटके प्रयोग करत तितक्याच आत्मविश्वासाने आणि टेचात वावरणाऱ्या जगभरातील तमाम कलाकारांचे कौतुक करावे तेवढे थोडेच!