स्वप्निल घंगाळे

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्ष आपल्या आपल्या पद्धतीने मतदारांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात आहेत. प्रत्येक जण वेगवेगळ्या बातम्यांवर आणि राजकीय घडामोडींवर आपलं मत देताना दिसतात. मात्र असं असतानाच व्हच्र्युअल जगातील या मतप्रदर्शनामुळे खऱ्या आयुष्यात मतभेद होण्याचं प्रमाण वाढताना दिसतं आहे.

सध्या निवडणुकींचा काळ असल्याने सभा, प्रचार, भाषणे यांच्याबरोबरच समाजमाध्यमांवरही जगातील सर्वात मोठय़ा लोकशाहीच्या उत्सवाचे संवाद रंग दिसून येत आहेत. अनेक राजकीय पक्ष आपल्या आपल्या पद्धतीने मतदारांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात आहेत. प्रत्येक जण वेगवेगळ्या बातम्यांवर आणि राजकीय घडामोडींवर आपलं मत देताना दिसतात. मात्र असं असतानाच व्हच्र्युअल जगातील या मतप्रदर्शनामुळे खऱ्या आयुष्यात मतभेद होण्याचं प्रमाण वाढताना दिसतं आहे. खास करून शहरी भागामध्ये जेथे इंटरनेट मोठय़ा प्रमाणात वापरलं जातं तेथे तेही तरुणाईकडून सोशल नेटवर्किंगवरील राजकीय मतभेदांमुळे खऱ्याखुऱ्या आयुष्यातील नात्यात कटुता वाढत असल्याचं नुकतंच ‘इपसोस’ या कंपनीने बीबीसीसाठी केलेल्या सर्वेक्षणामधून समोर आलं आहे.

विरोधी राजकीय मतं असणारे समाजमाध्यमांवरील मित्र हे संवाद साधण्यास योग्य नाही, असं मत जगभरातील २४ टक्के नेटकऱ्यांनी नोंदवलं आहे. भारतामध्ये असं मत असणाऱ्या नेटकऱ्यांचा आकडा ३५ टक्के इतका आहे. विशेष म्हणजे ऑनलाइन जगातील मतभेद वास्तव आयुष्यात गांभीर्याने घेत नात्यावर परिणाम होण्यापर्यंतचं प्रमाण भारतामध्ये सर्वाधिक आहे. केवळ सर्वेक्षणात सहभागी झालेल्या मोजक्या तरुणांचंच असं मत आहे असं नाही तर बहुतांशी नेटकरी कधी ना कधी अशा प्रकारच्या वैचारिक गोंधळाला सामोरे गेल्याचं मान्य करतात.

जोड अनुभवाची!

या सर्वेक्षणावरची चर्चा इथे महत्त्वाची ठरतेय कारण, समाजमाध्यमांवरील राजकीय संवादाचं वास्तवातही नात्यांवर विपरीत परिणाम होत असल्याचा अनुभव आल्याचं अनेक तरुणांचं म्हणणे आहे. राजकीय मतभेद असणाऱ्या मित्रमैत्रिणींशी समाजमाध्यमांवर झालेल्या वादांमुळे प्रत्यक्षातही ही नाती दुभंगली असल्याचं अनेकांनी सांगितले. या वादांचा शेवटही अनेकदा एकमेकांना ब्लॉक करणं, ऑनलाइन आणि ऑफलाइन संवाद थांबवणं अशाच पद्धतीने होतो. याबद्दल बोलताना ‘हिपहॉप’ तसंच इतर काही कार्यक्रम आयोजित करणारा विराट पवार म्हणतो, ‘सुरुवातील मी समाजमाध्यमांवर राजकीय मतं व्यक्त करायचो. पण त्यावरून कमेन्टसमध्ये चांगलीच वादळी चर्चा रंगायची. या चर्चेतून इतरांचं मनोरंजन व्हायचं पण विरोधी मत असणाऱ्या मित्रांनी मला ब्लॉक करण्यास सुरुवात केल्यानंतर याचं गांभीर्य मला समजलं. मी लोकांना एकमेकांशी जोडून घेण्याच्या उद्देशाने फेसबुकसारखे माध्यम वापरतो, पण राजकीय विचारसरणीमुळे लोक मलाच ब्लॉक करणार असतील तर त्याचा माझ्या फ्रेण्डसर्कलमधील मित्रांबरोबर मलाही आर्थिक फटका बसतो. समाजमाध्यमावर असण्याच्या माझ्या मूळ उद्देशालाच धोका पोहचतो. म्हणून मी आता समाज माध्यमांवर राजकीय मतप्रदर्शन करणं बंद केलं आहे. माझ्या एकटय़ाच्या समर्थनाने किंवा विरोधाने काही होणार नाही. प्रत्यक्षात भेटल्यावर आजही मी राजकीय विषयावर चर्चा करतो, पण आता समाजमाध्यमांवर राजकीय विषयांपासून लांबच राहतो. माझी राजकीय विचारसरणी माझ्याजवळ आणि त्यांची त्यांच्याजवळ हे धोरण मी सध्या अवलंबलं आहे.’ विराटसारखे अनेक तरुण आहेत जे समाजमाध्यमांसारख्या व्यक्त होण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या मंचावरून राजकीय घडामोडींवर भाष्य करणं टाळू लागले आहेत. एका विशिष्ट पक्षाचे किंवा नेत्याचे समर्थन करणारे फ्रेण्ड्स जास्त असल्यास ते सर्व मिळून एखाद्या पोस्टवर आपल्याला ट्रोल करतील अशी भीतीही आता अनेकांना वाटू लागली आहे.

‘हल्ली समाजमाध्यमांवर आपण एखाद्या राजकीय मुद्दय़ाच्या बाजूने उभे राहिल्यास फ्रेण्डलिस्टमधल्या विशिष्ट एका वर्गाला राग येतो असं माझं निरीक्षण आहे,’ असं आदित्य बिवलकर हसतच सांगतो. रागाच्या भरात लोक पुढचा-मागचा विचार न करता सरळ एखाद्याला ब्लॉक करतात किंवा अनफ्रेण्ड करतात. ‘अचानक मला एखादी व्यक्ती फेसबुकवर सापडेनाशी होते तेव्हा मला तिने ब्लॉक केल्याचं समजतं, असं लोक राजकीय मतं ही मनाला खूप लावून घेतात असं मला वाटतं. मीसुद्धा आता एखाद्या विशिष्ट पक्षाबद्दल किंवा नेत्याबद्दल अवाजावी पोस्ट शेअर करून उगाच माझ्या न्यूजफीडमध्ये उच्छाद मांडणाऱ्यांना अनफ्रेण्ड आणि ब्लॉक करू लागलोय. या ब्लॉक केलेल्यांच्या यादीत अगदी दहावी पासपासून ते काही पदव्या घेतलेल्या अतिशिक्षितांचाही समावेश आहे,’ अशी कबुली आदित्य देतो. ब्लॉक किंवा अनफ्रेण्ड करून प्रश्न सुटतो का तर याला आदित्य ‘नाही प्रश्न सुटत नाही, पण तुम्ही या वादावादीतून नक्की सुटता. त्यांच्या पोस्ट आपल्याला दिसत नाहीत हेच या प्रश्नाचं उत्तर आहे असं मला वाटतं,’ असं आदित्य म्हणतो. हे असं विरोध करणारं चित्र बहुतांशी ठिकाणी दिसत असलं तरी एखाद्या पक्षाला किंवा नेत्याला पूर्ण पाठिंबा देणाऱ्यांचेही ग्रुप असतात. ‘आम्हा काही मैत्रिणींचा एका ग्रुप आहे ज्यामध्ये आम्ही सर्वच जणी एकाच विचारसरणीच्या आहोत. त्यामुळे तेथे होणाऱ्या चर्चामधून एकाच विचारसरणीचे अनेक पैलू प्रत्येकीच्या दृष्टिकोनातून समजतात,’ असे गायत्री रेडे सांगते.

या संवादाचं करायचं काय?

अनेकदा रागाच्या भरात काही जण या वादांवरील जालीम उपाय म्हणून थेट ब्लॉक करणं किंवा अनफ्रेण्ड करत नात्यालाच पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतात. पण काही जण या वादाला नातं तोडणं हा उपाय नसल्याचे सांगत आपल्या पद्धतीने या सगळ्याशी ‘डील’ करतात. सांगायचंच झालं तर उपहासात्मक पद्धतीने उत्तर देणं. याला नेटकऱ्यांच्या भाषेत सरकॅझम असं म्हणतात. एखाद्या राजकीय वक्तव्यावर चीडचीड करण्याऐवजी त्या पोस्टवर उपहासात्मक कमेंट करून समोरच्याच्या वक्तव्यातील हवाच काढून टाकण्याचा हा सर्वात सोप्पा उपाय आहे. वाचून सोडून देणं हा दुसरा पर्याय. मी माझं मत मांडलं असं म्हणत त्या खाली कोणतीही कमेंट आली तरी त्यावर उत्तर न देण्याची भूमिका काही जण घेतात. मात्र काही जण अगदी चिकाटीने राजकीय पोस्टखालील कमेंट सेक्शनमध्ये वादविवाद स्पर्धेप्रमाणे लांबलचक मतं मांडत असतात. काही जण आकडेवारीच्या आधारे बोलतात तर काही जण भावनिक मुद्दय़ांना हात घालतात. काही जण गुगलवरून माहिती शोधून कॉपी पेस्ट करतात तर काही जण आपले अनुभव मांडतात. मात्र अशा लांबलचक चर्चामध्ये दोघांचं भांडण तिसऱ्याचा टाइमपास अशा पद्धतीने अनेक जण वाद घालणाऱ्या दोघांच्या कमेंट लाइक करत असतात. नेटकऱ्यांच्या भाषेत सांगायचं तर हे चौकातील भांडणासारखा प्रकार असतो. येणारे जाणारे बघतात, थोडा वेळ थांबतात आणि चालू लागतात, पण भांडण सोडवण्याचा कोणी प्रयत्न करत नाहीत. अशा लांबलचक चर्चा खासगीत करण्याचा आणखीन एक पर्याय म्हणजे त्या पोस्टखालीच ‘व्हॉट्सअपवर भेट’ असं म्हणत नाक्यावरील भांडण बंद चॅटबॉक्समध्ये करणं. थोडय़ात काय तर जितके विषय तितक्याच तो विषय हाताळण्याच्या पद्धती तरुणाईने आत्मसात केल्या आहेत. त्यामुळे ही शाब्दिक टोलवाटोलवी त्रयस्थांसाठी फुल ऑन एंटरटेनमेंट असते हे मात्र खरे.

लेखाच्या शेवटी इतकच सांगता येईल की, निवडणुका आणि राजकीय पक्षांवरून असणाऱ्या मतमतांतरांचा वास्तव आयुष्यातील नात्यांवर परिणाम होऊ  देणे ‘बॉस कुछ जादा हो गया’ प्रकारातील आहे. त्यामुळेच दोन शब्द ऐकवा, तीन ऐकून घ्या आणि गुण्यागोविंदाने आपल्याला लोकशाहीने दिलेल्या प्रत्येकाच्या व्यक्तिस्वातंत्र्याचं समाजमाध्यमांवर वावरतानाही भान ठेवा. सोशल नेटवर्किंगवर सोसेल तितका संवाद करा आणि वाद टाळा.

काय सांगतेय सर्वेक्षण?

‘इपसोस’ने घेतलेल्या या सर्वेक्षणामध्ये २६ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीमध्ये २७ देशांमधील २० हजार जणांनी सहभाग घेतला. भारतामधून या सर्वेक्षणात सहभागी झालेले तरुण हे शहरी भागातील, सुशिक्षित होते असं या पॅरिसमधील सव्‍‌र्हे करणाऱ्या कंपनीने नमूद केलं आहे. सर्वेक्षणामधील ४४ टक्के भारतीय तरुणांनी विरोधी राजकीय मतं असणाऱ्या व्यक्तींबद्दल मत नोंदवताना, ‘त्या लोकांबद्दल आम्हाला काहीही वाटत नाही,’ असे मत नोंदवलं. जागतिक स्तरावर हीच आकडेवारी ३१ टक्के होती. ४३ टक्के तरुणांनी राजकीय विरोधक असणाऱ्यांना देशाची काळजी नसल्याचं मत व्यक्त केलं आहे. हीच आकडेवारी जागतिक स्तरावर अवघी २८ टक्के इतकी आहे. राजकीय विरोधक हे देशाच्या विरोधात असतात असं माननणाऱ्या देशांच्या यादीमध्ये भारताच्या वर केवळ तुर्कीचा (४६ टक्के) क्रमांक लागतो. असं असलं तरी आठवडय़ातून एकदा तरी आपल्या विरोधात मत असणाऱ्यांशी चर्चा करून आपला मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीयांची संख्या ५६ टक्के इतकी आहे तर जागतिक स्तरावर हा आकडा केवळ ३५ टक्के इतका आहे.

एकीकडे आपापसात वाद असले तरी ६३ टक्के भारतीयांनी फेसबुक आणि ट्विटरसारख्या माध्यमांमुळे सामान्य जनता आणि सत्ताधाऱ्यांमधील संवाद अधिक सुखकर झाल्याचं म्हटलं आहे.