News Flash

संशोधनमात्रे : या किरणांनो!

प्रतीकची आई सांगली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील प्राथमिक केंद्रातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देते.

राधिका कुंटे viva@expressindia.com

काही वेळा काही गोष्टींचे योग यावे लागतात नि ते तसे आले की सगळ्या गोष्टी जमून येतात; त्यासाठी घेतलेली मेहनतही तितकीच महत्त्वाची असते. ही गोष्ट आहे छतावरील सौरऊर्जेबद्दल प्रतीक जोशी करत असलेल्या संशोधनाची.

सांगलीच्या प्रतीक जोशीच्या करिअरमध्ये काही गोष्टी योगायोगाने घडत गेल्या. तो ‘वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग’मध्ये पदविकेचा अभ्यास करत होता तेव्हा शिक्षक व्हावं असं त्याला वाटू लागलं. शिक्षण क्षेत्राविषयी आत्मीयता वाटली. हे नोबल प्रोफेशन आहे, हे मनोमन पटल्याने तो शिक्षकांना फॉलो करायला लागला. अगदी कॅम्पस इंटरवूमध्ये निवड झाली तरी तो त्या ठिकाणी रुजू झाला नाही. कारण आपल्याला या क्षेत्रामध्ये राहायचं आहे हेदेखील त्यानं मनाशी ठरवलं. शिक्षकांचं निरीक्षण करता करता कसं शिकवायचं नाही ते त्याला कळलं. काहींना शिकवायचं तंत्र माहिती असतं. काहींना तंत्र माहिती असतं पण ते जमत नाही; काहींना दोन्ही जमतं. ही निरीक्षणं तो शिकवायला लागल्यावर त्याला उपयोगी पडली.

प्रतीकची आई सांगली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील प्राथमिक केंद्रातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देते. त्याची बहीण एमएस्सी बायोटेक असून ती मिरजेच्या शाळेत शिकवते. कदाचित त्यांच्यामुळेही शिक्षणाची-शिक्षक व्हायची गोडी लागली असावी, असं त्याला मागे वळून बघताना वाटतं. तो सांगतो, ‘घरच्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून इथपर्यंत पोहोचू शकलो. इंजिनीअरिंग करूनही शिक्षक व्हायची मनीषा होती, त्या काळात बीटेकनंतर लगेच नोकरी मिळणं, हे माझ्या ‘कथित काळजीवाहू’ लोकांना परस्पर मिळालेलं उत्तर होतं. त्या नोकरीमुळे मी योग्य मार्गावर आहे हा दिलासा मिळाला. पुण्याच्या ‘विश्वकर्मा इन्स्टिटय़ूट फॉर टेक्नॉलॉजी’मध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून वर्षभर शिकवण्याचा अनुभव मिळाला. विद्यार्थ्यांच्या करिअरला, विचारांना किमान आकार देता आला पाहिजे, हे सूत्र या काळात समजलं. तिथे शिकलेल्या अनेक गोष्टी अजूनही उपयोगी पडतात.’

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून त्याने प्रा. स्वप्निल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीममध्ये एमई केलं. मास्टर्स थिसिससाठी त्याने सोलार इन्व्हर्टरवर काम केलं. रिन्युएबल एनर्जीमध्ये त्याचं स्पेशलायझेशन होतं. शिवाय धनंजय गवळी यांनीही वेळोवेळी मोलाचं मार्गदर्शन केलं. ‘स्टार्टअप सुरू करण्याची इच्छा असणाऱ्या मित्रांसोबत सल्लागार म्हणून मला मध्यंतरी चीनला जायचा योग आला. तिथला मॅन्युफॅक्चरिंग प्लांट बघता आला. आता ते आपल्याकडे बघायला मिळतं आहे. त्यामुळे या विषयाची आणखी आवड निर्माण झाली. दरम्यान, मी विविध महाविद्यालयांमध्ये सेमिनार्स, लेक्चर्स घ्यायचो. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला, अभ्यासात सातत्य राहिलं. शिवाय या क्षेत्रातील अनेकांशी नवीन ओळखी झाल्या,’ असं प्रतीक सांगतो.

दरम्यानच्या काळात त्याने पाहिलेले काही शिक्षक ठरावीक साच्यात अडकले होते. उलट काही शिक्षक स्वानुभवातून गोष्टी उलगडायचे. त्यांनी सांगितलेल्या छोटय़ा गोष्टी म्हणजे शोध- संशोधन असावं, असं त्याला वाटायचं. नंतर त्याला कळलं दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. त्याच सुमारास मुंबई आयआयटीमधील ‘नॅशनल सेंटर फॉर फोटोव्हॉलटायटिक रिसर्च अ‍ॅण्ड एज्युकेशन’ (एनसीपीआरई) मध्ये पदभरती होती. तेव्हा तो फायनल इयरच्या प्रोजेक्टवर काम करत होता. विषय होता- सौर ऊर्जा. हा विषय त्याला चांगला वाटत होता. मग ‘एनसीपीआरई’मध्ये अर्ज केला, मुलाखत झाली आणि तो निवडला गेला. त्याने ज्युनिअर रिसर्च फेलो म्हणून दीड वर्ष काम केलं. आयआयटी पवईच्या विद्युत विभागातील साहाय्यक प्रा. डॉ. नरेंद्र शिरडकर यांनी त्याचा कल ओळखून त्याला एनसीपीआरईच्या प्रकल्पामध्ये काम करण्याची संधी दिली. भारतभरात विविध ठिकाणच्या हवामानात सौर ऊर्जेची पॅनल्स कशी कार्यरत आहेत, यासाठी क्षमता चाचणी करायच्या प्रकल्पात त्याची निवड झाली. सोलार प्लांटचं आयुष्य साधारणपणे २५ वर्षांचं गणलं जातं. इतर कोणत्याही यंत्रांप्रमाणे त्याचीही कार्यक्षमता हळूहळू मंदावत जाते. त्याच्या चाचणीसाठी काही मानकं ठरवलेली असतात, ती पडताळून पाहिली जातात. त्यानुसार निरीक्षणांती पुढच्या काळात नवीन यंत्रणा बसवताना या निरीक्षणांच्या आधारे काही बदल करता येऊ शकतील का, याची चाचपणी करायची होती.

प्रतीक म्हणतो, ‘मास्टर्स आणि नोकरीमध्ये तांत्रिक गोष्टी अधिक होत्या. तर एनसीपीआरईमधल्या सर्वेक्षणाच्या वेळी स्थानिकांवर काय परिणाम होतो, प्लांट साफ करायला पाणी लागतं, त्याची सोय असते का, पाणी नसेल तर कशाला प्राधान्य दिलं जातं अशा गोष्टी, त्यांचे छोटे छोटे परिणाम जाणवले. काहींना यातून रोजगारही मिळाला. तांत्रिक बाबींचं निरीक्षण तर करत होतोच, पण अन्य सामाजिक पैलूंचाही विचार डोक्यात सुरू होता. हे तंत्रज्ञान नवीन होतं आणि त्यातून अनेक नवीन गोष्टी घडत होत्या, घडणार होत्या. या प्रकल्पाच्या निमित्ताने महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, हैदराबाद, केरळ, लडाखला जायला मिळालं. लडाखला लॅक ऑफ ऑक्सिजनचा त्रास झाला होता. अंगात त्राण उरला नव्हता. चव गेली होती. घरी परतल्यावर तब्येत फार बिघडली होती, पण सगळ्यांनी फार मदत केली होती. नंतर सगळं ठीक झालं.’

या कामात संशोधनाचा भाग म्हणून चाचणी होती, फिल्डवर गोष्टी प्रत्यक्षात पाहायला मिळाल्या. नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. काही वेळा कागदावर एक आणि प्रत्यक्षात दुसरं असंही बघायला मिळालं. दुसरीकडे पुढे पीएचडीला प्रवेश घ्यावा का, वगैरे विचार सुरू होता. त्यामुळे या प्रकल्पात काम करताना त्याचा दृष्टिकोन थोडा बदलला होता. थेट सामाजिक परिणाम करणारं, समाजाला उपयुक्त ठरणारं असं काही काम आपण करावं, असं त्याला वाटत होतं. त्या दृष्टीने शोध घेताना पॉलिसी स्टडीविषयी कळलं. ती भारतात तुलनेने नवीन आहे. मुंबई आयआयटीमध्ये पॉलिसी स्टडीचं सेंटर आहे. त्या संदर्भात माहिती काढली. माहिती कळल्यावर आपल्याला हवं ते गवसलं, असं त्याला वाटलं. मग आवश्यक तयारी करून अर्ज केला आणि प्रतीकला मुंबई आयआयटीतील पब्लिक पॉलिसीमध्ये पीएचडीसाठी प्रवेश मिळाला.

तो सांगतो, ‘पब्लिक पॉलिसी हे नवीन डोमेन असून ते लोकांशी निगडित आहे. लोकशाहीत या संदर्भात विविध योजनांची आखणी, अंमलबजावणी कशी करता येईल, सुरू असणाऱ्या योजनांचं निरीक्षण आणि विश्लेषण करणं हे सगळं यात होतं. हे काम परस्परावलंबी आहे. सरकारी योजना आणि नागरिक यांचा ताळमेळ साधला गेला पाहिजे. तंत्रज्ञान, योजना, योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी हे सगळं साधता आलं पाहिजे, असं मला वाटल्याने त्यात काम करावंसं वाटलं. सौर ऊर्जा वापरली पाहिजे वगैरे गोष्टी लोकांना पटल्या तरीही मग ती तितक्या प्रमाणात का वापरली जात नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मोठे प्लांट मोठय़ा कंपन्या किंवा संस्था बसवतात. दुसरीकडे घराच्या छतावर सौर उपकरण बसवूनसुद्धा सौर ऊर्जेचा वापर करणं शक्य आहे. आपल्याकडे मोठं मार्केट आहे, तरीही ते का घडत नाही, याचा शोध घ्यायचा ठरवलं. उपकरणाची उपलब्धता, किमती, ते अपग्रेड करणं, जागेचा प्रश्न, घरात बदल किंवा स्थलांतर केल्यास पर्याय काय, विजेची उपलब्धी आणि तिचे शुल्क आदी अनेक कंगोरे यात येतात.’

पीएचडीसाठी त्याला पाच वर्षांचं फंडिंग मिळालं आहे. सध्या अनेक वेबिनार्स अटेंड करणं, वाचन करणं सुरू आहे. शिवाय मेथडॉलॉजी टेस्ट करणं सुरू आहे. सौर ऊर्जा सध्याच्या वीज वितरण यंत्रणेसाठी किती किफायतशीर होऊ शकते, याचा अभ्यास सुरू आहे. कोविडच्या संकटामुळे संशोधनाचा वेग मंदावला आहे. म्हणावी तेवढी प्रॉडक्टिव्हिटी राहात नाही, याविषयी तो खंत व्यक्त करतो. त्याचे मार्गदर्शक डॉ. रंगन बॅनर्जी हे लॉकडाऊनमध्येच ठरले. त्याआधी वर्षभर आधी ते कोर्सवर्क शिकवायला होते. गेल्या वर्षी लॉकडाऊन झाल्यावर तो सांगलीला घरी गेला होता. अनलॉकनंतर तो कॅम्पसमध्ये परतला. तरीही दर आठवडय़ाला तो आणि गाइड ऑनलाइनच भेटतात. मार्गदर्शकांशी समोरासमोर संवाद करता येणार नाही, असं त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं, असं त्याला वाटतं. डॉ. बॅनर्जी यांचं त्याला वेळोवेळी मोलाचं मार्गदर्शन लाभतं. त्याच्या कामाकडे त्यांचं बारकाईनं लक्ष असतं. ते विद्यार्थ्यांना फार चांगल्या पद्धतीनं समजून घेतात. त्यांच्यासोबत झालेल्या ऑनलाइन मीटिंग्जच्या नोट्स प्रतीकने नीट नोंदवलेल्या असल्याने त्याचा फायदा त्याला वर्षांखेरीज कमिटीसमोर प्रेझेंटेशन करताना झाला. हॉस्टेलवर राहताना सगळ्या कोविड गाइडलाइन्स कटाक्षानं पाळाव्या लागतात. या काळात अभ्यासाखेरीज त्याने खूप वाचन केलं. सध्या बराक ओबामांचं ‘अ प्रॉमिसलँड’ हे पुस्तक वाचतो आहे. याखेरीज ‘सिटीज स्कायलाइन’ हा कॉम्प्युटर गेमही तो खेळतो. त्यात शहर डेव्हलप करायचं असतं. त्यात आर्थिक मर्यादा घालून दिली आहे, ती ओलांडल्यास गेम संपतो. स्वीडनमधील स्टॉकहोमच्या स्थानिक सरकारने नवीन शहरी वाहतूक प्रणालीची योजना तयार करण्यासाठी या गेमचा वापर केला आहे. हा गेम खेळल्याने त्याला वास्तविकतेच्या जवळ जात व्यापक आणि साध्यासोप्या पद्धतीने त्या दृश्याची कल्पना करता येते. अभ्यासातून वेळ मिळेल तसा तो ब्लॉगही लिहितो. पीएचडीनंतर आपल्या देशासाठी आणि लोकांसाठी काही तरी उपयुक्त काम करावं असा त्याचा मानस आहे. प्रतीकला त्याच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2021 2:21 am

Web Title: pratik joshi research on rooftop solar energy zws 70
Next Stories
1 बीइंग पॉझिटिव्ह
2 वस्त्रान्वेषी ; धोतराची कूळकथा
3 नवं दशक नव्या दिशा :  वैश्विकीकरणाची चौथी लाट
Just Now!
X