हाय मृण्मयी,
एमबीए केलंय. मला लेटेस्ट फॅशननुसार कपडे वापरायला आवडतात. माझी उंची ५.३ फूट आहे आणि वजन ७९ किलो आहे. मी वर्णानं गोरी आहे. माझ्या जाडीमुळे मला बऱ्याचदा परफेक्ट फॅशनचे कपडे निवडायला कठीण जातं. ड्रेस किंवा साडी निवडतानासुद्धा मर्यादा येतात आणि गोंधळ उडतो. मला प्लीज गाइड करा.    – श्वेता, कोल्हापूर
प्रिय श्वेता,
तू दिलेल्या वर्णनावरून तुझ्या बाबतीत वजन हा एकच प्रश्न आहे, असं दिसतं. तुझी उंची तशी ठीक आहे. पण त्याला योग्य असं वजन नाही. आता अशा परिस्थितीत आपल्याला दोन गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. एक – तू शक्य तेवढी उंच दिसशील असा प्रयत्न करायचा, जेणेकरून तुझ्या जाडीला ते योग्य वाटेल आणि दुसरं – तू शक्य तेवढी बारीक कुठल्या आणि कशा गारमेंट्समध्ये दिसशील त्याचा विचार करायचा. फॅशन पॅशन सदरात मी मागे लिहिल्याप्रमाणे ऑप्टिकल इल्युजनचा चातुर्यानं वापर करायला हवा. म्हणजेच वैशिष्टय़पूर्ण कपडय़ांमुळे हवा तसा आभास निर्माण करता येतो.
प्रथम रंगाचा विचार करू. तुझ्यासाठी रंग सुचवणं सोपं आहे. कारण तू गोरी आहेस. त्यामुळे तुला चांगले दिसणार नाहीत, असे रंग जवळजवळ नाहीतच. फक्त स्किन कलरचे कपडे घालणं टाळ. तुझ्या स्किनटोनला जवळ जाणारा रंग वापरू नकोस. तुझ्यासाठी गडद रंग चांगले दिसतील. कारण डार्क रंगाच्या कपडय़ात तू बारीक दिसशील.
दुसरा महत्त्वाचा भाग आहे कापड. डिझायनिंगमध्ये कपडा कुठला वापरला हे महत्त्वाचं ठरतं. तुझ्यासाठी हलक्या वजनाचं कापड चांगलं. थिन कॉटन, लिनन, जॉर्जेट, शिफॉन यामुळे शरीराची स्थूलता नजरेत येत नाही. ट्रान्सपरंट कापडामुळे बारीक दिसायला होतं. पण चकचकीत किंवा बल्की कापड निवडू नकोस. वेलवेट, सॅटिन, निट वेअर, हेवी ज्यूट या प्रकारचे कपडे टाळायला हवेत.
आता प्रिंट्स किंवा सजावटीबाबत बोलू या. मी नेहमी सांगते त्याप्रमाणे व्हर्टिकल लाइन्सच्या डिझाइनमुळे व्यक्ती स्लिम दिसते. डायगोनल लाइनमधल्या डिझायनर वेअरला पसंती दिलीस तर उपयुक्त ठरेल. उदाहरणार्थ लेहरियामध्ये तू बारीक दिसशील. तू बोल्ड प्रिंटचं डिझाइन मात्र टाळायला हवंस. त्यामुळे जाड दिसायला होईल. कपडय़ाच्या कट्सविषयी सांगायचं तर स्ट्रेट कट स्थूल व्यक्तींसाठी नेहमी उपयुक्त ठरतात. ए- लाइन किंवा अनइव्हन कटसुद्धा चांगले दिसतील.
कुठल्याही प्रकारच्या कपडय़ांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेव. गळा नेहमी मोकळा हवा आणि स्लीव्ह्ज शॉर्ट ठेवाव्यात. तू बंद गळा किंवा अधिकाधिक हात झाकणाऱ्या बाहय़ा शिवल्यास तर त्यामध्ये तुझी उंची कमी दिसणार आणि अर्थातच त्यामुळे तू स्थूल दिसू शकशील. योक असलेले कपडे वापरायचा सल्ला मी देईन. त्यामुळे व्यक्ती थोडी बारीक दिसते. तुला सलवार कमीझ आवडत असेल तर अँकल लेंथ लेगिंग्ज आणि वर पोटऱ्यांपर्यंत उंचीची कुर्ती असं कॉम्बिनेशन ट्राय करून बघ. कधी कधी सणासुदीला अनारकली पॅटर्न वापरायला हरकत नाही. सध्याची लेटेस्ट फॅशन म्हणजे अनइव्हन हेम. पुढे आखूड आणि मागच्या बाजूला लांब कुर्त्यांची फॅशन सध्या आहे. त्यामुळे उंचीचा आभास निर्माण होईल. ते वापरायला हरकत नाही. साडीच्या बाबतीत तू शिफॉनच्या सुंदर साडय़ा निवडू शकतेस. पण त्या बारीक बॉर्डरच्या आणि बारीक नक्षी असलेल्या हव्यात. बोल्ड प्रिंट नको आणि स्कर्ट बॉर्डरसुद्धा टाळायला हवी.
हेअरस्टाइलसुद्धा सुयोग्य हवी. तुझे केस मोठे असतील तर वरती उंच पोनी टेल घाल किंवा अंबाडा घाल. नाही तर क्लचरनं थोडेसे केस घेऊन बांध आणि बाकी मोकळे सोड. यामुळेसुद्धा उंचीचा आभास निर्माण होतो. मानेवर अंबाडा किंवा वेणी घातल्यानं तो होणार नाही.

तुमचे प्रश्न पाठवा
तुमच्या फॅशनविषयीच्या शंका आमच्याकडे पाठवा. फॅशन स्टायलिस्ट मृण्मयी मंगेशकर त्यांना या सदरातून उत्तर देतील. सब्जेक्टलाईनमध्ये फॅशन पॅशन लिहायला विसरू नका. आमचा आयडी- viva.loksatta@gmail.com