नव्या पिढीचा गायक, संगीतकार, हरहुन्नरी युवा कलाकार सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!

येत्या १६ तारखेला आपल्या गुलज़ार साहेबांचा वाढदिवस आहे; आणि गुलज़ार साहेबांना १०० टक्के लॉयल असणाऱ्या, ‘एक-कवी-व्रती’ अशा विशाल भारद्वाज यांचा वाढदिवस मागच्या आठवडय़ात (७ तारखेला) होऊन गेला. या जोडीने एक से एक अशी वेगळ्या वळणाची गाणी आपल्याला दिली आहेत आणि अशी आडवळणाची गाणीसुद्धा हिट होऊ शकतात; दीर्घकालापर्यंत श्रोत्यांच्या लक्षात राहू शकतात हे सिद्ध करून दाखवले. गुलज़ार! या नावातच सगळं आलं. विशाल भारद्वाज – ‘मकडी’, ‘ब्लू अंब्रेला’पासून ‘ओमकारा’, ‘मक़बूल’, ‘हैदर’सारखे चित्रपट दिग्दíशत करणारा संगीतकार! या दोन वल्ली एकत्र बसून जेव्हा गाणी बनवत असतील, ती प्रक्रिया काय भन्नाट असेल नाही? मला वाटतं, हे दोघे नुसतं गप्पा मारत बसत असतील आणि गाणी आपोआप बनत जात असतील..! खरंच ‘छोड आये हम वह गलियां’च्या वेळी या दोघांमध्ये काय चर्चा घडली असेल? आणि ‘चप्पा चप्पा चरखा चले’? किंबहुना ‘माचिस’ची सगळीच गाणी! माझे सर्वात आवडते- दीदींनी गायलेले ‘पानी पानी रे..’ चाल लावताना, (विशेषत: करुण रसाच्या, विरह रसाच्या गाण्याची), विशाल सर ‘मिंड’चा (म्हणजे गोलाकार स्वररचनांचा, एका स्वरावरून दुसऱ्या स्वरावर जाताना, खास करून खाली येताना मधले सगळे सूर स्पर्शण्याचा प्रकार) जेवढा सुंदर वापर करतात, तेवढा सुंदर दुसऱ्या कोणालाच जमणार नाही. अजून काही उदाहरणे म्हणजे ‘इश्किया’ मधले ‘बडम्ी धीरे चली रैना’, आणि ‘चाची 420’ मधले ‘एक वो दिन भी थे.’ या गाण्यांच्या निमित्ताने आपल्याला रेखा भारद्वाज या अनोख्या, मुलायम आवाजाच्या गायिकेशी ओळख झाली. या गायिकेची सौम्य, सूफी गाणी गाणारी गायिका अशी ओळख बनवून तीच पुढे ‘जुबां पे लागा’ (ओमकारा) तून मोडून टाकली! विशाल-गुलज़ार जोडीने प्रचलित केलेला अजून एक असा आवाज म्हणजे राहत फ़तेह अली खान. ‘ननो की मत मानियो रे..’ जेव्हा आले, तेव्हा सूफी गाण्यांची लाट तेवढी विस्तारली नव्हती. या गाण्यानंतर मात्र खूप काळापर्यंत म्युझिक अल्बम हिट करायचा असल्यास राहत साहेबांचे एक तरी सूफी गाणे पाहिजेच पाहिजे असा अलिखित नियमच बॉलीवूडमध्ये होता आणि हाच ट्रेंड विशाल साहेबांनी मोडीत काढला, तो ‘दिल तो बच्चा है जी’ या गाण्याद्वारे. राहत साहेबांच्या आवाजात असे गाणे बनवण्याचा विचार कोणाच्या मनात येऊ शकतो का? राहत साहेबांनासुद्धा तोपर्यंत माहीत नसेल की आपण असे काही गाऊ शकतो!
तसेच सुरेशजी वाडकरांना असे कधी स्वप्नात तरी वाटले असेल का, की आपण गायलेले एक गाणे लोक दहीहंडी आणि गणेशोत्सवात एवढे डोक्यावर घेतील, की ते ‘मिरवणूक अँथम’ बनेल? ‘ओंकार स्वरूपा’ कुठे आणि ‘सपनोमे मिलती है’ कुठे! मुळात विशाल-गुलज़ार जोडीकडून ‘सपनोमे मिलती है’ सारख्या मजेदार गाण्याची अपेक्षा कोणीच केली नसेल. हे कमी की काय, म्हणून ‘गोली मार भेजेमे’ हे भन्नाट गाणे ही जोडी याच सिनेमातून घेऊन आली.
विशाल भारद्वाजने बॉलीवूडला दिलेला असाच अजून एक सुंदर आवाज म्हणजे स्वत: विशाल भारद्वाज! ओमकारामधले श्रेयाबरोबरचे ‘ओ साथी रे’, ‘कमीने’मधले ‘कमीने’, अणि मला फारच आवडणारे ‘सात खून माफ’मधले ‘बेकरां’.. विशालसाहेब जेव्हा गातात तेव्हा असं वाटतं की कोणीतरी गुपचूप, हळुवारपणे कानात गुजगोष्टी करत आहे.
या जोडीच्या यादीत सदैव असणारा अजून एक आवाज म्हणजे सुखिवदर सिंग. ‘ओमकारा’मधल्या ‘धम धम धडम धडम्ैया रे’ या गाण्यात भीतीयुक्त आदराची भावना आणण्यासाठी सुखिवदरच्या वेगळ्याच पद्धतीच्या कंपनांचा फार सुंदर वापर केला गेला आहे. ‘बीडी जलइले’, ‘इब्न ए बतूता’, ‘ढँ टॅ ढॅण’, ‘मटरू के बिजली का मंडोला’ अशी अनेक हिट गाणी सुखिवदरने या जोडीसाठी गायली आहेत.
हरिहरननेसुद्धा ‘दौडम दौडम भागा भागा सा’, ‘गारे डोरे’, ‘चप्पा चप्पा’ , ‘छै छप छै’ सारखी मस्त गाणी या जोडीकडे गायली आहेत. ‘चाची 420’ मधे ‘माकारीना’ हे कमालीचे अफलातून गाणे एका म्हातारीच्या आवाजात गाणाऱ्या कमल हसनचे नावसुद्धा या यादीत समाविष्ट करावेच लागेल. ‘माकारीना’मध्ये आशाताईंचे नाव विसरून कसे चालेल. धमाल केलीय या गाण्यात सगळ्यांनी मिळून. ‘चुपडी चुपडी चाची’ हे असेच एक भारी गाणे. काय धम्माल गाणे आहे हे! जॅझचा फील, सुंदर कोरस आणि काय कमाल लिहिले आहे! ‘चाची तमाम चाचियोंकी आखरी कडी है, चाचीने पहले पन्नेसे ये जिंदगी पढी है..’ किंवा ‘चाची के पास मुश्किलों की सारी चाबियां है, सोसायटी में जानती है क्या खराबियां है..’ सलाम! हे गाणे गाणाऱ्या आदित्य नारायणचा आणि कोरसमधल्या श्रुती हसनचासुद्धा या गायकांच्या यादीत समावेश करावा लागेल. .. माझंच नाव दिसत नाहिये अजून.. वाट बघतोय..
जसराज जोशी- viva.loksatta@gmail.com

हे ऐकाच.. नो स्मोकिंग

बॉलीवूडमधल्या अत्रंगी (अब्सर्ड) चित्रपटांच्या यादीत अग्रगण्य असलेल्या ‘नो स्मोकिंग’ या अनुराग कश्यपच्या चित्रपटाला विशाल भारद्वाजचे संगीत आणि अर्थातच गुलज़ार साहेबांची गीतरचना आहे. हा सिनेमा कोणालाच (मलाही फारसा) कळला नाही. त्यामुळे विस्मृतीत गेला आणि त्याचे संगीतही. पण हा अल्बम फार भारी आहे. ‘धूम्रपान’ या विषयाभोवतीच फिरणारे शब्द आणि त्या नशेला विचारात घेऊन लावलेल्या चाली असलेला हा अल्बम माझ्या सर्वात आवडत्या अल्बम्सपकी एक आहे. रेखा भारद्वाज आणि सुखिवदर यांनी गायलेले ‘फूँक दे’, देवा सेन गुप्ताचे ‘ये अ‍ॅश ट्रे’, विशालजी, सुखिवदर, दलेर मेहंदी यांचे ‘कश लगा’ आणि अदनान सामीने गायलले जॅझ स्टाइलचे ‘जब भी सिगरेट जलती है’. सगळीच गाणी अनवट तरीही श्रवणीय. अज्जिबात चुकवू नयेत.