News Flash

चाकावरची चाल!

एक चप्पल एरोप्लेन टायरची आणि दुसरी ट्रक टायरची बनवली.

तेजश्री गायकवाड

शिक्षण घेता घेता लक्षात आलेल्या समाजातील मोठय़ा समस्येबद्दल काही तरी करावं या हेतूने पुण्याच्या पूजा आपटे-बदामीकर या तरुणीने टायरपासून चप्पल बनवायला सुरुवात केली.

पुण्यातल्या एका तरुणीने ‘इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन्स’मध्ये इंजिनीअरिंग पूर्ण केलं आणि आयटी कंपनीमध्ये नोकरी सुरू  केली. नोकरी सांभाळून तिने दिल्लीच्या विद्यापीठातून ‘रिन्युएबल एनर्जी’ या विषयात पोस्ट ग्रॅज्युएशनही सुरू के लं. आणि याच अभ्यासादरम्यान तिला जगभरात सुरू असलेल्या जुन्या वापरलेल्या टायरमधून होणाऱ्या प्रदूषणाच्या समस्येबद्दल माहिती मिळाली. या समस्येवर मात करण्यासाठी आपण काही करू शकतो का? याची चाचपणी म्हणून तिने त्यासंबंधित संशोधनाला सुरुवात  के ली. तिच्या या अभ्यास-संशोधनातूनच ‘नेमितल’ नावाचं अभिनव स्टार्टअप आकाराला आलं. या तरुणीचं नाव आहे पूजा आपटे-बदामीकर.

‘जगभरात बिलियन टन एवढा कचरा फक्त टायरचा आहे. जो निसर्गासाठी नक्कीच घातक आहे. मग या टायरचं करायचं काय?  हा प्रश्न उभा राहतो. शिकत असताना मला याविषयी खूप माहिती मिळाली, मी खूप लोकांना भेटले. सतत मार्के टमध्ये येणाऱ्या या टायरचं काम संपलं की पुढे काहीच होत नाही, ते असेच पडून राहतात हे माझ्या लक्षात आलं. दरवर्षी साधारणपणे एखादा टक्काच टायर रिसायकल होतात. दरवर्षी हा टक्का थोडय़ाफार फरकानेच बदलतो. म्हणून मग मी टायरवर अभ्यास सुरू केला’, असं पूजा सांगते. सुरुवातीला तिने टायरपासून टाइल्स बनवायला सुरुवात केली. वेगवगळ्या ठिकाणी जाऊन प्रयोग केले, परंतु नंतर तिच्या लक्षात आलं की, ते प्रॉडक्ट आधीच बाजारात आलं आहे. ‘मला असं काहीतरी बनवायचं होतं जे आपल्याला रोजच्या आयुष्यात वापरता आलं पाहिजे. आणि टायर थेट कटिंग करून त्यावर कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा वापर न करता त्याचं काहीतरी करता आलं पाहिजे, हे मी ठरवलेलं होतं. अभ्यास करताना मला काही आफ्रिकन व्हिडीओ मिळाले, ज्यात टायरवर पाय ठेवला की त्याच्या आकारानुसार ते कापून त्याच्या चप्पल बनवून दिल्या जात होत्या.  पण आपल्याकडे अशा प्रकारच्या चपला कोणी वापरू शकणार नाही हे मी जाणून होते’, असं ती सांगते. पूजाला माहिती होतं की या चप्पलमध्ये असं काहीतरी आणलं पाहिजे जे त्याच्या डिझाईनमध्ये ट्रेण्डी असेल आणि त्यात कम्फर्टही असला पाहिजे. मग तिने त्या दिशेने पुन्हा एकदा संशोधन सुरू केलं. ‘ मी प्रोटोटाईप बनवायचं ठरवलं. मी लोकल चांभार कारागीर असतात त्यांना भेटी दिल्या. त्यांच्यासमोर हा प्रस्ताव ठेवला. सुरुवातीला अनेकांकडून नकाराची घंटा वाजली, पण सरतेशेवटी खूप शोधल्यानंतर एक कारागीर तयार झाला. मी दोन दिवस त्यांच्याबरोबर रस्त्यावर बसून दोन चप्पलचे प्रोटोटाईप  बनवून घेतले. एक चप्पल एरोप्लेन टायरची आणि दुसरी ट्रक टायरची बनवली. त्याला सुशोभित करण्यासाठी कापडही मी वेस्ट मटेरियलचं घेतलं. बुटिकमध्ये उरलेल्या कापडांच्या तुकडय़ाचा मी त्यासाठी वापर केला’, अशी माहिती पूजाने दिली.

हे प्रोटोटाईप बनवायची प्रक्रिया सुरू असताना, त्यादरम्यान पूजाला ‘महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी’च्या ‘स्टार्टअप यात्रा’ या स्पर्धेबद्दल समजलं. तिने २०१८ सालच्या स्टार्टअप यात्रेमध्ये भाग घेतला आणि शेवटी तिने तिच्या या भन्नाट कल्पनेच्या जोरावर ती स्पर्धा जिंकली. तिला ‘अपकमिंग वुमन आंत्रप्रेन्योर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. याबद्दल ती सांगते,  ‘मी एके क करत ‘स्टार्टअप यात्रा’च्या सगळ्या फेऱ्या जिंकले. मला त्या स्पर्धेने खूप फायदा झाला. स्पर्धेसाठीच्या मेंटॉरने खूप गाईड केलं. मला त्यांच्याकडूनच या कल्पनेच्या जोरावर एक उत्तम व्यवसाय उभारता येऊ शकतो  हे समजलं. त्यानंतर मी फूटवेअर इंडस्ट्रीबद्दल अभ्यास करायला सुरुवात केली’. या दरम्यान पूजा खूप ठिकाणी फिरली, अनेक लोकांना भेटली. पुढे तिने तिचा ‘नेमितल’ हा ब्रॅण्ड  सुरू केला. ‘नेमितल’ हा संस्कृत शब्द आहे. ‘नेमि’ म्हणजे चक्र आणि ‘तल’ म्हणजे सोल असा त्याचा अर्थ असल्याचं तिने स्पष्ट के लं. ‘मी एप्रिल २०१९ ला माझं पाहिलं सेलेबल कलेक्शन बाजारात आणलं. ते फार बेसिक कलेक्शन होतं. त्यातूनच मला पहिल्या काही ऑर्डर मिळाल्या. पुढे मी प्रदर्शन करायला सुरुवात केली. मी लॉकडाऊन होईपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शन उभारत त्या माध्यमातूनच व्यवसाय के ला’, अशी आठवण तिने सांगितली. लॉकडाऊनमध्ये सगळं बंद असतानाच पूजाने वेबसाइट लॉन्च केली. या वेबसाइटमुळे तिला या करोनाच्या काळात फार मदत झाली. पूजा सुरुवातीला घरूनच काम करत होती. तिचे दोन्ही कारागीर त्यांच्या घरूनच काम करायचे आणि अजूनही त्याच पद्धतीने पूजा काम करते. ज्या कारागिरांच्या मदतीने पूजाने या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली ते कारागीर आजही पूजाबरोबर भक्कमपणे उभे आहेत. पूजा कस्टमाईज, बल्क, डिझायनर सगळ्या पद्धतीचं कलेक्शन बनवते.

‘सहा कारागीर, एक टेलर, एक  डिझाईनर आणि ऑफिस जॉब करणारी एक मुलगी अशा छोटय़ाशा टीमसोबत मी कामाला सुरुवात के ली होती. आम्ही नंतर आमचा छोटा स्टुडिओही सुरू केला. अनेकदा लोकांना पहिल्यांदा खरं वाटत नाही की या चप्पल टायरपासून बनवल्या आहेत. मग मी त्यांना चप्पल नीट दाखवल्यावर त्यांच्या ते लक्षात येतं. ग्राहकांना अनेकदा प्रॉडक्टबरोबरच त्याच्या जन्माच्या स्टोरीतही खूप इंटरेस्ट असतो. त्यांच्या मनात खूप प्रश्नही असतात’, असा आपला अनुभव ती सांगते. पण गेल्या काही वर्षांत झालेल्या अशा टाकाऊतून टिकाऊ बनवण्याच्या या प्रयत्नांमुळे लोक अपसायकल, रिसायकल या गोष्टींबद्दल जागरूकही झाले आहेत आणि ती उत्पादनं स्वीकारायलाही लागले आहेत, असं पूजा विश्वासाने सांगते. एकदा उद्योग उभारला म्हणजे काम पूर्ण होत नाही, तो कल्पकतेने वाढवणंही तेवढंच गरजेचं असतं. पूजाही बाजारात येणाऱ्या आपल्या प्रत्येक कलेक्शनमध्ये काही ना काही बदल सातत्याने करत असल्याचे सांगते.

या चप्पलची किंमतही पूजाने सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडेल अशीच ठेवली आहे. या पुढेही ती किंमत जास्त प्रमाणात वाढवणार नाही आहे, कारण या पर्यावरणपूरक चपला अनेक लोकांपर्यंत पोहोचवणं हे तिचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं ती आवर्जून सांगते. टाकाऊतून सुरू झालेला हा तिचा कल्पक ब्रॅण्ड आता सातासमुद्रापार नेण्याच्या दिशने तिचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2021 12:31 am

Web Title: pooja apte badamikar from pune started making footwear from tyre zws 70
Next Stories
1 संशोधनमात्रे : ‘बन-बन’ ढूंढन जाओ..
2 बदलांचे स्वागत..
3 धुळवडीचा रंग पांढरा
Just Now!
X