23 July 2019

News Flash

प्राजक्ता माळी

फिट-नट

|| प्रियांका वाघुले

शरीराचा आणि मनाचा फिटनेस राखणं ही माणूस म्हणून स्वत:ची जबाबदारी असून ती पाळणं म्हणजे स्वत:ला शारीरिक, मानसिक आजारांपासून दूर ठेवणं होय. फिटनेससाठी प्रयत्न करणे स्वत:साठी गरजेचे असल्याचे अभिनेत्री प्राजक्ता माळी सांगते.

घराची स्वच्छता केल्यावर घर स्वच्छ होते. ज्याचा फायदा घरातील सगळ्यांना होतो, पण स्वत:ची काळजी घेतली गेल्याने त्याचा फायदा मात्र आपल्याला स्वत:ला होतो. त्यामुळे अवतीभोवतीच्या गोष्टींची काळजी घेण्याबरोबरच आपल्या शरीराची, मनाची काळजी आपण स्वत: घ्यायलाच हवी, असे प्राजक्ता म्हणते. काळजी घेणे म्हणजे खूप काही करणे, असे नाही तर छोटय़ा छोटय़ा गोष्टी के ल्या तरी त्याचा आपल्याला चांगला उपयोग होतो. त्यामुळे अगदी लहान वाटणाऱ्या गोष्टी तितक्याच जास्त फायद्याच्या ठरणाऱ्या असल्यामुळे त्या करण्यास काहीच आढेवेढे घेऊ  नयेत, असे ती सांगते.

फिटनेससाठी प्राजक्ता जिमपेक्षाही पारंपरिक, आयुर्वेदिक उपायांना जास्त महत्त्व देते. सकाळी सकाळी उठल्यावर काही न खाता, ब्रश न करता एक ते दोन ग्लास पाणी प्यावे. त्याने तोंडात साठलेली लाळ आपल्या पोटात जाते. जी शरीरासाठी अतिशय औषधी ठरते. त्यामुळे शरीरातील अनावश्यक अ‍ॅसिड बाहेर पडते. त्याचबरोबर झोपण्यापूर्वी साधारण दोन ते तीन तास आधी आपले जेवण उरकून घेतले पाहिजे, कारण अन्नाला पचण्यास मुबलक वेळ मिळणे गरजेचे असते. अनेकदा आपण खाऊन लगेच झोपतो, ही अत्यंत चुकीची सवय असल्याने ती टाळली पाहिजे, असे ती सांगते.

आयुर्वेद असं सांगतं की माणसाने रात्री १० च्या सुमारास झोपणे योग्य असते, पण आपल्या सध्याच्या लाइफस्टाइलमध्ये उशिरा झोपण्याच्या लागलेल्या सवयी आपल्यासाठी जास्त घातक ठरू शकतात, असं प्राजक्ता म्हणते. ती या गोष्टींना अतिशय महत्त्व देत असून त्याचबरोबर अष्टांग योग करीत असल्याचेही तिने सांगितले. अष्टांग योग माणसाला मानसिक, शारीरिक आणि आत्मिक शुद्धीकरणासाठी उपयुक्त ठरतात. ज्यामध्ये आसन, प्राणायाम, धारणा अशा महत्त्वाच्या आठ गोष्टी एकत्र करून हा प्रकार केला जात असल्याने त्याला अष्टांग योग म्हटले जाते, असं ती म्हणते. अष्टांग योग केल्याने शरीराला दरदरून घाम येतो आणि त्यामुळे शरीरातील नको असलेले पदार्थ त्यावाटे मोठय़ा प्रमाणात बाहेर पडून शरीर निरोगी होण्यास मदत होते. योगमुद्रासन, गोरक्षासन, सर्वागासनसारखे योगप्रकार यात येत असून योग हा माणसासाठी हितावह आहे. हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या ऋषी मुनींनी सांगितलेल्या अनेक गोष्टी या आपल्या हिताच्या असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्या समजून घेणे गरजेचे आहे, असे प्राजक्ता म्हणते. कारण पाश्चिमात्य लोक आपल्याला आता जे सांगू पाहतात, त्यातल्या अनेक गोष्टी या भारतीय संस्कृतीत कित्येक वर्षांपूर्वी लिहून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे जे आपल्याकडे आहे ते समजून घेऊन त्याचा उपयोग आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी करणे कधीही चांगले आणि लाखमोलाचे असल्याचे प्राजक्ता सांगते.

viva@expressindia.com

First Published on March 8, 2019 12:05 am

Web Title: prajakta mali fitness tips