गायत्री हसबनीस

नेमकेपणाने सांगता न येणाऱ्या अशा कुठल्या मानसिक अस्वास्थ्यामुळे तरुण पिढीचा आनंद हरवत चालला आहे, हा प्रश्न पुन:पुन्हा मनात पिंगा घालत राहतो. तरुण, कोवळी मनं जेव्हा कशाचाच थांगपत्ता लागू न देता आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात तेव्हा हा प्रश्न पुन्हा एकदा अनुत्तरितच राहिल्याची भावनाच मनात उरते.  नोकरी, करिअर, लग्न आणि रिलेशनशिप अशा प्रत्येक गोष्टीत जिद्दीने लढा देणारी आजची जागरूक पिढी अचानक एका क्षणी सगळंच संपवायचा निर्णय का घेत असावी? हे मानसोपचारतज्ज्ञांशी बोलून जाणून घेण्याचा प्रयत्न ‘व्हिवा’ने केला.. 

नैराश्य हा तरुणाईच्या आयुष्यातील परवलीचा शब्द झाला आहे जणू.. नैराश्य आणि आवेग हे दोन घटक तरुणांच्या आत्महत्येसाठी कारणीभूत ठरतात, असं तज्ज्ञांचं मत आहे. नैराश्यामध्ये आनंदाची चुकीची व्याख्या, यशाचा हव्यास, भीती, दबाव आणि सोशल मीडियाला जवळ करून जगाशी संवाद साधण्याची लागलेली सवय अशा गोष्टींचा समावेश होतो. नैराश्य हे आनुवंशिकसुद्धा असते, असेही तज्ज्ञ सांगतात. अमली पदार्थाचे सेवन, दारू, सायबर बुलिंग, सिगारेटचे सेवन इत्यादी कारणंही नैराश्याची असतात. नैराश्य का येते, याबद्दल विस्ताराने सांगताना ‘दिशा काऊन्सिलिंग सेंटर’च्या काऊन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट नेत्रा खेर म्हणतात, असमाधानकारक वृत्ती हे यामागचं महत्त्वाचं कारण आहे.  इतरांना एखाद्या मुलात चांगल्या दिसणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात मात्र त्या मुलाला समाधान देत नाहीत. मग आपल्याला आलेलं असमाधान आणि आपल्याला हवं होतं ते समाधान यात त्या मुलाची तुलना सुरू होते आणि अशा वेळी नैराश्य येते. आपण कोणाशी बोलावं, असा विचार तो करायला लागतो आणि त्यातूनही नैराश्य वाढत जाते. नैराश्याबरोबरच आवेगदेखील आत्महत्येस कारणीभूत ठरतो कारण दुसऱ्यांशी जुळवून न घेता, परिस्थिती समजून न घेता स्वत:च्या अपेक्षा आणि वास्तव यांची सांगड न घालता येणारी तरुण मनं त्याच आवेगाने आत्महत्येस प्रवृत्त होतात. अनेकदा नैराश्य आलं आहे याचं निदान लवकर होत नाही हेही एक महत्त्वाचं कारण या आत्महत्यांमागे असल्याचं त्या सांगतात.

नैराश्य आल्यानंतर आयुष्यातील आनंदाचा निर्देशांक कमी होतो. आनंद शोधता येत नसल्याने मग दु:खाला महत्त्व दिले जाते आणि स्वत:च्या दु:खावर त्यांचा इतका विश्वास बसतो की त्याला कवटाळूनच ते आपलं बरंवाईट करून घेतात. ‘रिलेशनशिप, परीक्षा, नोकरीतले ताणतणाव-यशापयश याबरोबरीने एकटेपणा या गोष्टी भारतीय तरुणांना उदासीनतेकडे नेतात. अपयश येण्यामागेदेखील कुठला तरी दबाव आणि यशाच्या शोधात बदलत जाणाऱ्या तरुण पिढीच्या महत्त्वाकांक्षा बऱ्यापैकी कारणीभूत ठरतात, असं मतं नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या चाइल्ड अ‍ॅण्ड अ‍ॅडोलसन्ट मानसोपचारतज्ज्ञ डॉ. वाणी कुल्हळी यांनी व्यक्त केले. सातत्याने बदलत जाणाऱ्या महत्त्वाकांक्षा या एकमेकांमध्ये तुलना करायला भाग पाडतात.  उदाहरणार्थ, अनेकदा ही महत्त्वाकांक्षा इतकी मोठी असते की आपली गरज, क्षमता न ओळखता इतरांसारखं श्रेष्ठत्व हवं ही भावना त्यांच्या मनात जोर धरते. आणि यात ते जरा कु ठे कमी पडले तर ते स्वत:ला निरुपयोगी समजून दु:खी होतात. आजच्या पिढीत फस्ट्रेशन टॉलरन्स, इतरांसोबत सामावून घेणं आणि दुसऱ्यांसाठी आनंदी असणं या भावना कमी आहेत. ज्यातून अपमानास्पद वाटणं आणि इतरांशी विनाकारण वाद घालणं असे पडसाद उमटतात, असेही मत डॉ. वाणी कुल्हळी यांनी मांडले.

‘यश हे आभासी आणि तुलनात्मक असतं, ज्यात आपल्याला काय हवंय, हे मुलांच्या लक्षात येत नाही आणि मुलं त्यात हरवून जातात. जेव्हा आपल्याला खरोखरच काय हवं होतं याची प्रचीती येते तेव्हा मुलं उदास होतात, कारण आजवर आपल्याला नको असणाऱ्या गोष्टीकरता आपण इतकी धडपड करत होतो याचं भान त्यांना येतं. आत्मपरीक्षण न करता इतरांपेक्षा जास्त प्रमाणात आपल्याला मिळतं ते यश अशी मुलांची समजूत होऊन गेलेली असते,’ असं मतं मानसोपचारतज्ज्ञ डॉ. वैशाली देशमुख यांनी व्यक्त केले. अमुक एका पद्धतीने केलेल्या यशाचा विचार प्रत्यक्षात उतरला नाही तर आपण अयशस्वी ठरलो असं त्यांना वाटायला लागतं, असंही त्या नमूद करतात.

नैराश्य वाढत जाण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण हा मुलांचा पालकांबरोबर हरवत चाललेला संवाद हेही असल्याकडे तज्ज्ञ लक्ष वेधतात. पालकांशी त्यांचा सकारात्मक संवाद तर दूरच राहिला, सध्या तरुणाईत वास्तवाची जागा व्हच्र्युअल जगाने घेतली आहे त्यामुळे एक तर तेथील आभासी जग त्यांना आकर्षित करतं. शिवाय तिथे त्यांना इतरांकडून मिळणारं लक्ष हे त्यांच्यासाठी मोठं आकर्षण ठरलं आहे, असं डॉ. कुल्हळी सांगतात. तर सोशल मीडियावरचा हाच ‘फेसलेस’ संवाद मुलांना सोप्पा वाटतो. या संवादाची त्यांना इतकी सवय झाली आहे की, ‘समोरासमोर संवाद’ साधण्याची त्यांची क्षमताच कमी होते, याकडे डॉ. वैशाली देशमुख यांनी लक्ष वेधले.

नैराश्याला कारणीभूत ठरणारा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे पीअर प्रेशर. सध्याच्या वेगवान काळात सर्व स्तरावर तरुण पिढी आग्रही असल्याने अपेक्षा पूर्ण करण्यास अपात्र ठरल्याची भावना, आवडत्या व्यक्तीशी लग्न करण्यात आलेलं अपयश, व्यावसायिक स्तरावर डावलले जात असल्याशी भावना अशा अनेक गोष्टींमधून जाताना डिप्रेशनमध्ये एखादी व्यक्ती जाते परंतु पीअर प्रेशर हे व्यक्तिसापेक्ष आहे. एखादा माणूस पीअर प्रेशर नसतानाही आपल्यावर तसे प्रेशर आहे अशी समजूत करून घेतो, तर एखाद्याला तसे प्रेशर असणे चुकीचे वाटत नाही. इथे स्वभावाचा, व्यक्तिमत्त्वाचा भाग येतो. एखाद्याच्या प्रतिक्रियेला आपण कसा प्रतिसाद कसा देतोय त्यानुसार पीअर प्रेशर कसे हाताळले जाते हे महत्त्वाचे ठरते. रिलेशनशिपची बिघडणारी गणितं आणि कधी कधी त्यात येणारं अपयश यातूनही नकारी भावना वाढीस लागून मुलं आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. डॉ. वैशाली देशमुख यांच्या मते रिलेशनशिप ही पीअर प्रेशरमुळे विकसित होऊ शकते, हार्मोन्समधील बदलामुळे तर एकटेपणादेखील एखाद्याला रिलेशनशिपमध्ये येण्यास प्रवृत्त करतो. रिलेशनशिपला अतिरेकी आणि एक्सक्लुझिव्ह महत्त्व दिलं तर ब्रेकअपनंतर नैराश्याला समोरं जायला लागण्याची शक्यता वाढते. तर नेत्रा खेर यांच्या मते आजच्या काळात रिलेशनशिप ही लवकर सुरू होते.  रिलेशनशिपमध्ये असणारी व्यक्ती सुखी किंवा दु:खी दोन्ही असू शकते. यात पुन्हा भावनिक-शारीरिक छळ, फसवणूक, सायबर क्राइम आणि पोर्नोग्राफी अशा गोष्टींची भर पडत गेली तर त्यातून येणारा ताण असह्य़ होतो.

एकमेकांशी परस्परसंबंधित असलेले हे घटक  नैराश्यात भर घालत असतात, हे वास्तव आहे. मात्र सध्याच्या घडीला चैनीचे आयुष्य जगण्याची अपेक्षा, तशी धडपड, स्पर्धा आणि स्वत:वरच गोष्टी लादून घेणं या गोष्टींचा खूप मोठा परिणाम तरुण पिढीवर होतो आहे, हे यातून लक्षात येत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे आपली क्षमता, अपेक्षा आणि वास्तव यातील फरक ओळखणं, पालक-मित्र यांच्याबरोबरचा सकारात्मक संवाद, अपयश-नकार पचवून पुढे जाणं अशा अनेक गोष्टी नव्याने तरुण पिढीने समजून घ्यायला हव्यात, तरच फु लण्याआधीचे हे कोमेजणं थांबवता येईल.

viva@expressindia.com