देशातील नवतरुणांच्या मृत्यूचं सर्वात मोठं कारण आत्महत्या असल्याचं, नुकत्याच एका जागतिक पातळीवरील अहवालातून स्पष्ट झालंय. वर्षांला तब्बल ६० हजार तरुण स्वत:हून मृत्यूला जवळ करतात. १५ ते २४ या वयोगटातील तरुणांबाबतचं हे सर्वेक्षण आहे. आजच्या तरुणाईला हा टोकाचा निर्णय घ्यायला लावणारे असे कुठले ताण आहेत, हे शोधून त्यातून बाहेर यायचे मार्ग शोधायलाही मदत करायला हवी.

विचारातून वगळलेला वर्तमान कधी तरी अचानक वर्तमानपत्रांतून, समाजमाध्यमांतून डोकं वर काढतो आणि अचानक त्याची नोंद घेतल्यासारखी होते. त्याचं गांभीर्य जाणवतं, मात्र भीषणता कुठे तरी सवयीची झाल्यामुळे जाणवेनाशी होते. एखादी आत्महत्या.. आपल्याच वयाच्या कुणी तरी केलेली.. पण एक सुस्कारा टाकून बातमी विसरण्याखेरीज त्यापुढे काही घडत नाही. कधी तरी या सगळ्यात ‘तिच्या’सारख्या एकीच्या बाबतीत चर्चा झडतात. वर्ष-दोन वर्षांपूर्वी तिच्याचसारख्या कुण्या दुसरीवर झडल्या होत्या तशाच. त्यांचं प्रसिद्धीचं वलय ही त्यातील अधोरेखित बाब; पण या अशा केविलवाण्या पळवाटांना जेव्हा आपल्याच आजूबाजूचं कुणी तरी बळी पडतं तेव्हा? प्रश्न नवा नाहीये; पण आपल्या नव्या पिढीचा नक्की आहे. त्यासाठी आपली, आपल्या पिढीची पुढे करता येण्याजोगी काही कारणंही आहेत. सगळं लगेचच हवं असताना होणारी आपली असंयमी घालमेल, अस्थैर्य, ताण इत्यादी आदी.. पण म्हणून आत्महत्येसारख्या घोडचुकांचं ते स्पष्टीकरण ठरणं अजिबातच योग्य नाही.
‘द इन्स्टिटय़ूट फॉर हेल्थ मॅट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्युएशन’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतात वर्षभरात १५-२४ वयोगटातील जवळपास ६०,००० तरुणांनी आत्महत्या केल्या. आत्महत्येचा नुसता प्रयत्न, कुठल्याही प्रकारे स्वत:ला जखमा करून घेणे याचं प्रमाण तर याहून जास्त आहे. तरुणांमधील वाढलेला ताण, मानसिक विकार, बदलती जीवनशैली, स्वभावशैली, वाढतं स्थूलत्व, बेकारी ही स्वत:ला इजा करण्यामागची सर्वेक्षणातून समोर आलेली कारणं. ताणाची कारणं शोधायची, पण तिथेच थांबायचं नाही. ताणव्यवस्थापन आवश्यक. परिस्थितीच्या प्रतिकूलतेवर आजची मुलं कशी मात करताहेत हे पाहणंही महत्त्वाचं आहे.
परीक्षा, स्पर्धा, यशाच्या अपेक्षा आणि मग अपेक्षाभंग यामुळे नैराश्य आलेल्यांची संख्या मोठी. नुकताच यू.पी.एस.सी.चा निकाल लागला. अनेक तरुणांना निकालाचं प्रेशर होतं, अनेकांचा अपेक्षाभंग झाला आणि अनेकांना नैराश्यानं घेरलं. स्पर्धा परीक्षांच्या वर्तुळातली अनिश्चितता, पालकांनी मुलांकडून केलेल्या अवाजवी, अवास्तव अपेक्षा, ध्येयाप्रत पोहोचण्याची विद्यार्थ्यांची क्षमता या सगळ्यातून समतोल साधून ध्येय गाठणं फार थोडय़ांनाच जमतं, पण आयुष्यात हेच सर्वस्व नाही.
यू.पी.एस.सी.ची तयारी करणाऱ्या पुण्याच्या एका तरुणाने नाव न सांगण्याच्या अटीवरून त्याचा अनुभव सांगितला. ‘‘यू.पी.एस.सी.ची प्रिलिमिनरी एक्झ्ॉम क्लिअर झाली नाही, तेव्हा मी त्याकडे अपयश म्हणून न पाहता शिकण्यासारखा एक महत्त्वाचा अनुभव म्हणून पाहिलं. जेव्हा जेव्हा प्रचंड लो वाटतं तेव्हा मी माझे छंद जोपासतो. मित्रमैत्रिणींना फोन करून त्यांच्याशी गप्पा मारतो, पोहतो, चालतो. तयारीच्या आजवरच्या दोन वर्षांच्या कालावधीत माझी याबाबतीत काही निरीक्षणं आहेत. जेव्हा इंजिनीअरिंग, मेडिकल करणारे पॅशनेटली यूपीएससीची तयारी करतात तेव्हा अटेम्प्ट यशस्वी झाला नाही की आपलं साधारण १० लाखांचं नुकसान झालं या दृष्टीने ते त्याकडे पाहतात. काही जण पहिला प्रयत्न यशस्वी झाला नाही की लगेचच भीतीने ‘मला हे जमणार नाही’ म्हणून मोकळे होतात. काहींची तऱ्हा याहूनही निराळी असते. प्लॅन बी बॅक अप प्लॅन म्हणून तयार ठेवलेला असताना ते प्लॅन बीमध्येच इतके रमतात की आपण ‘खरं तर’ यूपीएस्सीच्या बाबतीत पॅशनेट होतो याचा बहुधा त्यांनाच विसर पडत असावा,’’ असं तो म्हणाला.
हे झालं करिअर वाटचालीतील आव्हानांच्या बाबतीत, पण वैयक्तिक पातळीवरही वाटय़ाला आलेलं एकाकीपण, संवादाचा अभाव यामुळे आतल्या आत कोसत राहणं एका पॉइन्टला सहन झालं नाही की कुणी तरी असंच अतिरेकी पाऊल उचलतं. ही मैत्रीण पूर्वी खूप एकटी राहणारी, एकाच मित्राशी सारं काही शेअर करणारी. तिनेदेखील नाव न लिहिण्याच्या अटीवरून तिचा सेल्फ हार्मचा अनुभव शेअर केला. मैत्रिणीने फार पूर्वी स्वत:ला इजा करून घेतलेली, त्या जवळच्या मित्राच्या अकाली जाण्याचा धक्का सहन न होऊन. तीच मैत्रीण त्या अघोरी प्रयत्नातून पूर्णत: बाहेर पडून आज काही वर्षांनी वेगवेगळ्या सामाजिक संस्थांसाठी काम करून मैत्रीचा खरा अर्थ एका प्रगल्भ जाणिवेने जगते. तिचं एकूण व्यक्तिमत्त्व पाहून अनेक जण तिच्याकडून प्रेरणा घेतात. वेगवेगळ्या वयोगटातील अनेकांशी मैत्री करून, त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करून तिने चॅनलाइज केलंय.
आयुष्यातला एखादा टप्पा प्रतिकूल वाटला तरी तेच सर्वस्व नाही. परिस्थिती बदलणंही बऱ्याच अंशी आपल्या हातात असतं. मनाच्या कणखरपणातूनच ही अमाप सकारात्मकता विचारात, कृतीत, व्यवहारात येते.. आणि वर्तमानात तगून राहायला साहाय्य करते. शेवटी आपल्याला प्रतिकूल परिस्थितीला दोषी ठरवून सेल्फ हार्मची पळवाट शोधायची, की ‘सेल्फ हार्म-नी’चा तोडगा काढून प्रतिकूलतेतून अनुकूल परिणाम साधायचाय हे ज्याचं त्याने ठरवायचं.
(संकलन साहाय्य : वेदवती चिपळूणकर)