प्रसाद नर्से, कोरिआटाउन, लॉस एंजेलेस, यू.एस.ए.

इथल्या आठवणी कुणाशी तरी शेअर कराव्यात, असं वाटत असतानाच या सदराच्या माध्यमातून ही संधी मला मिळाली. सध्या मी लॉस एंजेलेसमधील बरबँक शहरात ‘माव्‍‌र्हल स्टुडिओज’साठी व्हिज्युअल इफेक्ट्स अ‍ॅनिमेटर/व्हिज्युअलायझेशन आर्टिस्ट म्हणून काम करतोय. कामानिमित्ताने मी सतत फिरतीवर असतो. फिल्मिंग सुरू होतं, तेव्हा अटलांटाला मुक्काम असतो. ‘माव्‍‌र्हल स्टुडिओज’ बरबँकमधील ‘डिझ्नी’च्या मुख्य प्रॉडक्शन सेंटरमधे ‘डिझ्नी लॉट’मध्ये येतो.

लॉस एंजेलेसमधील माझे वास्तव्य हे चारपेक्षा जास्त वर्षांचं. २०१४च्या सुमारास फिल्म इंडस्ट्रीत काम मिळवायला मी जॉर्जियातून इथे स्थलांतर केलं. इथे प्रथम आलो तेव्हा काहीच माहिती नव्हतं की, लॉस एंजेलेस किती मोठं आणि विस्तारलेलं असेल ते.. काम मिळालंच तर इथली मेट्रो सेवा वापरून अप-डाउन करेन, असा विचार केला होता, पण बऱ्याच जणांकडून एल. ए. मेट्रोबद्दल चांगलं ऐकू आलेलं नसल्यामुळं थोडा धास्तावलेलोच. नंतर प्रवास सुरू झाल्यावर कळलं की, मेट्रो बसेस किंवा सबवे ट्रेन्स वेळेवर सुटतात. आपली वेळ चुकली तर मात्र अर्धा ते एक तास पुढील बसची वाट पाहावी लागते. अगदी सुरुवातीच्या काळात मी कामानिमित्तानं दोन तास वनवे प्रवास केलेला आहे. कारण नॉर्थरिज ते सॅन्टा मोनिकातील लुमा पिक्चर्स ही दोन टोकं म्हणावी लागतील लॉस एंजेलेसची. नॉर्थरिज हा मुख्यत: सीसन युनिव्हर्सिटीसाठी प्रसिद्ध, आजूबाजूचं वातावरण निर्मळ आणि शांत, हिरवेगार बगीचे आणि मागील बाजूस असलेला पोर्टर रँचचा पर्वत, सर्वत्र प्रसन्न वातावरण.

बरबँक सिटीमध्ये ‘टोल्युका लेक’ येथे राहू लागलो. बरबँक हे ‘मीडिया कॅपिटल ऑफ द वर्ल्ड’ म्हणून ओळखलं जातं. त्याची खरी ओळख पटली. ‘डिझ्नी लॉट’, ‘वॉर्नर ब्रदर्स’, ‘बरबँक स्टुडिओज’, ‘लेजेंडरी स्टुडिओज’, ‘कार्टून नेटवर्क ’, ‘निकलोडिअन स्टुडिओज’पासून ते अगदी ‘डॉल्बी डिजिटल साउंड’ची हेडक्वार्टर्स इथेच पाहायला मिळाली. जवळच बरबँक विमानतळ आहे. या वेळेत प्रवास चक्क पावलांवर येऊ न ठेपला.. मी ‘वॉर्नर ब्रदर्स’च्या समोरच राहत होतो. मी माझ्या करिअरमधे पायी प्रवास करून ऑफिस गाठेन, असं कधी वाटलं नव्हतं. जवळजवळ ३० मिनिटांचा पायी प्रवास ‘वॉर्नर ब्रदर्स’ ते ‘डिझ्नी लॉट’ आणि आजूबाजूला हिरवळ असल्यामुळे हा वॉक मॉर्निग व इव्हनिंग वॉकसारखा भासायचा. बरबँक पर्वतरांगांच्या जवळ असल्याने इथलं वातावरण काहीसं उष्ण. दिवसा अगदी मुंबईतल्या उकाडय़ासारखं वातावरण असतं तर रात्री थंडगार. साधारण ५ ते ६ वाजेपर्यंत उकाडा उतरतो आणि हेही उन्हाळ्याच्या दिवसात. बाकी वेळेस सहसा आरामदायी वातावरण असतं. रस्त्यावर वर्दळही मोजकीच, पण रात्री चक्क १२ वाजेपर्यंत मी लोकांना जॉगिंग करताना पाहिलंय. अमेरिकेत कार कल्चर असल्यामुळे मोस्टली रस्त्यावर जॉगर्स सोडले तर माझ्यासारखे मोजकेच असतील वॉक करत ऑफिसला जाणारे. बहुतांशी ‘डिझ्नी’ स्टाफ जवळ राहणारा असलाच तर माउंटन सायकलवरून ऑफिसला येताना पाहिला आहे.

सध्या मी लॉस एंजेलेसमधील ‘कोरिआटाउन’मध्ये राहतोय. नावावरून अंदाज आलाच असेल की, इथे कोरियन लोकांचा वावर जास्त. इथलं लाइफ पळापळीचं आणि कॉर्पोरेट आहे. लोक ऑफिसला जायच्या घाईत असतात, कुणाला ट्रेन पकडायची घाई असते तर कुणी बसच्या दिशेने वाट पाहात असतो. ट्रॅफिकमध्येही घाई सुरूच असते. हॉर्न्‍स मी अमेरिकेत आतापर्यंत ऐकले नसतील तेवढे कोरिआटाउनमध्ये ऐकले आहेत. मी दिवसातला बहुतेक वेळ ऑफिसलाच असतो, फक्त वीकएंडला मला मॉर्निग, इव्हनिंग वॉक करायला मिळतो. सध्या इथल्या मेट्रोचाच वापर करतोय. मेट्रोतून प्रवास करताना प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव असतात आणि चेहराही गोष्ट सांगत असतो. आम्हा अ‍ॅनिमेटर्सना अशा निरीक्षणाची आमच्या कामात मदतच होते, त्यामुळे मग प्रवासाचा कंटाळा कधीही जाणवत नाही. अशाच प्रवासातून माझे काही मित्रही झाले आहेत, जे जेमतेम सारख्याच वेळेला मेट्रो व बस गाठतात, त्यांची सोबत वेगळीच. कदाचित अमेरिकेत सर्वत्र काहीशा प्रमाणात मॅनर्स हे लोकांमध्ये उपजतच येतात का, कोण जाणे? पण समजा एखाद्या अनोळख्या व्यक्तीशी नजरानजर झालीच तर ‘हाऊ  आर यू?’ वा ‘हाऊ  आर यू डुइंग?’ असं हसतच क्षणिक संभाषणही होतं. प्रत्युत्तरादाखल ‘मी मजेत’ वा ‘आय अ‍ॅम गूड, होप यू हॅव अ वंडरफुल डे!’, असं ग्रीट करायची छान संकल्पना आहे. इथे उबर आणि लिफ्ट अ‍ॅपचा वापर करून कार पूल करतात बहुतेकजण. लॉस एंजेलेसमधे घाई असली किंवा रात्री उशीर झालाच तर उबर कार पूल फारच उपयोगी पडतं.

माझं शिक्षण दादरच्या ‘राजा शिवाजी विद्यालय’मध्ये मराठी माध्यमातून झालेलं, ‘रुईया’ महाविद्यलयातही इंग्रजी बोलणं तेवढं झालं नाही आणि ‘जे. जे. इन्स्टिटय़ूट ऑफ अप्लाइड आर्ट’मध्ये मराठीचाच जास्त वापर व्हायचा. अमेरिकेत पहिल्यांदा आलो तेव्हा थोडा प्रॉब्लेम झाला इंग्रजी भाषेचा, पण आता इंग्रजीतून लीलया बोलणं होतं, इंग्रजी बोलण्याशिवाय पर्याय नसेलच तर ती भाषा अवगत करावीच लागते. आणि ते अगदी सोप्पं आहे.. एखाद्यास पोहणं नाही येत, पण तलावात पडल्यावर हातपाय हलवण्यास कुणी सांगावं लागत नाही तसंच. इथले इंग्रजी उच्चार थोडे वेगळे आहेत, अजूनही बऱ्याचदा एखादा उच्चार व्यवस्थित केला नाही की, समोरच्याला काहीच काळत नाही. मोस्टली कॉफी शॉप्समध्ये अशा गोष्टी जास्त घडतात. इथे स्टारबक्स आणि कॉफी बीन हे प्रसिद्ध कॉफी शॉप्स आहेत. स्टारबक्समधील ‘चाय टी’ मीन्स चहा माझा आवडता, पण त्याला ‘चाय’, ‘टी’ असं दोनदा का संबोधतात हे नवलच आहे! बऱ्याचदा मी चहाची ऑर्डर केली की कॉफी कपवर नाव लिहिलं जातं, ऑर्डर्स देताना सोपं पडतं म्हणून, पण नावाचा मोठा गोंधळ घातलेला असतो. माझं नाव ‘प्रसाद’, त्याचं कधी ‘रसाद’ कधी ‘प्रसन’ अशी बारशी केली जातात.

महत्त्वाच्या गोष्टीवर अजून आलो नाही, लॉस एंजेलेस हे प्रसिद्ध आहे ते हॉलीवूडसाठी. इथे ‘हॉलीवूड वॉक ऑफ फेम’सुद्धा आहे आणि दिवसभर इथे गजबजाट असतो. मी आमच्या हेडक्वार्टर्सच्या हॉलीवूडमधील ऑफिसमध्ये काम करायचो तेव्हा माझ्या डेस्कसमोरील खिडकीतून चक्क ‘हॉलीवूड’ साइनही पाहायची संधी मिळाली आहे. त्या वेळी मी हॉलीवूडमार्गे प्रवास केला आहे आणि रस्त्यावर वर्दळ मोठय़ा प्रमाणावर असते. रस्त्यांवर आजपर्यंतच्या अ‍ॅकॅडमी विंनिंग सेलेब्रिटीजची नावं गोल्डन स्टारमध्ये कोरण्यात अली आहेत. मूव्ही क्रेझ पाहायची असेल तर हॉलीवूडला नक्की भेट द्यावी. हॉलीवूडजवळची ‘लॅकमा आर्ट गॅलरी’ही पाहण्यासारखी आहे. तेथे प्राचीन भारतीय संस्कृतीचा एक पूर्ण भाग आहे. प्रसिद्ध टीसीएल चायनीज थिएटर, वॅक्स म्यूझियम, आणि मुख्यत्वे डॉल्बी थिएटर जिथे अ‍ॅकॅडमी अ‍ॅवॉर्डचा सोहळा पार पडतो ही सर्व स्थळं पाहण्यासारखी आहेत. बरेचदा आवडती मूव्ही कॅरेक्टर्स, बॅटमॅन, स्पायडरमॅन, ट्रान्सफॉर्मर्स आदी पोशाखात एंटरटेन्मेंट करताना दिसतात. त्यामुळे कित्येकदा ट्रॅफिकही खोळंबतं, कारण पूर्ण हॉलीवूड बुलावार्ड रेड कार्पेट रिसेप्शनसाठी ब्लॉक केला जातो. एखादा नवा चित्रपट रिलीज इथेच होतो, अ‍ॅकॅडमी अ‍ॅवॉर्डसारखे शोज इथेच पार पाडले जातात. मीही सुरुवातीला २०१४ मध्ये हॉलीवूडला पाऊ ल ठेवलं ते ‘एम्मीझच्या अ‍ॅवॉर्ड रिसेप्शन’साठी. माझ्या लघुपटाला ‘आय एम पॉसिबल’ला  इथला मानाचा ‘एम्मी अवार्ड’ जाहीर झालेला. मला अजूनही आठवतंय आमच्या कॉलेजची फोटोग्राफर्सची टीम आम्हाला घेऊ न हॉलीवूड स्ट्रीटवर फोटोग्राफी करायला घेऊ न आली. हातात एम्मी अ‍ॅवॉर्ड आणि समोर पापाराझींसारखे फोटोग्राफर, त्या वेळेस मी हॉलीवूडसाठी कामही केलं नव्हतं, पण अनुभव विलक्षणीय होता. रस्त्यावर लोकसुद्धा फोटो काढू लागले; त्यांना वाटलं, कुणीतरी सेलिब्रिटीज असावेत म्हणून. थोडा गमतीशीरच होता प्रकार.

इथे मंदिरंसुद्धा आहेत. मी नॉर्थरिजमध्ये राहत होतो तेव्हा जवळच्या वॅली हिंदू टेम्पलला आठवडय़ातून एकदा जायचो. एकूणएक सर्वच मूर्ती इथे स्थापन केल्या आहेत. गणपती उत्सवही उत्साहाने साजरा केला जातो. वॅली परिसरामध्ये भारतीय लोकांचं वास्तव्य जास्त. सेरिटोजमध्ये ‘लिटिल इंडिया विलेज’सुद्धा आहे. इंडियन शॉपिंग मॉल, इंडियन फूडकोर्ट्स ते इंडियन पेहरावांची आलिशान दुकानं इथे पाहायला मिळतात. सेरिटोज लॉस एंजेलेसच्या दक्षिण भागात येतं. आता मूळ मुद्दा उरतो तो खाण्यापिण्याचा. अमेरिकन पिझ्झा हा सर्वाचाच आवडता प्रकार, मग बर्गर आणि फ्रेंच फ्राइस. इथले लोक भारतीय जेवणाची भलतीच तारीफ करतात. इथे भारतीय रेस्तराँसुद्धा बरीच आहेत. सांता मोनिकातील ‘दिल्ली दरबार’मधील जेवण खूपच चवदार असते. मी ‘लुमा पिक्चर्स’मध्ये काम करत होतो तेव्हा बऱ्याचदा कलिग्सबरोबर तिथेच लंचला जायचो. एशियन फूड, चायनीज फूड, अरेबियन फूड, कोरियन फूडही प्रसिद्ध आहे. चिपोटले मेक्सिकन ग्रीलसारखी हेल्दी फूडकोर्टसुद्धा आहेत. इंडियन ग्रोसरी स्टोअर्ससुद्धा बरीच आहेत. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे राइस, फ्रोझन चपात्या, डाळी, लोणची, मसाले, इंडियन भाज्या, चकल्या आदी बराच भारतीय किराणा मिळतो आणि घरी करून खाण्यात मजा असते ती काही औरच. मी बऱ्याचदा वीकेंडला कुकिंग करतो, कारण तेव्हाच वेळ मिळतो. ट्रेडर जोझमध्ये ऑथेंटिक इंडियन कुक्ड फूडची पाकिटंही मिळतात. चक्क साजूक तूपसुद्धा मिळतं. इथल्या जेवणाला आईच्या हातची सर येणारच नाही, पण खाण्यापिण्याची अडचण अजूनपर्यंत कधीही भासली नाही. लॉस एंजेलेसला एकटं राहून एकटेपणा कधी जाणवलाच नाही, इथल्या प्रदूषणविरहित वातावरणात आणि रंगीबेरंगी निसर्गात वेळ कसा निघून जातो हे समजतच नाही..

viva@expressindia.com