29 October 2020

News Flash

क्षितिजावरचे वारे : विस्मृतीतील खलनायक

या साऱ्यावर उपाय म्हणून शास्त्रज्ञ बायोडिग्रेडेबल प्लॅस्टिकच्या निर्मितीवर संशोधन करत आहेत

क्षितिजावरचे वारे : विस्मृतीतील खलनायक

सौरभ करंदीकर

कशाला चांगलं म्हणायचं आणि कशाला वाईट, हे आपला समाज वेळोवेळी ठरवत असतो. एखादी गोष्ट वाईट ठरवणाऱ्यांचं संख्याबळ, तीच गोष्ट चांगली आहे असं समजणाऱ्यांहून अधिक भरलं की त्या गोष्टीला ‘वाईट’ असं लेबल लावलं जातं. अशी लेबलं काळाप्रमाणे बदलतात किंवा बदलली नाही तरी काही वेळापुरती त्यांच्या वाईटपणाकडे डोळेझाक केली जाते. आज जगभरात ‘करोना विषाणू’ प्रमुख खलनायकाची भूमिका पार पाडतो आहे. या खलनायकाच्या प्रवेशापूर्वी ‘प्लॅस्टिक’ हा सर्वमान्य खलनायक होता. आज वैद्यकीय क्षेत्रात, इस्पितळात, कोविड टेस्टिंग सेंटर्समध्ये इतकंच नाही तर अगदी आपल्या मास्कमध्ये, फेस शिल्डमध्ये, तसंच आपल्या घरात येणाऱ्या शेकडो डिलिव्हरी पॅक्समध्ये प्लॅस्टिक आपल्या उपयोगी पडते आहे. प्लॅस्टिकची पिशवी पकडायला कचरणारे हात आता ‘दगडापेक्षा वीट मऊ’ या न्यायाने निर्ढावले आहेत (तसे ते भर पावसाळ्यात देखील निर्ढावतातच). शासनाच्या प्लॅस्टिकविषयक निर्णयाबद्दल उत्पादकांचं एक तर ग्राहकांचं दुसरं आणि पर्यावरणाविषयी काळजी वाटणाऱ्या ग्राहकांचं तिसरं मत असतं.

परंतु विज्ञान कुठल्याही गोष्टीला चांगलं अथवा वाईट या तराजूत तोलत नाही. एखादी गोष्ट काय आहे, कशी आहे, का उद्भवते, त्याच्या चांगलं अथवा वाईट असण्यामागे काय कारणं आहेत, त्याचे तात्कालिक तसेच दूरगामी परिणाम काय आहेत, त्या परिणामांवर काय उपाययोजना करता येईल?, याचा शोध घेणं हाच खरा वैज्ञानिक दृष्टिकोन.

प्लॅस्टिकशिवाय आपलं भागलं असतं तर हा पदार्थ आपल्या जीवनातून कधीच गायब झाला असता, परंतु तसं झालेलं नाही. गरज ही शोधाची जननी असते. आपल्या प्लॅस्टिक गरजांमुळे आपल्या पर्यावरणावर दूरगामी परिणाम झाला आहे, होतो आहे, हे मान्य करावं लागेल. इतर पदार्थांप्रमाणे प्लॅस्टिकचे जैविक विघटन (बायोडिग्रेडेशन) होत नाही, म्हणजेच आपण वापरून फेकून दिलेल्या प्लॅस्टिकचं नैसर्गिकरीत्या पाणी, कार्बन डायऑक्साईडसारख्या सोप्या संयुगांमध्ये रूपांतर (सूक्ष्मजीवांच्या माध्यमातून) होत नाही. मानवी शरीर बायोडिग्रेडेबल आहे. आपला देह एक ना एक दिवस निसर्गात मिसळून जाणार आहे. परंतु आपण निर्माण केलेलं प्लॅस्टिक ५०० वर्षांंहून अधिक काळ स्वत:चा अवतार सोडणार नाही. प्लॅस्टिक नुसतं जाळून टाकलं तर त्यातून निघणारे वायू विषारी तसंच पर्यावरणाचा समतोल बिघडवणारे असतात. त्यामुळे प्लॅस्टिकचा नायनाट करण्यापेक्षा त्याचा पुनर्वापर करणे, थर्मोप्लास्टिकना (उच्च तापमानामुळे हवा तसा आकार  प्राप्त होणारी प्लॅस्टिक) वेगळी रूपं देऊन त्यांना पुन्हा मानवाच्या सेवेशी जुंपणे पसंत केलं जातं. प्लॅस्टिकवर अशा प्रक्रिया करण्यासाठी लागणारी साधनसामुग्री आणि ऊर्जा सर्व देशांना परवडणारी नसते, त्यामुळे प्लॅस्टिक कचऱ्याला डम्पिंग ग्राऊंडमध्ये पुरून टाकणे अथवा चक्क समुद्रात भिरकावून देणे, असले चुकीचे पर्याय नाइलाजाने निवडावे लागतात.

आज जगभरात एका वर्षांत दरडोई ५० किलो प्लॅस्टिक निर्माण होते आहे. पुढच्या दहा वर्षांंत हे प्रमाण दुप्पट होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. प्लॅस्टिकसदृश, परंतु पूर्णत: नैसर्गिक पदार्थांचा उपयोग ख्रिस्तपूर्व १६०० सालापासून केला जात असे, परंतु मानवनिर्मित प्लॅस्टिकची पहिली निर्मिती १८५६ साली (पारकेसीन — नायट्रोसेल्युलोज) केली गेली. पूर्णपणे कृत्रिम प्लॅस्टिक प्रथम निर्माण करण्याचं श्रेय बेल्जियन शास्त्रज्ञ लिओ बेकलँड याला जातं. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला त्याने ‘बेकलाइट’ नावाचे प्लॅस्टिक फिनॉल आणि फॉर्माल्डिहाईड यांचा वापर करून निर्माण केलं.

१९५६ नंतरच्या दशकात प्लॅस्टिकचा वारेमाप वापर होत गेला.  एका अंदाजानुसार १९५० पासून जवळजवळ एक अब्ज टन प्लॅस्टिक कचरा आपण निर्माण केला आहे, ज्याचा पुनर्वापराचा दर फक्त ९ टक्के आहे. भारतात वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकमध्ये पॅकेजिंगचं प्रमाण सुमारे ५४ टक्के इतकं आहे. म्हणूनच आपल्या सरकारने लोकोपयोगी प्लॅस्टिक पिशव्यांवर अंकुश आणला आहे. मात्र बलाढय़ औद्योगिक कंपन्या त्यांच्या उत्पादनाच्या पॅकेजिंगमध्ये प्लॅस्टिकचा कितीतरी अधिक वापर करतात. चोर सोडून  संन्याशाला फाशी देण्याचा हा प्रकार आहे (प्लॅस्टिकचा पुनर्वापर शिकायचा असेल, तर एक प्लॅस्टिकची पिशवी आपल्या मध्यमवर्गातील कुटुंबं कशी वर्षांनुवर्षे वापरतात ते साऱ्या जगाने पाहावं आणि त्यातून बोध घ्यावा!).

या साऱ्यावर उपाय म्हणून शास्त्रज्ञ बायोडिग्रेडेबल प्लॅस्टिकच्या निर्मितीवर संशोधन करत आहेत. परंतु आता उपलब्ध असलेल्या बायोडिग्रेडेबल प्लॅस्टिकचं विघटन करायचं असेल तर काही विशेष खर्चीक प्रक्रिया कराव्या लागतात. अशा प्लॅस्टिकचा कचरा डम्पिंग ग्राऊंडमध्ये पुरला तर त्यामुळे निर्माण होणारे मिथेनसारखे वायू पर्यावरणाला अधिक घातक ठरतील, अशी उलटी परिस्थिती आहे. शिवाय अशा प्लॅस्टिकच्या उत्पादनात वापरली जाणारी ऊर्जा, पाणी, संसाधनं या साऱ्याचा हिशेब आज तरी जुळत नाहीये. रोगापेक्षा उपाय जालीम, अशी परिस्थिती आहे.

विज्ञान प्रवाही आहे. तंत्रज्ञान प्रगतिशील आहे. आज प्लॅस्टिक—प्रश्नावर समाधानकारक उत्तर नसलं तरी ते क्षितिजावर मात्र नक्कीच आहे. परंतु तूर्तास तरी आपल्या प्लॅस्टिक वापरावर निर्बंध ठेवणं, त्याचा पुनर्वापर करणं या उपायांकडे पाहावं लागेल. राज्यकर्त्यांंनी बायोडिग्रेडेबल प्लॅस्टिकच्या संशोधनावर भर दिला पाहिजे. या तंत्रज्ञानात मोठी गुंतवणूक केली पाहिजे. ‘प्लॅस्टिकच्या अमुक एका प्रकाराचंच समूळ उच्चाटन करू’ वगैरे कल्पना मात्र तितक्याशा कामाच्या नाहीत.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2020 12:19 am

Web Title: plastic reuse creative ways to reuse and recycle plastic zws 70
Next Stories
1 ‘बाई’कगिरी!
2 सदा सर्वदा स्टार्टअप : अपडेट्सचा पाठपुरावा!
3 ‘नथिं’ग रॉन्ग
Just Now!
X