एखाद्या शब्दाच्या नेमक्या उच्चाराबाबत मनात अनेकदा गोंधळ होतो. कॉलेज प्रेझेंटेशनमध्ये, इंटरव्ह्य़ूमध्ये किंवा हायफाय पार्टीमध्ये इंग्रजी किंवा इतर परकीय शब्दांचा उच्चार चुकीचा केला की, इम्प्रेशन एकदम डाऊन. कुठल्या शब्दाचा उच्चार, कुठल्या ठिकाणी, कसा करावा यासाठीच हा कॉलम..

एखादा शब्द हा मास्टर कीसारखा असतो.. सर्वच कुलपांचा पत्ता ठाऊक असणारा. पृथ्वीतलावर वावरताना देशादेशातल्या भाषिक सीमारेषा जरी गडद असल्या तरी मास्टर कीप्रमाणे जो शब्द या साऱ्या भाषिक कुलपांना तोडून संभाषणास सुरुवात करायला मदत करतो तो शब्द म्हणजे हॅलो. आज आपण या शब्दाचा अचूक उच्चार शोधण्यापेक्षा या शब्दाच्या उच्चारांची विविध रूपं शोधणार आहोत. याचं मुख्य कारण म्हणजे हेलो, हालो, हलाव, हलो अशा विविध रूपांत या शब्दाने संभाषणास सुरुवात होते आणि ही सर्व रूपं आपापल्या परीने अचूकच ठरतात.
या शब्दाचे मूळ रूप शोधण्याचा प्रयत्न केला तर नदीचे मूळ वा ऋषीचे कूळ हा नियम याला लागू करावा लागेल. याची मूळ रूपे विविध भाषांमध्ये विविध संदर्भासह जोडलेली आहेत आणि आधुनिक काळातील या शब्दाच्या वापराला खूप साऱ्या दंतकथाही चिकटल्या गेल्या आहेत. जुन्या जर्मन भाषेत hallo किंवा hollo नावाचा शब्द होता. बोटीतून प्रवास करणारे नावाडी एखाद्याचे लक्ष वेधून घेण्याकरिता या शब्दांचा वापर करत. हॅलोपासून संभाषणाची सुरुवात होते म्हणजे एक प्रकारे लक्ष वेधण्याचाच तो प्रकार असतो.
फ्रेंचमध्ये hola असा शब्द होता. त्याचा whoa there या उद्गारार्थी शब्दांसाठी पर्याय म्हणून वापर व्हायचा. तर hullo, hollo अशा उच्चारांचा वापर शिकारीच्या वेळी होई. एखादं सावज शिकाऱ्याला गवसलं किंवा त्याच्या नजरेच्या टापूत आलं की तो hullo, hollo असा उद्गार काढून इतरांना सूचना द्यायचे. भूतकाळातील या साऱ्या hallo, hollo, hola, hullo, hollaयांना इथे आमंत्रित करण्याचं कारण, आजचं हॅलो हे या शब्दांतूनच निर्माण झालंय. त्यामुळे विविध देशांत, प्रांतांत त्याचे जे विविध उच्चार होतात ते एक प्रकारे न्यायाचं ठरतं. एकाच उच्चाराचा आग्रह धरता येत नाही. पण त्यातल्या त्यात अगदी कॉमन उच्चार कोणता? तर हॅलो. पण ‘लो’ला अगदी हलकेच ‘अ’चं शेपूट ब्रिटिश वा अमेरिकन मंडळींनी जोडलंय. ‘हॅलोअ’ असा काहीसा उच्चार त्यातून तयार व्हावा.
‘हाय’ या अर्थाने वा एखाद्याला ग्रीट करण्याच्या हेतूने हॅलोचा वापर अगदी अलीकडचा. ग्राहम बेलच्या टेलीफोनच्या शोधानंतरचा आहे. त्यातही प्रसिद्ध संशोधक थॉमस अल्वा एडिसनने आपल्याला फोन करणाऱ्या मंडळींना ‘हॅलो’ने सुरुवात करण्याचा सल्ला दिला होता, असे सांगितले जाते. त्याकाळात टेलिफोन एक्स्चेंजमध्ये काम करणाऱ्या मुलींना ‘हॅलो गर्ल्स’ असे संबोधले जाई. टेलिफोनचा वापर जसजसा वाढत गेला तसतसं हॅलो आणि त्या हॅलोची विविध रूपं सर्वदूर होत गेली. आज दिवसभरात या शब्दाचा वापर न करणारी मंडळी फारच थोडकी असतील. तर अशा या मास्टर की हॅलोने एक खूपच सुंदर पूल जोडला आहे. अज्ञात भाषेच्या व आपल्या संभाषणाचा. परक्या देशात ती भाषा येत नसतानाही सुहास्य वदनाने केलेलं हॅलो, खूप काही साध्य करून जातं. म्हणूनच ज्ञात, अज्ञात वाचकांशी दुवा जोडण्याचा हा एक प्रयत्न. हॅलोच्या माध्यमातून.
रश्मी वारंग – viva.loksatta@gmail.com