पंकज भोसले

साठीच्या दशकापर्यंत लोकप्रिय संगीतामध्ये गिटार या वाद्याला पुरुषी प्रतीक मानले जात होते. अमेरिकेतील जॅझ सुवर्णकाळापासून संगीतामध्ये पियानो आणि गिटारवर निष्णात हात बसलेल्या महिला कलाकार होत्या. तरी काही कृष्णवंशीय गायिकांखेरीज गिटार वाद्यासह पुरुषी रॉकस्टार्सना मात देणाऱ्या महिला नव्हत्या. अमेरिकेतील सिनात्रा-एल्विसपर्व आणि ब्रिटनमधील बिटल्सयुग महिला रॉकस्टार्ससाठी अनुकूल नव्हते. त्याला छेद दिला तो सत्तर-ऐंशीच्या काळात बँड किंवा स्वतंत्ररीत्या समोर आलेल्या महिला कलाकारांनी. आपल्याकडे या काळातील एक गमतीशीर प्रभाव चित्रपटात डोकावला होता. (‘चुरालियाँ हे तुमने जो दिल को’ म्हणत पडद्यावर आकुस्टिक गिटारच्या फ्रेट्सवर खेळ करणारी नायिका अवघ्या राष्ट्रासाठी अचंबित करणारी घटना होती.) सत्तरीच्या दशकात अ‍ॅबा या स्वीडिश बॅण्डच्या गाण्यांनी ‘डान्सिंग क्वीन’चे वेड जगभरात पोहोचविले. या बॅण्डच्या आगमनानंतर रॉक्सेट या आणखी एका स्वीडिश बॅण्डने शिरकाव केला आणि ‘शी’ज गॉट द लूक’ या त्यांच्या गाण्याने इतिहास रचला. या दरम्यान अमेरिका आणि ब्रिटनमध्ये महिला रॉकस्टार्सची फळी तयार झाली. गिटारवरचा पुरुषी पगडा कमी झाला आणि हे वाद्य हाती घेऊन महिला रॉकस्टार्स दिसायला लागल्या. मॅडोनापासून टेलर स्वीफ्टपर्यंत शेकडो गायिकांची गिटारकला आज सहज उपलब्ध पाहायला मिळू शकेल. दोन हजारोत्तर काळातील महिला रॉकर्सचा संगीतपसारा पाहणे येथे महत्त्वाचे ठरेल. कारण ध्वनीमुद्रणाच्या साऱ्या यंत्रणा हाताशी घेऊन कानांना सुखावणारे संगीत तयार करणाऱ्या महिला रॉकस्टार्सची संख्या याच काळात वाढली. यातील मिशेल ब्रन्च ही  गायिका आता फारशी ऐकली जात नाही. गेल्या वर्षी आठेक वर्षांच्या थांब्यानंतर तिने पुन्हा मुख्य प्रवाहात येण्याचा प्रयत्नही केला होता. पण तिच्या गाण्यांत पूर्वीइतका पकडून ठेवणारा जोम राहिलेला नव्हता. ‘ऑल यू वॉण्टेड’ किंवा ‘एव्हरीव्हेअर’ ही तिची गाणी आजही ऐकताना खासच वाटू शकतात. अगदी साध्या गिटारकॉर्ड्सचा प्रभावी वापर करून तयार झालेली ही गाणी कल्ट क्लासिक आहेत. भारतात एमटीव्ही रिअ‍ॅलिटी शोज पेरणारी वाहिनी झाल्यानंतर तिच्याशी फारकत घेणाऱ्या एका पिढीला या गाण्यांची जादू किती होती ते सांगता येईल. गिटारवादनाचे यातील प्रयोगही या गाण्यांच्या अनप्लग्ड व्हर्शन्समध्ये सापडू शकतील. मॅण्डी मूर ही अभिनेत्री याच काळात काही उत्तम गाण्यांच्या अल्बमसह संगीत वर्तुळात दाखल झाली होती. तिचे ‘क्रश’ हे गाणे हेदेखील मिशेल ब्रन्चच्या एव्हरीवेअरच्या जातकुळीचे आहे. ‘मला तू आवडतोस’ हे बिनधास्त सांगणाऱ्या मुलींची फलटण या काळात एकाच प्रभावाची गाणी तयार करीत होती. यात सिक्सपेन्स नन द रिचरचे ‘किस मी’ जसे होते, तसेच व्हेनसा कार्टलनचे ‘थाऊजंड माईल्स’ हे देखील. नताशा बेडिन्गफिल्ड या गायिकेचे ‘अनरिटन’ या गाण्याने देखील याच काळात बराच मोठा श्रोतावर्ग मिळविला होता. गिटार ही या गाण्यात देखील सर्वात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसते. ऑस्ट्रेलियन गायिका नतालिआ इम्ब्रुलिआ ‘टॉर्न’ गाणे घेऊन आली, ती त्या वर्षांतील सारी पारितोषिके पटकावण्यासाठीच. अगदी अलीकडेपर्यंत हे गाणे दुसऱ्याच बॅण्डचे व्हर्शनरूप आहे, हे प्रकाशात येईस्तोवर ही गायिका प्रसिद्धीच्या शिखरांना स्पर्श करती झाली होती. अ‍ॅव्हरिन लॅव्हिन ही गायिका दोन हजारच्या दशकातील खरीखुरी हार्डरॉकस्टार होती. ‘कॉम्प्लिकेटेड’ या गाण्यासह या देखण्या गायिकेने एमटीव्हीवर बराच काळ राज्य केले होते. ना डाऊट बॅण्डच्या ग्वेन स्टिफनी या गायिकेच्या ‘आय अ‍ॅम जस्ट गर्ल’ या गाण्याचाही बराच बोलबाला या काळात होता. अलानिस मॉरीसेट या गायिकेची सारीच गाणी अंगाला थिरकायला भाग पाडतात. तिच्या ‘हॅण्ड्स क्लीन’ने आणि निली फुर्टाडोच्या ‘पॉवरलेस’ने एकाच काळात आपल्याकडे एमटीव्ही, व्ही चॅनलवर धुमाकूळ घातला होता. निली फुर्टाडोच्या या गाण्यात गिटारऐवजी बेंजोलिनचा सुरेख वापर करण्यात आला आहे. एकाच काळात किंवा दशकात खच्चून महिला रॉकर्स भरल्या होत्या, की कुणाला ऐकावे, हा प्रश्न ऐकणाऱ्यांपुढे होता. त्या तुलनेत या दशकात महिला रॉकस्टार्सची संख्या नुसती वाढली आहे. मात्र कान आणि लक्ष वेधून घेणाऱ्या गायिकांची वानवा आहे. सेण्ट व्हिन्सेण्ट नावाने लोकप्रिय असलेल्या अ‍ॅनी क्लार्क या गायिकेची गाणी विशेष उल्लेखनीय आहेत. तिचा गिटारवरचा ताबा आणि कौशल्य पाहिले की लक्षात येते. बाकी महिला रॉकस्टार्सचा संगीत संसार वर्षांगणिक फोफावतोय, हे चित्र चांगलेच आहे.

viva@expressindia.com